ज्युलियाचं 'होमकमिंग' (सम्राट फडणीस)

रविवार, 6 जानेवारी 2019

ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स मनोरंजनाचा अभूतपूर्व खजिना घेऊन शब्दशः आपल्या हाताच्या बोटांवर उभी राहिली आहेत. या प्लॅटफॉर्मचं भविष्य अफाट आहे. बदलाचा वेग अतुलनीय आहे. माहिती आणि मनोरंजन (इन्फोटेन्मेंट) या दोन्ही क्षेत्रांचं मीलन "ओटीटी'वर होत आहे. मोबाईलच्या इवल्याशा वाटणाऱ्या स्क्रीनवर एक नवं विश्व जन्माला येत आहे.

ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा टीव्हीचा स्क्रीन उपलब्ध होता. "ओटीटी'नं या स्क्रीनवरून मोबाईलवर झेप घेतली. "नेटफ्लिक्‍स', "ऍमेझॉन प्राईम', "हॉटस्टार', "हूट' आदी मोबाईल ऍप्लिकेशन्स मनोरंजनाचा अभूतपूर्व खजिना घेऊन शब्दशः आपल्या हाताच्या बोटांवर उभी राहिली आहेत. या प्लॅटफॉर्मचं भविष्य अफाट आहे. बदलाचा वेग अतुलनीय आहे. माहिती आणि मनोरंजन (इन्फोटेन्मेंट) या दोन्ही क्षेत्रांचं मीलन "ओटीटी'वर होत आहे. मोबाईलच्या इवल्याशा वाटणाऱ्या स्क्रीनवर एक नवं विश्व जन्माला येत आहे. या नव्या विश्वातल्या मनोरंजनाचे ट्रेंड, तिथले प्रयोग, त्या प्रयोगांचे शिल्पकार अशा नानाविध गोष्टींची या सदरामधून भेट होईल.

"होमकमिंग' सेंटरमध्ये तू काम करत होतीस,' या थॉसमच्या प्रश्नावर हैडी भांबावते. "नाही' म्हणते. हैडी
मात्र, हैडी त्या सेंटरची प्रमुख होती, हे सिद्ध करणारं रेकॉर्ड थॉमसच्या हातात आहे. मग ती ते का नाकारतेय? आणखी खात्री करून त्यानं पुन्हा हैडीला गाठलं. तिला विचारलं ः "तुला वॉल्टर क्रुझ माहितीय?' हैडीचा पुन्हा नकार. क्रुझ कृष्णवर्णीय अमेरिकी सैनिक. हैडीचा त्या सेंटरमधला पेशंट होता. मग हैडी सारं का नाकारतेय...? कशामुळं...?कुणासाठी ती काम करत होती...? तिचं काम नेमकं होतं तरी काय...?
"ऍमेझॉन प्राईम'वर गाजत असलेल्या "होमकमिंग' मालिकेत प्रगल्भ ज्युलिया रॉबर्टसनं हैडीच्या भूमिकेत अप्रतिम रंग भरलेयत.
 

हैडी बर्गमन (ज्युलिया रॉबर्टस) एका साधारण हॉटेलमधली वेट्रेस. आईसोबत राहणारी. आला दिवस ढकलणारी. अधूनमधून भांबावणारी. मनात काहीतरी खोल खोल गाडलं गेलंय आणि ते अधूनमधून उसळी मारून वर येतंय, असा चेहऱ्यावर भाव. वेंधळी नाही; पण हैडी अस्वस्थ जरूर आहे. थॉमस कॅरेस्को (शिया विंगमॅन) नावाचा अमेरिकी संरक्षण खात्यातला - शब्दशः कारकून दर्जाचा- अधिकारी हैडीला शोधत शोधत येतो आणि "होमकमिंग'चा प्लॉट उलगडायला सुरवात होते.

