
‘ब स, गिने-गिनाये कुछ पन्ने बाकी है आनंद की जिंदगी के. उस के गिने-गिनाये कुछ दिनों की तरह...’ मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर जेव्हा जेव्हा `आनंद’ बघतो, तेव्हा तेव्हा डॉ. भास्कर बॅनर्जीच्या आवाजातलं हे वाक्य ऐकताना काळजात हलल्यासारखं होतं. हा एकच नव्हे, असे आणखीही प्रसंग आहेत या चित्रपटात.
कोण कुठला आनंद सहगल? ओळख ना पाळख… नात्याचा ना गोत्याचा... दिल्लीहून मुंबईला येतो काय, जेमतेम सहा महिने राहतो काय आणि या वास्तव्यात डॉ. भास्कर बॅनर्जी, डॉ. प्रकाश कुलकर्णी, त्याची पत्नी सुमन यांच्यासह ओळखीतल्या सर्वांना चटका लावून या जगाचा निरोप घेतो काय, तेही माणसानं जगावं कसं, हे साध्यासोप्या पद्धतीनं शिकवून.... सारंच विलक्षण!
‘आनंद’ (१९७०) हा चित्रपट सर्वांना चांगला माहित आहे, तेव्हा कथेची उजळणी करण्याची आवश्यकता नाही. मरणाच्या उंबरठ्यावर असूनही हसत-खेळत जगणारा व जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारा… अनोळखी माणसांनाही आपल्या वागणुकीनं लळा लावून जाणारा… कविता, गाणं, खाणं आणि माणसांशी निरपेक्ष मैत्री या गोष्टींवर विलक्षण जीव लावणारा या चित्रपटाचा नायक - अर्थात आनंद गेली पन्नास वर्षे लोकांच्या मनात घर करून आहे. हृषीकेश मुखर्जी यांची कथा आणि त्यांचंच दिग्दर्शन, गुलजार यांचे कधी खुसखुशीत तर कधी काळजाला भिडणारे संवाद, संगीतकार सलील चौधरी यांची `जिंदगी कैसी है पहेली’, `मैने तेरे लिये ही सात रंग के’, `कहीं दूर जब दिन’, `ना.. जिया लागे ना’ ही गाणी आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या गुणांमुळे `आनंद’ कायमचा आठवणीत आहे. दरवेळी त्यातले नवनवे अर्थ उलगडून दाखवत!
कॅन्सरचा आजार बळावलेला आनंद सहगल (राजेश खन्ना), मुंबईत वैद्यक व्यवसाय करणारा डॉ. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन) आणि याच व्यवसायातला त्याचा मित्र डॉ. प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) या तिघांभोवती फिरणारी ही कथा. समाजातली गरीबी, भूक, अज्ञान, कुपोषण या गोष्टींमुळं डॉ. भास्कर नैराश्यानं पछाडलेला, तरीही नीतीमत्तेची चाड असलेला नि बराचसा फटकळ. त्यामुळेच रोग्यांमध्ये तो फारसा लोकप्रिय नसतो. याउलट डॉ. प्रकाश व्यावहारिक आणि रोग्यांना आवडेल अशी `ट्रीटमेंट’ देणारा. श्रीमंत रुग्णांकडून फी उकळायची आणि गरिबांना मोफत उपचार द्यायचे हा त्याचा बाणा. अर्थात एवढे मतभेद असूनही या दोघांची मैत्री टिकून असते.
या दोघांच्या दिल्लीतल्या एका मित्राच्या शिफारशीवरून आनंद हा कॅन्सरचा रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतो आणि त्याच्या रूपानं एक ‘वादळ’ घोंघावत येतं. तिशीच्याखालचा, उत्साहाचं मूर्तिमंत प्रतीक असलेला, बडबड्या, विनोदी, काहीशा आक्रमक स्वभावाचा आनंद पुढले सहा महिने आपल्या वागणुकीनं सर्वांना आपलंसं करतो. डॉ. प्रकाशची पत्नी सुमन, हॉस्पिटलची मुख्य नर्स मिसेस डीसा, भास्करवर मुग्ध प्रेम करणारी रेणु, नाट्यकलावंत इसाभाई, भास्करच्या घरातले रघुकाका या लोकांच्या सहवासात आनंद स्वतः देखील रमतो. त्याचं आगमन आणि शेवटी इथंच त्याला आलेला मृत्यू यादरम्यानचा घटनाक्रम म्हणजे हा चित्रपट...
एकलकोंडा भास्कर आनंदच्या सहवासानं खूप हळवा होतो. त्यामुळंच एकदा आनंद दिल्लीला परत जाण्याचा विषय काढतो, तेव्हा भास्कर ताडकन म्हणतो, `अजिबात नाही, तू कुठंही जाणार नाहीयेस. तुला मरण आलं तरी ते माझ्याच कुशीत येईल.’
