वसंतदादांच्या साधेपणाच्या कथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sampat more writes about vasantdada patil political leader

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील राजाराम तातोबा माळी हे सातारा आगारात एसटीत वाहक होते

वसंतदादांच्या साधेपणाच्या कथा

आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नाला फारसे महत्त्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी सामान्य माणसांच्या छोट्या-छोट्या समस्याही समजून घेतल्या. त्या सोडवल्या; पण त्या गोष्टी जाहीर सभेत कधी सांगितल्या नाहीत. दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या, पण त्यांच्या बातम्या झाल्या नाहीत; पण त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील राजाराम तातोबा माळी हे सातारा आगारात एसटीत वाहक होते. त्यांना पोटाचे दुखणे सुरू झाले. ते डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशन केले. त्यानंतर त्यांना उभे राहून वाहकाचे काम जमेना. खूप त्रास व्हायचा. त्यावेळी रस्तेही चांगले नव्हते. खडकाळ रस्त्यावरून गाडी गेली की पोटाला दणका बसायचा. एक दिवस त्यांना वाटलं ‘नोकरी सोडूया’; पण नोकरी सोडायची तर घरात बायको, चार छोटी मुलं, कसा संसाराचा गाडा चालवायचा? त्रासही सहन होत नव्हता आणि नोकरी सोडता येत नव्हती. माळी रडकुंडीला यायचे.

एक दिवस त्यांनी गावातील पुढारी खासेराव पवार यांना आपली अडचण सांगितली. नोकरी सोडावी वाटते असेही ते म्हणाले. मग पवार त्यांना मुंबईला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे घेऊन गेले. दादांना त्यांनी माळी यांची सगळी परिस्थिती सांगितली.

दादा म्हणाले, ‘‘नोकरी का सोडतो? मी इथं कशाला आहे?’’

दादांनी तोडगा काढला, माळी यांना उभे राहून वाहकाचे काम जमत नाही म्हणून त्यांना वाहतूक नियंत्रण कार्यालयात काम देण्याचे मान्य केले. दादांच्या कामाची पद्धत अशी की, राजाराम माळी आणि खासेराव पवार मुंबईवरून घरी येईपर्यंत माळींची वाहतूक नियंत्रक कार्यालयात बदली झाल्याची ऑर्डर पोचली होती.

वसंतदादा पाटील यांच्याबाबतचा असाच एक किस्सा आमच्या गावातील वयोवृद्ध पुढाऱ्याने सांगितलेला. हा पुढारी आम्हाला सतत त्यांच्या काळातील राजकारणातील गोष्टी सांगायचा. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतरची एक घटना आहे. रस्त्यावरून एक ट्रक चाललेला. ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकाने त्या ट्रकला हात करत विचारलं, ‘‘काय झालंय?’’

‘‘आरं, आपलं दादा मुख्यमंत्री झाल्याती.’’ ट्रकमधल्या माणसानं सांगितलं.

‘‘आपलं वसंतदादा?’’

‘‘होय.’’

‘‘मग चला, मीबी येतो.’’

‘‘आरं, पण तुझ्या अंगावर ही रानातली कापडं हायती.’’

‘‘त्येला काय हुतंय. आपुन दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलंच हायती.’’ असे म्हणत तो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोतरावर मुंबईला निघाला.

शेकडो मैलांचा प्रवास करून ही गावाकडची माणसं दादांच्या बंगल्यावर पोहचली. दादा अजून येणार होते म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली. काही वेळाने दादा आले. आल्या आल्या त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेले. दादांनी त्याला विचारलं, ‘‘हरिबा, असा कसा आलायस? शर्ट कुठं आहे?’’

‘‘दादा, तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं. आता घरी कवा जाऊ आणि कापडं कवा घालू? तवर ही माणसं निघून आली असती. म्हणून तसाच आलू.’’

ते ऐकून दादा हेलावले. त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरिबाला घालायला दिला. दादा आत गेले, दुसरा शर्ट घालून आले. आपल्या कार्यकर्त्याचे भोळे-भाबडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणारे वसंतदादा लोकांना आठवत राहतात आणि त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरांतून सांगितल्या जातात.

आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नाला फारसे महत्त्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात. म्हणतात, ‘‘हे काम सायेबांना सांगतोयस? काय किंमत घालवतोय काय आमच्या सायेबांची.’’ हे अनेकांनी अनुभवलेले असते. साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणारे काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचे असते. अशा साहेबांच्यासाठी आणि त्यांच्या भोवतीच्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे.

एकदा काय झालं, दादांच्या एका बालमित्राला विहिरीवर बसवायचे इंजिन घ्यायचे होते. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याजवळ गेला. त्याला पोलिस आत सोडत नव्हते. तो तिथेच उभा राहिला. योगायोगाने दादा कुठेतरी बाहेर निघालेले. या मित्राने त्यांना जोराने हाक मारली, ‘‘वसंता है...’’

ती गावाकडच्या माणसाची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले. कडकडून मिठी मारली. ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते. ते हा प्रसंग पाहून चकित झाले. अधिकारीही अवाक् झालेले. राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळाभेट घेत होते.

त्यांनी विचारलं, ‘‘असं अचानक कसा आलास?’’

‘‘वसंता, गेल्या साली हिर पाडली. पाणी लागलंय चांगलं. औंदा इंजन बसवायचं हाय. तुझ्या ओळखीनं म्हटलं चांगलं इंजन मिळंल म्हणून आलूया’’ असं म्हणत त्यांनी फेट्यातला नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला. दादा त्याला म्हणाले, ‘‘राहू दे, ठेव तुझ्याजवळ. आता आलास तर दोन दिवस राहा.’’

त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय, याचे काहीही वाटत नव्हते. कारण दादा त्याला आपले वाटत होते. आणि दादांनाही त्याने हे काम सांगितले यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता. दादा हे दादाच होते. दादांनी त्याचे इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवले. आणि सांगलीला जाताना त्याला सोबत घेऊन गेले. विशेष म्हणजे दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही. या घटनेची जाहिरात केली नाही. कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सांगण्यासारख्या. कोणत्या गोष्टी सांगायच्या? आजचे नेते असे वागत नाहीत आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होते. दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या, पण त्यांच्या बातम्या झाल्या नाहीत; पण त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत.