माझीच ‘स्पर्धा’ माझ्याशी...!

माझीच ‘स्पर्धा’ माझ्याशी...!

रविवारचा दिवस होता. इतर दिवसांपेक्षा जरा जास्तच लगबग. बाकीच्यांना सुटी म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा दिवस.
Summary

रविवारचा दिवस होता. इतर दिवसांपेक्षा जरा जास्तच लगबग. बाकीच्यांना सुटी म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा दिवस.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

क्लास वन अधिकारी होता होता राहिले, याची मला खंत असायची. पण आज ज्या पुस्तकांचा अभ्यास करता करता अधिकारी व्हायचे राहून गेले, त्याच अभ्यासात आपल्या नावाचा प्रश्न येणे, पुस्तकाच्या पहिल्या पानावर फोटो असणे, हे पाहून गहिवरून आले. हो, इतकं मोठं व्हायचं होतं मला, कारण ‘माझी स्पर्धा माझ्याशीच’ होती.

रविवारचा दिवस होता. इतर दिवसांपेक्षा जरा जास्तच लगबग. बाकीच्यांना सुटी म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा दिवस. सोहम मला कायम विचारायचा, ‘आम्हाला शनिवार, रविवार सुट्टी असते, तसं तुला कधी गं सुटी?’ त्याला सांगायचे, ‘तुम्हाला सुटी तोच आमचा शाळेचा दिवस, म्हणजे आमच्यासाठी गर्दीचा दिवस.’’

अशाच एका रविवारी कार्यक्रमातच होते. कार्यक्रमातून बाहेर पडतानाच मोबाईल वाजला. ऑफिसमधून होता, ‘काय रे शरद ?’ म्हणून विचारलं, ‘तर ताई व्हाट्सॲप बघाना लगेच.’ नेहमीप्रमाणे अर्जंट केसेस असतील म्हणून पाहिलं, तर एमपीएससीच्या पेपरची प्रश्नपत्रिका.

प्रश्नपत्रिका पाहून मन गहिवरून आले अन् चक्क डोळ्यांत पाणी आलं. कारण माझाच प्रश्न त्यामध्ये विचारलेला. ‘क्या बात है ताई..!’ म्हणत त्याने हसत-हसत फोन ठेवला.

मी परत एकदा प्रश्नपत्रिका पाहिली अन् वीस वर्षांपूर्वीचा काळ सरकन डोळ्यांसमोरून गेला. बी.सी.एस.चं शिक्षण घेत होते.

शिक्षण सुरू असतानाच लग्न झालं. लग्नानंतर एमपीएससीचा अभ्यास सुरू झाला. सासरी एकत्र कुटुंब. आज्जेसासूपासून सगळे घरात. सासरे धारेश्वर मंदिराचे ट्रस्टी. राजकारणात नव्हते; पण धायरीत बडे प्रस्थ. कोणाचेही लग्न जमवण्यापासून ते गावातील कोणताही वाद असो, सासरे मध्यस्थी असत. स्वभावाने कडक, शिस्तीचे आणि स्वतः शून्यातून जग निर्माण केलेले असल्यामुळे स्वाभिमानी आणि करारी बाणा. त्यामुळे घरात प्रचंड शिस्त आणि त्यांचा धाक आमच्यावर होता.

सासरचा मोठा गोतावळा सांभाळत, प्रत्येक सणवार, पै-पाहुणे, घरातील स्वयंपाक यातून राहिलेल्या वेळेतून अभ्यास. माझे बाळ आता चार महिन्यांचे झाले होते. त्याच्या कृष्णलीला सांभाळता सांभाळता माझीच दमछाक होत होती.

एमपीएससी परीक्षेचा अभ्यास चालू होता. पेपरचा दिवस आला, पुण्यात नंबर होता. सासूबाई सोबत आल्या होत्या, बाळाला घेऊन त्या गाडीत बसल्या होत्या. परीक्षेला बसले तरी लक्ष बाळाकडे होते. बाळ हेच आईचं जग, बाकी सगळं जग अर्थशून्य असतं. माझी आई माझ्याशी वागताना इतकी का काळजी घ्यायची हे आज आई झाल्यावर जाणवत होतं.

