दिन-ए-मर्द

चांगला नवरा मिळावा म्हणून स्त्रिया उपास-तापास, व्रत-वैकल्ये करतात. पुरुष असं काहीही करत नाहीत; पण ‘चांगली बायको’ हीच एक अंधश्रद्धा असल्याचे ठाऊक असल्याने पुरुष उपवासाच्या भानगडीत पडत नाहीत!
Man
Mansakal
Summary

चांगला नवरा मिळावा म्हणून स्त्रिया उपास-तापास, व्रत-वैकल्ये करतात. पुरुष असं काहीही करत नाहीत; पण ‘चांगली बायको’ हीच एक अंधश्रद्धा असल्याचे ठाऊक असल्याने पुरुष उपवासाच्या भानगडीत पडत नाहीत!

चांगला नवरा मिळावा म्हणून स्त्रिया उपास-तापास, व्रत-वैकल्ये करतात. पुरुष असं काहीही करत नाहीत; पण ‘चांगली बायको’ हीच एक अंधश्रद्धा असल्याचे ठाऊक असल्याने पुरुष उपवासाच्या भानगडीत पडत नाहीत! बायकांचा आणखी एक आक्षेप असतो की, वर्षाचे ३६५ दिवस पुरुषांचेच असतात, त्यामुळे वेगळा असा ‘पुरुष दिन’ साजरा करायची किंवा त्यांच्यासाठी काही करायची गरजच नाही; पण आजकाल जो तो स्त्रियांच्या सबलीकरणाच्या गोष्टी करत आहे, मग या सबल झालेल्या स्त्रियांना पुरे पडण्यासाठी पुरुषांचं सबलीकरण कोण करणार? त्यासाठी हवाय ‘पुरुष दिन’!

अलीकडेच सोशल मीडियामुळे मला कळलं की दरवर्षी १९ नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिवस असतो. मी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतल्या कुठल्याही गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवत नसल्याने, या पोस्टच्या खरेपणाचा शोध घेतला तेव्हा मला कळले की, १९ नोव्हेंबरच्या जागतिक पुरुष दिनाची बातमी सत्य असून त्याच दिवशी जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) सुद्धा असतो. या दोन्ही दिन-विशेषांच्या एकत्रित येण्यानेच बहुदा या जगात पुरुषांची अवस्था शोचनीय झाली असावी, असा माझा कयास आहे.

आपला समाज हा पुरुषप्रधान असल्याचे म्हटले जात असले आणि समाजातील गरीब वर्गाच्या बाबतीत ते बऱ्याच अंशी खरेदेखील असले, तरी मध्यम, सेमी-मध्यम, उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गाच्या घरात डोकावून पाहिल्यास पुरुषप्रधान संस्कृती ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचे लक्षात येते. स्त्रिया आपल्या दिवाणखान्यात सास-बहूच्या सिरीयल बघून भावूक होत असताना, मैत्रिणींसोबत फोनवर गॉसिप करत असताना किंवा सोशल मीडियावर साडी चॅलेंज खेळत असताना पुरुष बिचारे आपल्या ऑफिसातल्या बॉसच्या नावाने खडे फोडत असतात, रशिया-युक्रेनच्या युद्धाचे काय होईल, याची चिंता वाहत असतात, सेन्सेक्स घटेल की वाढेल याचा अंदाज लावत असतात, क्रिकेट वर्ल्डकपच्या मॅचमध्ये इंडियन टीमची स्ट्रॅटेजी काय असावी, यावर आपलं मत मांडत असतात किंवा ठाकरे-शिंदे वादात अमुक कसा बरोबर आणि तमुक कसा चूक यावर घमासान चर्चा करत असतात.

पुरुषांना आयुष्यात किती तडजोडी कराव्या लागतात, किती वेळा मन मारून जगावे लागते, याची काही गणतीच नाही. साधे शॉपिंगला जायचे म्हटले, तरी बाजारात तीन-चार रंगापेक्षा जास्त रंगाच्या ट्राउझर मिळत नाहीत. शर्ट, टी-शर्ट आणि फारतर कुर्ता यापलीकडे कपड्यांचे आणि रंगाचे ऑप्शन्स मिळत नाहीत. पायातले बूट, चपला या बाबतीतही पुरुषांकडे फार पर्याय उपलब्ध नसतात. एखादा तापाने फणफणलेला पुरुष बस, ट्रेन किंवा मेट्रोमध्ये थंडीने कुडकुडत उभा असेल, तरी त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही; मात्र धडधाकट (आणि सुंदर) स्त्री उभी दिसली तर डझनावारी पुरुष तिला सीट देण्यासाठी उभे राहतात. तुम्हीच सांगा, आजारी पुरुषासाठी आपली सीट सोडणारी स्त्री तुमच्या तरी पाहण्यात आहे काय?

