मोळीसाठी पुसलेलं कुंकू... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत.

उन्हाळ्यात अलिबागला एक-दोन चकरा का होईना, होतातच. अलिबाग म्हणजे "गरिबांचा गोवा...'! अलीकडं मुंबईच्या गिरणीतला काळा रंग समुद्राच्या पाण्यावर तवंगांच्या रेषा बनून तांडव करतोय जणू...मात्र, त्या तांडवाकडं लक्ष देण्यासाठी फार कुणाला वेळ नाही...असो.
मी ओल्या वाळूवर पावलं उमटवली आणि मुंबईच्या दिशेनं निघालो...

अलिबाग जसा गरिबांचा गोवा आहे, तसाच तो डोंगरी आदिवासी लोकांचा प्रदेशही आहे. आपण जसजसे जंगलात प्रवेशतो तसतशी रानमेवा विकणाऱ्यांची तोबा गर्दी या भागात पाहायला मिळते. आंबे, चारं, करमुळे, फणस असा नानाविध प्रकारचा रानमेवा रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला बसून हे लोक विकत असतात...
अंगात हत्तीचं बळ; पण त्या "हत्ती'ला पुरेसे कपडे नाहीत अशी बिचाऱ्यांची अवस्था...काहीजण उकडतंय म्हणून उघडे होते, तर काहींना नेसायला कपडेच नसल्यानं ते उघडे होते. झाडांच्या जेमतेम सावलीत बाळाला झोका देणारी एक माउली बाजूलाच होती...एका हातानं झोका देणं आणि दुसऱ्या हातानं काम करणं सुरू होतं तिचं...

उन्हाळ्याचे दिवस; त्यामुळे ऊन्ह तापायच्या आधी आपलं काम कसं संपेल याकडं कामगाराचं लक्ष होतं. कार्ले खिंड हे अलिबागकडं जाणारं छोटंसं जंगल. डोंगरावरून एक महिला काठी टेकवत टेकवत, डोक्‍यावर लाकडाची मोळी घेऊन खाली येताना दिसली. खाली येताना तिचा वारंवार तोल जात होता. ठिगळाची साडी, कोरफट कपाळ आणि डोळ्यात काळजी एवढंच तिचं वर्णन करावं लागेल. मी गाडी रस्त्याच्या बाजूला लावली. का कुणास ठाऊक; त्या बाईशी बोलावं असं मला वाटलं. मी ज्या ठिकाणी गाडी लावली होती, त्या ठिकाणी दोन महिला हातात काहीतरी सामान घेऊन येताना मला दिसल्या. गाडी उभी करीपर्यंत ती महिला लगबगीनं मुख्य रस्त्यावर आली. तिनं डोक्‍यावरची लाकडाची मोळी रस्त्यावर ठेवली आणि हातातल्या एका फडक्‍यानं ती अंगावर तरारून आलेला घाम पुसायला लागली. तिच्या विरुद्ध दिशनं येणाऱ्या दोन्ही महिला तिला जाऊन भेटल्या. हातातलं भाकऱ्यांचं गाठोडं एकीनं त्या महिलेकडं दिलं. रस्त्याच्या दुसऱ्या कडेला जंगलातून येणारा झरा शांतपणे वाहत होता. त्या तिघी त्या झऱ्याकाठच्या छोट्याशा झाडाखाली जाऊन बसल्या. मी त्यांच्या दिशेनं जातोय, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या. त्यांच्याकडं असलेल्या कुऱ्हाडीकडं त्यांची नजर गेली. यांच्याशी बोलायचं तर आहे; मात्र सुरवात कशी करायची, असा प्रश्‍न मला पडला. थोड्याशा दुरूनच हाक मारून मी त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि "ही लाकडाची मोळी विकायची आहे का?' असं त्यांना विचारलं.
त्या तिघी एकमेकींकडं बघत म्हणाल्या ः ""होय.''
मला लाकडं घ्यायची नव्हती, हे माझ्या एकूण राहणीमानावरून आणि मी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाडीवरून त्यांच्या लक्षात आलंच असेल. त्या जिथं बसल्या होत्या त्याच्या बाजूला असलेल्या जांभळाच्या झाडाखाली जाऊन मी जांभळं वेचायला सुरवात केली. खात खात त्या महिलांना मी विचारलं ः ""तुम्ही कुठल्या गावच्या?''
त्यांनी उत्तरच दिलं नाही. कदाचित त्या घाबरल्या असाव्यात.
मी म्हणालो ः ""मला तुमच्याशी बोलायचं आहे.''
तरीही त्या बोलायला राजी दिसल्या नाहीत. वरून जी महिला लाकडाची मोळी घेऊन आली होती ती मला थोड्या वेळानं म्हणाली ः ""काय बोलायचं आहे तुम्हाला?''
""हेच की, तुम्ही लाकडं कुठून जमा करून आणलीत? तुम्ही ती लाकडं किती रुपयांना विकता? तुमच्या घरी कोण कोण आहे? तुमच्या घरच्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो?'' मी सांगितलं.