`अरे वा! आता कसं बोललास!.... चल मग तुझ्या आवाजात तुझी कविता रेकॉर्ड करूया. तीच कविता म्हण, `ओ मौत, तू एक कविता है...’
आनंद त्याच्यासमोर माईक धरतो. भास्कर कविता म्हणू लागतो –
`मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है,
मिलेगी मुझको....’
कविता म्हणून झाल्यानंतर भास्कर आनंदचं बोलणं रेकॉर्ड करायचा आग्रह धरतो. आनंद तयार होतो, पण रेकॉर्डिंगचं बटण सुरू असतानाच आरशासमोर जाऊन केस विंचरतो, तोंडाला पावडर लावतो. हे सगळं करून झाल्यावर एका नाटकातला त्याला माहित असलेला संवाद म्हणून दाखवतो –
`बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहांपनाह! उसे न तो आप बदल सकते है, और न मै! हम सब रंगमंच की कठपुतलियाँ हैं, जिनकी डोर उपरवाले की उंगलियोंसे बंधी हुई हैं. कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नही कह सकता!’
यानंतर दोघंही नाटकी हास्य करता करता खरंच हसू लागतात.
दुखणं बळावलेला आनंद शेवटी अंथरुणाला खिळतो. मिसेस डीसा, इसाभाई, सुमन, रघुकाका... सगळेच त्याच्यासाठी आपापल्या देवाचा धावा करू लागतात. सुन्न झालेला भास्कर डायरीत लिहून जातो, `बस, गिने-गिनाये कुछ पन्ने बाकी है आनंद की जिंदगी के....’
अखेर `तो’ अटळ क्षण येऊन ठेपतो. आनंद अखेरचे श्वास मोजत असताना भास्करला कुणीसं सांगितलेलं आठवतं, होमिओपॅथीमध्ये या आजारावर गुणकारी औषध आहे. तो लगेच त्या डॉक्टरांकडे जातो. तोवर डॉ. प्रकाश आणि रेणु आनंदजवळ थांबतात. भास्करला यायला उशीर होतो तसा आनंद आणखी अत्यवस्थ होतो. दम लागलेल्या अवस्थेतच तो रेकॉर्ड केलेली कविता ऐकवायला सांगतो. टेप सुरू होते. भास्करची कविता ऐकतानाच वेदना असह्य झालेला आनंद जिवाच्या आकांतानं ओरडतो, `बाबू मोशाय...!’. तो त्याचा अखेरचा आवाज. त्यानंतर सारं शांत! भास्कर धावत धावत येतो, पण तोवर आनंदनं जगाचा निरोप घेतलेला असतो. आनंदच्या अचेतन देहाजवळ बसून भास्कर उद्वेगानं त्याच्यावर ओरडतो, `मी तुला असा गप्प होऊ देणार नाही. सहा महिन्यांपासून सतत तुझी बडबड ऐकत आलोय मी. बोल माझ्याशी... बोल काहीतरी..’
`बाबू मोशाय!’ आनंदचा आवाज कानावर येतो, भास्कर चमकून आनंदच्या चेहर्याकडे बघतो. पण तो तर निष्प्राण असतो. मग हा आवाज कोणाचा? लक्षात येतं, हा टेपरेकॉर्डरमधला आनंदचा आवाज. `बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है... जहांपनाह! उसे न तो आप बदल सकते है, और न मैं! हम सब रंगमंच की कठपुतलियाँ हैं, जिनकी डोर उपरवाले की उंगलियों से बंधी हुई हैं. कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नही कह सकता!’ या संवादाबरोबरच टेपरेकॉर्डरमधली टेपही संपते. आनंदच्या आयुष्याप्रमाणे.
भास्करच्या तोंडची कविता आणि त्यापाठोपाठ येणारा आनंदचा संवाद या दोहोंमध्ये एक-दीड मिनिटाचं अंतर असतं. हे अंतर रहावं यासाठीच आनंदला `मेकअप’ करायला लावण्याची युक्ती लेखक-दिग्दर्शकानं योजलेली. पण त्या कल्पकतेला दाद देण्याचं भानही राहू नये, एवढा तो शेवटचा प्रसंग अंगावर येतो. भास्कर, रेणु आणि प्रकाश शोकाकुल अवस्थेत असताना पृष्ठभूमीवर भास्करचा धीरगंभीर आवाज घुमतो, `आनंद मरा नही... आनंद मरते नहीं !!
(सदराचे लेखक हिंदी - मराठी चित्रपटांचे अभ्यासक आणि सुगम संगीताचे जाणकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.