आपण सगळे भारतीय आहोत!

गिरगावमधील एका कंपनीच्या नोकरीविषयक जाहिरातीत ‘मराठी नॉट वेलकम’ अशी अट घालण्यात आली होती.
marathi people not welcome
marathi people not welcomesakal

- रेणुका शहाणे

गिरगावमधील एका कंपनीच्या नोकरीविषयक जाहिरातीत ‘मराठी नॉट वेलकम’ अशी अट घालण्यात आली होती. दुसरीकडे घाटकोपरच्या गुजराती सोसायटीत मराठी पत्रके वाटण्यावर कार्यकर्त्यांना विरोध झाल्याने ऐन निवडणुकीत पुन्हा ‘मराठी’चा मुद्दा चर्चेला आला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्याबाबत चिंता व्यक्त करत ‘मराठी लोकांना घरे न देणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपले बहुमूल्य मत देऊ नका,’ असे थेट आवाहन करत ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिले आहे. त्याबाबत त्यांची रोखठोक भूमिका त्यांच्याच शब्दांत...

आपल्या राज्यात जर कुणी आपल्यालाच दुय्यम स्थान द्यायचा विचार करत असेल तर त्याला आपण विरोध करायलाच हवा, अशा मताची मी आहे. मुळात सगळा मुद्दा सुरू झाला तो जान्हवी सरना नावाच्या एका मुलीमुळे. तिने केलेल्या एका पोस्टमुळे. ती गिरगावच्या एका कंपनीसाठी एचआर म्हणून काम करत होती आणि तिने त्या जॉब प्रोफाईलमध्ये ‘मराठी नॉट वेलकम’ असं लिहिलं होतं.

अशा अनेक कंपन्या असतील ज्यांना मराठी कर्मचारी नको असतात आणि ती मुलगी पकडली गेली, कारण तिने जाहीरपणे जाहिरातीत तसं लिहिलं होतं. असे कित्येक जण असतील ज्यांचा मराठी माणसांबद्दल असा समज आहे आणि ते चुकीचं आहे. त्याचा विरोध कसा करता येईल याचा विचार आपण करायला हवा.

कुठल्याही पक्षाच्या किंवा त्याच्या कार्यकर्त्याच्या मदतीशिवाय एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो किंवा आपल्याकडे जो अधिकार आहे त्याचा वापर करून आपण त्याला कसा विरोध करू शकतो तर ते म्हणजे, आपल्या हक्काचं मत... हा आपला एक मोठा अधिकार आहे आणि आपली जबाबदारीही. मराठी माणसांनी जे असं करतात अशा उमेदवारांचं समर्थन करण्याची अजिबात गरज नाही.

हा जो मराठीचा द्वेष आहे तो आपण सगळ्यांनी हाणून पाडला पाहिजे. आपल्या अवतीभवती जी माणसं आहेत त्यांची विचारसरणी आणि त्यांची बोलण्याची भाषा आपल्यासारखीच असावी. हा प्रत्येक माणसाचा स्वभावच असतो. एक लक्षात घ्या, आपण सगळे भारतीय आहोत आणि तसंच एकत्र राहायला हवं. मात्र, अशा विषयांचा राजकीय वापर केला जातो. ते चूक आहे. मी एक नागरिक आहे आणि मला हा मुद्दा पटत नाही.

म्हणून तो एक नागरिक म्हणून मी मांडणार आहे, मांडत राहीन. मला राजकारणात पडायचे नाही आणि राजकारण करायचेही नाही. हा केवळ मराठी भाषेच्या अस्मितेचा, तिच्या सन्मानाचा मुद्दा आहे. असे भाषा विरोधाचे प्रकार सगळे कुठेतरी थांबवायला हवेत. आपलं मत आपण कोणाला द्यायला हवं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं. जे अशा प्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात अशा उमेदवारांना पाठिंबा देण्याची गरज नाही.

राजकीय लोकांना पराचा कावळा करायची सवय असते. आपण नागरिकांनी सावध राहायला हवं. त्यांचा स्वार्थ ते साधतात लोकांमध्ये फूट पाडून, नागरिकांमध्ये द्वेष पसरवून, आणि ती गोष्ट नागरिकांच्या वागणुकीमध्येसुद्धा बघायला मिळते. मराठी भाषिकांबद्दलच्या द्वेषाला कारणीभूत हे असंच राजकारण आहे. तरीही मी कुठल्याही पक्षाची प्रतिनिधी नाही हे अधोरेखित करायचे आहे. मला एक नागरिक म्हणून जे वाटलं ते मी बोलले आणि ते बरोबरच बोलले.

