आपली बॅंकच बरी! (ऋता बावडेकर)

ऋता बावडेकर
रविवार, 11 डिसेंबर 2016

विजयचा सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल.’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. विजयनं सुजयला सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं...अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’

विजयचा सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल.’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. विजयनं सुजयला सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं...अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’

कॉलेजमध्ये शिकणारे दोन मित्र - सुजय आणि विजय. या दोघांची मैत्री संपूर्ण कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होती. म्हणायला तीन वर्षांपूर्वीची त्यांची ओळख; पण अगदी बालपणापासूनचे मित्र असल्यासारखा त्यांचा व्यवहार होता. बघता-बघता शिक्षण संपलं. पुढं काय? दोघं विचार करत होते. सुजय म्हणाला, ‘‘आपण इथं प्रयत्न करूच; पण परदेशातही प्रयत्न करायला काय हरकत आहे?’’ विजयला कल्पना आवडली. मग दोघांचे त्या दिशेनंही प्रयत्न सुरू झाले.

...आणि अखेर दोघांच्याही प्रयत्नांना यश आलं. आखाती देशात वेगवेगळ्या कंपन्यांत; पण एकाच शहरात दोघांनाही नोकरी मिळाली. सुरवातीला रेंटवर राहिल्यावर काही दिवसांनी दोघांनी मिळून एक फ्लॅट घेतला - स्वतःचा! खूश होते दोघंही. दिवसभर नोकरी करून रात्री दोघंही अगदी थकून जात, वेगळं काही करायला वेळच मिळत नसे. मग शनिवार-रविवार ते बाहेर फिरायला निघत. अशा पद्धतीनं त्यांची बरीच ठिकाणे बघून झाली होती.

आनंदात दिवस चालले होते. पण एक दिवस सुजय म्हणाला, ‘‘यार विजय, बोअर झालं राव. घरी जाऊन येऊ या? खूप वर्षं झाली. घरच्यांना भेटलोच नाही...’’ विजयलाही जाणवलं- खूप दिवसांत फोनशिवाय आपला घरच्यांशी संपर्क नाही. त्यालाही कल्पना पसंत पडली. मग दोघांनी रजा वगैरे काढून घरी जाण्याची तारीख नक्की केली. वास्तविक, दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम होती, त्यामुळं त्यांच्या घरची मंडळी त्यांचे पैसे घेत नसत. पण आता घरी जाणार, तर प्रत्येकाला गिफ्ट्‌स घ्यायला हव्यात आणि नाही म्हणत असले, तरी आईबाबांना पैसेही द्यायला हवेत, असं सुजयच्या मनात आलं. ते त्यानं विजयबरोबर शेअर केलं. विजयलाही कल्पना अर्थातच आवडली. दोघांनी मिळून गिफ्ट्‌स खरेदी केली आणि घरी गेल्यावर आईबाबांच्या नावावर पैसे ट्रान्स्फर करण्याचं त्यांनी ठरवलं.

दरम्यान, ऑफिसमधील एका सहकाऱ्याबरोबर बोलताना विजय ही गोष्ट सहज बोलून गेला. ऐकताना त्या माणसाचे डोळे एकदम लकाकले. थोड्या वेळानं तो म्हणाला, ‘‘तुमचा प्लॅन एकदम उत्तम आहे. पण मी एक गोष्ट सुचवू का?’’ विजय म्हणाला, ‘‘सुचव की...’’ तो माणूस म्हणाला, ‘‘गिफ्ट वगैरे ठीक आहे; पण आईबाबांना पैसे कसे देणार तुम्ही?’’ विजय म्हणाला, ‘‘अर्थातच त्यांच्या खात्यात जमा करणार.’’ त्याला मधेच तोडत तो सहकारी म्हणाला, ‘‘तिथं असं किती व्याज मिळणार आहे? त्यापेक्षा मी एक आयडिया सांगतो. बघ पटतीय का...’’ विजय उत्सुकतेनं ऐकू लागला...

‘‘तुमची सगळी कल्पना सुंदर आहे. पण मला वाटतं, बॅंकेत तुम्हाला ठरल्याप्रमाणं व्याज मिळेल, ते जास्त मिळालं तर?’’ विजयच्या भुवया उंचावल्या. त्याच्या मनातलं ओळखून तो सहकारी म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीची एक आर्थिक व्यवहार करणारी कंपनी आहे. तिथं तुम्ही पैसे ठेवा, बॅंकेत मिळतं त्यापेक्षा दुप्पट व्याज ही कंपनी तुम्हाला देईल...’’ विजयच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य, आनंद दिसू लागला. पण मनात शंका होती, ‘‘असं दुप्पट व्याज आम्हाला का आणि कोण देईल?’’ तो सहकारी म्हणाला, ‘‘अरे माझ्या ओळखीच्या माणसाची ही कंपनी आहे. तो असे व्यवहार करतो आणि त्यांना नफाच इतका असतो, की दुप्पट व्याज देणं त्यांना परवडतं... मग बोलू त्याच्याबरोबर?’’ ‘‘मला माझ्या मित्राबरोबर बोलावं लागेल. मी एक-दोन दिवसांत तुला सागंतो,’’ विजय म्हणाला. ‘‘लवकर सांग रे, त्याच्याकडं खूप गर्दी असते,’’ तो सहकारी म्हणाला. विजयनं मान डोलावली आणि तो घरी निघाला.

सुजयला त्यानं सगळं सांगितलं. विजय खूप उत्साहात होता. पैसे दुप्पट होणार म्हणून. सुजयला कळेना याला कसं समजवावं... अखेर तो म्हणाला, ‘‘विजय, मित्रा, आपण शांतपणे विचार करू.’’ ‘‘अरे विचार काय करायचाय त्यात? किती छान प्लॅन आहे,’’ विजय म्हणाला. ‘‘हो बरोबर आहे,’’ सुजय शांतपणे म्हणाला. ‘‘विजय, तुला ती गोष्ट माहिती आहे? दोन मित्र पैसे कमवून घरी येत असतात. एक जण म्हणतो, सगळे पैसे घरी नको न्यायला. लोक चर्चा करतील. त्यापेक्षा झाडाखाली पुरून ठेवू, लागतील तसे नेऊ. दुसरा मित्र तयार होतो. पण पहिला मित्र रात्री येऊन सगळे पैसे चोरून नेतो आणि आरोप दुसऱ्या मित्रावर करू लागतो. आपल्या कपटात वडिलांनाही सहभागी करतो. त्यांना झाडाच्या ढोलीत बसवून दुसऱ्या मित्रानंच पैसे चोरले असं म्हणायला लावतो. दुसऱ्या मित्राच्या लबाडी लक्षात येते. तो ढोलीजवळ जाळ करतो आणि पहिल्या मित्राचे वडील आतून ओरडत बाहेर येतात... विजय, हा तुझा सहकारी या पहिल्या मित्रासारखा आहे. आपले कष्टाचे पैसे तो घेईल. व्याज सोड, उद्या त्यानं मूळ पैसेही दिले नाहीत, तर काय करणार आपण? त्यापेक्षा थोडा फायदा कमी झाला तरी चालेल, बॅंकच जास्त विश्‍वसनीय आहे. आपण तिथूनच पैसे ट्रान्सफर करू.’’ विजयला पटलं आणि त्यांनी तसं करूनही टाकलं... हो, उद्या खासगी कंपनीत पैसे ठेवण्याचा मोह झाला तर!

Web Title: ruta bawdekar's article