किशोर बेडकिहाळ-editor@esakal.comप्रत्येक मुलाला आपल्या पालकांकडून काय हवे असते? कसे वागणे अपेक्षित असते? यांसह सजग पालकत्वाशी निगडित विविध मुद्द्यांवर ‘समृद्ध पालकत्व’ या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे..बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पालकांना भान देणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. लग्न होणे, मुले होणे, ती वाढवणे ही जगरहाटी आपल्या नेणिवेत पक्की बसलेली आहे. समाज व समाजमन नेणिवेतून चालते. मात्र, बदलाच्या वेळेला ते जाणिवेने बदलावे लागते. नेणिवेने चाललेली जी सबंध जगरहाटी आतापर्यंत सुरू आहे, त्यातून जे पालकत्व दिसतेय, ते कसे बदलले पाहिजे, हे जाणिवेने सांगणारे हे पुस्तक आहे. म्हणून एका अर्थाने पुस्तकाचा प्रवास नेणिवेकडून जाणिवेकडे असा आहे..पालक आणि मूल यांच्या संबंधाने केलेले विवेचन वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाचे आहे. आजची कुटुंबव्यवस्था त्रिकोणी किंवा ‘सिंगल’ किंवा ‘डिस्टन्स पॅरेंटिंग’ अशी होताना दिसते. आतापर्यंतचे पालकत्व हे मुलांनी काय केले पाहिजे आणि एखाद्या मुलाने तसे केले तर त्याचा अभिमान बाळगणारे व नसेल केले, तर अपराधभाव निर्माण करणारे होते..मात्र, या पुस्तकात सांगितलेलं पालकत्व या सगळ्यापेक्षा वेगळं आणि वैश्विक आहे. आजचा पालकवर्ग हा ‘कळते परंतु वळत नाही’ अशा गर्तेत आहे. भौतिक प्रगती खूप झालेली आहे, वस्तूंचा भरपूर संचय तयार झालेला आहे, मुलांनी तोंडातून शब्द काढण्याचा अवकाश की, ती वस्तू लगेच त्याला पुरवली जाते. यामुळे मुलांना थांबायची, नकार पचवण्याची सवय उरलेली नाही. मुळात आजच्या पालकवर्गाच्या आकांक्षा, मुलांच्या करिअरविषयीची स्वप्ने यात मुले भरडली जात आहेत. आपण मुलांना छंद जोपासायला परवानगीच देत नाही. एखादी गोष्ट चांगली येत असेल, तर मग त्याने त्यामध्ये करिअरच करायला पाहिजे. कारण त्यातून पैसा मिळवता येतो. ज्यातून पैसा मिळवता येत नाही असे छंद जोपासायला पालक मुलांना परवानगी देत नाही. या सगळ्यावर पुनर्विचार करण्याची गरज पुस्तकात अधोरेखित केली आहे..या पुस्तकामध्ये ‘युटोपिया’ मांडला आहे. युटोपिया या शब्दाला ‘सोशल सायन्स’मध्ये फार मोठे महत्त्व आहे. समाज म्हणून जगण्यासाठी जे एक उद्दिष्ट लागते, ते सांगण्यासाठी जो ‘युटोपिया’ लागतो, तो पालकसंहितेच्या रूपाने पुस्तकात मांडला आहे. पुस्तकात वेगळ्या प्रकारची कुटुंबव्यवस्था मांडली आहे. ती समताधिष्ठित आहे, ती पुरुषप्रधानता नाकारते. ती पालकप्रणित आहे, पण पालकप्रधानता नाकारते. श्रेष्ठत्वाची जबाबदारी किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ या श्रेणी लेखिका नाकारते. अनुभवातून शिकण्याची भूमिका घेऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखाव्यात, या प्रकारचे सौहार्दपूर्ण वातावरण कुटुंबामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न लेखिकेच्या पालकसंहितेमध्ये दिसतो..‘सार्थक-साधने’चा सखोल तत्त्वविचार.आजच्या कुटुंबव्यवस्थेचे लोकशाहीकरण करणे, हा या पुस्तकाचा एका अर्थाने गाभा आहे. माणुसकीच्या दिशेने जाणारा समाज व सहृदयी, जबाबदार माणूस आपल्याला घडवायचा आहे, याचे भान प्रत्येक पालकाने ठेवायला पाहिजे हा सिद्धान्त ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. चिकित्सेच्या पातळीवर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याची क्षमता पालकांना ठेवावी लागेल, हे या पुस्तकात गांभीर्याने लक्षात आणून दिले आहे. अलीकडच्या काळामध्ये माणसांची व्यक्तिमत्त्वे एकेरी पद्धतीने घडतात. त्यामुळे ती एकवटलेली नाहीत, तर ती एकारलेली आहेत. त्यामुळे सामाजिकतेचे वर्तुळ वाढवत नेणे; व्यक्तिवाद, चंगळवादातून बाहेर पडणे आवश्यक आहे. समाजामध्ये उभे राहताना योग्य भूमिका घेण्याचा अधिकार आणि तेवढी क्षमता प्रत्येक मुलामध्ये निर्माण व्हायला हवी. त्याचे मूळ पालकांच्या संस्कारांमध्येच असते. त्याला खतपाणी घालण्यासाठी ‘समृद्ध पालकत्व’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.