रियाज : संगीतातली कठोर साधना

ललित कलांमध्ये संगीतकला ही प्रमुख आहे. संगीतकला साध्य करण्यासाठी साधकाला कठोर परिश्रम करावे लागतात.
riyaaz rigorous practice based on music marathi news
riyaaz rigorous practice based on music marathi news Sakal
Updated on

- किरण फाटक

प्रयत्न या शब्दातील अर्थ संगीतात ‘रियाज’ या शब्दातून सूचित होतो. गायन, वादन व नृत्य यांत प्रावीण्य मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला रियाज असं म्हणतात. प्रावीण्य म्हणजे नेमकेपणा, अचूकता. हे प्रावीण्य मिळवण्यासाठी मन व शरीर संस्कारित करणं, चांगल्या अर्थानं साचेबद्ध करणं म्हणजे रियाज.

ललित कलांमध्ये संगीतकला ही प्रमुख आहे. संगीतकला साध्य करण्यासाठी साधकाला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यासाठी अतीव तळमळ, श्रद्धा आणि कलेवरचं प्रेम त्याला जागतं ठेवावं लागतं.

प्रखर आत्मविश्वासानं, प्रतिभाशक्तीच्या दैवी प्रेरणेनं व कुशाग्र बुद्धीनं जेव्हा स्वर आणि ताल सिद्ध केले जातात व ते आविष्कृत केले जातात तेव्हा संगीतकलेचा जन्म होतो.

निर्गुणातून सगुणाची आनंददायी निर्मिती म्हणजेच कलेची निर्मिती. अभिजात कलांचा संबंध मनाशी असतो. कला ही मनःशांती देते. सर्व कलांत अभिजात संगीत ही कला उच्च आणि प्रथम क्रमांकाची आहे.

ही कला शिकण्याचा सुयोग यावा लागतो. गुरूसुद्धा मिळावा लागतो. कारण, संगीत ही कला साधकाला अध्यात्माच्या मार्गावरून नेत थेट मोक्ष मिळवून देते. म्हणून, संत तुकाराममहाराज म्हणतात : ‘गायनाचे रंगी। शक्ती अद्भुत हे अंगी ।। हे तो देणे तुमचे देवा।। घ्यावी अखंडित सेवा।।’

गायनात-वादनात अद्भुत शक्ती आहे. हे गायन-वादन म्हणजे नादाची साधना व नादयोग आहे. नाद हा ओंकारातून निर्माण झालेला चैतन्यस्वरूप ईश्वर आहे. नादाची उपासना म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश्वराची उपासना, त्रिगुणात्मक श्रीदत्तमहाराजांची उपासना. संत तुकाराममहाराज म्हणतात :

ओलें मूळ भेदी । खडकाचें अंग ।

आभ्यासासी सांग। कार्यसिद्धी ॥

नव्हे ऐसें कांहीं । नाहीं अवघड ।

नाहीं कईवाड । तोंच वरि ॥

दोरें चिरा कापे । पडिला कांचणी ।

अभ्यासें सेवनीं । विष पडे ॥

तुका म्हणे कैंचा । बैसण्याची ठाव ।

जठरीं बाळा वाव। एकाएकीं ॥

म्हणून संगीत हे केवळ शिकून साध्य होत नाही. त्याची उपासना, आराधना व तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्याही कमीत कमी बारा वर्षांची असते. ‘पी हळद आणि हो गोरी’ अशी ही कला सहजसाध्य नाही. कमालीचा संयम, दीर्घ काळ मेहनत यांचा अवलंब करावा लागतो. साधकाची वृत्ती ठेवून अभ्यास एकाग्रतेनं व दीर्घ काळ, न थकता करावा लागतो.

‘प्रयत्नें वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ किंवा ‘यत्न तो देव जाणावा’ अशी काही सुवचनं मराठीत आहेत. प्रयत्नांशिवाय परमेश्वर प्रसन्न होत नाही, म्हणूनच प्रयत्नांना मानवी आयुष्यात फार मोठं महत्त्व आहे.