"होमकमिंग' हे अमेरिकी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या गाईस्ट ग्रुप संस्थेचं सेंटर. युद्धातलं अमानवी क्रौर्य, जिवलगांना मरताना पाहूनही स्वतःच्या जगण्याची लढाई आधी लढल्याची न भरून येणारी वेदना, मानवी संवेदनांच्या चिंधड्या उडविणाऱ्या रणभूमीतल्या आठवणी अशा वातावरणातून सैनिकांनी थेट सर्वसाधारण समाजात मिसळण्यापूर्वी त्यांच्यावर "होमकमिंग' केंद्रात मानसिक उपचार केले जातात, इथपर्यंतची माहिती थॉमसकडं होती. इथं उपचार झालेल्या आणि नंतर घरी परतलेल्या एका सैनिकाच्या आईनं संरक्षण खात्याकडं केलेल्या तक्रारीची चौकशी थॉमस करतोय. हे सेंटर सैनिकांवर उपचार करत नाहीय; तर त्यांच्यावर अनाकलनीय प्रयोग करतंय, असं त्या पत्रात आईनं म्हटलेलं. संरक्षण खात्याच्या एकूण कारभारानुसार या पत्रावर "चौकशी करून फाईल बंद केली आहे,' असं सांगण्याचं काम थॉमसवर सोपवलेलं. थॉमसनंही त्यादृष्टीनं जुजबी चौकश्‍या करून काम आटोपण्यासाठी हैदीला गाठलेलं.

"होमकमिंग' सेंटरमध्ये तू काम करत होतीस?' या थॉसमच्या प्रश्नावर हैडी भांबावते. "नाही' म्हणते.
मात्र, हैडी त्या सेंटरची प्रमुख होती, हे सिद्ध करणारं रेकॉर्ड थॉमसच्या हातात आहे. मग ती ते का नाकारतेय?...थॉमसच्या मनातला डिटेक्‍टिव्ह जागा झाला. आणखी खात्री करून त्यानं पुन्हा हैडीला गाठलं. तिला विचारलं ः "तुला वॉल्टर क्रुझ माहितीय?' हैडीचा पुन्हा नकार. क्रुझ (स्टीफन जेम्स) हा कृष्णवर्णीय अमेरिकी सैनिक हैडीचा त्या सेंटरमधला पेशंट होता, असं त्याच्या आईनं केलेल्या तक्रारीत तर स्पष्ट म्हटलंय. हैडी काय नाकारतेय...? कशामुळं...? कुणासाठी ती काम करत होती...? तिचं काम नेमकं होतं तरी काय...? एका ना दोन...अनंत प्रश्नांनी थॉमसच्या मनात थैमान मांडलंय. एकीकडं संरक्षण खात्यातल्या बॉसची घाई सुरूय की फाईल बंद केलीस का...आणि दुसरीकडं हैडी तर "काहीच माहीत नाही' म्हणतेय. "होमकमिंग'चा झोल आहे तरी काय...? थॉमस मुळापासून शोधायला निघालाय.

"ऍमेझॉन प्राईम'वर मावळत्या वर्षातल्या अखेरच्या टप्प्यात ज्या काही मालिका गाजल्या, त्यातली एक "होमकमिंग'. ज्युलिया रॉबर्टस "ओटीटी' (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मवर आल्यामुळं जसं या मालिकेला ग्लॅमर आलं; तसंच त्याच्या विलक्षण गुंतवून ठेवणाऱ्या कथानकामुळंही आलं. वैद्यकीय विज्ञान, राजकारण आणि आर्थिक हितसंबंध यांचा "अघोरी' संगम झाला, की "होमकमिंग'चा जन्म होतो, असं साधारण सूत्र. पन्नाशी ओलांडलेली ज्युलिया आजही हॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री. सन 1990 चा तरल "प्रीटी वूमन', त्यापाठोपाठ "पेलिकन ब्रीफ', "माय बेस्ट फ्रेंड्‌स वेडिंग', "स्टेपमॉम', "रन वे ब्राईड', "एरिन ब्रोकोविच', '"इट प्रे लव्ह' अशी अफाट यशस्वी चित्रपटांची मांदियाळी ज्युलियाच्या खाती जमा. ज्युलिया अमेरिकी टीव्ही-मालिकांमध्येही अधूनमधून दिसते. मात्र, "होमकमिंग'च्या निमित्तानं पहिल्यांदाच ती मोबाईलच्या स्क्रीनवर आली. प्रमुख अभिनेत्री आणि कार्यकारी निर्माती या दोन्ही नात्यांनी. म्हणूनही "होमकमिंग'बद्दल उत्सुकता वाढलेली.

