तिच्यासाठी सारं काही... (संदीप काळे)

sandeep kale
sandeep kale

त्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले...
असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का?

गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या आठवड्यात चार दिवस गोवामुक्कामी होतो. गोव्यातल्या तरुणाईचे; तसेच राजकीय प्रश्न समजून घेताना अनेक नवीन विषय या प्रवासादरम्यान पुढं आले. परतीच्या प्रवासाला निघालो असताना मडगाव स्थानकालगत वेगवेगळ्या वयाच्या चार व्यक्ती एका उघड्या जागेवर झोपलेल्या मला दिसल्या. अंगात नीटनेटके कपडे असलेले हे चौघं या असे उघड्यावर का झोपले असावेत असा प्रश्न पडला.

त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्याशी मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ना धड मराठी समजत होतं ना धड हिंदी. मोडक्‍या-तोडक्‍या हिंदीत त्यांच्याशी संवाद साधल्यावर मला कळलं की ते चौघं मध्य प्रदेशातल्या सातेपूर (जि. खांडवा) या गावचे आहेत.
जितेंद्र गुज्जर (वय 45), देवीदास गुज्जर (35), लक्ष्मीनारायण गुज्जर (30) आणि संजू गुज्जर (25 ) अशी त्यांची नावं.
पैसे कमावण्यासाठी ते गोव्याला आले होते. चौघांच्या चार तऱ्हा. चार वेगवेगळे प्रश्‍न. मात्र, हे प्रश्‍न सुटू शकतात ते फक्त पैशानंच हे या चौघांनी हेरलं आणि पैसे कमावण्यासाठी आपल्या गावाबाहेर पडायचं असं त्यांनी ठरवलं.

ते गोव्यात आले. दिवसभर काम करायचं आणि रात्री ढगांकडं बघत डोळे मिटायचा प्रयत्न करायचा, असा त्यांचा साधासुधा दिनक्रम. ते ढगांकडंसुद्धा दोन कारणांनी बघायचे. एक म्हणजे, पाऊस कधी येतोय यासाठी; जेणेकरून त्यानंतर गावाकडं जाऊन हाताला काम मिळू शकेल आणि दुसरं कारण म्हणजे, आकाशाची चादर स्वत:वर पांघरून घेण्यासाठी!
मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. चौघांशीही मनमोकळ्या गप्पा झाल्या. काहीतरी शोधण्याची वृत्ती घेऊन आपलं घर सोडलेली ही माणसं किती स्वप्नं उराशी बाळगून अशी उघड्यावर जगत आहेत, असा विचार मनात येऊन गेला.

जितेंद्र गुज्जरला तीन मुली. थोरली मुलगी याच वर्षी
शाळेत जाऊ लागली आहे.
जितेंद्र म्हणाला : ""मध्य प्रदेश जेवढं मागासलेलं आहे; तेवढं शिक्षणाच्या बाबतीत महागडंही आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबातलं कुणीही शाळेची पायरी आजवर कधी चढलेलं नाही. माझी मुलगी गंगा ही आमच्या कुटुंबीयांपैकी शाळेत जाणारी पहिलीच मुलगी. गंगा फार हुशार आहे. मला तिला खूप मोठं करायचं आहे, शिकवायचं आहे; पण शाळेची फी मला न परवडणारी आहे. मुलीला तर शिकवायचंय; पण पैसा उभा कसा करायचा? त्यासाठीच मी गोव्यात आलोय. आता चार पैसे कमवीन आणि मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे घरी घेऊन जाईन. गोव्यात येऊन मला दोनच महिने झाले आहेत.''
दिवसभर बांधकामावर ओझं वाहण्याचं काम हे चौघंही करतात. त्यातून चौघांना दर दिवशी सहाशे रुपयांची कमाई होते. त्यापैकी शंभरेक रुपये खाण्यासाठी खर्च होतात. रोज 500 रुपये शिल्लक पडतात.
जितेंद्र म्हणाला : ""रात्री आम्ही उघड्यावर झोपतो, त्यामुळे अधिकचा खर्च काही लागत नाही. बॅगमध्ये कामावर घालून जायचा ड्रेस आणि अंगात रात्री झोपायचा ड्रेस असे आमच्याकडं कपड्यांचे दोनच जोड. चोरांपासून एकीकडं पैसे सावधपणे मुठीत धरायचे आणि दुसरीकडं रात्री-बेरात्री एकटं असताना जीव मुठीत धरायचा! बऱ्यापैकी पैसे मिळवून आज ना उद्या आम्हाला आमच्या गावी जायचं आहे.''

