esakal | प्रसिद्धी, पैसा आणि सत्तेचं वर्तुळ
sakal

बोलून बातमी शोधा

rihanna-and-greta

माध्यम
प्रसिद्धी आणि पैसा या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. प्रसिद्धी मिळत राहिली, की पैसा येतो आणि पैसा असला, की प्रसिद्धी मिळविण्यासाठीच्या गोष्टींवर तो खर्च केला जातो.

प्रसिद्धी, पैसा आणि सत्तेचं वर्तुळ

sakal_logo
By
सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

प्रसिद्धी आणि पैसा या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. प्रसिद्धी मिळत राहिली, की पैसा येतो आणि पैसा असला, की प्रसिद्धी मिळविण्यासाठीच्या गोष्टींवर तो खर्च केला जातो. या वर्तुळाकार प्रक्रियेला सत्तेनं जोडलं किंवा सत्ता जडली की ताकद वाढते. नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला या आठवड्यात आलेलं आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे या व्यवहाराचं ताजं, उत्तम उदाहरण. 

सत्तेची रेष
रॉबिन रिहाना फेन्टी आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातल्या आंदोलनाची अचानक बाजू घेणं, त्याविरोधात भारताच्या परराष्ट्र खात्यानं अनपेक्षितपणे प्रतिक्रिया देणं आणि त्या प्रतिक्रियेनुरूप भारतातल्या ‘ प्रसिद्धी-पैसा’ वर्तुळ पूर्ण केलेल्यांना अचानक सत्तेचा अक्ष लाभणं असा अभूतपूर्व खेळ रंगला. या खेळामध्ये सोशल मीडियाचा आणि एकूणच माध्यमांचा बेसुमार वापर सुरू आहे. ‘प्रसिद्धी-पैसा’ वर्तुळानं या खेळात भाग घेणं नियमित आहे; सत्तेच्या रेषेनं हे वर्तुळ जोडल्यानं आता हा खेळ राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय गंभीर राजकारणाचे स्वरूप आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसिद्धी ते सत्ता
चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, कला-क्रीडा क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती, उद्योग-व्यावसायिक, लेखक, सामाजिक चळवळींमधील लोक यांना राजकारण्यांइतकाच नावलौलिक असतो. नावलौकिक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेले प्रसिद्धी माध्यमांतले लोक सर्वसाधारणपणे स्वतः प्रसिद्धीच्या झोतात असणं भारताला तीन दशकांपूर्वी माहिती नव्हतं. 

भारतीय अर्थव्यवस्था खुली होणं, वृत्त वाहिन्यांची झपाट्यानं पैदास वाढणं आणि पाठोपाठ डिजिटल माध्यमांचा विस्तार होणं या गोष्टी एकापाठोपाठ एक अशा घडत गेल्या. त्याचा परिणाम म्हणून माध्यमांतल्या लोकांनाही नावलौकिक हवासा वाटू लागला. त्यानंतर प्रसिद्धी-पैसा आणि सत्ता बहुतांशवेळा परस्परांच्या गळ्यात गळे घालू लागल्या. त्यातही पहिल्या दोन दशकांत चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, त्यांची प्रसिद्धी आणि सत्ता यांची गणिते सर्वाधिक जुळली गेली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, नितीश भारद्वाज, अरविंद द्विवेदी, शत्रृघ्न सिन्हा, सुनील दत्त अशी ही मर्यादा होती. चित्रपट माध्यमाचं वर्चस्व असतानाच टीव्ही माध्यमातल्या कलाकारांनीही राजकारणात प्रवेश केला. ही व्यवस्था गेल्या दशकापर्यंत विनातक्रार सुरू होती. डिजिटल माध्यमांची; विशेषतः सोशल मीडियाची ताकद वाढत गेली, तशी या व्यवस्थेत प्रसिद्धी माध्यमांतल्या लोकांचा समावेश व्हायला सुरूवात झाली. प्रसिद्धी देणारेच प्रसिद्धीच्या मागं लागले. 

