सह्याद्री प्रतिष्ठान अन् किल्ले संवर्धन...

टीम ई सकाळ
Tuesday, 2 July 2019

राज्यभरातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक व शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजमगुंडे व त्यांची टीम अहोरात्र काम करत आहेत.

राज्यभरातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक व शासन दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य श्रमिक गोजमगुंडे व त्यांची टीम अहोरात्र काम करत आहेत. राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते कशा प्रकारे काम करतात, याबाबत त्यांच्याशी केलेली चर्चा पुढीलप्रमाणेः

गड किल्ल्यांची आवड कशी निर्माण झाली?
लहानपणापासून इतिहासाची आवड होती. शालेय शिक्षण घेताना गडकिल्ल्यांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले. गडकिल्ले व त्याविषयी उपलब्ध असणारा इतिहास याची नेहमी उत्सुकता असायची. पुढे पुण्यात उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर गड-किल्ले पाहत असताना गड किल्ल्यांची अधिक आवड निर्माण झाली.

किती गड-किल्ल्यांना आजपर्यंत भेटी दिल्या आहेत?
तसं पाहिलं तर गड-किल्ल्यांना भेट हि पुण्यातील सिंहगड किल्ल्याला भेट देण्यापासून झाली. आपल्या इतिहासात उल्लेख असलेल्या 250 किल्ल्यांना भेट द्यायची इच्छा होती. किल्ले पाहत असताना जणू छंदच जडला. पाहता-पाहता एक-दोन नव्हे तर संबंध महाराष्ट्रात 400 किल्ले पाहिले. 1 जानेवारी 2010ला लिंगाणा किल्ला पाहिला. महाराष्ट्रात किल्ले पाहत असताना या गडकोट-किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्व वास्तुंची माहिती व्हावी यासाठी 22 मे 2010 ला किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन भरविले. या अनोख्या प्रदर्शनाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. आजपर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर देशातील 1673 किल्ल्यांना अभ्यासू दृष्टिकोनातून पाहिले व प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या आहेत. शिवाय, माहिती गोळा केली आहे.

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आजपर्यंत काय-काय केले?
सह्याद्री प्रतिष्ठाणची सुरुवात दहा वर्षांपुर्वी करण्यात आली. दुर्गसंवर्धन हे एक तत्व उराशी बाळगून झपाटून कामाला सुरुवात केली. एक-एक करत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. हे करत असताना काम पाहत हळूहळू माणसे जोडत गेली. विविध संस्था जोडू लागल्या. आजपर्यंत सह्याद्री प्रतिष्ठाणच्या संपुर्ण महाराष्ट्रभर 70-80 शाखा निर्माण झाल्या आहेत. या शाखांच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे संवर्धन-रक्षणाचे काम केले जाते. सुरुवातील गड-किल्ल्यांवर पाहणी करत कचरा गोळा करणे, साफसफाई करणे, किरकोळ दुरुस्त्या करणे अशी कामे केली. या कामांना व्यापक स्वरुप देता यावे म्हणून गड-किल्ल्यांवर माहिती, दिशादर्शक फलक लावण्याची कामे हाती घेतली. सुमारे 100 किल्ल्यांवर अश्लिल कृत्ये, इतर कृत्ये करु नये यासाठी फलक लावण्यात आले. तसेच सरकारला किल्ल्यांसंबंधी करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला जाग येण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली. आंदोलने करण्यात आली. काही वर्षांपुर्वी सिंहगडच्या कल्याण दरवाजाची दुरवस्था समोर आल्यानंतर या दरवाजाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे लोकसहभागातुन विविध ठिकाणी दरवाजे, प्रवेशद्वार बसविण्यात आले. तोफांना तोफगाडे बसविण्यात आले. वेताळवाडी किल्ल्यावर सर्वात अत्याधुनिक तोफखाना बसविल्या. दरम्यान, अशा प्रकारे विविध ठिकाणी किल्ल्यांवर कामे करण्यात आली असून, अद्यापही विविध ठिकाणी अनेक कामे सुरु आहेत.

गडकिल्ल्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर पुढील ध्येय काय?
गडकिल्ल्यांचे संवर्धन करत असताना महराष्ट्रातील नव्हे तर संपुर्ण देशातील सर्वच गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच या पाहिलेल्या किल्ल्यांचेही भव्य प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यामध्ये 1800-1900 पाहिलेल्या किल्ल्यांचा समावेश असून, या प्रदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान उपस्थित राहावेत यासाठी आग्रही आहे.

