निसर्गचक्र

आजही समाजात स्त्री आणि स्त्रीचे आरोग्य याबाबत कायम दुर्लक्षित केले जाते...
Rupali Chakankar  women health always neglected in society
Rupali Chakankar women health always neglected in society sakal
Summary

आजही समाजात स्त्री आणि स्त्रीचे आरोग्य याबाबत कायम दुर्लक्षित केले जाते. शारीरिक रचनेचं निसर्गचक्र म्हणून मुलींना सुरू होणाऱ्या मासिक पाळीबाबत ग्रामीणच काय...

आजही समाजात स्त्री आणि स्त्रीचे आरोग्य याबाबत कायम दुर्लक्षित केले जाते. शारीरिक रचनेचं निसर्गचक्र म्हणून मुलींना सुरू होणाऱ्या मासिक पाळीबाबत ग्रामीणच काय, पण शहरी भागातदेखील आजही खूप अज्ञान आहे. आपण डॉक्टरांशी याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो काय? मी ग्राऊंडवर इतर मुलींसोबत खेळू शकेन का? सायकलवरून जाऊ की नको शाळेत? जर जास्त त्रास होतोय तर मी कसं सांगू माझ्या शिक्षिकेला? एक ना हजार प्रश्न... कोण देणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं?

- रूपाली चाकणकर

आयोग कार्यालयात दिवसभर तक्रारदारांची गर्दी होती. माझ्या काही सामाजिक संस्थेसोबत बैठका होत्या. बैठकीदरम्यान माझ्या सहकाऱ्यांनी एक कागद माझ्याकडे सरकवला, वाचून आनंद झाला आणि तितकेच आश्चर्य वाटले.

मी लगेच माझ्या सेक्रेटरींना सांगून संबंधित व्यक्तीला कॉल जोडून द्यायला सांगितला. नाशिकचा परिवार. मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचे स्वागत करणारा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. मी पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कन्येलादेखील शुभेच्छा दिल्या. कदाचित वाचायला आणि ऐकायला थोडं अवघडल्यासारखे वाटत असेल; पण जे सत्य आहे ते आम्ही सहजासहजी स्वीकारत नाही, ही आमची मानसिकता.

आजही समाजात स्त्री आणि स्त्रीचे आरोग्य याबाबत कायम दुर्लक्षित केले जाते. शारीरिक रचनेचं निसर्गचक्र म्हणून मुलींना सुरू होणाऱ्या मासिक पाळीबाबत ग्रामीणच काय, पण शहरी भागातदेखील आजही खूप अज्ञान आहे. टीव्हीवरच्या जाहिरातीने किमान आम्हाला थोडीफार माहिती दिली; पण ती जाहिरात फक्त नॅपकिन कंपनीची असते. मुळात पाळी म्हणजे काय? ती केव्हा सुरू होते? पाळीत आहार कसा असावा? जास्त रक्तस्राव झाला तर काय करावे? आपण डॉक्टरांशी याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो काय? आईने कसं काय सांगितलं नाही आपल्याला याबाबत? घरात बाबांना माहीत असेल का? मी ग्राऊंडवर इतर मुलींसोबत खेळू शकेन का? सायकलवरून जाऊ की नको शाळेत? वर्गात बेंचवरून उठताना फ्रॉकवर डाग पडला तर? मुलंपण वर्गात असतात; पण मला जर जास्त त्रास होतोय तर मी कसं सांगू माझ्या शिक्षिकेला? किती दिवस होतो पाळीत रक्तस्राव? प्रत्येक महिन्याला पाळी ‘त्या’च तारखेला येईल की तारखांमध्ये बदल होतो??? एक ना हजार प्रश्न... कोण देणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं?

मुली वयात येताना त्यांना वाढविण्याची जबाबदारी नक्की कोणाकोणाची? आई-वडील ‘पालक’ म्हणून कधी फार मोकळेपणाने आपल्या पाल्याशी बोलत नाहीत. शिक्षक अभ्यासक्रमाखेरीज ‘हे’ विषय फार चर्चेला घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी अनेक शाळांमधून जाऊन व्हिडीओ फिल्मच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात; पण तो अपुरा पडतो. पाठ्यपुस्तकांमध्ये दोन पानांमध्ये स्त्रीची शरीररचना सांगून झालेली असते. मैत्रीणही याबाबत इकडून तिकडून ऐकलेली माहिती घेऊन आलेली असते. आता आता गुगलवर आम्हाला सगळं सापडतं. अगदी नको असलेलेही, पण तेच काय आजचं विद्यापीठ. त्यात नक्कीच आम्ही कमी पडतो संवाद साधायला.\