प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता यांचा एकत्रित अविष्कार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसला. त्याची पार्श्वभूमी आधी जनलोकपाल आंदोलनातून आणि त्यानंतर निर्भया बलात्कारप्रकरणातून तयार झाली होती. भ्रष्टाचाराच्याविरोधात आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल नावलौकिक असलेले (सेलेब्रेटी) लोकच नव्हे; तर माध्यमांमधले लोकही बोलले. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची प्रतिमा निर्मिती करण्यात सेलेब्रेटी आणि माध्यमांचाही अभूतपूर्व वाटा जरूर होता. प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता यांचं गणित पहिल्यांदा स्पष्टपणानं जुळून आलं. त्यानंतरच्या छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्येही हे गणित जुळत राहिलं. आता तर त्याचा सराव झाला आहे, इतकं स्वाभाविकपणे हे गणित जुळून येतं. 

या गणिताची खासियत अशी आहे, की प्रत्येकाचा फायदा इथं जरूर पाहिला जातो. सेलेब्रेटींना अधिक प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धीच्या उद्योगाला अधिक पैसा मिळतो आणि या दोन्हींचा थेट लाभार्थी सत्ताधारी अथवा राजकारणी राहतो. सेलेब्रेटींना स्वतःची मतं नसतातच असा याचा अर्थ नाही; ती जरूर असतात. इतिहास सांगतो, की ती मते अपवादात्मक सत्तेविरोधात राहतात. कारण, सत्तेत पैसा असतो आणि प्रसिद्धी सत्तेमागे उभी असते. चित्रपटाचा पडदा, टीव्ही मालिकांनी जसं तीन दशकांपूर्वी प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता यांचं वर्तुळ जोडलं होतं, तसंच आता सोशल मीडियातून होतं आहे. 

भारताची ‘सोशल’ बाजारपेठ
ग्रेटा थनबर्ग किंवा रिहाना ही काही आपल्या आसपासची, रोजच्या जगण्यातली नावं नव्हेत; कदाचित रिहाना हे तरूणाईच्या एका वर्गाचं प्रतिनिधित्व करू शकते; तथापि ग्रेटा हे अद्याप सर्वदूर पोहोचलेलं नाव नव्हे. अशा सेलेब्रेटींना भारतासारख्या सोशल मीडियातल्या सर्वाधिक सक्रिय देशाबद्दल दोनच प्रकारचं मतप्रदर्शन अमाप प्रसिद्धी मिळवून देऊ शकतं. एकतर सरकारबद्दल गुडीगुडी किंवा तीव्र नकारात्मक. या दोन्ही सेलेब्रिटींनी नकारात्मक मार्ग पत्करला, याचा अर्थ त्यांना भारतातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची फारच कळकळ आहे, असा अजिबात नाही. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब या साऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत ही जगातली सर्वात प्रबळ बाजारपेठ आहे.

फेसबूकचे सर्वाधिक वापरकर्ते आजघडीला अमेरिकेत नाहीत; भारतात आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत इन्स्टाग्रामचेही सर्वाधिक वापरकर्ते भारतात असतील. आज ट्विटर वापरकर्त्यांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे; तिथेही क्रमांक अव्वल होईल. अशा परिस्थितीत भारतातल्या लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचवणं ही सेलेब्रिटींची प्रसिद्धीची गरज असते आणि त्यासाठी मुद्दा निवडणं ही त्यांच्या प्रसिद्धी विभागाची कामगिरी असते. त्यामुळं, त्यांनी नकारात्मक मार्ग निवडला असेल, तर त्याच्या मुळाशी जाणं अथवा न जाणं हा सरकारचा निर्णय आहे. ते काम घाईघाईनं स्वतःच्या अंगावर घेणं ही भारतीय सेलेब्रिटींची अपरिहार्यता बनल्यासारखं चित्र गेल्या आठवडाभरात निर्माण झालं आहे. या चित्रानं प्रसिद्धी, पैसा आणि सत्ता यांचं वर्तुळ अक्षरशः गडबडीनं पूर्ण केलं आहे.

Edited By - Prashant Patil