esakal | आमच्या घरच्या गौरी
sakal

बोलून बातमी शोधा

आमच्या घरच्या गौरी

श्रावण महिना आला की घरात सणासुदीची चंगळ सुरू होते. गुढीपाडवा, राखी, गणेश चतुर्थी, गौरी... आमच्या घरी १० दिवसांचा गणपती बसवतात आणि गौरीचा उत्सव मोठा असतो.

आमच्या घरच्या गौरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलिब्रिटी टॉक : समृद्धी पोरे, दिग्दर्शिका

श्रावण महिना आला की घरात सणासुदीची चंगळ सुरू होते. गुढीपाडवा, राखी, गणेश चतुर्थी, गौरी... आमच्या घरी १० दिवसांचा गणपती बसवतात आणि गौरीचा उत्सव मोठा असतो. मी उत्सव म्हणाले कारण या सणाला आम्ही सगळे हमखास एकत्र येतो. पोरे घराण्याचे सगळे एकत्र येतात. अगदी आताची नवीन पिढी परदेशात कामानिमित्त गेली आहे ती सुद्धा या सणाला चुकवत नाही. माझ्या लक्षात आले, की खरं म्हणजे सगळे सण सारखेच असतात. पण त्याचा उत्सव होतो जेव्हा सगळे एकत्र येऊन सकारात्मक ऊर्जांची देवाणघेवाण करतात. घरातली आजी, काकू, आत्या छान-छान पदार्थ बनवून वाढतात. आपण त्याला नैवेद्य म्हणतो. आपल्या आधीच्या पिढीने त्यांच्या सोईनुसार काही चालीरीती सुरू केल्या. अमुक देवाला हा नैवेद्य असतो. आपण नीट विचार केला तर त्या सीझनमध्ये जे कडधान्य, फळे, भाज्या मिळतात त्याच गोष्टींचा नैवेद्य असतो. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ‘प्रांत’. अशी कुठलीच गोष्ट नसते जी फक्त दुबईमध्येच मिळते आणि देवासाठी तेथून आणावीच लागते. अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी नैवेद्याला लागतात. 

कोकणात ओला नारळ तर विदर्भात सुका नारळ, कोकणात सोनचाफा तर विदर्भात कण्हेरीची, मोगऱ्याची फुलं. इकडे तांदळाच्या ओल्या ओंब्या तर विदर्भात गव्हाचे धांडे वापरायची पद्धत आहे. परवा माझ्या मुलीने प्रश्‍न विचारला, ‘अगं, कशाला गं आपण एवढं सगळं करतो? एवढ्या लोकांना जेवायला बोलवतो? केवढं आवरायला लागतं. त्यापेक्षा तेवढ्या पैशात सगळे कुठेतरी मस्त ठिकाणी फिरायला जाऊयात, मज्जा करूयात. सगळं काम दुसरे करतील आणि आपण फक्त मजा करायची. देवाबद्दल आदर, भक्ती तर आपल्या मनात आहेच ना?’ पण गौरींची मजा काही वेगळीच!

तिचं काही चुकलं नव्हतं. सकारात्मक ऊर्जा देवाणघेवाणीची नवीन संकल्पना देवाला घाबरण्यापेक्षा त्याला प्रेम करणारे आपण असावे. हे सगळं बरोबर असलं तरी एकत्र येऊन सण करण्यामध्ये अधिक जवळिकता येते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या अगदी जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी निसर्गाने तर आपल्याला फुकटच दिल्या आहेत. एकवेळ बाकी गोष्टी नसल्यातरी चालतील आपल्याला. खरं सांगायचं तर त्याची पर्वाही नाही. त्यासाठी आपल्याला कुणापुढे तरी कृतकृत्य व्हायला पाहिजे. एक  मानसिक समाधान मिळते. घाबरून नाही पण प्रेमानेच आपल्याला पटलेल्या धर्मानुसार हा सुंदर मानवाचा जन्म मिळाला म्हणून या निसर्गापुढे नतमस्तक व्हावे व अशापद्धतीने पूजाअर्चा करावी, की या निसर्गाला हानी पोचणार नाही. 

मागच्या वर्षी मी आमच्याकडच्या गौरींचे सजवलेले फोटो फेसबुकवर टाकलेत. त्यावर कुणीतरी कमेंट केली, ‘मॅडम, आपण समाजसेवेत विश्‍वास ठेवता मग या सगळ्या पूजेचे फोटो बघून मला नवलच वाटले.’ आपण आधुनिकतेच्या नावाखाली ना निसर्गाला जपत, ना नातेवाईक-शेजाऱ्यापाजाऱ्यांशी सबंध ठेवत, ना घरात प्रेमाने बनवलेले सकस अन्न खात, ना आपल्या वडीलधाऱ्यांच्या सोबत राहत, त्यांना हवं-नको ते बघत, फक्त आधुनिक वस्तूंच्या मागे उंदरासारखी निरर्थक शर्यत लावून धावत बसतो. सगळ्यांच्या हातांत सतत मोबाईल, स्वतःची स्वतंत्र खोली, अनोळखी माणसांशी डिजिटल मैत्री, फक्त आपल्यापुरते जगणे, वडीलधारी माणसं वृद्धाश्रमात, मुलं होस्टेलमध्ये सगळंच हृदय काढून ठेवलेल्या मशिनसारखे चालले आहे. वर्षातून एकदा सगळ्यांनी एकत्र जमणे, एकाच हॉलमध्ये खाली गाद्या टाकून एका रांगेत गप्पा मारत-मारत झोपी जाणे. सुग्रास जेवण बनवून आरत्या होईपर्यंत भूक धरून मग केळीच्या पानावरची पंगतीची मजा लुटणे. ज्यांनी हे सगळं अनुभवलंय त्यांनाच कळेल कुटुंबात सणवार साजरे करणे म्हणजे काय असते. आमच्याकडचा गौरीचा सण शंभर वर्षाच्या आधीपासून कुटुंबात असाच साजरा होतोय. लक्ष्मी आणि सरस्वती आपल्या बाळांना घेऊन माहेरी येतात, असा समज आहे. तीन दिवस माहेरपणाचा यथेच्छ आनंद घेतात. आनंदाने बागडतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया म्हणतात. अगदी तशाच भावनेने घरातल्या सगळ्या सुना, लेकी, काका, मामा, आजी-आजोबा एकत्र येतात मजा करतात आणि मग एकमेकांचा निरोप घेतात. म्हणूनच मी म्हणते सण हा नात्यांचा उत्सव असतो. 

loading image
go to top