देवीदास गुज्जरचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. देवीदासला चार भाऊ. चौघा भावांमधला हा धाकटा. देवीदासला एक मुलगी आहे. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार,"त्या लहानग्या मुलीच्या छातीत दोन छोटी छोटी छिद्रं असून, तिला वाचवण्यासाठी ऑपरेशन अपरिहार्य आहे.'
देवीदास म्हणाला : ""त्या ऑपरेशनसाठी दोन लाखांचा खर्च आहे. त्या रकमेची जमवाजमव करण्यासाठी मी मित्रांसोबत गोव्याला आलो आहे.''
आईचा आणि मुलीचा फोटो तो जवळ बाळगतो. पाकिटातल्या दोन्ही फोटोंकडं पाहताना तो भावुक झाला होता. मुलीला वाचवायचं असेल, तर दिवस-रात्र मेहनतीशिवाय देवीदासकडं काही पर्याय नाही.

जितेंद्र आणि देवीदास यांनी त्यांच्या कहाण्या मला सांगितल्या. अन्य दोघांच्या समस्याही मुलींबाबतच्याच होत्या; पण खूपच निराळ्या.

लक्ष्मीनारायणचं लग्न दोन वर्षांपूर्वीच ठरलंय; पण अजून झालेलं नाही! जोपर्यंत लक्ष्मीनारायण स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत लग्न लावून देणार नाही, असं त्याच्या भावी सासऱ्यानं त्याला सांगितलं आहे. लक्ष्मीनारायणच्या होणाऱ्या बायकोचं नाव गीता. पळून जाऊन लग्न करण्याविषयी तिनं लक्ष्मीनारायणला सुचवलं. मात्र, तो त्याच्या तत्त्वावर ठाम आहे."सन्मानानं आणि सगळ्यांच्या साक्षीनंच लग्न करीन,' असं त्यानं गीताला सांगितलं आणि सासऱ्याची भूमिका मान्य करून तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या खटपटीला लागला. तसे प्रयत्न तो सध्या गोव्यात करत आहे.

आता चौथ्याची कहाणी. याचं नाव संजू. हा पंचविशीतला तरुण. गावातल्याच मेनका नावाच्या मुलीवर संजूचं प्रेम. मात्र, दोघांच्या जाती वेगवेगळ्या. याच कारणामुळं मेनकाच्या वडिलांकडं संजू तिला लग्नाची मागणी घालू शकत नव्हता. संजूची अत्यंत गरीब परिस्थिती हेही एक कारण मागणी घालायला कचरण्याचं होतंच. मेनकाचंही संजूवर खूप प्रेम असलं तरी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावं असं तिला आजघडीला तरी वाटत नाही.
मेनकाला घेऊन संजूला मध्य प्रदेशाची सैर करायची आहे. सगळा मध्य प्रदेश तिला हिंडवून आणायचा, असं त्याचं स्वप्न आहे. त्यासाठी त्याला पैशाची आवश्‍यकता आहे, म्हणून तो गोव्याला आलाय!

संजू चांगला खेळाडू आहे, जिल्हा पातळीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत त्याच्या संघानं चांगली कामगिरी बजावली. तो पुढंही असाच खेळला असता; पण त्याला मेनका भेटली आणि त्याच्या कबड्डीची तपश्‍चर्या भंग पावली! आता मेनकाशी लग्नाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी संजू गोव्यात काम मिळवून इथल्या कामाशी, स्वतःच्या जगण्याशी स्पर्धा करतोय...

हे चौघंही आपापली हकीकत मला सांगताना आपापसातही बोलत होते. आपापसात बोलण्याची त्यांची भाषा वेगळीच होती. त्या भाषेचं नाव "नेमाडी' असल्याचं त्यांच्याकडून कळलं.
त्यांच्या गावातल्या वातावरणाविषयीही ते बोलले. सरपंचांनी एका विशिष्ट पक्षाला आग्रहानं करायला लावलेलं मतदान...देवीदासला मंजूर झालेलं घरकुल सरपंचाकडून नाकारलं जाणं...इत्यादी.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौघांनाही आपल्या आई-वडिलांची वाटणारी काळजी त्यांच्या बोलण्यातून डोकावत होती.
कुठलंच स्वप्न उराशी न बाळगणारा, आला दिवस आळसात घालवणारा, सगळं काही नशिबावर सोडून मोकळं होणारा तरुणवर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे, हे मला वेगवेगळ्या ठिकाणच्या भ्रमंतीतून आजवर दिसत आलेलं आहे. अशा तरुणाईच्या तुलनेत हे चारजण मला खूपच वेगळे वाटले. आदर्श वाटले. आपली हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःचं राज्य सोडून ते गोव्यासारख्या राज्यात येऊन राहिले आहेत.