मराठी भाषेचा विषय येतो तेव्हा कुठेतरी खूप वाईट वाटतं. आपल्या राज्यात हिंदीला जास्त महत्त्व दिलं जातं. मराठी भाषेला विनाकारण कमी लेखलं जातं. आपली मराठी माणसंच काही प्रमाणात त्यात आघाडीवर असतात, हे दुर्दैवी आहे. आजूबाजूला किंवा आपल्या कंपनीमध्ये फक्त आपलीच भाषा बोलणारी माणसं हवी, असं वाटू शकतं; पण एखादा मराठी माणूस असेल तर त्याच्या भाषेवरून त्याचा पाणउतारा करू नये, अशी अपेक्षा करण्यात गैर काय...

आपल्या राज्यात तरी भूमिपुत्रांना कुठल्याही स्तरावर दुय्यम स्थान मिळूच नये. कारण बाहेर काय होतं ते आपल्याला माहिती नसतं किंवा त्यावर आपण काही करू शकत नाही; पण निदान आपण आपल्या परीने इथे काही तरी प्रयत्न नक्कीच करू शकतो. राजकीय मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या त्या वेळेस जे मुद्दे बरोबर वाटतात ते उचलतात; पण त्याचा सगळ्या बाजूने विचार करत नाहीत. अशा प्रकारांमुळे मतांसाठी जनतेमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातात.

अशा राजकारणाचा सर्वसामान्य जनतेवर परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी ते खूप गांभीर्याने घेतात आणि मग तेही तसंच वागू लागतात. राजकारणापलीकडे आपला समाज कसा बदलत चालला आहे हे आपण गेली अनेक वर्षं बघत आलोय. असाच द्वेष पसरत राहिला तर मग समाजाचा विकास कसा होणार? विकास व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. पण समाजात शांततापूर्ण वातावरण नसेल किंवा एकमेकांबद्दल चांगल्या भावना नसतील तर विकास कसा होणार?

आपला देश अनेक छोट्या छोट्या प्रांतांत विभागलेला आहे. त्याची अनेक कारणं आहेत; पण आपण भारतीय आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हेच सगळ्यांना पटवून द्यायला हवं. आता मी मराठी आहे आणि मला अमुक अमुक प्रांतातील माणसं नकोत, असे मी म्हटले तर तेही चुकीचंच आहे.

चित्रपटसृष्टीत मी अनेकदा पाहिले आहे की कितीतरी मराठी चित्रपटांना सिनेमागृहच मिळत नाहीत. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. एखादा चित्रपट थिएटरमध्ये लागला आहे आणि त्याची जाहिरात व्यवस्थित होत नसेल तर मग प्रेक्षक त्याच्याकडे कसा ओढला जाणार, ही एक मोठी खंत आहे. त्या विषयावर आतापर्यंत खूप मोठ्या स्तरावर चर्चाही झालेल्या आहेत; पण अजूनही या समस्येचं समाधानकारक निरसन झालेलं नाही.

आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. जेव्हा तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल तेव्हा तिच्याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जाईल. मराठी भाषेचा गोडवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपणच कुठेतरी कमी पडतो आहोत. इतर कुठल्याही भाषा तुम्ही शिका; पण आपल्या भाषेकडे दुर्लक्ष व्हायला नको हे मुळात लक्षात ठेवलं पाहिजे. मी आजवर अनेक वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांत काम केलं आहे.

माझ्या भाषेचा अपमान होत असता तर मी तिथे कामच करू शकले नसते. तसं जर झालं तर मी नक्कीच त्यांना चार शब्द ऐकवेन. जोपर्यंत ते त्यांची चूक सुधारत नाहीत किंवा त्यांची वागणूक बदलत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करणारच नाही. पण मला अशी वागणूक कुठे पाहायला मिळाली नाही. आज मी अनेक चित्रपट आणि नाटकांतून कामं केली. तीही वेगवेगळ्या भाषांतील; पण त्यांची मराठी भाषेबद्दलची भावना खरंच खूप चांगली आहे. म्हणूनच मला आजपर्यंत असा अनुभव आलेला नाही.

आज एखाद्या भाषेवरून किंवा इतर कुठल्याही गोष्टीवरून ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय ते चुकीचं आहे. ट्रोलिंग सोशल मीडियावरद्वारे जास्त प्रमाणात पसरते आहे. सोशल मीडियाचे किंवा इतर तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. पण, शेवटी हे सगळं आपल्याच हातात असतं, की आपण त्याचा कशा प्रकारे वापर करायचा ते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com