गोष्ट पैशापाण्याची : ‘ती’च्या हाती ‘अर्थसाक्षरते’ची दोरी!

सुखी, प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग आर्थिक संपन्नतेतूनच जातो. त्यामुळे ही चळवळ घराघरात रुजवण्याची गरज आहे.
गोष्ट पैशापाण्याची
गोष्ट पैशापाण्याची Sakal

स्त्री असो की पुरुष, दोघांनाही आर्थिक साक्षर व्हायची गरज आहे; पण या बाबतीत मात्र आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक उतरंडीत स्त्री अजूनही पुरुषाच्या खूपच मागे आहे. आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे. मग ती तिच्या घराला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल, अशा अर्थसाक्षर घरांमुळे पुढे गाव आणि शहरं अर्थसाक्षर होतील. आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वतंत्र होईल. सुखी, प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग आर्थिक संपन्नतेतूनच जातो. त्यामुळे ही चळवळ घराघरात रुजवण्याची गरज आहे.

मुलगी शिकली, प्रगती झाली!’, ‘एक स्त्री शिक्षित झाली तर एक घर शिक्षित होते, एक घर शिक्षित झाले तर एक गाव शिक्षित होते आणि अशी गावं शिक्षित झाली तर समाज शिक्षित होतो.’ सावित्रीमाई, महात्मा फुले यांच्यावरील भाषणावेळी किंवा इतर शिक्षण क्षेत्रातील समाज सुधारकांविषयी भाषण करताना किंवा सरकारी जाहिरातीतही ही आणि अशी अनेक वाक्य आपण सर्वच लहानपणापासून वाचतो, ऐकतो, बोलतो. इतकंच काय, पण आपल्या सर्वांना हे अगदी मनोमन पटतंही.

ज्या ज्या कुटुंबात स्त्रिया शिकल्या, ती घरं खरोखर प्रगतीकडे वाटचाल करतात. हे आपण सगळीकडे पाहतो, तरीही मुलगा-मुलगी भेदभाव पाहायला मिळतो. शहरी असो वा ग्रामीण, आजही बऱ्यापैकी उच्चशिक्षणात मुलाच्या खर्चाला प्राधान्य दिले जाते. एखादी नवी प्रॅापर्टी घेताना सहसा मुलाचे नाव लावतात, अगदी मुलगी म्हणजे दुसऱ्या घरची हे खूळ डोक्यातून जातच नाही. कित्येक ठिकाणी अगदी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले की मुलीचे लग्न लावून दिले जाते. जास्त शिकली तरी शिकलेली मुलं मिळतीलच याची खात्री नसते किंवा आर्थिक परिस्थितीची हतबलता आणि सामाजिक प्रगती जी टीव्ही, समाजमाध्यमं आणि इंटरनेटवर दिसते तशी प्रत्यक्षात ग्राऊंडवर नसल्यानेही अनेकदा खरी कारणं समोर येत नाहीत.

भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी स्त्रियांच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीबद्दल तर न बोललेलंच बरं. त्यातही शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य किंवा २ ते ६% इतकं अत्यल्प होतं. १९४८ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा जोतिबा फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढली आणि सावित्रीबाईंसोबत खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली. आज १७२ वर्षांनंतरचा कालखंड आणि आपल्या देशात स्त्रियांवरील होत असलेले अत्याचार आणि एकूण सामाजिक स्थिती पाहता त्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात.

आता या सर्व स्त्री-शिक्षणाचा आणि आपल्या पैशापाण्याच्या गोष्टीचा काय संबंध? असाही विचार तुमच्या मनात येऊ शकतो, जो रास्तही आहे; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे - ‘‘I measure the progress of community by the degree of progress which women have achieved’’ म्हणजे समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो. यात समाजातील सर्व स्तरातील, (गरीब-श्रीमंत, सामाजिक मागास-प्रगत, ग्रामीण-शहरी, गृहिणी- नोकरी-धंदा करणाऱ्या, विधवा, अपंग आणि अगदी एकूणएक.) स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारांचा मुद्दा येतो. त्यात पुरुषांसह स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार असेल, वडील आणि पतीच्या संपत्तीमधील समान मालकी हक्क असेल, स्वतःच्या विकासाचे, तसेच निर्णयाचे स्वातंत्र्य असेल, शिक्षण आणि पुढे पर्यायाने मिळालेले आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या मूलभूत अधिकारापर्यंत.

