गारेगारवाले रोडे मामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmad Rode

प्राथमिक शाळेत होतो तेव्हा दुपारच्या सुटीत चणे, चिरमुरे, गोळ्या, बिस्कीट असले काही तरी खायचो. माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा तिथे मधल्या सुटीत पंचवीस पैशाला एक गारेगार विकणारे रोडे मामा भेटले.

गारेगारवाले रोडे मामा

प्राथमिक शाळेत होतो तेव्हा दुपारच्या सुटीत चणे, चिरमुरे, गोळ्या, बिस्कीट असले काही तरी खायचो. माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा तिथे मधल्या सुटीत पंचवीस पैशाला एक गारेगार विकणारे रोडे मामा भेटले. त्यांच्याशी ऋणानुबंध विणले गेले. कालांतराने आम्ही शहरात गेलो. कधी मोठ्या हॉटेलात जायचा योग आला, तेव्हा तिथली थंडगार आईस्क्रीम खातानाही महागड्या आईस्क्रीमपेक्षा मामांनी प्रेमाने दिलेलं गारेगार आयुष्यभर स्मरणात राहिलं आहे...

आमची माध्यमिक शाळा गावापासून थोडी दूर होती. प्राथमिक शाळेत होतो तेव्हा दुपारच्या सुटीत किराणा दुकानात जाऊन चणे, चिरमुरे, गोळ्या, बिस्कीट असले काही तरी खायचो; पण गावापासून दूर असलेल्या हायस्कूलजवळ असलं काही खायला मिळणार नाही असं वाटत होतं. कारण ही शाळा दूर असल्याने तिथे कोणी खाऊ विकायला येणार नाही, अशी आमची ठाम खात्री झाली होती.

माध्यमिक शाळा सुरू झाली त्याच दिवशी एक पेरूवाला यायला लागला. तो दुपारी आला. त्यांच्याजवळील पेरूची टोपली मधल्या सुटीत संपली. पुन्हा तो दुसऱ्या दिवशी आला. असं तो येत राहिला. पुढं हिवाळ्यात चिरमुरे आणि भेळ घेऊन तो येऊ लागला. तो पावसाळ्यात पेरू विकायचा, हिवाळ्यात चिरमुरे आणि उन्हाळ्यात गारेगार. पंचवीस पैशाला एक गारेगार मिळायचं. ते शेजारच्याच कुंडल गावातून यायचे. आमची दुपारची जेवणाची सुटी व्हायची तेव्हा ते आणि त्यांची सायकल शाळेच्या गेटवर थांबलेली असायची.

अहमद रोडे असं त्यांचं नाव. एक दिवस मला समजलं. माझ्या आजोबांचे ते मित्र होते. त्या दिवशी आजोबांनी माझी व त्यांची ओळख करून दिल्यावर ते माझ्याशी जास्तच जवळीकतेने वागायला लागले. कधी मला फुकट गारेगार द्यायला लागले. ते आम्हाला सांगायचे, ‘पोरानो, शाळा शिका. सावलीतल्या नोकऱ्या लागतील. आयबापाला सुख लावा.’ त्यांची अनेक पोरांशी दोस्ती झालेली. आमची हायस्कूलातील चार वर्षे गेली. दहावीचं वर्ष आलं. बघता बघता संपलं. निरोप संमारंभाच्या दिवशी आमच्या वर्गातील मुलं आणि मुली खूप रडलो. शिक्षकांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर आलो. तिथं झाडाखाली रोडे मामा गारेगार विकत उभे होते. त्यांना पाहून मला भरून आलं. मी रडायला लागलो. तेसुद्धा गहिवरले. त्या दिवशी त्यांनी माझ्यासोबत असलेल्या सगळ्या पोरांना फुकट गारेगार दिली. त्या दिवसापासून आमचा शाळेचा संपर्क कमी झाला. पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेलो. माध्यमिक शाळा आणि रोडे मामा यांचा संपर्क कमी होत गेला.

