गणित : शाळांचं आणि मुलांचं...

ही सगळी मंडळी आश्रमशाळेचे शिक्षक होते. काहीही करा आणि एप्रिल-मे मध्ये शाळेसाठी लागणारी मुलं घेऊन या. नाहीतर घरचा रस्ता धरा,
rural education student away from education teachers lost their job
rural education student away from education teachers lost their jobSakal

मी सातारा सोडून सांगलीच्या वाटेला लागलो. ढगाळ वातावरण होते. सांगलीत माझ्या दोन्ही मुलांना शांतिनिकेतनमधल्या एका शिबिरामध्ये मला पाठवायचे होते. मी खिडकीच्या बाहेर पाहत होतो. बाहेर शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेले होते. एक शेतकरी दूर रानात औताला जुंपलेले बैल सोडून एका झाडाखाली बसले होते.

मी नमस्कार घातल्यावर आजोबा, साहेब प्या पाणी असे म्हणाले. मी आजोबाला म्हणालो, आजोबा काम झालं काय, की थकलात. ते म्हणाले, साहेब शेतकऱ्यांचे काम कधी संपत नाही आणि थकतोय कसला. बाजूला असलेल्या छोट्या रस्त्याकडं आजोबाचे डोळे लागले होते.

आजोबा उठले आणि त्यांनी झोपडीचा दरवाजा लावला. मी आजोबाला म्हणालो, कुणाची वाट पाहता काय? आजोबा म्हणाले, होय जी. मास्तर मंडळी गावात गेली आहेत, त्यांनी झोपडीत जेवणाचा डबा ठेवला आहे. जाताना मला ते मास्तर म्हणाले, आजोबा, डबा झोपडीत ठेवला आहे, जरा लक्ष ठेवा, अजून त्यांचा पत्ता नाही.

मी म्हणालो, मास्तर मंडळी म्हणजे नेमके कोण? ते म्हणाले, त्यांच्या आश्रमशाळेसाठी गावात मुले मिळतात का? याचा शोध घेण्यासाठी गेली आहेत. आजोबा त्यांच्या बैलाकडे निघालेच होते, तितक्यात चार माणसे त्या रस्त्यानं येताना आजोबानी पहिलं.

ती मंडळी आली काही न बोलता झोपडीत जाऊन जेवणाचा डबा घेऊन आली आणि खात बसले. फिकं वरण, अर्धवट भाजलेल्या पोळ्या, आंब्याचं रायतं असा त्यांचा मेनू होता. त्यांनी जेवण केलं पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा होती.

निराशेनं मान खाली घालून बसलेल्या गुरुजींना खुलवण्याचा प्रयत्न आजोबा करत होते. पण गुरुजी काही केल्या खुलत नव्हते. मीही त्यांच्या गप्पात सहभागी झालो. गप्पा मारताना लक्षात आलं, शिक्षकांची अवस्था पाहून आजोबाला जशी हळहळ वाटत होती, तीच माझी भावना झाली.

ही सगळी मंडळी आश्रमशाळेचे शिक्षक होते. काहीही करा आणि एप्रिल-मे मध्ये शाळेसाठी लागणारी मुलं घेऊन या. नाहीतर घरचा रस्ता धरा, अशी तंबी देऊन संस्थाचालकानं या शिक्षकांना ग्रामीण भागात पाठवलं.

होतं. त्यांची मेहनत सुरू होती, पण त्यांना यश येत नव्हतं. आज ते ज्या गावात गेले, त्या गावातही त्यांना मुलं काही मिळाली नव्हती. दुपारनंतर गावात या, काही तरी जोड लावू, असा शब्द गावाच्या सरपंचांनी दिल्यावर दोन घास खायला ही मंडळी परत आजोबाच्या झोपडीवर आली होती.

त्यांच्याशी बोलणे झाल्यावर परिस्थिती किती गंभीर आहे, हे मला कळलं. आश्रमशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची अवस्था करो या मारो अशी झाली आहे. त्या आमच्या गप्पा नव्हत्या तर राज्यातल्या शिक्षणाच्या गंभीर विषयावर विचारमंथन होतं.

राज्यातला बहुतांशी भाग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे. जो आश्रमशाळांशी बांधलेला आहे. यामध्ये शिक्षक आणि मोठा वर्ग प्रशासकीय वर्ग यांचा संबंध आणि विद्यार्थी आणि त्यांचे भवितव्य घडण्याचा संबंध येतो. पण अलीकडे काळ बदललाय आणि आश्रमशाळेच्या वाटेला जाणारे विद्यार्थी गावाच्या आसपास असणाऱ्या इंग्रजी शाळेचे विद्यार्थी होऊ लागले

. माझ्यासमवेत असणारे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास वाघेवाड बोलताना सांगत होते. सहा सहा महिने पगार होत नाही. आलेला पगार संस्थाचालकाला वर्ग करून खिशामध्ये तुटपुंजी रक्कम पडते. अनेक वेळा शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या तोंडचा घास काढून शाळेच्या चार भिंती बांधाव्या लागतात. ते पाप बघवत नाही.

पण शेवटी आपलाही प्रपंच चालवायचा असतो. अर्धे आयुष्य शिक्षणासाठी घालवलेलं असतं. मुकाट्यानं सर्व काही सहन करावे लागते. त्यातच आश्रमशाळेत असणाऱ्या शिक्षकांवर सरकारी कामाशिवाय खासगी कामाचा बोजा अधिक असतो.

अनेक ठिकाणी संस्थाचालक शिक्षकांचा वापर घरघड्यासारखा करून घेतात, त्या चौघांमध्ये असलेले नागनाथ वाघलवाड मला विविध गोष्टी सांगत होते. त्यांच्यातले रमेश गायकवाड म्हणाले, की दरवर्षी एप्रिल-मे-जून हे तीन महिने आमची नोकरी जाणार की राहणार अशी अवस्था असते.

शाळेवर जायचं,काम करायचं, सही करायची आणि तिथून भाकऱ्या बांधून गावोगावी मुलं शोधण्यासाठी बाहेर पडायचं. संस्थाचालकांनी तंबी दिलेली असते, की या वर्षी मुलांचा कोटा पूर्ण झाला पाहिजे. तरच तुमची नोकरी टिकेल? जर शाळेमध्ये मुलं नसतील तर सरकार अनुदान देणारे कुठून? जेवणाचं अनुदान, राहण्याचं अनुदान, शिक्षकांचा पगार असं सारं काही त्या अनुदानावर अवलंबून असतं.

शिक्षणात सर्वोत्तम असणाऱ्या आणि विविध कलागुणांनी संपन्न असणाऱ्या या शिक्षकांवर आज विद्यार्थी शोधण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली होती. हे मागच्या अकरा वर्षांपासून सुरू होतं. आम्ही त्या गावांमध्ये पोहोचलो त्या शिक्षकांची ते सरपंच वाटच पाहत होते.

सरपंचांनी बोलणं सुरू केलं. सरपंच म्हणाले, मी थेट आणि मुद्द्याचं बोलतो. तुम्ही हे जे काय करताय किंवा तुमच्या मालकांनी तुम्हाला जे काम लावलेले आहे. ती नक्कीच समाजसेवा नाही. मी गेल्यावर्षीही तुम्हाला मुलांसाठी मदत केली होती, या वर्षी केली, करतो. गेल्या वर्षी सारखी या वर्षी मी फुकट मदत करणार नाही.

मला प्रत्येक मुलामागे काहीतरी कमिशन द्यावे लागेल. सरपंचांचं बोलणं ऐकून ते चौघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. त्यातले गायकवाड नावाचे शिक्षक फारच चतुर होते. गायकवाड सरांनी त्या सरपंचाला बाहेर नेलं आणि हळूच त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं. त्यानंतर पुन्हा आत आल्यावर ते म्हणाले, अहो मी गमतीनं सगळं म्हणत होतो. तुमची मानसिकता पाहत होतो, हे आपलं सामाजिक काम.

गावातली चार मुलं शिकली तर ते बरं आहेना. कोणाकोणाची मुलं येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचे वडील कोण आहेत, त्यांची घरं कोणती, हे सारं काही सरपंचांनी एका दमात त्या शिक्षकाना सांगितलं. ते सरपंच माझ्याकडे आले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले, बर का साहेब, आमच्या गावात आम्ही खूप चांगली कामं केली आहेत. एखादी बातमी देता आली तर बघा. मी त्या सरपंचाकडं शांतपणे बघत होकाराची मान हलवली.

त्या शिक्षकांनी गावात जाऊन संपर्क साधला. एखादा युद्ध जिंकून यावं, या पद्धतीनं ते शिक्षक परत निघाले. होते. वाटेत मुख्याध्यापक त्या गायकवाड यांना म्हणाले, ‘तुम्ही त्या सरपंचांवर काय जादू केलीत. बाहेर गेलात आणि सरपंच एकदम सामाजिक सेवेचा चेहरा घेऊनच आतमध्ये आले. गायकवाड म्हणाले, कधी कधी वेगळा मार्ग अवलंबून पुढे जावं लागतं.

मी त्यांना एवढंच म्हणालो की सोबत बसलेले गृहस्थ हे शिक्षक नाहीत तर आमचे पत्रकार मित्र आहेत, आणि त्यांची ओळख खूप दूरपर्यंत आहे. तुम्ही आम्हाला चांगल्या कामासाठी मदत करा. एवढंच काय तुम्ही त्या सरपंचाला सांगितलं. पत्रकार म्हटल्या म्हटल्या सरपंच यांना घाम फुटला. कारण पत्रकारांच्या समोरच त्यांनी आपल्याला पैशाची मागणी केली होती.

आम्ही पुन्हा त्या झोपडी जवळ आलो. आजोबा आमची वाट पाहत होते. झाली का मोहीम फत्ते म्हणत आजोबांनी आम्हाला दुरूनच पुकारा केला. मुख्याध्यापकांनी होकाराची मान हलवली. मी, आजोबा आणि त्या शिक्षकांचा निरोप घेऊन निघालो.

शिक्षकही त्यांच्या मार्गाने निघाले. आजोबा शेतीच्या मशागतीसाठी निघाले. पण राज्यातल्या त्या आदिवासी आश्रमशाळेच्या आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या कोलमडून गेलेल्या व्यवस्थेबद्दल कोण आणि कधी काय करणार, असा प्रश्न या निमित्तानं माझ्या मनात रेंगाळत होता. हा प्रश्न केवळ एका किंवा दोन आश्रमशाळेचा नव्हताच. हा प्रश्न राज्यातल्या त्या प्रत्येक आश्रमशाळेचा आहे की जिथं अलीकडे मुलं सापडत नाहीत. त्याचा बोजा शिक्षकावर येऊन पडतो. केवळ आश्रमशाळाच नाहीत तर जिल्हा परिषदेची शाळा, महानगरपालिका, नगरपालिकेची शाळा या सगळ्या शाळांना अक्षरशः घरघर लागलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com