पुरुषांना काय काय करावं लागतं! कुटुंबासाठी कमवावं तर लागतंच. त्याउप्पर घरात शांती प्रस्थापित करण्यासाठी काळजावर दगड ठेवून मनाविरुद्ध खोटं बोलण्याचं काम पुरुषांनाच करावं लागतं. अखंड पत्नीव्रता बनण्यासाठी (किमान तसे दाखवण्यासाठी) पुरुषांना जे कष्ट करावे लागतात, त्याची काही गणनाच नाही. प्रत्येक पुरुष आपण इतरांपेक्षा हटके दिसावे म्हणून जीवतोड प्रयत्न करत असतो; तरीही बायका ‘सगळे पुरुष मेले सारखेच’ किंवा ‘Men will be Men’ म्हणून त्यांची वासलात लावतात, हे पुरुष जातीवर प्रचंड अन्यायकारक आहे.

निसर्गानेही पुरुषांवर काही कमी अन्याय केलेला नाहीये. काळा, पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, निळा असे मोजकेच रंग पुरुषांच्या नजरेला दिसतात. स्त्रियांना मात्र किरमिजी, तपकिरी, कोंबडा कलर, राणी कलर, राखाडी, मोरपंखी असे शेकडो रंग ओळखता येतात. एक स्त्री दुसरीला; मूठभर अमुक, चिमूटभर तमुक, हलकीशी हळद, पळीभर तेल, चमचाभर मसाला, चवीपुरते मीठ, अशाप्रकारे स्वयंपाकाची रेसिपी सांगते तेव्हा त्यांना ते प्रमाण योग्यरीत्या उमगत असलं, तरी यातलं कुठलंच प्रमाण आम्हा पुरुषांच्या डोक्यात शिरत नाही. चुकून कधी बायकोने सांगितलेल्या प्रमाणानुसार तांदूळ-पाणी घेऊन आपण भात कुकरला लावला, तर भात करपल्याशिवाय कुकरची शिटी वाजत नाही.

सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही खानदानातील सगळ्यांचे वाढदिवस, ॲनिव्हर्सऱ्या, जयंत्या-मयंत्या हे सगळं सगळं बायकांच्या बरोब्बर लक्षात राहतं. तो तिला पहिल्यांदा भेटल्याचा दिवस, त्याने प्रपोज केल्याची वेळ, पहिलं अमुक अन् पहिलं तमुक हे सगळं स्त्री, ‘दिल चाहता है’मधील सुबोध काटेकोरपणे लक्षात ठेवते आणि आपल्या नवऱ्यानेही ते तसं लक्षात ठेवावं अशी अपेक्षा बाळगते. अरे, ज्या पुरुषांना बिचाऱ्यांना स्वतःच्या लग्नाचा वाढदिवसदेखील लक्षात राहत नाही, त्यांना हे सगळे तपशील कसे लक्षात राहणार, जागतिक पुरुष दिवस लक्षात राहणे तर खूप पुढची गोष्ट!

आपले पंतप्रधान आणि अर्थमंत्री स्वच्छ प्रशासनाच्या गोष्टी करतात. आर्थिक गुन्हेगाराच्या नाड्या आवळण्याच्या वल्गना करतात. मी म्हणतो, जेव्हा आपल्या घरी मळलेले कपडे धुण्यासाठी म्हणून आपण आपल्या होम डिपार्टमेंटकडे देतो. या कपड्यांच्या खिशात चुकून राहिलेल्या चिठ्ठ्या, तिकिटे, हॉटेलची बिलं, कपड्यावरील एखादा केस, एखादा गुलाबी डाग याबद्दल होम डिपार्टमेंटकडून आपली अशी काही कसून चौकशी होते की सीबीआय, रॉ आणि आयबीवाल्यांनी लाजून मान खाली घालावी; पण होम डिपार्टमेंटकडे लॉन्ड्रीसाठी दिलेल्या कपड्याच्या खिशात, चुकून राहिलेले पैसे; मात्र आपल्याला पुन्हा कधीच दिसत नाहीत. खंत या गोष्टीची वाटते की, घरोघरी, वर्षानुवर्षे पुरुषांच्या खिशातून स्त्रियांच्या पर्समधे होत असलेल्या या हजारो कोटींच्या मनी-लॉडरिंगबद्दल पंतप्रधान आणि अर्थमंत्री असे कुणीच आवाज उठवीत नाही!

‘जागतिक पुरुष दिन हे एक मिथ आहे, मिथ आहे, मिथ आहे’, असं सांगून सांगून मी थकलो; पण कुणी याकडे लक्षच देत नाहीये. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कट्टर समर्थक आहे; पण हल्ली १९ नोव्हेंबरला दिवसभर सोशल मीडियावर Happy Men''s Day चे मेसेज धुमाकूळ घालीत असताना ‘Men''s Day’ या अंधश्रद्धेबाबत ''अंनिस''वाले मूग गिळून गप्प का राहतात, हे अनाकलनीय आहे.