मन जर कणखर व खंबीर असेल तर रियाजही चांगला होतो. रियाज हा शब्द आपल्याकडे पर्शियन भाषेतून आला. याचा अर्थ कष्टकारक अभ्यास. कलेचा अत्यंत शिस्तबद्ध असा नियमित व भरपूर अभ्यास म्हणजे रियाज.

रियाजाबाबत रॉबर्ट सिम्स (Simms) म्हणतात : Riyaz means, by which concentration is developed. Sustained concentration being a prerequisite for performance.

बबनराव हळदणकर म्हणतात : ‘रियाज या शब्दाचा वापर आवाज कमावण्यासाठी जी मेहनत घेतली जाते त्यासाठी केला जातो; परंतू संगीताच्या सौंदर्यविषयक संकल्पना घडत असताना जे विचारमंथन होतं तोही एक रियाजच असतो. त्याला आपण मानसिक रियाज म्हणू.’

रियाज ही एक यांत्रिक आणि निर्जीव क्रिया नव्हे. रियाज करताना चैतन्याचा स्पर्श होणं गरजेचं असतं. स्वर हे निर्गुण, निराकार, चैतन्यमय असल्यानं त्यांचा सहवास चैतन्य निर्माण करणार यात कसलीच शंका नाही. म्हणून सच्चा, प्रामाणिक रियाज हा साधकाला आत्मिक उन्नततेच्या वाटेवर नेतो.

कुमार गंधर्व म्हणतात : ‘स्वरसाधना ही मंत्रासारखी आहे. ती आयुष्यभर रोज करायची असते. ती करताना संगीतातल्या सौंदर्याचा शोध घ्यायला हवा. सौंदर्य कधीही न संपणारं असतं. साधना डोळसपणे, समजून करावी. तीत आत्मविश्वास यायला हवा.’

रियाज ही रोज करण्याची गोष्ट आहे.

मिश्चेर या सुप्रसिद्ध व्हायोलिनवादकानं म्हटलं आहे : If I don’t practice for one day, I know it. If I don’t practice for second day, the critics know it. If I don’t practice for third day, the public know it.

जे आपल्याला माहीत आहे ते जास्त उजळणं, चकचकीत करणं; जे येत नाही ते येण्यासाठी न थकता भरपूर मेहनत करणं म्हणजे रियाज.

रियाज म्हणजे आपल्या जन्मजात स्वरतालाच्या देणगीला सृजनात्मक प्रतिभाशक्तीची जोड देऊन तिचं सौंदर्यपूर्ण कलाकृतीत रूपांतरित करण्यासाठी केलेला प्रयत्न. स्वरसमूहातून शिस्तबद्ध, प्रवाही, चैतन्यमय, सुंदर आकृतिबंध निर्माण करण्याचा प्रामाणिक, शिस्तबद्ध व नियोजित असा कार्यक्रम म्हणजे रियाज.

रियाजात श्रवण, मनन, चिंतन, रटन, संगीतविषयक वाचन यांचा अंतर्भाव होतो.

रियाज तीन पातळ्यांवर विभागावा लागेल.

१) सुरुवातीचा प्राथमिक रियाज :

क) स्वरांची ओळख होण्यासाठी.

ख) स्वरस्थाने डोक्यात पक्की होण्यासाठी व त्याप्रमाणे गळ्यातून स्वर निघण्यासाठी.

ग) आवाजात गोडवा, शक्ती व सातत्य निर्माण करण्यासाठी.

घ) दमसास वाढवण्यासाठी.

च) लयीचं ज्ञान होण्यासाठी.

२) रागगायनाचा रियाज :

रागासंबंधी पूर्ण ज्ञान होण्यासाठी व राग गळ्यावर चढण्यासाठी जो रियाज आवश्यक असतो तो रागगायनाचा रियाज.

क) रागातल्या महत्त्वाच्या स्वरसंगती गळ्यातून सहजपणे निघण्यासाठी.

ख) स्वराला स्वर जोडण्याचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी. आंदोलित स्वर, कणस्वर, स्पर्श, स्वरमिंड इत्यादी गळ्यातून काढण्याचं कसब आत्मसात करण्यासाठी.