"होमकमिंग'च्या पहिल्या सीझनमध्ये दहा भाग प्रदर्शित झालेयत आणि प्रत्येक भागावर ज्युलियाची अभिनेत्री म्हणून छाप आहे. "होमकमिंग' फ्लॅशबॅकनं हळुवार उलगडत जाणारी मालिका. सैनिकांना "माणसाळवताना' होणारे संवाद-विसंवाद, तयार होणारं गुंतागुंतीचं नातं, व्यावसायिक "गाईस्ट' संस्थेच्या बॉसचा रिझल्टसाठीचा दबाव, कामाचं प्रचंड प्रेशर आणि या सगळ्यांमध्ये दमछाक होणारी; तरीही "नवं करतेय...ग्रेट करतेय' ही भावना स्वतःतच जागवून ताठ उभी राहणारी हैडी ज्युलियानं उभी केलीय. वॉल्टर क्रुझचा हसरा चेहरा, त्याचे जगण्याचे दृष्टिकोन तिला भावताहेत. त्याच्याशी बोलताना तिची मानसिक गुंतवणूक वाढायला लागलीय. या तरुण सैनिकानं सर्वसाधारण नागरी जीवन जगायला सुरवात केली पाहिजे...त्यासाठी त्याला मदत केली पाहिजे यासाठी हैडीची घालमेल होतेय. वॉल्टरसारख्या सैनिकांना प्रश्न विचारणं, त्यांना बोलतं करणं आणि त्यानंतर आधीची प्रश्नोत्तरं-आजची प्रश्नोत्तरं यांचा अभ्यास करणं हे हैडीचं काम.

"सैनिकांच्या मनातल्या कटू स्मृती पुसून टाकायच्या...त्यांच्या मेंदूमध्ये ज्या विशिष्ट पेशींमध्ये या स्मृती साठवलेल्या आहेत, त्या पेशींवर आघात करायचा आणि कटू स्मृती पूर्णतः नष्ट करायच्या. असं झालं की सैनिक पुन्हा सर्वसाधारण माणूस म्हणून उभा राहील...' असं हैडीला सांगण्यात आलेलं. त्यासाठी काही औषधं सैनिकांना त्यांच्याही नकळत द्यायची आणि औषधांचे परिणाम संवादातून तपासायचे. हैडीची गती चांगली होती; मात्र तिच्या बॉसला आणखी वेग हवाय. रिझल्टसाठी हैडी धावतेय...वॉल्टरबद्दल तिच्या मनात अपार माया पाझरतेय...कुठंतरी काहीतरी बिनसतंय...आजच्या हैडीची स्मृती अजूनही अंधूकच...

"होमकमिंग'च्या एकंदर प्रकारात काहीतरी काळंबेरं होतं, असं संरक्षण खात्याच्या थॉमसला वाटतंय. हैडीला काहीच का आठवत नाहीय...? "होमकमिंग' नावाचं सेंटर होतं, तर त्याची नोंद कुठंय...हे सगळं कुणाच्या अखत्यारीत येत होतं आणि मुख्य म्हणजे त्या सैनिकांचं नेमकं झालंय काय या प्रश्नांचा मागोवा एकीकडं थॉमस घेतोय. दुसरीकडं हैडीची अंधूक स्मृती हळूहळू बाळसं धरतेय. आपण एक थेरपिस्ट होतो, वैद्यकीय क्षेत्रात काम करत होतो; हे आता वेट्रेस असलेल्या हैडीला समजायला लागलंय. पण मग अचानक वेट्रेस कशा काय झालो आपण? थॉमसप्रमाणंच हैडीलाही प्रश्नांच्या मोहळानं वेढलंय.

