साप्ताहिक राशिभविष्य (२७फेब्रुवारी ते ५ मार्च )

विश्‍वनियंता, पंचमहाभूतांच्या देवता आणि माणूस म्हणवून घेणारी माणसं यांच्या परस्पर देवाण-घेवाणीतून हा विश्‍वप्रपंच चालवला जात असतो.
Horoscope
HoroscopeSakal

राशिभविष्य

(२७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२)

विश्‍वनियंता, पंचमहाभूतांच्या देवता आणि माणूस म्हणवून घेणारी माणसं यांच्या परस्पर देवाण-घेवाणीतून हा विश्‍वप्रपंच चालवला जात असतो. ग्रहांना आधिभूतांचंच अधिष्ठान आहे, त्यामुळेच पंचांगातील अवकहडा चक्र बेतलं गेलं. ज्योतिष हे विज्ञान आहे आणि ते मनोविज्ञानाशी खेळणारं अद्‌भुत गूढशास्त्र अर्थातच अध्यात्म आहे! असो.

सप्ताहात महाशिवरात्र आहे. यंदाची मंगळवारी येणारी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे. ही एक रवी-गुरू सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर आलेली दुर्मीळ पर्वणी आहे. मंगळवारी महाशिवरात्र क्वचित येते. आधिभूतांना चेतवणारा हा अंगारक मंगळ अंगारकीशी संबंधित आहे. ‘गणानाम्‌ त्वाम् गणपतीम्‌’ असं म्हटलं जातं. गणपती भक्तांना विघ्नहर्ता आहे आणि अभक्तांना वक्रतुंड अर्थातच विघ्नकर्ता होत असतो! माणूस हा शरीररूपी यंत्रच आहे. त्यातच कलियुगातील माणसाचं जीवन हे यंत्रतंत्रानेच बांधलं जातं किंवा जोडलं जातं. यॅं हे वायुबीज ज्या वेळी त्रिगुणात्मक होतं, त्या वेळी ते कौशल्याने वापरण्याचं यंत्रच होत असतं! ‘तत्‌’च्या शुभत्वाचा शुद्धभाव त्याला जोडला नाही तर हे यंत्र विघातक ठरतं, हे आपण पदोपदी सध्या बघतच आहोत!

सध्याचा भावनाहीन यांत्रिक माणूस जगण्याचं तंत्र विसरला आहे. ‘तत्‌’मधील समर्पणाची भावना विसरलेला सध्याचा तांत्रिक माणूस राक्षस बनून सतत प्रमाद करत दशदिशांना वावरत असतो. अशा या प्रमादी राक्षसाला अर्थातच रावणाला शिवोपासनेशिवाय पर्याय नसतो. म्हणूनच रावणाने शिवलिंग पूजलं. तेच शिवाचं आत्मलिंग गोकर्ण महाबळेश्‍वरस्थित आहे. अर्थातच, ते गणपतीने प्रतिष्ठापलं आहे!

मित्र हो, ता. १ मार्चला, मंगळवारी येणाऱ्या महाशिवरात्रीला आपण गणपतीचं स्मरण करत आपल्यातील रावणाला ‘गणानाम्‌ त्वाम्‌ गणपतीम्‌ हवामह्’ असं म्हणत, अर्थातच ‘हरि ॐ तत्‌ सत्‌’ म्हणून शिवस्मरण करत जगण्याचं भावतंत्र शिकवू या!

सुवार्ता व मानसन्मान मिळतील

मेष : रवी-गुरू युतियोगातून या सप्ताहात ग्रहांचं फिल्ड प्रकाशमान होणार आहे. अर्थात, अमावास्येच्या या सप्ताहात! बुद्धिजीवी मंडळींना अफलातून ग्रहमान राहील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस अतिशय शुभसंबंधित. मोठे मानसन्मान. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ मार्चचा गुरुवार मोठ्या सुवार्तांचा.

न्यायालयीन प्रकरणं सुटतील

वृषभ : रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात रवी-गुरू आणि बुध-शनी यांचे योग मोठे चमत्कार घडवतील. कोर्ट प्रकरणं सुटतील. वास्तुविषयक व्यवहार होतील. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात प्रवासात सांभाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी भावाबहिणीशी जपून.

