‘फॅक्ट चेक’ तमाशा आणि माध्यमं

Social-Media
Social-Media

बॉस्टन रिव्ह्यू मध्ये २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रकाशित एका लेखात भारतात अनेक वर्षे काम केलेले केंटारो टोयोमा म्हणतात - " तंत्रज्ञान कितीही चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलं असलं तरी ते फक्त मानवी हेतू आणि क्षमतेचं द्योतक असतं." याचा अर्थ असा, की एखादे तंत्रज्ञान शुद्ध हेतूनं, सक्षम व्यक्ती किंवा गटाकडून वापरले गेले, तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. याउलट वाईट हेतूनं तेच तंत्रज्ञान घातक परिणाम देऊ शकतं. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे सर्वांत जास्त झपाट्यानं वाढणारं तंत्रज्ञान आहे. हा सोशल मीडिया जगात अनेक ठिकाणी लोकांना एकत्र आणण्यात, विचारांची-ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात मदत करत आहे. त्याच वेळी इतर अनेक ठिकाणी हाच सोशल मीडिया दंगली घडवण्यात, दहशतवाद पसरवण्यासाठी वापरला जात आहे. फक्त तंत्रज्ञानात बदल करून या गोष्टी बदलवता येणं शक्य नाही, तर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर मानवी हेतू आणि क्षमतांना बदलण्यासाठी व्यापक काम होणं गरजेचं आहे.

जर सोशल मीडिया समाजात तेढ निर्माण करण्यासाठीचं रणांगण असेल, तर या रणांगणात सर्वांत प्रभावीपणे वापरलं जाणारं अस्त्र आहे - फेक न्यूज. फेक न्यूज म्हणजे नेमकं काय? फेक न्यूजचा सखोल अभ्यास करणारे नोलन हिगडन म्हणतात, "दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती जी तोंडी, लिखित, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात बातमी म्हणून प्रसारित केली जाते ती म्हणजे फेक न्यूज. यामध्ये हेतू वेगवेगळे असू शकतात - आपल्या राजकीय गटातील व्यक्तीची खोटी स्तुती, विरोधी गटातील व्यक्तीची निंदानालस्ती किंवा थट्टा, सामाजिक किंवा धार्मिक तेढ पसरवणे किंवा निव्वळ पैसा कमावणे. फेक न्यूजमुळे आपल्या देशात झालेले मालमत्तेचे आणि जिवांचे नुकसान, आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याला बसलेली खीळ, त्यातून राजकीय आणि धार्मिक गटांमध्ये तयार झालेली दरी याची गणती करणे जवळपास अशक्य आहे. 

यातील सर्वांत वाईट बाब ही, की अनेक प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी किंवा त्यांच्या संपादकांनी, पत्रकारांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून कित्येक वेळा वर उल्लेख केलेल्या अशा चुकीच्या बातम्या  पोस्ट केल्या आहेत. अनेक वेळा आपली चूक लक्षात आल्यावर म्हणा किंवा आपले पितळ उघडे पडल्यामुळे म्हणा, त्या पोस्ट कुठलेही स्पष्टीकरण न देता किंवा माफी न मागता सर्रास डिलीट केल्या गेल्या. पण त्यामुळे जे नुकसान व्हायचे ते आधीच झालेले असते.
शेअरबाजारात काम करणारे आमचे मित्र एक वाक्य नेहमी वापरतात - आपत्ती ही संधीसारखी असते. २३ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाले, शेअरबाजार हजारो अंकांनी पडला, तेव्हा अनेक दलाल मोठ्या संख्येनं शेअर्स खरेदी करत होते. शेअरबाजारात मात्र अनेकांनी आयुष्यभराची चांदी करून घेतली.