जितेंद्र म्हणाला ः ""आमच्यातला एकजण रोज रात्री जागा राहतो. मद्यपि मंडळींची संख्या इथं खूप मोठी आहे. असे लोक इतरांना उपद्रवकारक ठरत असल्याचंही आम्हाला दिसून येतं. गोव्यात आम्ही कमावलेले पैसे अशा लोकांपैकी कुणी लुटले तर आम्ही काय करायचं, ही भीती आमच्या मनात सतत असते. मग अशा परिस्थितीत आमच्यातला एकजण खडा पहारा देण्याचं काम करतो. आमच्यातल्या या "पहारेकऱ्या'ला आणखी एक गोष्ट करावी लागते व ती म्हणजे आम्ही झोपतो त्या उघड्यावरच्या ठिकाणी रात्रभर जाळ करून धूर सतत कसा राहील हे पाहणं! डासांना पिटाळून लावण्यासाठी हे करावं लागतं, नाहीतर डासांमुळं झोप लागणं केवळ अशक्‍य. दोन रात्री असा जाळ करता आला नव्हता तर त्या दोन रात्री डासांच्या चाव्यांनी आम्ही त्रस्त-हैराण होऊन गेलो होतो. डासांनी आम्हाला फोडून काढलं होतं''
कामावरून लवकर यायचं, जाळासाठी सरपण गोळा करायचं, रेल्वे स्टेशनवर पडलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्याच रेल्वे स्टेशनवर असलेल्या पाणपोईतून पिण्यासाठी पाणी आणायचं आणि उगवणाऱ्या प्रत्येक नव्या दिवशी नव्या ऊर्जेनं कामाला लागायचं, हा या चौघांचा नित्यक्रम.
"तुम्ही परत या', असा सांगावा प्रत्येकाच्या घरची मंडळी फोनवरून सातत्यानं धाडत असतात; पण घरच्यांचं या सांगाव्यामागचं प्रेम लक्षात घेऊनही, या सांगाव्याला या तरुणांच्या लेखी सध्या तरी काही स्थान नाही. त्यांना काबाडकष्ट करून परिस्थितीवर मात करायची आहे...ठरलेलं वर्तुळ पूर्ण करायचं आहे.

माझा सहकारी सूरज पाटील माझ्यासोबतच होता. तो वारंवार या
चौघांकडं न्याहाळून पाहत होता. ""कसं हे जगणं यांचं?'' असा प्रश्न त्यानं मला विचारला. मी एका शब्दानंही उत्तर न देता त्या चौघांकडं पाहून हसून म्हणालो ः ""या चौघांच्या स्वप्नातलं पाखरू एक दिवस जोरदार भरारी घेईल आणि त्या पाखराला दिशा सापडेल.''
स्वप्नं उराशी बाळगल्याशिवाय ती पूर्ण होत नाहीत, हे तेवढंच खरं.
या चौघांनी एक उद्देश समोर ठेवला आहे. इतरांच्या दृष्टीनं त्यांच्या धडपडीला किती महत्त्व आहे, या धडपडीचं स्थान काय आहे हे मला सांगता येणार नाही; पण स्वप्नं उराशी बाळगून सतत धडपडणारी ही माणसं मला कलंदर वाटली खरी! त्यांच्या मळलेल्या कपड्यांना इमानदारीचा सुगंध आहे, असं मला वाटून गेलं. आपल्याला काही ध्येयं गाठायची आहेत, त्यासाठी क्षणभरही वाया घालवता कामा नये, असंच त्याचं जगणं-वागणं आहे, हे मी पाहत होतो. त्यांच्या या जिद्दीला नाव देण्यासाठी मला शब्द सापडले नाहीत.

या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. मुंबईला परतायला मलाही उशीर होत होता. मी त्यांचा निरोप घेतला. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले...
असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com