माझी ओळख आणि बोलण्याच्या हावभावांवरून मी कुणीतरी चांगला माणूस आहे, हे त्यांना पटलं असावं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. "तुम्ही जेवण कराल का?' असंही त्यांनी मला विचारलं. खरं तर भाकरी बघून जेवायचा मोह मलाही आवरत नव्हता; पण तीन बायका, तीन भाकरी आणि मी, हे समीकरण मलाही कुठंतरी खटकत होतं, त्यामुळे "मला भूक नाही', असं सांगून मी तो मोह आवरला. खूप वेळ गप्पा रंगल्यानंतर त्या तिघी जायला निघाल्या. जी महिला डोक्‍यावर मोळी घेऊन आली होती, तिनं आपली मोळी तिच्या मुलीकडं सुपूर्द केली आणि ती परत दुसऱ्या महिलेसोबत जंगलाच्या आतल्या भागात लाकडं आणायला निघाली. लाकडं वेचणं किती धोकादायक काम असतं, याची पुसटशी कल्पना गप्पांमधून मला त्या महिलेनं दिली होती.

मी त्या महिलेला सहज विचारलं ः ""मी तुमच्यासोबत जंगलात आलेलं चालेल का?''
-मी असं विचारणं त्या महिलांना जरा खटकलंच. हा काय वेडाबिडा आहे की काय, असंही त्यांना वाटलं असेल. रखरखत्या उन्हात हा माणूस जंगलात येण्याचा आग्रह का धरतोय, हे काही त्या महिलेला कळत नव्हतं.
""अहो ताई, येऊ द्या ना! वरच्या भागात जंगल कसं आहे हे मला पाहायचंय...थोडंसं भटकेन आणि परत येईन. मी तुम्हाला विचारतोय यासाठी की मला तुमच्यासोबत यायचं आहे. कारण, मला रस्ता माहीत नाही,''
मी म्हणालो.
"ताई' हा मी उच्चारलेला शब्द ऐकून त्यांच्या जिवात जीव आला असावा.
गाडी एका हॉटेलच्या समोर रस्त्याच्या कडेला उभी केली होतीच. त्या महिलांसोबत मी जंगलभ्रमंतीसाठी निघालो. माझ्यासोबत जी महिला होती, तिचं नाव सावित्री साठे आणि दुसरी महिला होती तिचं नाव रंजना कांबळे. सावित्री चाळिशीतली असेल आणि रंजना पंचविशीतली. सावित्री आणि रंजना दोघीही शेजारी शेजारी. सावित्रीला सात मुली. कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे जंगलामधली लाकडं एकत्रित करायची, ती डोक्‍यावरून गावापर्यंत न्यायची आणि लोकांना विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. गेल्या अनेक पिढ्यांपासून हा वाळलेली लाकडं विकण्याचा व्यवसाय सावित्रीच्या घरी चालतो. आम्ही जंगलाच्या आतल्या भागात शिरलो. घामाच्या धारा काय असतात, याची प्रचीती डोंगर चढताना येऊ लागली. मुख्य डोंगरावर चढेपर्यंत घामानं आंघोळ झाली होती! वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, जंगलामधलं एकदम स्पष्ट ऐकू येणारं संगीत आता अधिक मोठ्या आवाजात कानावर पडत होतं. मी त्या दोन्ही महिलांसोबत सारखं बोलत होतो. "हा आवाज कशाचा? तो आवाज कशाचा? हे झाडं कशाचं? ते झाड कशाचं?' इत्यादी...