माझ्या परीने परीक्षा दिली. हवी तशी तयारी न केल्यामुळे आपण पास होणार नाही, ही कल्पना होतीच. या परीक्षेचा अनुभव पुढे उपयोगी पडेल, असे वाटले.

जिंदगी मन की हो तो अच्छा है,

न हो तो और भी अच्छा है..

म्हणत पहिल्या परीक्षेत अपयशी ठरलो हे मान्य करून, परत जोमाने तयारी केली. पुन्हा अभ्यास, नोट्स, दररोजच्या अपडेट्स, वर्तमानपत्रापासून ते सगळ्या चालू घडामोडी... दरम्यान, ग्रामपंचायतींचा समावेश प्रभागात झाला होता. या प्रभाग पद्धतीत आरक्षण जाहीर झाल्यामुळे, कोणतीच महिला त्यावेळी तयार नव्हती. म्हणून सासूबाईंना गावकऱ्यांनी आग्रह करून उमेदवारी घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, खुद्द सासऱ्यांचा या निवडणुकीला प्रचंड विरोध. इकडे प्रचारही सुरू झाला, एकही दिवस सासरे सोबत आले नाहीत. आम्ही सुनांनी आग्रह केला तर म्हणाले, निवडणुकीत मतदानाला येईन तेवढीच तुमची जमेची बाजू समजा. आमचा हिरमोड व्हायचा. ते स्वतः येत नसत व इतरांनाही प्रचारासाठी बोलत नसत.

एका सासूच्या विरोधात इतर दोन पक्षांतून दोन सुना उभ्या राहिल्या. पण सासूबाईंनी बाजी मारली, चांगल्या मताधिक्क्याने त्या निवडून आल्या. हा सगळा वेळ मला घरात द्यावा लागला. सगळे प्रचारात फिरत असताना घर, संसार आणि लहान मुलं माझ्याकडे असत. माझ्या थकलेल्या आज्जी असत, त्यांच्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे लागायचे.

घरातली जबाबदारीदेखील तितकीच महत्त्वाची होती, सासर-माहेर ही दोन्ही नाती. त्यात नवीन सून म्हणून सगळ्यांचं फार लक्ष... मनातल्या मनात दररोज विचार यायचा... कशी परीक्षा पास होणार... वाईट वाटायचं. शाळेत कायम पहिल्या पाचमध्ये नंबर असायचा. शाळेतर्फे सहभागी खेळात सगळी बक्षिसं घेऊनच शाळेत यायचो. पाचवी ते दहावी शाळेतील मॉनिटर. इतके कष्ट केले आणि आता अभ्यासाला वेळ देऊ शकत नाही, ही सगळी जबाबदारी. तोपर्यंत सिम्बॉयसिस कॉलेजला एचआर स्पेशल घेऊन एम.बी.ए.ला ॲडमिशन घेतले. सासूबाईंचे राजकारण सुरू होते, त्यावेळी अधिकारी घरी येऊन सांगत की बचत गट तयार करा, पण कोणीही गट करायला तयार नसत. मी व माझ्या जाऊबाईंच्या गटापासून सुरुवात केली. हळूहळू प्रत्येक गल्लीत, सोसायटीत जाऊन बचत गटांची माहिती द्यायला सुरुवात केली. चार महिन्यांत दोन गटांचे दोनशे गट केले. २००८ चा उत्कृष्ट आणि सर्वाधिक बचत गटांचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेकडून मला मिळाला.

सासूबाईंच्या उपस्थितीत हा पुरस्कार घ्यायला गेले, काय कौतुक सासूबाईंना! पण हा पुरस्कार घेताना मनात विचार आला. आपला रस्ता बदलतोय की काय? आपल्याला तर स्पर्धा परीक्षेचा निकाल हातात घ्यायचा होता. मनाचा हिय्या करून परत अभ्यासाला सुरुवात केली. परीक्षेचा दिवस जवळ आला, यावेळी चांगली तयारी झाली होती, पण सोहमचं बालपण सांभाळून, अभ्यासासाठीच जागरण, ताण यामुळे कदाचित आजारी पडले इतका अशक्तपणा जाणवत होता. अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. त्यावेळी कळून चुकले, फक्त मन, बुद्धी सुदृढ असून चालत नाही; तर शरीरही तितकंच सुदृढ असायला हवं. आणि यावेळी आजारपणामुळे एमपीएससीने मला चेकमेट केले.