बायकांचा एक आक्षेप असतो, की चांगला नवरा मिळावा म्हणून स्त्रिया उपास-तापास, व्रत-वैकल्ये करतात. पुरुष असं काहीही करत नाहीत; पण माझं म्हणणं असं आहे की, मुळात ‘चांगली बायको’ हीच एक अंधश्रद्धा असल्याचे ठाऊक असल्याने पुरुष उपवासाच्या भानगडीत पडत नाहीत! बायकांचा आणखी एक आक्षेप असतो की, वर्षाचे ३६५ दिवस पुरुषांचेच असतात, त्यामुळे वेगळा असा ‘पुरुष दिन’ साजरा करायची किंवा त्यांच्यासाठी काही करायची गरजच नाही. संपूर्ण जगातील मध्यमवर्गीय पुरुषांच्या वतीने मी इथे सांगू इच्छितो की, आजकाल जो तो स्त्रियांच्या सबलीकरणाच्या गोष्टी करत आहे. अरे, आज आमच्याकडे जी आहे तीच स्त्री आम्हाला झेपत नाहीये, तर मग या सबल झालेल्या स्त्रियांना पुरे पडण्यासाठी पुरुषांचं सबलीकरण कोण करणार? त्यासाठी हवाय ‘पुरुष दिन’!

पत्नीच्या भीतीने ऑफिस सुटल्यावरही घरी न जाता बाहेरच टाईमपास करणाऱ्या पुरुषांमुळे, घरच्या जेवणाची चव आवडली नसली, तरी तसे स्पष्ट सांगण्याची हिंमत नसलेल्या पुरुषांमुळे, ‘या साडीत मी कशी दिसते?’ या प्रश्नाला गुळमुळीत उत्तर देणाऱ्या पुरुषांमुळे, वीकएंडला न कुरकुरता घराची साफसफाई करणाऱ्या पुरुषांमुळे आणि आई-बायकोच्या भांडणात ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेणाऱ्या पलायनवादी पुरुषांमुळे, पुरुष जात बदनाम झाली आहे. या समस्त पुरुषांचे तातडीने सबलीकरण करणे गरजेचे आहे.

पुरुषपणा केवळ आम्हा मध्यमवर्गीयांनाच भोगावा लागतो, असे नव्हे. मध्यंतरी एक बातमी वाचली की, दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांना घटस्फोटानंतर त्यांच्या पत्नीला पोटगी म्हणून ७३० मिलियन डॉलर्स (जवळजवळ ६,००० कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत. सगळीकडे लोक चर्चा करीत होते की, शेखसाहेब इतकी मोठ्ठी रक्कम खुशीखुशी द्यायला तयार झालेत, म्हणजे त्यांच्याकडे संपत्ती तरी किती असेल? आणि मी विचार करीत होतो की, शेखसाहेब इतकी मोठ्ठी रक्कम आनंदाने द्यायला तयार झालेत, याचा अर्थ, या माणसाला बायकोपासून त्रास किती असेल!

सर्वसामान्य (म्हणजे माझ्यासारखे) पुरुष स्वभावाने भोळे असतात. दोस्तीत आणि नात्यांत ते व्यवहार पाहत नाहीत. आपल्या आयुष्यातल्या स्त्रियांवर त्यांचा प्रचंड विश्वास असतो आणि त्या स्त्रियांना खूश ठेवण्यासाठी ते आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतात. घरचा कर्ता पुरुष म्हणजे कुटुंबीयांची येता-जाता बदडायची पंचिंग बॅग असते. आई, बहीण, प्रेयसी, बायको, मुलं सगळेच त्याला बदडतात. सगळ्या फसलेल्या कामाचं अपश्रेय त्याच्या डोक्यावर मारतात. तोही बिचारा ओशाळवाण्या चेहऱ्याने हसून प्रसंग साजरा करतो. आपली माणसं खूश आहेत, यातच तो खूश असतो. काही पुरुष असतील याला अपवाद; पण काही पुरुषांत आढळणाऱ्या विकृतीपायी ‘पुरुषी वृत्ती’ वगैरे म्हणून विकृतीचं सरसकटीकरण करणं स्त्रियांनी टाळायला हवं.

पुरुषांनी जेंटलमन असावं, अशी स्त्रियांची अपेक्षा असते; पण आपल्या मुलाने जेंटल बनू नये, तर स्ट्राँग बनावं, यासाठी त्या सतत त्याला टोचत असतात. ‘तू मुलगा आहेस, मुलीसारखं रडू नकोस’ असं म्हणत त्याच्यातला हळूवारपणा संपवला जातो. आपला मुलगा खेळताना पडला, त्याला लागलं, तर त्याला मोटिव्हेट करताना बाप म्हणतो की, ‘मर्द को दर्द नही होता!’ अरे पण दुसऱ्याच्या वेदना, दर्द जाणवल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने मर्द ठरत नाहीत, हे त्या होऊ घातलेल्या पुरुषाला कुणी शिकवतच नाही! खरंतर आजचा ‘पुरुष दिन’ साजरा-बिजरा करण्याचा माझा काही बेत नव्हता, पण बायको म्हणाली, ‘नथिंग डुईंग! साजरा करायचा म्हणजे करायचा आणि मी म्हणेन तस्साच साजरा करायचा!’

असो. समस्त महिलापीडित निमूटकटूबोलपाचवक, वस्त्रपात्रप्रक्षालक, प्रसंगोत्पात बल्लवाचार्य दीन पुरुषांस, पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

(लेखक लोकप्रिय स्तंभलेखक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com