esakal | सर्वसामान्य माणूस वजा कलाकार (सायली पानसे-शेल्लीकेरी)
sakal

बोलून बातमी शोधा

Saily Panse Shellikeri

कलाकार अखंडपणे देत आला आहे, वर्षानुवर्षं. आपल्याला. एका शब्दाच्या कौतुकाचीही अपेक्षा न करता सुरूच असतात त्याचे कष्ट..दिवस-रात्र. फक्त स्वत:च्या आणि श्रोत्यांच्या आनंदासाठी... कुणी त्याच्याबद्दल चांगलं बोलो अथवा वाईट, तो कायम आनंदच देत राहणार निरपेक्षपणे...! त्याच्यासाठी वेगळं काही करत नसलो आपण तरी किमान त्याला वाईट तरी ठरवायला नको. चुकला असेल तो कधी तरी खासगी आयुष्यात...नसेल जमलं त्याला गणित संसाराचं...आपण समजून घ्यायला नको का त्याला? 

सर्वसामान्य माणूस वजा कलाकार (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sakal_logo
By
सायली पानसे-शेल्लीकेरी sailyshellikeri@gmail.com

कलाकार अखंडपणे देत आला आहे, वर्षानुवर्षं. आपल्याला. एका शब्दाच्या कौतुकाचीही अपेक्षा न करता सुरूच असतात त्याचे कष्ट..दिवस-रात्र. फक्त स्वत:च्या आणि श्रोत्यांच्या आनंदासाठी... कुणी त्याच्याबद्दल चांगलं बोलो अथवा वाईट, तो कायम आनंदच देत राहणार निरपेक्षपणे...! त्याच्यासाठी वेगळं काही करत नसलो आपण तरी किमान त्याला वाईट तरी ठरवायला नको. चुकला असेल तो कधी तरी खासगी आयुष्यात...नसेल जमलं त्याला गणित संसाराचं...आपण समजून घ्यायला नको का त्याला? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘शी! केवढा माज...’
‘दारू पितो म्हणे खूप...’
‘दुसरं लग्न...?’
‘कित्ती साधा होता आधी, आता बघा...’
‘त्याचे फार मूड सांभाळायला लागतात म्हणे...’
‘एवढं मानधन देतंच कोण त्याला...?’
‘असंच करतात ही कलाकार मंडळी...’
‘एक ना दोन हजारो भानगडी...’
‘जाऊ दे बाई...आपल्याला काय करायचयंय...!’

कलाकारांबद्दल अशा प्रकारची शेरेबाजी खूप लोक सहजपणे करताना दिसतात. त्यांच्या कलेमुळे ही कलाकारमंडळी सर्वसामान्यांना इतकी जवळची वाटत असतात की नकळत त्यांच्या खासगी आयुष्यात सहज डोकावलं जातं. कलाकाराबद्दलची इकडून तिकडून उडत उडत आलेली गॉसिप्स इतर लोकांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होऊन बसतात! एक कलाकार म्हणून लोकांबरोबरचा, श्रोत्यांबरोबरचा परिचय सोडल्यास, बाकी कुठलीही ओळख नसताना कलाकाराच्या खासगी आयुष्यात किती पटकन डोकावलं जातं. एक श्रोता या नात्यानं कलाकाराच्या कलेबद्दल थोडंफार बोलणं एकवेळ मान्य करता येईल; पण त्याव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं खरं म्हणजे गैरच! कलाकार असला तरी माणूस असतो तो. त्यालाही सर्वसामान्य लोकांचे सगळे नियम लागू असतात!

सतत लोकांसमोर हसतमुख राहणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं म्हणणं ऐकणं, त्यांच्याबरोबर फोटो काढू देणं, स्वाक्षऱ्या देणं...हे सगळं कधी तरी नकोसंही वाटत असेल त्याला. हजारो लोक रोज भेटत असतील, सारखे फोन करत असतील, कधीतरी कंटाळा येत असेल. शेवटी कधीतरी स्वत:साठी जगावंसं वाटत असेलच की त्यालाही! कलाकारालाही भावना असतात, आवडी-निवडी असतात, छंद असतात, मूड असतात. फक्त तो सतत डोळ्यासमोर असतो म्हणून त्याचं वागणं श्रोत्यांसमोर सहजतेनं येतं आणि ते थोडंफार चुकीचं असलं तरी जरा जास्तच खटकतं इतरांना.