अगदी शरीररचनेच्या बदलापासून ते मानसिक बदलापर्यंत, आम्ही काहीच बोलत नाही या नव्या पिढीशी. मी शाळेत सातवीत असताना अनुराधा म्हणून माझी छान मैत्रीण होती. वर्गात पहिल्या तीन नंबरमध्ये येण्यासाठी आमची स्पर्धा असायची इतकी ती हुशार. खेळातही चपळ. आठवीत गेल्यानंतर तिला मासिक पाळी सुरू झाली. याबाबत कोणाशी बोलावं म्हणून कदाचित ती शांत राहायला लागली. तिला वाटत होतं पाळी लवकर सुरू झाली आहे. बाकीच्या मुलींपेक्षा आपल्यात काही वेगळे बदल खूप लवकर झालेत. यामुळे तिला कदाचित नैराश्य आलं होतं. मधल्या सुट्टीत एकत्र डबा खायला येण्याऐवजी ती वर्गातच डबा खाऊ लागली.

नंतर ती जेवणाच्या सुट्टीत ग्राऊंडवर खेळायला यायचीसुद्धा बंद झाली. बोलकी अनुराधा अबोल होत गेली. सहामाही परीक्षेनंतर पहिल्या बेंचवरून ती शेवटच्या बेंचवर बसायला गेली. आम्हाला काहीच समजेना. आपल्याला येणारी मासिक पाळी, त्यामुळे होणारे शारीरिक बदल, बदलत जाणारे हार्मोन्स, कदाचित या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्यावर होऊ लागला होता. त्याचा परिणाम इतका भयानक होता की वर्गात पहिल्या तीनमध्ये असणारी अनुराधा वार्षिक परीक्षेला चक्क एका विषयात नापास झाली. त्यानंतर पुढच्या वर्षी तर विषय बदलून ती शेवटच्या तुकडीत गेली. संवादाचा विसंवाद झाला की आयुष्याची फुलबाग फुलण्याऐवजी उजाड होते, याचे उदाहरण मी डोळ्यांनी पाहिले. म्हणून पूर्वी सोयीसुविधा नव्हत्या म्हणून अज्ञान समजू शकतो; पण आत्ताच्या जगात आम्ही अंतराळाला सहज हात लावतोय तिथे आजही अनेक अंधश्रद्धा खतपाणी घालतात. मासिक पाळीला ‘विटाळ’ म्हणून अनेक प्रथा सर्रास पाळल्या जातात. मग आमच्या विज्ञानाच्या ज्ञानाचे काय?

काही दिवसांपूर्वी मी गडचिरोलीच्या आदिवासी पाड्यावर गेले होते. प्रवास जंगलातून होता. जाताना पाहिलं, तिथल्या महिला जंगलातील पालापाचोळा, गवताच्या वाळलेल्या काड्या गोळा करून झाडाच्या मोठ्या पानाच्या आत हे सगळं गुंडाळून त्याचे ‘नॅपकिन’ तयार करत होत्या. मी जेव्हा हे पाहिलं तेव्हा धक्काच बसला. मी शक्य तितके पॅड पाठवून दिले. त्यानंतर मी परतीच्या प्रवासात ठरवले आणि माझ्या प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांना सांगितले, आपण ‘सॅनिटरी नॅपकिन बॅंक’ सुरू करायची... आणि तितक्याच उत्साहाने सज्ज झाली माझी टिम.

माझ्या खडकवासला मतदारसंघात मी हा अभिनव प्रयोग सुरू केला आणि आज मला या गोष्टीचे समाधान आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही मुलींपर्यंत नॅपकिन पोहचवू शकतोय. आमच्या किशोरवयीन दिवसांत आम्हाला निसर्गचक्राची माहिती सांगणारे कोणी भेटले नाही आणि फारशी त्याची दखलही कोणी घेतली नाही; पण आज मी माझ्या भागात अनेक शाळांमध्ये जात टेलिफिल्मच्या माध्यमातून शरीररचना समजून सांगत डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करत त्यांच्याशी संवाद साधत, त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या कार्डवर नोंद करत मोफत नॅपकिन वर्गात देऊन येतो. प्रचंड समाधान या मुलींच्या चेहऱ्यावर जाणवतं.

आमच्या शारीरिक बदलाबरोबर आम्हाला हवा असलेल्या मानसिक आधारासाठी, शारीरिक सुरक्षितेसाठी, आमच्या बदलत्या ‘निसर्गचक्राचे’ कोणीतरी स्वागत करीत आहे... चला बदलत्या जगाची सुरुवात करू या स्वतःपासून, स्वतःच्या परिघापासून. उद्याच्या तरुणाईच्या सक्षम आणि सुदृढ आरोग्यदायी जीवनासाठी!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com