रेडिओच्या ‘श्रीमंत’ आठवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redio

गावात मोजक्या घरात रेडिओ असणे, नंतर गावातील प्रत्येक घरात रेडिओ येणे या गोष्टी माझ्या पिढीने पाहिल्या आहेत.

रेडिओच्या ‘श्रीमंत’ आठवणी

गावात मोजक्या घरात रेडिओ असणे, नंतर गावातील प्रत्येक घरात रेडिओ येणे या गोष्टी माझ्या पिढीने पाहिल्या आहेत. आज लग्नसोहळ्यात टीव्ही, फ्रिजसारख्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू भेट दिल्या जातात. एकेकाळी गावगाड्यातील लग्नसोहळ्यात रेडिओ किंवा सायकल भेट मिळण्याला प्रतिष्ठा होती. आता गावातील काही घरांत रेडिओ आहेत, पण ते अडगळीत गेले आहेत. रेडिओ ऐकला जात नाही, कारण लोकांना ऐकण्याची नाही तर बघण्याची सवय लागली आहे. त्यामुळे रेडिओ केवळ आठवणीसाठी उरला आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी घरात रेडिओ असणे ही मोठी गोष्ट वाटत असे. सकाळी गावात घराघरातून रेडिओवरची गाणी ऐकायला मिळत असत. सुरुवातीला चार-दोन घरात रेडिओ असायचे. ज्यांच्याकडे रेडिओ असत त्यांच्या घरी लोक बातम्या ऐकायला जायचे. देशातील महत्त्वाच्या घडामोडी रेडिओच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचत असत.

गावात सुरुवातीला सरकारने दिलेला रेडिओ ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये आला. तो बघायला लोकांनी गर्दी केली होती, असे जुनेजाणते लोक सांगतात. एवढ्याशा डब्यातली माणसे कशी बोलत असतील, अशी चर्चा गावकरी उत्सुकतेपोटी करत होते. आवाज कुठून येतो? लोक कसे बोलतात? याचे लोकांना आश्चर्य वाटत होते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती.

रोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायतीचा शिपाई रेडिओ लावत असे. गावातील लोक कार्यक्रम ऐकत बसत. इतर कार्यक्रमापेक्षा लोकांना बातम्यांची आवड होती. बातम्या ऐकल्या की त्या दिवशी देशात, राज्यात काय घडले हे समजत असे. मग गावकरी दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करत. त्या वेळी मोजक्या आणि महत्त्वाच्या बातम्या लोकांना समजत आणि तेवढ्यावर लोक खुश असत. आजच्यासारखा ब्रेकिंग न्यूजचा जमाना नव्हता.

आज एक घटना घडत असताना त्याचे मिनिटा-मिनिटांचे अपडेट दिले जातात आणि लोक ते समजून घेण्यासाठी आतुर असतात; पण तेव्हा अशा बातम्या नसत. एकदा सकाळी आणि पुन्हा रात्री बातम्या ऐकल्या की गावातील लोक आपापल्या उद्योगात रमत. पुन्हा दिवसभर काय झाले, याची त्यांना उत्सुकता नसे. दिवसा काय घडले ते रात्रीच्या बातम्यांत समजत असे. कोणतीही घडलेली तात्काळ गोष्ट आपल्याला कळावी असा हव्यास त्यावेळी नव्हता.

आज एखादी गोष्ट कानावर आली की पहिल्यांदा समाजमाध्यमांवर जाऊन सर्च केले जाते. तिथे सापडले नाही तर अजून काही आधुनिक पद्धतीने शोधून ती बातमी पाहिली-वाचली जाते. कारण लोकांना समजून घेण्याची घाई झाली आहे. आपण समजून घेऊन ती आपणच लोकांना सांगितली पाहिजे, असा अट्टहास असतो. पूर्वी लोकांना अशी घाई नव्हती.

लोकांना रेडिओने एक शिस्त लावली होती; पण आज चांगले किंवा वाईट तात्काळ ऐकायची घाई जाणवते. अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या येतात. त्या वाचून त्याचा खरेपणा न पाहता व्हायरल केल्या जातात. पुन्हा समजते ही माहिती खरी नव्हती, तोवर हजारो लोकांना ती माहिती मिळालेली असते. एखादा साथीचा आजार पसरावा, तशी ती खोटी माहिती पसरत गेलेली असते.

रेडिओचा काळ असा नव्हता. रेडिओ ऐकून माणसे आनंदी व्हायची, अस्वस्थ होत नव्हती. जगण्यासाठी गरजेची माहिती रेडिओ द्यायचा. बातम्या असत, गाणी असत, नाट्य असे, भाषणे असत; पण हे सगळे ऐकायलाही लोकांना वेळ नसे. माझ्याच पंचक्रोशीबद्दल बोलायचे झाले तर लोकांना एवढा वेळ नसे. बातम्या मात्र रोज ऐकल्या जात. लोक आज बोलतात, आम्ही बिझी आहोत. याच बिझी लोकांना मात्र आज मिनिटामिनिटाला सांगितल्या जाणाऱ्या, फारशा महत्त्वाच्या नसलेल्या घडामोडी ऐकायला बघायला वेळ आहे!