वैद्यकीय क्षेत्रातले प्रयोग, त्याचे परिणाम-दुष्परिणाम, प्रयोगांची नैतिक मूल्यं अशा गंभीर विषयांना "होमकमिंग' स्पर्श करतेय. कोणतंही भाष्य न करता. सॅम इस्माईल या अमेरिकी-इजिप्शियन दिग्दर्शकाचं हे कौशल्य. सलग दीड-दोन तासांच्या दृश्‍यांमुळं चित्रपटमाध्यमातल्या संदेशाचा खोलवर प्रभाव मानवी मनावर होतो. टीव्ही-मालिकांच्या दोन भागांमध्ये काळ-वेळेचं काही अंतर असतं. परिणामी, प्रभाव मर्यादित राहतो. "ओटीटी'सारख्या नव्या कोऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकाला मोबाईलसह गुंतवून ठेवायचं तर प्रत्येक शॉटमध्ये संदेश हवा. तो संदेश प्रभावीपणे प्रेक्षकापर्यंत पोचायला हवा आणि संदेशप्रभावामध्ये सलगताही हवी. तर आणि तरच मोबाईलवर अथवा "ओटीटी' प्लॅटफॉर्मवरची मालिका उत्तम चालते. "होमकमिंग'चे दहाही भाग सॅम इस्माईलनं या कॉपी-बुक स्टाईलनं बनवलेयत. प्रत्येक भाग, प्रत्येक भागातला प्रत्येक शॉट काहीतरी नवं देणारा. या नव्याची एक सलगता 45-50 मिनिटं. पुढचा भाग आधीच्या सलगतेला सामावून घेऊन पुढं जाणारा. दृश्‍यमाध्यमाच्या मानवी मनावरच्या प्रभावाची कल्पना असलेल्या आणि कसलेल्या दिग्दर्शकाचंच हे काम. इस्माईलनं ते तन्मयतेनं केल्याचं दहाही भाग सांगून जातात.

"होमकमिंग'च्या एकेका भागानंतर उत्सुकता ताणली जातेय. स्वतःचाच शोध घेणारी अगतिक हैडी, प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी धडपडणारा थॉमस, बेपत्ता वॉल्टर क्रुझ यांच्यामध्ये होणारी प्रेक्षकांची गुंतवणूकही वाढत जातेय आणि एका टप्प्यावर एकेका प्रश्नाची सलग उत्तरं मिळायला सुरवात होतेय. "होमकमिंग'चा शेवट सांगण्यात काही अर्थ नाही. तो स्क्रीनवरच पाहायला हवाय. थिएटर, टीव्हीच्या स्क्रीननंतर ज्युलिया रॉबर्टस मोबाईलच्या पडद्यावरही किती खिळवून ठेवतेय, हा अनुभव निवांतपणेच घ्यायला हवाय.

मालिकेत युद्धाची पार्श्वभूमी आहे. कौटुंबिक ताण-तणाव आहेत. व्यावसायिक स्पर्धा आहे. या साऱ्यांना बांधून ठेवणारं वैद्यकीय विज्ञानाचं गूढ आहे. म्हटलं तर पात्र भरपूर आहेत. सैनिकांपासून ते हैडीच्या बॉसपर्यंत कित्येक पात्रं मालिकेत येतात-जातात. प्रत्यक्षात हैडी, थॉमस आणि वॉल्टर या तीन पात्रांभोवती कथानक फिरतेय. प्रत्येक भागामध्ये ही तीन पात्र प्रभाव सोडून जातात. "ओटीटी' मालिकांचं हे एक वैशिष्ट्य. मध्यवर्ती पात्रांची संख्या जितकी अधिक, तितका प्रेक्षकांचा संयम कमी. "होमकमिंग' तीनच पात्रांभोवती; त्यातही हैडीभोवती मालिका सर्वाधिक फिरतेय आणि कदाचित त्यामुळंही "होमकमिंग'च्या शेवटापर्यंत उत्सुकता काही कमी होत नाहीय.

"ओटीटी'वरच्या अशा मालिकांचं आणखी एक वेगळेपण असतं. शेवट जिथं होतोय, तिथंच पुढच्या "सीझन'चा जन्म होतो. त्यामुळं "होमकमिंग' पुढच्या सीझनमध्ये वैद्यकीय विज्ञान, राजकारण आणि आर्थिक हितसंबंधांची मांडणी कोणतं वळण घेणार याबाबतची उत्सुकता पुढच्या सीझनचा प्रेक्षकवर्ग आजच तयार करतेय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis write julia homecoming article in saptarang