आयुष्याचा धबधबा!

निसर्गाने आपल्याला सुंदर आयुष्य दिले आहे; मात्र क्षुल्लक कारणे आणि गैरसमजामुळे आयुष्यातील नात्यांची वीण सैल होते आणि नको ते प्रसंग आयुष्यात येतात.
Incident in Life
Incident in LifeSakal
Summary

निसर्गाने आपल्याला सुंदर आयुष्य दिले आहे; मात्र क्षुल्लक कारणे आणि गैरसमजामुळे आयुष्यातील नात्यांची वीण सैल होते आणि नको ते प्रसंग आयुष्यात येतात.

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

निसर्गाने आपल्याला सुंदर आयुष्य दिले आहे; मात्र क्षुल्लक कारणे आणि गैरसमजामुळे आयुष्यातील नात्यांची वीण सैल होते आणि नको ते प्रसंग आयुष्यात येतात. दुसरीकडे मात्र दिव्यांग, अनाथ मुलांना ना कधी आई-वडिलांची माया मिळाली, ना हे सुंदर जग कसे दिसते, हे पाहता आले; परंतु त्याबाबत कुठलीही तक्रार न करता मिळालेले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी ते वाटचाल करतात.

दर आठवड्याला माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तक्रारदार येत असतात. खूप घटना जवळून पाहता येतात, व्यक्ती अनुभवता येतात, कधीही न ऐकलेले भीषण अनुभव सोसणारी माणसं समोर पाहून आपले दुःख काहीच नाही, आपण सुखाच्या ऐरावतच आहोत, हे मत मात्र ठाम होत राहतं.

दुःखी, कष्टी, नैराश्याने ग्रासलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या आणि सर्वात वेदनादायक म्हणजे आपल्याच माणसाने पाठीवर वार केल्याने, भरून न येणाऱ्या जखमा घेऊन आयुष्याची वाटचाल काटेरी रस्त्यावरून करणारी ही माणसं... आपण आपुलकीचे दोन शब्द आणि समस्यांचा गुंता सोडवण्यासाठीचे आश्वस्त आणि विश्वासक पाठबळ दिले, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य, आपल्यालाही जगण्याचं बळ देते.

परवाही अशीच प्रचंड गर्दी. गर्दीमुळे दुपारपासून थांबल्यानंतर सायंकाळी दोन कुटुंबाना आत येता आले. आजची ही केस तरी माझ्यासाठी समाधानाची होती. कारण नवरा बायकोला विनंती करायला आला होता. ‘मी कोणताही त्रास देणार नाही सासरी चल... सुखाने राहू, वाटलं तर तसं लेखी लिहून देतो; पण फक्त आई-वडिलांपासून वेगळं राहायचं ही अट मान्य नाही.’

मी खुश होते, मला वाटलं बायको आनंदात तयार होईल, विषय समोरच मिटेल. दोन्ही कुटुंब हजर होती; पण कशाचे काय... मुलीकडच्या बाजूचे टोकाच्या भूमिकेवर होते. मुलाचे आई-वडील हात जोडून उभे होते. आम्हाला काहीच वाद घालायचा नाही. मुलाचा संसार नीट व्हावा, एवढीच अपेक्षा. हवं तर आम्ही स्वतंत्र राहतो; पण त्या दोघांनी एकत्र राहावं, असं लहान लेकराला घेऊन किती दिवस माहेरी राहणार? पण मुलगी आणि तिच्या घरचे क्षणभरही सामंजस्याने मिटून घेईनात. ‘आम्हाला मुलगी मुलासोबत स्वतंत्र राहायला हवी, तरच आम्ही मुलगी पाठवू आणि तसं आम्हाला लिहून द्या.’

हे एकूण आता माझाही संयम सुटला.

‘आपण ज्या घरात मुलगी दिली, तेव्हा मुलाचे आई-वडील, त्यांचे घर, नातेवाईक, भाऊ-बहिणी, हे सगळं पाहूनच मुलगी दिली ना... मग आता आई-वडील घरात नको म्हणणारे उद्या तुमची स्वतःची सून घरात आल्यावर घराबाहेर पडणार का? आणि हे कोणते संस्कार? कोणती कुटुंब व्यवस्था?’

मी रागात बोलते हे पाहून मुलीचे कुटुंब जरा शांत झाले, मुलीला विचारले, तुला सासरी जायचे का नाही ते सांग?

विशेष म्हणजे ती तिच्या आई-वडिलांकडे न पाहताच पटकन हो म्हणाली.

‘...पण हो, सासू-सासरे सोबत राहतील. कारण त्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन कष्ट करून तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभे केले आहे. आणि त्याचा पगार, घर बघूनच तुम्ही लग्न करून आलात. तुझा नवरा अजूनही फार काही जबाबदाऱ्या न घेता सुखाने तुझ्यासोबत राहतोय.’

ती तयार झाली, माहेरची लोकं काहीतरी शिकवून तिला घेऊन आले होते. पाच-सहा महिन्यांचे बाळही तिच्या मांडीवर होतं. इतकी साधी माणसं, निर्व्यसनी नवरा, उत्तम शिक्षण, चांगलं घर, स्वर्गसुख म्हणतो ते काय वेगळं असतं? अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरून आपण राईचा पर्वत करत असतो. स्वतःच वेगवेगळे गैरसमज निर्माण करून इतरांबद्दल आपल्या सोयीनुसार ‘मत’ बनवतो आणि आनंदाच्या क्षणांचे ‘गैरसमजाने’ विरजण होऊन दुःखाची सावली पांघरून आयुष्याचे वाळवंट करून घेतो.