काहीसं असंच फेक न्यूजचं झालं : फेक न्यूजच्या वाढत्या भस्मासुरामुळे देशाच्या स्थैर्याला दिवसेंदिवस धक्के बसत असताना, फॅक्ट चेकिंग नावाचा नवा उद्योग उभा राहिला. सोशल मीडियावर फिरत असणाऱ्या सणसणीत फेक न्यूज घेऊन त्यांच्या मागची सत्यता पडताळून लोकांसमोर मांडणे असा चांगला हेतू यामागे होता. सुरुवातीच्या काळात यातून फेक न्यूजचे दिवस भरले असेच चित्र रंगवले गेले. अनेक मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांनीही यात सहभागी होऊन पावले उचलण्यास सुरुवात केली. मग त्यात या फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइट्सला निधी देणे, त्यासाठी अजून प्रगत अल्गोरिथम्स बनवणे अशा प्रकल्पांना सुरुवात झाली. अतिशय सोप्या भाषेत बातमीमधील त्रुटी समजावून सांगणाऱ्या या वेबसाइट्सना जनाधारही मिळू लागला. पण ज्यांच्याकडूनच फेक न्यूजचा प्रसार होत होता, अशा अनेक माध्यमांनी किंवा त्यांच्याशी संलग्न कंपन्यांनी फॅक्ट चेकच्या उद्योगात उडी घेतली. दुसऱ्या न्यूज चॅनेलच्या चुकीच्या बातम्यांची पोल खोल करता करता अनेकांनी स्वतःच्याही जुन्या चुकीच्या बातम्यांची पोल खोलून टाकली. अगदी फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइट्सचेही फॅक्ट चेक केले जाऊ लागले. यासाठी या कंपन्यांनी जाहिरात तसेच लोकवर्गणीतूनही पैसा उभा करण्यास सुरुवात केली. यातून विशिष्ठ पक्षाला किंवा विचारसरणीला मदत करणारे फॅक्ट चेक करू जाऊ लागले आणि फॅक्ट चेकच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला. त्यामुळे फेक न्यूजची पकड कमी न होता अजूनच बळकट होत चालली आहे. सोबतच त्याला उदात्त काम करत आहोत असं दाखवून या मीडिया कंपन्या निधी उभारून अजून मोठ्या होत आहेत.

माध्यमांची जबाबदारी
आम्ही लहान असताना मोजकी वृत्तपत्रं होती. या काळात बातम्या कमी होत्या, त्यामुळे प्रत्येक बातमी लिहिताना, त्यासोबतचे ग्राफिक तयार करताना, वृत्तनिवेदन करताना टोकाची काळजी घेतली जाई. आज मात्र साठ शब्दांत बातम्या, थोडक्यात बातम्या, बातम्यांचे अर्धशतक, सुपरफास्ट बातम्या असा बातम्यांचा धुमाकूळ घालून वाचकांची एका बातमीला वाचून किंवा बघून विचार करण्याची क्षमता मारली जात आहे. त्यावर काम करणे गरजेचे आहे. जर्मनीमध्ये DW news किंवा मूळची इंग्लंडची असलेली BBC News या संस्थांनी उथळ मार्गानं बातम्या न देताही एक व्यवहार्य मॉडेल उभे केले आहे. अशा संस्थांचं अनुकरण होणं गरजेचं आहे.

वृत्तमाध्यमांनी आणि खासकरून वृत्तपत्रांनी डिजिटल माध्यमात जाताना नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबवून सणसणीत बातम्या न देताही वाचकांना आपल्या वेबसाइट्सवर खिळवून ठेवणे गरजेचे आहे. अनेक शाळा मुलांना शिकवण्यासाठी गेमिफिकेशन तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांनी फक्त वरवर अभ्यास न करता सखोल वाचन आणि आकलन करावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अशा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला बातमी क्षेत्रातही जागा मिळावी. वाचकांच्या कमेंट्सच्या स्वरूपात येणाऱ्या प्रतिक्रियांना प्रतिसाद दिला जावा, जेणेकरून हा संवाद त्यांना एकांगी वाटणार नाही आणि ट्रोलिंगची जागा अर्थपूर्ण संवादानं घेतली जाईल.

जेव्हा एखादी बातमी खूप चांगली किंवा खूप वाईट वाटते, तेव्हा उत्तेजित होऊन लगेच त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा ती शेअर करणं टाळा. बहुतेक वेळा बातमी लिहिताना मथळा अशा पद्धतीनं लिहिलेला असतो, बातमी पूर्ण वाचल्याशिवाय त्याचा संदर्भ लागत नाही. त्यामुळे बातमी वरवर न वाचता सखोलपणे वाचा. सोशल मीडियावरील एखादी बातमी खोटी आहे याची तुम्हाला माहिती असेल, तर अशा अकाउंटला योग्य कारण देऊन रिपोर्ट करा. आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एखाद्या व्हॉट् सॲप ग्रुपमध्ये कुणी तेढ पसरवणाऱ्या  बातम्या पसरवत असेल, तर त्यांना तसं करण्यापासून परावृत्त करा. आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध विचारसरणीच्या लोकांशीही ऑनलाइन आणि ऑफलाइन मैत्री करा आणि सामाजिक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करा. यातून एकाच प्रकारच्या फिल्टर बबलमधून बाहेर पडून तुम्हाला विरुद्ध विचारसरणीच्या लोकांसोबत एक अर्थपूर्ण संवाद साधता येईल.

(लेखक ‘झटका डॉट ऑर्ग’ या संस्थेसोबत ‘Climate Change Campaigner’ म्हणून कार्यरत आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com