आयुष्याचा सारीपाट

शाळा आणि पाऊस दोघांची सुरुवात बरोबरच होते, ही लहानपणापासूनची कल्पना दिवसेंदिवस ठाम होत होती.
Life
LifeSakal
Summary

शाळा आणि पाऊस दोघांची सुरुवात बरोबरच होते, ही लहानपणापासूनची कल्पना दिवसेंदिवस ठाम होत होती.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

आई-वडिलांचे स्वप्न आणि आपले प्रामाणिक कष्ट पूर्ण करण्याची धमक मनामध्ये जर ठेवली तर आयुष्य यशाची चढती कमान देईल. गणिताचे एखादे सूत्र नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण आयुष्याच्या गणितात प्रामाणिकपणाचे सूत्र यशाची बेरीज करीत सन्मानाची बाकी देईल.

शाळा आणि पाऊस दोघांची सुरुवात बरोबरच होते, ही लहानपणापासूनची कल्पना दिवसेंदिवस ठाम होत होती. आजही शाळेत येताना इतका जोरदार पाऊस की, शाळेचे मैदान पाण्याने भरून गेले होते. बेंचवर बसून शिक्षकांची नजर चुकवत बाहेर पडणारा मुसळधार पाऊस पाहणं आणि आपणच या पावसात चिंब भिजलोय ही कल्पना करत पावसाचा आनंद लुटत होतो.

आज जरा जास्तच पाऊस जाणवत होता. आभाळ भरून आलेले होते, आठवीचा वर्ग दुपारच्या सत्रात भरत होता; पण दिवस मावळतीचा भास होत होता. तेवढ्यात तिसऱ्या तासाची बेल वाजली. इंग्रजीच्या वायदंडे ताई वर्गात आल्या. सडपातळ, एक छानशी वेणी, त्या वेणीत एक फूल आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य, यामुळे त्या नेहमीच सुंदर दिसायच्या. वर्गात येताच सगळे चिडीचूप. इतका वेळ वर्गात एवढा गोंधळ होता, हे सांगायलाही कुणाचे मन धजावले नसते. फळ्यावर सुंदर अक्षरात सुविचार, वार, दिनांक, धड्याचे नाव लिहिले आणि मुलींकडे पाहत पुस्तक हातात घेऊन टेबलाला टेकूनच शिकवायला सुरुवात केली. मध्येच परत पुस्तक टेबलावर उलटे ठेवून सर्व मुलींकडे नजर फिरवली. ‘‘आज आरती आली आहे का?’’ असं विचारलं. नजरा आरतीच्या बेंचवर गेल्या. ती नव्हती. शाळा सुरू झाल्यापासून आठवड्यातून दोन-तीनदा यायची. घरात कोणीतरी आजारी आहे म्हणून सांगत होती. मी वर्गाची मॉनिटर असल्यामुळे उभे राहून वायदंडे ताईंना सांगितले, ‘‘ताई, ती गेल्या तीन दिवसांपासून आलेली नाही. घरी कोणीतरी फार आजारी आहे, असं तिने सांगितले आहे.’ माझ्या उत्तराने ताईंचे समाधान झाले नाही, हे चेहऱ्यावरून जाणवत होतं.

मला खाली बसण्याची खुण करून त्या परत टेबलाकडे गेल्या. उलटं ठेवलेलं पुस्तक हातात घेऊन बंद केलं आणि दीर्घ श्वास सोडून म्हणाल्या, ‘आज मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे.’

‘पाठ्यपुस्तकातील एखादा धडा शिकवायचा राहून गेला तर फार काही फरक पडणार नाही, पण आयुष्याच्या पुस्तकातील अनुभव शिकवलाच पाहिजे. आयुष्याच्या या निसरड्या वाटेवरून एकदा का पाऊल घसरले की, आयुष्याचा विस्कटलेला सारीपाट परत मांडता येत नाही; म्हणून आजचा माझा एक तास वाया गेला तरी चालेल, पण मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचे आहे.’

वर्गात भयाण शांतता पसरली, कायमच हसतमुख असणाऱ्या वायदंडे ताई इतक्या उदास का झाल्या? काय झालं असेल?

मला आरतीबद्दल बोलायचं आहे. आज ती वर्गात आली नाही, तशी ती शाळेत दररोज येते; पण वर्गात बसत नाही. ताईंच्या या वाक्याने आम्ही अस्वस्थ झालो. म्हणजे नक्की काय? असे आमचे चेहरे प्रश्नार्थक आणि घाबरलेही. ताई सांगत होत्या, ‘आरतीबद्दल कालच मला समजलं, तेव्हापासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. आरती घरी सांगते मी शाळेत चालले आणि शाळेत येत नाही. या वयातील वाईट संगत आयुष्याची फरपट करेल. आज तिच्या पालकांना बोलावून घेतलं होतं. घरात कोणीही आजारी नाही. सगळं छान आहे; मग आपण खोटं कुणाशी आणि का बोलतोय? कोणाला फसवतोय? मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, वृत्तपत्रांमध्ये परवा वाचलेली घटना. अशीच आरतीसारखी ती मुलगी आठवीतील, एका मुलाच्या प्रेमात पडली. या वयात कोणीही आपल्याला सुंदर म्हणाले, सूर्य, चंद्र, तारे तोडून आणण्याची भाषा आपल्यासाठी केली की, आपण लगेच भाळतो. आई-वडिलांचासुद्धा विचार करत नाही. ती मुलगीही तशीच त्या मुलाच्या प्रेमात पडून शाळा बुडवून मुलासोबत फिरू लागली, तिला दिवस गेले. आठवीत मुलीचा गर्भपात करावा लागला. त्या मुलाने एकत्र असतानाचे सगळे व्हिडीओ काढून त्या मुलीला सातत्याने धमकी देऊन तिच्याकडून वाईट काम करून घेतले. मग त्याच्या, मित्रांसोबत हिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले, ते फोटो सगळीकडे पसरले.