दैवी प्रचितीचा अनुभव येईल

मिथुन : रवी-गुरू युतियोगाचं फिल्ड प्रचंड क्रियाशील राहील, न बोलता कामं करून घ्या. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह पूर्वसंचितातून लाभ देईल. विशिष्ट भूखंड सोडवाल. वारसाहक्काचे प्रश्‍न सुटतील. नोकरीत वरिष्ठांची कृपा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या दैवी प्रचितीची. खरेदीत जपा.

गुंतवणुकीतून लाभ

कर्क : अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर जुने वाद उकरून काढू नका. घरी वा दारी राजकारण टाळा. बाकी मंगळ-शुक्र सहयोगाची साथ राहीलच. घरातील तरुणांच्या चिंता संपतील. ता. ३ ते ५ हे दिवस शुभग्रहांच्या मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. तरुणांच्या छान मुलाखती.

पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ.

पूर्वसंचित फळास येईल

सिंह : रवी-गुरू सहयोगाचं पॅकेज अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात गुप्तधनाचा लाभ देईल. अर्थातच, पूर्वसंचित फळाला येईल. ता. २७ व २८ या दिवसांत पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं शत्रुत्व संपेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार भाग्याचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचं नैराश्‍य जाईल. अमावास्या संसर्गाची.

वास्तुयोग व प्रेमात यशस्वी व्हाल

कन्या : सप्ताहातील ग्रहयोग मोठे अपवादात्मक राहतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र सहयोगातून अफलातून लाभ. ता. २७ व २८ हे दिवस प्रचंड ऊर्जा देतील. मुलाखतींतून यश. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात वास्तुयोग. प्रेम प्रकरणं फुलतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या मौजमजेचा.

नोकरीतील चिंता संपतील

तूळ : रवी-गुरू योगाची पार्श्‍वभूमी अमावास्येच्या या सप्ताहात मोठी दैवी प्रचितीची राहील. विशिष्ट प्रतीक्षा संपेल. नोकरीतील विशिष्ट गुप्तचिंता जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या कलंदर होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना रविवार, सोमवार मोठे शुभलक्षणी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या सन्मानाची. मात्र, घरातील वृद्धांना जपा.

नोकरीत बदलीमुळे लाभ

वृश्‍चिक : सप्ताहातील ग्रहयोगांची संगती मोठी लाभदायी राहील. गृहिणींना सप्ताह छानच. नवपरिणितांचे भाग्योदय. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठ्या बॅटिंग फिल्डची. सरकारी कामं, नोकरीत बदलीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मानसन्मानाचा.

सतत अर्थपुरवठा होईल

धनू : सप्ताहातील रवी-गुरू सहयोगाची पार्श्‍वभूमी मानसिक पर्यावरण उत्तम ठेवेल. माणसांचा प्रेमळ सहवास. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना दिव्यप्रचिती मिळेल. नोकरीतील जडणघडणीतून उत्तम लाभ. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सतत अर्थपुरवठा. ता. ३ ते ५ हे दिवस एकूणच इम्युनिटी देणारे. मानसन्मान मिळतील.

संतांचे आशीर्वाद मिळतील

मकर : राशीतील ग्रहांचा गोलयोग आणि रवी-गुरू युतियोगाची पार्श्‍वभूमी भक्तांना महाशिवरात्रीजवळ दैवी प्रचिती देईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती आत्मतृप्त होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना संतांचे आशीर्वाद मिळतील. तीर्थाटनातून आनंद. सप्ताहाचा शेवट धनिष्ठा नक्षत्रास उत्सव-प्रदर्शनांतून नेणारा. सखीचा सहवास!

गुरुबळ तारून नेईल

कुंभ : राशीच्या व्ययस्थानातील ग्रहांची गर्दी वैचारिक गोंधळ करू शकते. मात्र, रवी-गुरू युतियोगाच्या पार्श्‍वभूमीवर श्रद्धा बळकट ठेवा. ता. २ व ३ हे दिवस गुरुबळातून तारून नेणारे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ ते ५ हे दिवस चिंतामुक्त करणारेच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात वाद टाळावेत. आजचा रविवार पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सन्मानाचा.

सरकारी धोरणातून लाभ

मीन : सप्ताहातील ग्रहयोगांची मालिका आपणास सांभाळून घेणारीच. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य लाभ होतील. सरकारी धोरणांतून लाभ. नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी मोठे धनलाभ. आजचा रविवार रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना छप्पर फाडके देणारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com