हे सगळं सुरू असताना नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आले. त्यात एक अंध विद्यार्थी होता. त्यांचे आमंत्रण स्वीकारले. बाकीचे सगळे बाहेर पडले, तो अंध विद्यार्थी दोन मिनिटे थांबला. मला वाटतं काही काम असेल. मी तसे विचारलेही; पण काहीच काम नाही. मलाच तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, म्हणून थांबलो म्हणाला.

‘बोल ना...’ त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला म्हणाले.

तो म्हणाला, ‘लहानपणी आई-वडील वारलेत. मी अनाथ, त्यातही अंध. हे जग कसं आहे हे पाहता येत नाही. सगळं स्पर्शाने अनुभवतोय. कोणीच नातेवाईक नाहीत. एकटाच आहे. या वाडिया संस्थेने लहानाचा मोठा केला; पण या जगात डोळस माणसाला जग फसवते तिथे आमची काय कथा? प्रेमाने, मायेने बोलणारे कुणी नाही, आईची माया, प्रेम यांचा कधी स्पर्शही नाही; पण इतरांच्या अनुभवावरून कल्पना करून माझ्या आईनेही मला असेच कुशीत घेतले असते, काळजी केली असती, मायेने हात फिरवला असता, माझ्या आनंदात तोंड भरून कौतुक केले असते, आईच्या कौतुकापुढं जग फिके पडले असते, अशी अनेक स्वप्ने पाहत राहतो.

वडील असते तर माझी जबाबदारी घेतली असते, अंगाखांद्यावर घेऊन हे जग त्यांच्या नजरेने दाखवलं असतं, रस्त्यात चालताना ठेच लागू नये म्हणून हाताला धरून चालले असते. काही अडलं नडलं तर वडिलांकडे हट्ट करून मार्ग काढला असता; पण हे कोणीच नाही. माझी आयुष्याबद्दल तक्रार मुळीच नाही. मी चार दिवसांपूर्वी बँकेत कामाला लागलो. मी आनंदात आहे; पण हे आनंदाचे क्षण वेचताना सोबत कोणी नाही म्हणून आवर्जून आलो. तुम्हाला सांगावं म्हणून...’

मी तर स्तब्ध झाले. त्याने पेढे दिले हातात आणि येतो म्हणून भिंतीचा आधार घेऊन निघूनही गेला...

ही दोन्ही कुटुंबीय तिथेच होती. आपल्याच माणसांवर वैऱ्यासारखी धावणारी ही गोतावळ्यातील माणसं काहीशी लाजेखातर नरमली होती. देवाने आपल्याला सुदृढ शरीर दिलंय, हे जग पाहता येतं, सुंदर निसर्ग अनुभवता येतो, आपली माणसं आणि त्यांचे प्रेम, त्यांच्यासोबतचा सहवास अनुभवता येतो, काहींना तर आपण स्वतः कसे दिसतो, हेसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत पाहता येत नाही, त्या मानाने आपल्याला उत्तम अवयव देऊन, जगात काहीतरी चांगलं कर, हे या विधात्याला सांगायचे असते. आजूबाजूला अफाट प्रेम करणारी आपली माणसं देवानं दिली, अनेक संधी दिल्या. त्याचं सोनं करत आयुष्यात नावलौकिक मिळवतो, सुखाच्या झुल्यावर झुलत असताना या सुखांना ईश्वरी ठेवा आणि ‘ऐश्वर्य’ आपण मानायला तयारच नसतो.

क्षुल्लक गोष्टीवरून ‘वादळ’ निर्माण करून आयुष्याची फरपट करत, आपल्याबरोबर आपल्या सोबतीला असलेले या ‘जीर्ण पानांना’ कुस्करून टाकतो आणि सहज विसरून जातो की कधीतरी याच झाडांनी आपल्याला खूप मोठी आधाराची सावली दिली होती. सगळं निर्मात्याने देऊनही तुम्हाला जगता येईना, हातातल्या सुखाच्या क्षणांची पायमल्ली करून दुःखाला कवटाळणारे तुम्ही, क्षणात हे आयुष्य कधी संपून जाईल, ते कळणारही नाही. कारण आयुष्याचा हा वाहता प्रवाह कोणासाठीही विसावत नाही. अगदी आज असलेले आयुष्यातील वाटसरू उद्या सोबतीला असतील का, हे माहिती नाही. या अशा वागण्याने आयुष्याच्या सायंकाळी एकटेपणा आणि भळभळणाऱ्या जखमा घेऊन जगावे लागेल, नंतर तुटलेले धागे कितीही जोडत राहिलात तरी ‘गाठी’ तशाच राहतील, कायम सल देणाऱ्या...

मी बोलत असतानाच, ‘ताई’ म्हणत ती मुलगी उठली. मला थांबवत मुलीने क्षणात मांडीवरचे बाळ नवऱ्याकडे दिले. सासू-सासऱ्यांची माफी मागितली आणि आपण आपल्या घरी जाऊ म्हणत, त्यांना बाहेर घेऊनही गेली. तिच्या माहेरच्या माणसांनाही कदाचित चूक लक्षात आली असेल, आणि नसेल आली तर त्यांना सद्‍बुद्धी मिळो... अशा अनेक भरकटलेल्या पालकांना विवेकाचा आणि संस्काराचा सद्‍मार्ग मिळो. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे. काट्यातील फुलांची झुलती कमान आहे! जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, तर कधी रडावं लागतं; कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com