या कामापासून इतरांना प्रेरणा मिळते का?
हो. निश्चितच. गड-किल्ल्यांचे संवर्धनाचे काम करत असताना हळूहळू अनेकजण जोडत गेले. स्वयंप्रेरणेने अनेक तरुण-संस्था यात सामिल झाल्या आहेत. गड किल्ले संवर्धन हे तत्व न राहता हि मोठी चळवळ निर्माण झाली आहे. यात उल्लेखनिय कार्य करणाऱया व्यक्ती व संस्थांना संस्थेमार्फत पुरस्कार देउन सन्मानित करण्यात येत आहे. त्यामुळे या कामांमुळे अनेकांनाही प्रेरणा मिळते.

दुर्गसंवर्धन करताना आर्थिक गणिते कशी बसविता?
सुमारे दहा वर्षांपुर्वी दुर्गसंवर्धानाच्या कामाला सुरुवात केली. कचरा काढणे, साफसफाई करणे या कामांसाठी पैसा लागत नसे. श्रमदानासाठी लोकसहभागाचा मोठा वाटा असायचा, त्यामुळे अनेक कामे करण्यास बळ मिळे. परंतु, जसजसे काम वाढत गेले तशी आर्थिक गरज भासू लागली. दरम्यान, या कामांसाठी स्थानिक पदाधिका-यांनी स्वत:च्या खिशातून व वर्गणीतून कामे केली. मदतीचे आवाहन केल्यानंतर निधी जमू लागला. त्यातून अनेक कामे करण्यात आली. यातूनच जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रध्वज फडकविला असून, हा एकमेव किल्ला आहे.

या कामासाठी सरकारकडून काही मदत मिळतेय काय?
दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतल्यानंतर त्या कामाची व्याप्ती वाढली. तसेच हि कामे करण्यासाठी वेळोवेळी विविध आंदोलने-निवेदनामार्फत सरकारचे लक्ष वेधले. याची दखल घेत सरकारने दुर्ग संवर्धन समिती स्थापन केली. किल्ल्यांवर कारावयाच्या कामांबाबत सरकारी आदेशही काढला आहे. तसेच गड-किल्ल्यांवर करावयाची कामे याबाबत पुरातत्व खात्याला याबाबत पञ दिले आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक गड-किल्ल्यांसाठी निधी मंजूर केला आहे.

सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
गडकिल्ल्यांचे संवर्धन करत असताना हि कामे अधिकाधिक लोकसहभागातून व्हावीत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकारनेही या वास्तू जतन करणे गरजेचे असून याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त निधी देउन या गडकिल्ल्यांना पुनःवैभव प्राप्त करुन द्यावे, एवढीच अपेक्षा आहे.

सध्याच्या तरुण पिढीला काय आवाहन कराल?
आजच्या तरुणपिढीला या गड-किल्ल्यांचा इतिहास माहिती होणे गरजेचे असून, भविष्यातही या वास्तु टिकल्या पाहिजेत. युवकांची शोधक दृष्टी असते, त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी गड-किल्ले पहायला जाल त्या ठिकाणी ते चिञ जतन करावे. गडावर गेला असता अश्लिल / अघोरी  कृत्ये करु नका. गड-किल्ल्यांची दुरावस्था आढळल्यास संबंधित संस्था/विभाग पुरातत्व खाते याला माहिती देण्यात यावी. इतिहासाचा ठेवा जतन करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. त्यामुळे हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करावा.

प्रतिष्ठानने सध्या एक मोठे काम हाती घेतला आहे, ते म्हणजे पद्मदुर्ग किल्ल्यावर भारतातील सर्वात मोठा भगवा झेंडा लावणे. या कार्यासाठी Archaeological Survey of India कडून परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्गसंवर्धन कार्यात आपणही आपले आर्थिक योगदान देऊ शकता:
संपर्क: 9689017733
Sahyadri Prastisthan
Syndicate Bank, Branch: Chinchwad
A/c NO. 53222010079906
IFSC Code : SYNB0005322


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahyadri Prastisthan working for fort in maharashtra

फोटो गॅलरी