

Resident Alien
esakal
‘रेसिडन्ट एलियन’ ही मालिका शेवटी एका रुक्ष व तरीही कोमल तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे. ते म्हणजे, मनुष्य हा पूर्णपणे तर्कसंगत नसतो; पण त्याच्या त्या तर्कहीनतेत अदृश्य सौंदर्य दडलेलं असतं.
क्रिस शेरिडनची ‘रेसिडन्ट एलियन’ ही मालिका पाहताना सर्वप्रथम जाणवतं ते तिच्या विचित्र टोनचं विलक्षण संतुलन. पहिल्या दृष्टिक्षेपात एखाद्या हलक्या, कॉमिक-शैलीच्या विज्ञानकथेसारखी वाटणारी ही मालिका हळूहळू एका सखोल, मानवी निरीक्षणात रूपांतरित होते. एक परग्रहवासी पृथ्वीवर कोसळतो, एका डॉक्टरचं शारीर रूप घेतो आणि कॉलराडोच्या एका लहानशा गावात स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, अशा स्वरूपाची मूलभूत गोष्ट आपल्या परिचयाची आहे; मात्र ‘रेसिडन्ट एलियन’ ही केवळ ‘फिश आऊट ऑफ वॉटर’ कॉमेडी नाही. ती परकेपण, असुरक्षितता आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीची एक सुंदर कथा आहे.