दिवस निघून गेले, आम्ही शिकलो. शहरात गेलो. कधी मोठ्या हॉटेलात जायचा योग आला, तेव्हा तिथली थंडगार आईस्क्रीम खात असताना एकदम गारेगारवाले रोडे मामा आठवले. मग तिथल्या महागड्या आईस्क्रीमपेक्षा मामांनी प्रेमाने दिलेलं गारेगार आठवायला लागलं. विस्मृतीत गेलेले मामा पुन:पुन्हा आठवायला लागले. स्वप्नातही यायला लागले.

एक दिवस गावाकडे गेलो होतो. दुपारच्या प्रहरी रोडे मामा दिसले. इतक्या वर्षांनी पाहत होतो; पण त्यांच्यात काहीही बदल झाला नव्हता. जसेच्या तसे होते. फक्त आता ते सायकलीवरून नव्हते. त्यांनी मोटरसायकल घेतली होती. ते पाहून खूप समाधान वाटलं. किमान या वयात तरी त्यांची दगदग कमी होईल. आयुष्य सायकलीवर गारेगारची पेटी वागवण्यात गेलं. आता तरी त्यांना सुख लागलं. त्यांच्यातला हा बदल पाहून मला आनंद झाला. मामांनी किती दिवस सायकलीवरून पायपीट करायची? बरं झालं त्यांच्या जीवनाला गती मिळाली. माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. ते जवळ आले, ‘मामा नमस्कार.’

‘आरं, लै दिवसान नजरं पडलास? बरं चाललंय न्हवं का?’ त्यांनी विचारलं. मग आमच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. इतक्या वर्षांनंतर त्यांनी मला ओळखलं होतं. आमच्या बोलण्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मामा आमच्या वर्गातील मुलांची चौकशी करू लागले. आमच्या वर्गात कोण कोण मुलं होती हे त्यांनी अजून लक्षात ठेवलं होतं. जाताना एक गारेगार दिलं. मी पैसे द्यायला लागलो तर घेईनात.

‘राहू दे पोरा...’ म्हणत राहिले. तरीबी मी पैसे घेण्याचा आग्रह करायला लागल्यावर ते खवळले.

‘लै शाना हु नको. गप्प ठेव ते पैसे. तू कितीबी मोठा झाला तरी आमच्यासाठी बारकाच हैस’ त्यांचे ते शब्द ऐकून मला गहिवरून आलं. आपोआप डोळे गळायला लागले. मी भूतकाळात गेलो. मला ते सगळे दिवस आठवायला लागले. जसेच्या तसे...

‘गप पोरा. आरं दरवर्षी पाचवीला लहान पोरं येतात आणि दहावीपर्यंत शिकली की निघून जातात. जेव्हा ती दहावीच्या वर्गातील शेवटच्या दिवसाचा निरोप घेतात त्या दिवशी मला भरून येतं. पाच वर्षे त्या पोरांचा लळा लागलेला असतो. माझ्यादेखत लहानाची मोठी झालेली असतात. मला जीव लावतात; पण ज्या दिवशी ती निरोप घेऊन जातात, त्या दिवशी मला लय उदास होतं. अशी किती मुलं माझ्यासमोर लहानपणापासून वावरली आणि पुढं आपापल्या रोजीरोटीसाठी निघून गेली.

रहाटगाडगे हाये हे. थांबणार कसं? पुन्हा पाचवीत नवी पोरं येतात. दोस्ती होते. लळा लागतो, हे सुरू असतं बाळा. तुम्ही शाळेचा निरोप घेता तेव्हा तुमचे शिक्षक आत आणि मी गेटवर रडत असतो, आतल्या आत.’ मामा बोलत राहिले. सांगत राहिले. मामांचे मनोगत मी ऐकत राहिलो. ऐकताना भरून आलेलं, बोलणाऱ्या गारेगारवाल्या मामाला आणि ऐकणाऱ्या मलाही...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे महत्त्वाचे भाष्यकार आहेत.)

टॅग्स :Ice Creamsaptarang