आज आपण सर्व एकविसाव्या शतकात आहोत. शंभर-दोनशे वर्षांपेक्षा निश्चितच चांगली परिस्थिती आज आहे. कित्येक मुली-महिला शिकल्या. त्या नोकरी, उद्योगधंदा, विज्ञान-तंत्रज्ञान, संरक्षण, कला, नाटक, चित्रपट, बॅंकिंग तसेच अगदी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या पैसे कमावतात, नेतृत्व करतात. अगदी गृहिणी असलेल्या स्त्रियाही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत प्रचंड स्वावलंबी आणि माहितगार झालेल्या पाहायला मिळतात. हे सर्व जरी खरे असले तरी आजही आर्थिक निर्णय घेताना त्यांचा सल्ला किंवा मत बहुतांश वेळा विचारातही घेतले जात नाही. आपली पुरुषप्रधान संस्कृती कितीही केल्या त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास या ना त्या कारणांनी परवानगी देत नाही, हे कटुसत्य कोणताही संवेदनशील माणूस नाकारू शकत नाही.

स्त्रियांना घरखर्च किंवा फारफार तर कपडे, दागदागिने, किराणा सामान, भाजीपाला, भांडी किंवा काही इलेक्ट्रॅानिक्सच्या खरेदीपलिकडे फार काही स्वातंत्र्य नसते. जागेची, जमिनीची खरेदी असो, गृहखरेदी, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स, शेअरबाजार किंवा उद्योग व्यवसायाशी निगडित गुंतवणुकीच्या व्यवहारात त्यांना फार अधिकार दिले जात नाहीत. बहुतांश ठिकाणी तर मतही विचारात घेतले जात नाही. फक्त कल्पना दिली जाते किंवा शेवटी पूजेला बसवण्यापुरता मानसन्मान!

अगदी सर्रास हे असेच होतेय, असे नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बदलही होतोय. कित्येक महिला आता स्वतःचे डीमॅट अकाऊंट उघडून व्यवहार करताहेत. चांगले उत्पन्न असलेल्या तर अगदी लग्नाच्या आधी घरं घेताहेत. बचत, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करताहेत. यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला हवी. यासाठी प्रत्येक घरात विशेष प्रयत्न व्हायला हवेत. काही ठराविक रक्कम महिलांनीही फक्त बचत न करता विविध ठिकाणी गुंतवायला हवी, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हवी.

घरात एखाद्या गुंतवणुकीसंदर्भात, टॅक्स प्लानिंगसंदर्भात चर्चा सुरू असेल तर त्यात महिलांनी स्वतःहून भाग घ्यायला हवा. कोणताही आर्थिक व्यवहार व्हायच्या आत तो संपूर्ण समजून घ्यायलाच हवा. एकदा का पैसे दिले आणि त्यात जर चुकून नुकसान झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार असतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार चोख व योग्यच व्हायला हवा, हा कटाक्ष अत्यंत महत्त्वाचा असतो. यात बऱ्याचदा उसनेपासने करून, उधारीवर किंवा अधिक व्याज देऊन एखादी गुंतवणूक होत असेल आणि ती चुकीची असेल तर त्याला ठामपणे विरोधी व्हायला हवा.

सुरुवातीला जरी ही मते विचारात नाही घेतली तरी हळूहळू परिस्थिती शंभर टक्के सुधारते. माझी समस्त माता, भगिनींना वैयक्तिक विनंती आहे की, घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तुम्ही माहिती करून घ्या, त्यावर विचार करा, सल्ले द्या, तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल ते शिका, अभ्यास करा आणि पुढच्या वेळी कमीत कमी चुका करत स्वतःची अन्‌ कुटुंबात आर्थिक प्रगती करा.

स्त्री असो की पुरुष, दोघेही आयुष्यात स्वप्न पाहतात. दोघांनाही ती पूर्ण करायची असतात. त्यातून स्वतःसह कुटुंबाचे जीवनमान उंचावयाचे असते. चांगले आरोग्य, संकटसमयी पैसा, नोकरी-धंद्यात यश आणि बेसिक गरजा भागण्यासाठी सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते. खरं तर यालाच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात. त्यासाठी एका मोठ्या जनजागृतीची, चळवळीची गरज आहे. स्त्री असो की पुरुष, तसं पाहिलं तर दोघांनाही आर्थिक साक्षर व्हायची गरज आहे; पण या बाबतीत मात्र आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक उतरंडीत स्त्री अजूनही पुरुषाच्या खूपच मागे आहे. तिला प्रत्येक घरात समोरून प्राधान्य मिळेलच, असे नाही. तिला स्वतःच आता पुढे यायला हवे, आर्थिक व्यवहार, त्याची गुंतवणूक शिकायला हवी. वडील, भाऊ, पती, सासरे, मित्र यांच्या खांद्याला खांदा लावून ठाम उभे राहायला हवे. निर्णय घ्यायला हवेत.

शेवटी - आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे. मग ती तिच्या घराला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल, अशा अर्थसाक्षर घरांमुळे पुढे गाव आणि शहरं अर्थसाक्षर होतील. आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वतंत्र होईल. सुखी, प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग या अशा आर्थिक संपन्नतेतूनच जातो.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com