ग) रागातील दाणेदार ताना गळ्यातून निघण्यासाठी.

घ) बंदिश तालबद्ध पाठ होण्यासाठी व तिला आलापांच्या फांद्या फुटण्यासाठी. बोल विकसित करण्याची क्रिया अंगी मुरण्यासाठी.

३) सौंदर्यनिर्मितीसाठीचा रियाज :

यात आत्मपरीक्षण व स्वररचनांचा आणि बंदिश फुलवण्याचा स्वतंत्र सौंदर्यपूर्ण विचार विकसित करण्यासाठी रियाजाची आवश्यकता असते. रागत्व, रागस्वभाव, बंदिशीतील भाव समजून घेऊन आलाप, बोल व तान-अंगाचा संयमित योग्य वापर बंदिशीत करण्याचं कौशल्य विकसित करणं हा या टप्प्यावरील रियाजाचा हेतू असतो.

रियाज या संकल्पनेत ‘आदत’, ‘जिगर’ व ‘हिसाब’ हे शब्द नेहमी येतात. ‘आदत’ म्हणजे सवय. रियाजाची सवय. ‘जिगर’ म्हणजे जिद्द. ‘हिसाब’ म्हणजे लय-तालासंबंधातली गोष्ट. वेळेचा हिशेब, मात्रांचा हिशेब व लयकारीची मनोहर गुंतागुंत समजण्याची कुवत व अभ्यास म्हणजे ‘हिसाब’.

रियाजात स्वरांचा रियाज, तालाचा रियाज आणि बंदिशीचा रियाज या तीन गोष्टी अंतर्भूत होतात.

१) स्वरांचा रियाज हा ‘शुद्ध स्वरालंकार’, ‘मेरुखंड पद्धत’ यांचा आधार घेऊन करावा लागतो. शुद्ध स्वरालंकारांचा रियाज पूर्ण झाल्यावर, शुद्ध स्वरालंकारात एकेक स्वर कोमल करून नंतर दोन स्वर, तीन स्वर आणि नंतर चार स्वर कोमल करून रियाज करावा लागतो.

२) तालाचा रियाज करण्यासाठी प्रथम लयीवर प्रभुत्व मिळवावं लागतं. तबल्याचे बोल पूर्णपणे समजून घेण्यासाठी, ताल तबल्यावर वाजत असताना वारंवार ऐकावा लागतो.

३) बंदिशीचा रियाज हा बंदिशीचं रटन करून, म्हणजेच बंदिश

पुनःपुन्हा म्हणून करावा लागतो. यात बंदिश नोटेशनमध्ये म्हणणं, नंतर बंदिश ‘आ’कारात, ‘उ’कारात, ‘इ’कारात, ‘ओ’कारात गाणं आणि नंतर शेवटी शब्द घेऊन गाणं असा बंदिशीचा रियाज करावा लागतो.

गायनात आवाजाचा लगाव, वादनात वाजवण्याचं तंत्र आणि नृत्यात मुद्राभिनयाला खूप महत्त्व असतं. गायनाचा रियाज केवळ तंबोऱ्यावर करण्यानं डोक्यात स्वरस्थानं पक्की होत जातात. स्वरस्थानं पक्की होईपर्यंत हार्मोनिअमचा आधार घेतला तरी चालतं.

गमकेचे प्रकार, तानांचे विविध प्रकार आपल्या गुरूंकडून समजून घेऊन त्याप्रमाणे रियाज करावा. रियाजासंबंधीचं सर्व ज्ञान संगीताच्या बाबतीत ग्रंथ वाचून मिळत नाही. त्यासाठी लागते ती गुरूची कृपादृष्टी व चांगला गुरू मिळण्याचा सुयोग व शिक्षणात सातत्य राहील अशी परिस्थिती. संगीत ही गुरुमुखी विद्या आहे; त्यामुळे ‘गुरुबिन ग्यान कहाँ से पाऊॅं’ असं म्हणतात ते काही खोटं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com