बदनामीच्या भीतीने मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून डॉक्टरांनी मुलीला वाचवलं. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक, वडील वारलेले, घरी लहान भाऊ, आई धुणी-भांडी करून घर चालवत होती. शिक्षकांनी मुलगी शाळेत येत नाही म्हणून आईला बोलावून सविस्तर माहिती सांगितली. यापूर्वीही आईला शाळेत दोनदा पालकसभेला जाता आलं नव्हतं म्हणून खरी परिस्थिती आईला समजली नाही. पोलिसांनी तपास करताना या सगळ्या गोष्टी उलगडून त्या मुलीच्या आईसमोर मांडल्या. अगदी त्या मुलीला वेश्या व्यवसायातसुद्धा ढकलण्याचा प्रयत्न त्या मुलाने केला होता. इतक्या चांगल्या संस्कारात वाढलेली आपली मुलगी, तिला मोठं अधिकारी करायचं म्हणून आपण दिवस-रात्र काम करतो, शिक्षणात कोठे कमी पडायला नको म्हणून आपण घाम गाळतो आणि आपल्या मागे ही अवस्था. आईला हृदयविकाराचा झटका येऊन जागीच आई गेली. क्षणात सगळं संपलं. एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं... एका खोटं बोलण्यामुळे. आईशी खोटं बोलून दुनिया नाही जिंकता येत...’ ताई बोलता बोलता थांबल्या, हुंदका गिळला. वर्गात भयाण शांतता होती. एव्हाना बेलसुद्धा वाजली होती. दुसऱ्या शिक्षिका येऊन थांबल्या होत्या; पण ताईंनी दुसरा तास दहा मिनिटांसाठी मागवून घेतला.

आम्हाला सगळ्यांनाच अपराधी असल्यासारखं वाटत होतं. विद्येच्या या मंदिरात आपण कशासाठी येतो? आणि करतो काय? क्षणभरात प्रश्नांचं जाळं भोवताली फिरू लागलं.

ताई म्हणाल्या, ‘शाळेत शिकण्यासाठी येता, पण फक्त शिक्षणच नाही तर संस्काराची, अनुभवाची, विचारांची शिदोरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. दुसऱ्यांशी खोटं बोलतो, त्यावेळेस स्वतःला जास्त फसवत असतो, हे कायम लक्षात ठेवा.

प्रेम करण्यासाठी आयुष्य आहेच, हे दिवस मोरपंखी जरी असले तरी मातीच्या घड्याला आकार देण्याचे आहेत. उद्याच्या स्पर्धेच्या जगात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल, तेव्हा स्पर्धक म्हणून टिकाव धरता आला पाहिजे. आपली गुणवत्ता, जिज्ञासा, चिकित्सा, चिकाटी आणि प्रामाणिक कष्ट या बळावर आपल्याला आयुष्याची स्पर्धा जिंकता आली पाहिजे. यशस्वी जीवनाचा, उभ्या राहणाऱ्या उंच इमारतीचा पाया शालेय जीवनात रचला जातो. हा पाया वैचारिक बैठकीचा असावा.

पायातील चप्पल झिजली तरी नवीन न घेता, तो खर्च वाचवून मुलांच्या शिक्षणासाठी खस्ता खाणारा ‘बाप’ आणि आपली हौस-मौज बाजूला ठेवून महिनाभर काटकसर करून चार पैसे आपल्यासाठी गाठीशी ठेवणारी ‘आई’, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी एकदा तरी नजरेसमोर आणली तरी आयुष्याचा निर्णय कधीच चुकणार नाही.

पालकांनी घरातूनच मुलांना प्रेम आणि माया दिली तर ती बाहेर शोधावी लागणार नाही. वयात येताना मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला तर कटुत्वाचे विसंवाद टाळता येतील. अनुकूल वयात परिपक्व विचारांनी घडलेलं प्रेम आयुष्य आनंदमय करेल, जगण्याची प्रेरणा देईल. डोळसपणाने घेतलेला निर्णय बुद्धीच्या आणि मनाच्या निर्णयाला साथ देईल.

वर्गातील तो ‘तास’ आणि कायम मनात कोरला गेलेला ‘आयुष्याचा सारीपाट’, आमच्या सर्वच विद्यार्थिनींना नवी दिशा देणारा होता. आम्ही त्या पाठ्यपुस्तकात नसलेल्या ‘धड्याने’ खूप शिकलो. आजही आम्ही तो धडा मनात कोरून ठेवून विद्यार्थिदशेपासून आजतागायत तो ‘विचार’ अवलंबविला, म्हणूनच ‘रयत’च्या सर्वच विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत यशाचे गरुड पंख घेऊन ‘रयत’चा वटवृक्ष जोपासत आहेत.

आई-वडिलांचे स्वप्न आणि आपले प्रामाणिक कष्ट पूर्ण करण्याची धमक मनामध्ये जर ठेवली तर आयुष्य यशाची चढती कमान देईल. गणिताचे एखादे सूत्र नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण आयुष्याच्या गणितात प्रामाणिकपणाचे सूत्र यशाची बेरीज करीत सन्मानाची बाकी देईल.

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com