आणि माझ्या प्रश्‍नांची उत्तरं न चुकता त्या देत होत्या. अधूनमधून हरणाचं पाडस, एखादा ससा दिसत होता. सावित्री तिच्याबाबतीत घडलेल्या अनेक गोष्टी मला खुलवून सांगत होती. मीही तितक्‍याच बारकाईनं ऐकत होतो. सावित्रीचा नवरा रामा याच भागात पाच वर्षांपूर्वी एका बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडला होता. केवळ हाडांचा एक सांगाडा आख्खं जंगल फिरल्यावर तीन दिवसांनंतर सावित्रीला सापडला होता. जंगलाच्या आतल्या भागात गेलेल्यांवर जंगली प्राण्यांचे हल्ले होऊ शकतात हे लक्षात घेऊन रामा घरातल्या इतर महिलावर्गाला आतल्या भागात जाऊ न देता स्वतः आतल्या भागात जायचा व गोळा केलेली लाकडं मुख्य रस्त्यापर्यंत आणून ती सावित्रीकडं सुपूर्द करायचा. सावित्री पुढं ती लाकडं घेऊन शहरात जायची. मग रामा पुन्हा लाकडं आणण्यासाठी जंगलात यायचा. जिथं खूप घनदाट झाडी आहे, तिथंच अधिक लाकडं असायची आणि ती लवकर सापडायची. याच घनदाट जंगलाच्या भागात हिंस्र प्राणीही आहेत. ते शिकारीसाठी पुढं यायचे. कितीतरी माणसं या हिंस्र प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत. ती वेळ एके दिवशी रामावरही आली.

रामा मरण पावल्यानंतर आता सावित्री त्याचं काम करू लागली. मुख्य जंगलातून रस्त्यापर्यंत लाकडं आपल्या मुलीला आणून द्यायची आणि लाकडं आणण्यासाठी परत जंगलात जायचं. सावित्रीच्या तीन मुलींची लग्नं झालेली आहेत. अजून चार मुलींची लग्नं व्हायची आहेत.
एका मुलीचं लग्न रामा हयात असतानाच झालं. दोन मुलींची लग्न सावित्रीनं गेल्या पाच वर्षांत केली.
""जे प्राणी माणसांवर हल्ले करतात, ते प्राणी आपल्याला दिसतील का आज?'' असं मी जेव्हा सावित्रीला विचारलं तेव्हा ती म्हणाली ः ""प्राण्यांचं माणसांसारखं नसतं. आपण सुरक्षित नाही, अशी भीती त्यांना जेव्हा वाटू लागते तेव्हाच ते माणसांवर हल्ले करतात. माझा नवरा रामा पट्टीचा शिकारी होता. दिसेल त्या प्राण्याची शिकार तो करायचा. शिकारीसाठी कुणी प्राणी दिसला नाही तर लाकडं वेचायचा. रामा ज्या परिसरात लाकडांसाठी भटकायचा त्या परिसरात मी गेल्या पाच वर्षांपासून भटकत आहे. मला रोज अनेक प्राणी दिसतात; पण माझ्यावर कुणी हल्ला करत नाही. कदाचित मी त्यांच्या ओळखीची झालेली असेन!'' सावित्री सांगत असलेलं तत्त्वज्ञान जंगलातल्या एकूण वातावरणाकडं बघितल्यावर मलाही पटायला लागलं होतं. त्या दोघीच्या हातात कुऱ्हाडी होत्या आणि माझ्याकडं निरीक्षण करण्याची जोरदार ऊर्मी. त्या दोघीही लाकडं गोळा करण्याच्या कामात दंग झाल्या. मी फोटो काढले...पक्ष्यांचे आवाज ऐकत राहिलो...आंबे, जांभूळ, चारं अशा अस्सल जंगली रानमेव्याचा आनंद घेतला.