त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. बचत गट, मतदारसंघाचे अध्यक्षपद, पुणे शहराध्यक्ष पद, प्रदेशाध्यक्ष पद आणि आता आयोगाचे पद... फार लांबचा प्रवास करीत इथपर्यंत आले. अनेक संकटं आली, वादळं आली, पण या सगळ्या वादळात मातीत पाय घट्ट रोऊन उभी राहिले. एक बाई काम करतेय आणि कोणत्याच प्रकारे मागे हटत नाही, त्यामुळे सगळे प्रयत्न करून फसल्यावर, अक्षरशः चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहीर कार्यक्रमही होत असे. अशा वेळी मनात नैराश्य दाटून आल्यावर ‘आता बस’ असं म्हणत, जिथे आहे तिथे थांबण्याचा निर्णय मी जेव्हा घ्यायचे तेव्हा कायमचे सावलीसारखे साथ देणारे पती मला म्हणायचे, ‘‘अर्धा रस्ता चालून आलीस, परत मागे फिरण्यापेक्षा पुढचा अर्धा रस्ता आत्मविश्वासाने चाल. जे होईल ते योग्य होईल. निर्णय चुकला तर अनुभव मिळेल, निर्णय बरोबर आला तर यश मिळेल. तुझ्या सर्व निर्णयांत मी बरोबर असेन.’’ या वाक्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करायची उभारी मिळाली. आता हे नेहमीचे झाले होते, जितके कोणी मागे खेचले तितक्या वेगाने पुढे जायचे. मनात आणलेला संकल्प पूर्ण करायचा. कारण संकल्प आणि सिद्धी यामधील दरी प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला सहज पार करता येते. सिद्धीस गेलेली कामे ही संकल्पित कामांना आव्हान करतात आणि हेच आव्हान कायम पेलण्याची ताकद मला या संकटांनी दिली. अनेकदा हरले, अनेकदा पडले, पण पुन:पुन्हा उठून चालत राहिले अन् आज इथपर्यंत येतानाचा हा रस्ता मला गवसत गेला.

जीवनातील प्रत्येक क्षण मी अनुभवले, त्यांना दुःखात का होईना आकार देत हे जीवन सावरलं, सुंदर बनवलं. सुखाची झालर त्यावर पांघरून दोन-चार पावलं चालायचा प्रयत्न केला. पडले, रडले, अडखळले; पण हार नाही मानली कधी. प्रत्येक दु:खाच्या क्षणांना जिंकण्याचा प्रयत्न केला अन् जिंकलेही.

आयोगाची अध्यक्ष म्हणून अनेक शासकीय कार्यालयांत मान-सन्मानाने उपस्थित राहता आले, कधी प्रमुख पाहुणे म्हणून, तर कधी आयोगाची अधिकारी म्हणून. या प्रत्येक भेटीत आनंदाला एका खंत असायची, ती ही की आपण क्लास वन अधिकारी होता होता राहिलो. पण आज पुन्हा हा एमपीएससीचा पेपर पाहून खूप समाधान वाटलं... हो ज्या पुस्तकांचा अभ्यास करता करता अधिकारी व्हायचे राहून गेले, आज त्याच अभ्यासात आपल्या नावाचा प्रश्न यावा आणि पुस्तकाच्या पहिल्या पानावर आपला फोटो छापून यावा व सर्व स्पर्धकांनी इथूनपुढे आपल्या नावाचा अभ्यास करावा... हो, इतकं मोठं व्हायचं होतं मला... कारण ‘माझी स्पर्धा माझ्याशीच’ होती.

(लेखिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com