एकच गोष्ट पुन:पुन्हा ऐकताना माणसे थकत नाहीत काय, असाही प्रश्न आहे. तेव्हा लोकांना जास्त वेळ होता तरी लोक मोजक्याच वेळी रेडिओजवळ असत. आज सगळीकडूनच माहितींचा मारा आपल्यावर होतो आणि ही दाही दिशेने येणारी माहिती आपण बघतो, वाचतो आणि ऐकतो. अनेकदा अल्पायुषी माहितीच येऊन आदळते. त्याच वेळी रेडिओच्या काळातली जीवनाला दिशा देणारी माहिती त्या त्या काळातल्या लोकांना आठवते.

आमच्या गावातील मला माहिती असलेला रेडिओवर गेलेला पहिला माणूस अधिक दिवटे. ते उपक्रमशील शेतकरी. त्यांची तूर पिकाबाबत एक मुलाखत होती. अमुक वेळी त्यांची मुलाखत रेडिओवर होणार आहे, असा मजकूर खडूने गावातील एका फळ्यावर लिहिलेला आठवतो. त्या वेळी त्यांचा आवाज रेडिओवर ऐकला होता. मुलाखत रात्री साडेसातदरम्यान होती. त्याच वेळी ते गावात होते. इथे असलेला माणूस रेडिओवर कसा बोलत आहे, हा त्यावेळी विद्यार्थीदशेत असताना मला पडलेला प्रश्न. त्यानंतर अनेक वर्षे गेली. वेगवेगळी माध्यमे आली.

या माध्यमांचा मला अभ्यास करता आला. या अभ्यासातून अनेक गोष्टी कळत गेल्या. स्वतःला पुणे आकाशवाणी केंद्रावर मुलाखतीसाठी जायची संधी मिळाली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर रेडिओसोबत माझ्या परिसराच्या जोडलेल्या अनेक आठवणी उभ्या राहिल्या. गावात मोजक्या घरात रेडिओ असणे, नंतर गावातील प्रत्येक घरात रेडिओ येणे या गोष्टी डोळ्यासमोर घडलेल्या. आता एकाही गावात रेडिओ ऐकला जात नाही, कारण लोकांना ऐकण्याची नाही तर बघण्याची सवय लागली आहे. घरात रेडिओ आहेत; पण बंद करून ठेवले आहेत.

आमच्याकडे पहिल्यांदा रेडिओ आला तो दिवस मला आजही आठवतो. तो आनंद पुन्हा कधीही झाला नाही, एवढी रेडिओची क्रेझ होती. कधी काळी एवढा लोकप्रिय असलेला रेडिओ आज मात्र अडगळीत पडलाय, अशी अवस्था आहे. रेडिओसोबत घेऊन गुरे चारायला जाणे, शेतात रेडिओ घेऊन जाणारी लोक १९९५ च्या आसपास दिसत. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लोकांनी रेडिओवर ऐकले आहेत. त्या दिवशी रेडिओला मोठा स्पिकर जोडून लोकांना निकाल ऐकण्याची व्यवस्था केली होती. आज हे निकाल एका लिंकवर प्रत्येकाला मोबाईलवर दिसतात; पण एखादा निवडणूक निकाल सामूहिक ऐकताना मिळणारा आनंद हा एकट्याने बघताना होत नाही.

आकाशवाणीच्या सुरू असलेल्या बातम्या, त्याच वेळी नळाला सुटलेलं पाणी, पाणी भरतभरत बातम्या ऐकायच्या. गावातून तालुक्याला जाणारी पहिली बस त्याच वेळी जायची. गावातील ते वातावरण आता फक्त आठवणीतच मनात कप्प्यात उरले आहे.

आमच्या गावातील शंभर वर्षांचे सायकलपटू आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी गणपती बाळा यादव यांची पुणे आकाशवाणीने मुलाखत घेतली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत मी होतो. रेडिओच्या अगोदरच्या पिढीतील माणूस रेडिओचा काळ ओसरत चालल्यावर रेडिओ केंद्रात पोहोचत होता.

गती आणि प्रगतीचा काळ, माध्यमाचे सार्वत्रिकीकरण झाल्याच्या काळात रेडिओ जरी दूर गेला असला, तरी त्या दिवशी गणपती यादव यांना मात्र रेडिओच मोठा वाटत होता. आकाशवाणीवरून जेव्हा त्यांची मुलाखत प्रसारित झाली तेव्हा मी सोबत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि रेडिओवरून स्वतःचा आवाज ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यातील पाणी याचा मी साक्षीदार होतो.

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

टॅग्स :Memoriessaptarang