"नादिष्ट' ही मनोज बोरगावकर यांची कादंबरी अलीकडं गाजतेय...त्या कादंबरीमधला बराचसा भाग या प्रवासात मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. इथं वारुळात शिस्तीत जाणाऱ्या मुंग्या मला मुंबईत शिस्तीत बसमध्ये चढणाऱ्या, रांग न तोडणाऱ्या माणसांची आठवण करून देत होत्या. सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत जंगलातली दिमाखदार सफर सावित्रीच्या अनेक किश्‍शांनी मजेशीर करून टाकली होती. शिवाय, तिचं दुःख ऐकून माझंही मन जड झालं होतं.
जंगलाचा राजा वाघ की सावित्री नावाची ही वाघीण असा प्रश्‍न मला पडला होता. एका लाकडाच्या मोळीसाठी सावित्रीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं. तिच्या मनात हे दु:ख होतं; पण दु:ख करून काय होणार? आपल्या मुलींच्या पोटाची खळगी भरणं हा तिच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. नवरा मेल्यावर चौथ्या दिवशी नवऱ्याच्या कुऱ्हाडीला धार लावून ही वाघीण जंगलाच्या दिशेनं गेली होती. कारण, आपण जर लाकडं आणायला गेलो नाही तर संध्याकाळी चूल पेटणार नाही, हे तिला पक्क ठाऊक होतं.

दोघींच्याही लाकडाच्या मोळ्या तयार होत्या. दोघींनी मिळून ती लाकडं उचलली. त्या दोघीचं वजन जेमतेम 40 ते 45 किलो असावं. त्या तुलनेत लाकडांचं वजन बरंच जास्त होतं. आधार म्हणून दोघींनीही हातात काठी घेतली होती आणि त्या दोघींचं बघून मीही हातात काठी घेतली होती. आता मात्र त्या माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाहीत, हे त्यांना बघून माझ्या लक्षात आलं होतं. खाली येताना जास्त वेळ लागणार नव्हता. आम्ही सुरवातीला ज्या ठिकाणी भेटलो होतो, तिथं तासाभरात येऊन पोचलो. दोघींनीही मोळ्या धाडदिशी रस्त्यावर टाकल्या आणि त्या पाणी प्यायला धावल्या. मलाही खूप तहान लागली होती. मीही त्या झऱ्यामधलं पाणी मनसोक्त प्यायलो. किती गोड आणि थंडगार पाणी. त्या दोघी थोडा वेळ झाडाखाली बसल्या आणि तंबाखू चोळत चोळत मला म्हणाल्या ः ""कशी वाटली जंगलची सफर?''
-मोठा श्वास सोडत म्हणालो ः ""डेंजरच आहे हे सगळं.''
सावित्रीच्या डोळ्यांतली काळजी मला दोन्ही अर्थांनी दिसत होती.
जंगलाच्या आतल्या भागात जाऊन लाकडं गोळा करण्याची ही रोजची जोखीम व त्यासंदर्भातली काळजी आणि दुसरं म्हणजे, नवऱ्यासारखाच प्रसंग आपल्यावरही गुदरून त्यात आपलं काही बरं-वाईट झालं तर आपल्या मुलींचं काय होईल हा चिंता.
त्या दोघींचा निरोप घेऊन मी निघालो खरा; पण सावित्रीनं सांगितलेल्या अनेक घटना माझ्या डोळ्यांसमोर तरळत राहिल्या. तिचं ते खडतर जीवन आणि तिची वास्तववादी कहाणी!
यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत
असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत आपल्या जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत. अशा "सावित्रीं'कडं एकच ताकद असते व ती म्हणजे स्वाभिमान आणि हिंमत. अशा हिमतीवर आपलं वेगळं साम्राज्य उभं करणाऱ्या त्या सर्व "सावित्रीं'ना मानाचा मुजरा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com