सर्वसामान्यपणे एखाद्यानं दुसरं लग्न केलं तर चालवून घेतात सगळे. एखाद्यानं दारू घेतली तरी चालते सगळ्यांना; पण कलाकारांनी कधी तरी थोडी बंधनं झुगारली तर ती मात्र चालत नाही. बाकीचे सर्वसामान्य लोक मनात येईल ते करून मोकळे होतात; पण कलाकाराला मात्र स्वैराचाराला मुभा नसते. कलाकार जेव्हा रंगमंचावरून खाली उतरतो तेव्हा तोही एक सर्वसामान्य माणूसच असतो हे श्रोत्यांनीही लक्षात घ्यायला हवं. अर्थात्‌, कलाकाराला सामाजिक भान असण्याला पर्याय नाही; किंबहुना हे कुठलेही आनंद उपभोगताना त्यानं स्वतःची इमेज सांभाळणं इष्टच ठरतं. कारण, त्याला मानणारे लोक असतात, त्याच्या कलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांचा तो आदर्श असतो. त्याच्या समस्या, त्याच्या अडचणी, त्याची व्यसनं त्यानं वैयक्तिक पातळीवर ठेवली तर समाजात त्याचा मान टिकून राहायला मदत होईल हे नक्की.

‘मनाला येईल ते मानधन सांगतो म्हणे’...पण त्याला मनासारखं मानधन देणारे लोक आहेतच नं? आणि त्यानं तेवढे कष्टही घेतले आहेत, तेवढा वेळही घालवला आहे, तेवढं आयुष्यही खर्ची घातलं आहे. देणारा देतोय-घेणारा घेतोय...आपण कोण मध्ये लुडबुड करणारे? कधीतरी मानधनाच्या नावावर लुटणारीही मंडळी असतात. आपल्याकडे असणाऱ्या मोडक्या-तोडक्या ज्ञानाच्या जोरावर फायदा घेऊन, रसिकांची दिशाभूल करून, कलेचं आणि कलाकारांचं नाव खराब करण्यात त्यांना जराही गैर वाटत नाही. अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणारे असे कलाकार कधी तरी आढळतातही. त्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि मग सुरू होतो माज, कलाकार असण्याचा...‘मला हेच लागतं, मी असंच वागणार, मी हेच करणार’ वगैरे.
मात्र, कुठल्याही क्षेत्रात नाण्याच्या दोन बाजू असायच्याच. तशाच इथंही..!

एक सच्चा कलाकार काय कारतोय. काय मानधन घेतोय यापेक्षा त्यानं समाजाला काय दिलं आहे हे बघायला हवं. मग कळेल त्याची योग्यता. एक मैफल ऐकली की श्रोत्यांची सगळी दुःखं क्षणात हवेत विरून जातात. एखादं सुंदर चित्र घेऊन जातं दूर कुठल्याशा वेगळ्याच जगात. एखादं कथाकथन घेऊन जातं एका वेगळ्या काल्पनिक विश्वात. कधी या आनंदाची पैशात किंमत करून बघितलीत तर लक्षात येईल! असं मोल नाहीच लावता येत. कारण, कलेला मोल नसतं हेच खरं.

कलाकार अखंडपणे देत आला आहे, वर्षानुवर्षं. आपल्यासाठी. एका शब्दाच्या कौतुकाचीही अपेक्षा न करता सुरूच असतात त्याचे कष्ट...दिवस-रात्र. फक्त स्वत:च्या आणि श्रोत्यांच्या आनंदासाठी...
कुणी त्याच्याबद्दल चांगलं बोलो अथवा वाईट, तो कायम आनंदच देत राहणार निरपेक्षपणे...!
त्याच्यासाठी वेगळं काही करत नसलो तरी किमान त्याला वाईट तरी ठरवायला नको...

कलाकार असला तरी सर्वसामान्य माणूसच आहे तो...चुकला असेल कधी तरी खासगी आयुष्यात...नसेल जमलं गणित संसाराचं...असतील त्याची दुःखं त्याला न पचवता येणारी...आपण समजून घ्यायला नको का त्याला? तेवढंच करू शकतो आपण त्याच्यासाठी... एक खरा,समजूतदार रसिक म्हणून...!

Edited By - Prashant Patil

loading image
go to top