कोरीव कामाच्या व्यवसायातून उभ्या राहिल्या मनमाडच्या रेखाताई

रेखाताई मोरे
रेखाताई मोरेesakal

मनमाड (जि. नाशिक): कुटुंबातील सदस्य म्हणून वावरताना अनेकदा खचून जाण्याचे प्रसंग आले. गरिबीच्या परिस्थितीला तोंड देतानाच काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगून त्यांनी स्वतःला उभं केलं. परिस्थिती बदलायची असेल तर भक्कम व्हावेच लागेल, याच आत्मविश्वासातून लाकडावरील कोरीव काम करण्याच्या व्यवसायातून उभ्या राहिल्या त्या मनमाडच्या रेखाताई मोरे..!

कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना परिस्थितीमुळे शासकीय सेवा करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं... काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या शिक्षण अर्ध्यावरच सुटलं... रेखा विशाल मोरे... शिक्षण अकरावी... माहेर मालेगाव तालुक्यातील झाडी एरंडगावचे, तर सासर मनमाडचे... माहेरी वडील जिभाऊ गुठले यांचे पत्नी सरूबाई यांच्यासह मुलगी रेखाताई आणि दोन मुलं, असं पंचकोनी कुटुंब... तुटपुंजी कोरडवाहू शेती फक्त नावालाच... त्यामुळे गुठले कुटुंबाला मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुटुंबाला आधार म्हणून पाचवीत असतानाच रेखाताईंनाही मोलमजुरीच्या निमित्ताने कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी आली. मात्र परिस्थिती बदलण्याची ताकद माणसाला नक्कीच जगण्याची ऊर्जा देत असते, हेच रेखाताईंच्या बाबतीत घडले. कुटुंबातील मुलीच्या लग्नाची जबाबदारी म्हणून वडिलांनी रेखाताईंचे लग्न अकरावीत असतानाच २००२ मध्ये करून टाकले. येथेच शिक्षणाला ब्रेक लागला.

सासरीही परिस्थिती जेमतेम...

सासरी पती विशाल मोरे यांच्या कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. विशाल यांचे शिक्षणही बारावीपर्यंतच. मात्र कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पती विशाल हे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम शिकून या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावत होते. केवळ ‘चूल आणि मूल’ या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी रेखाताई पर्याय शोधत होत्या. मात्र संधी मिळत नव्हती. याच काळात सासरे अशोक मोरे यांचे आजारपणाने डोके वर काढले आणि कुटुंबाला आर्थिक चटके बसत होते. आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी रेखाताई आणि त्यांच्या सासूबाई चंद्रभागाबाई या मनमाडमध्ये रोजंदारीवर गोधडी शिवून देण्याचे काम करत होत्या. या काळात त्यांना या कामामुळे अन्य कुटुंबांकडून अवहेलनाही सहन करावी लागली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रेखाताई यांची धडपड पाहून पती विशाल यांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

पतीला दिली साथ

कुटुंबावरील आर्थिक संकटातून बाहेर पडत असतानाच सासऱ्यांचे निधन झाले. पतीची होणारी ओढाताण बघून आणि लाकडी इलेक्ट्रिक बोर्ड नाशिकहून आणण्यात जाणारा वेळ लक्षात घेता, हे काम स्वतः करण्याची इच्छा व्यक्त केली. विशाल यांनीही त्यांना पाठबळ देत लाकूड डिझाईन, तसेच बोर्ड खाचण्याचे मशिन विकत घेतले. यामुळे नाशिक येथून साहित्य आणण्यात जाणारा वेळ तर वाचलाच शिवाय रेखाताई यांच्यातील व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागला. त्यामुळे पतीला इलेक्ट्रिक फिटिंगसाठी लागणाऱ्या बोर्डसह मनमाडमधील इतरही कोरीव कामांसाठी त्यांना पैसे मिळू लागले. पहिल्याच दिवशी तीन बोर्ड खाचण्याच्या कामातून ९० रुपयांची कमाई झाली आणि येथूनच रेखाताई यांच्या व्यवसायाला भरभराटी मिळाली. २०१० मध्ये या कामातून ९० रुपयांनी झालेली सुरवात आज दिवसाकाठी सुमारे ५०० लाकडी बोर्ड कट करण्याच्या कामातून त्यांनी आर्थिक घडी बसविली आहे.

रेखाताई मोरे
सत्तर लाख रुपयांचे पॅकेज नाकारून साकारली आयटी कंपनी

कोरोनातही उभा केला पर्याय

लॉकडाउनमुळे आर्थिक संकट कोसळले. मात्र नेहमीच सकारात्मक विचार करणाऱ्या रेखाताईंसमोर संकट आले. लाकडावरील कलाकुसरीचे काम आणि पतीचेही फिटिंगची कामे बंद पडले; पण रेखाताई यांनी खचून न जाता मनमाडमध्ये वास्तव्य असलेल्या परिसरात त्यांनी छोटेसे किराणा दुकान थाटले. यामुळे कुटुंबाला मिळालेल्या या आधाराचा उल्लेख करताना केवळ रेखाताई याच नाही, तर त्यांचे पती विशाल यांनाही अश्रू आवरणे कठीण बनले होते.

रेखाताई मोरे
अक्षय्य तृतीया का साजरी करतात माहितीये?

महिलांसाठी ठरल्या आयडॉल

किराणा दुकानाच्या निमित्ताने पती विशाल हे डिझाइनची कामे सांभाळण्याबरोबरच किराणा दुकानाकडेही लक्ष देताहेत. रेखाताई यांच्या लाकडावरील कलाकुसरीच्या कामात पती विशाल यांचे प्रोत्साहन, तसेच नववीत शिकणारी मुलगी नूतन, मुलगा अंश यांचेही सहकार्य मिळते आहे. कुटुंबातील घटक म्हणून जबाबदारी सांभाळताना परिस्थितीला हरविण्याची जिद्द राखून प्रत्येक महिलेने सकारात्मक विचार केल्यास परिस्थिती बदलण्याची ताकद तिच्यात आपसूकच येते, हेही त्या सांगण्यास विसरल्या नाहीत. कोणत्याही कामाची लाज न बाळगता जिद्दीच्या जोरावर लाकडावरील कोरीव कामाच्या व्यवसायातून स्वतःची ओळख उभ्या केलेल्या रेखाताई नक्कीच महिलांसाठी आयडॉल ठरल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com