Sandeep Khandekar writes dhangar Culture
Sandeep Khandekar writes dhangar Culturesakal

घोंगड्याच्या अर्थचक्रातून कष्टाला मिळावे दाम!

महामंडळाच्या पुढाकारातून... गाठावी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

‘ते घोगडं घे आणि बस तिथं,’ धनगरमामानं पट्टणकोडोलीतल्या बिरोबाच्या मंदिरासमोर आवाज दिला...त्याच्या नातवानं नाक मुरडल्याने मामा खेकसला...‘टोचतंय व्हय ते! आरं बसून बघ. अंग नाय दुखायचं,’’ मामाच्या फर्ड्या आवाजानं नातू नरमला...मुकाट्याने त्यानं अंग घोंगड्यावर टाकलं. ‘‘आरं पिढीजात आपण तेच वापरतोय. आपलं पोटपाणी त्यावर हाय. तुमाला नायं कळायचं त्येचं महत्त्व!,’’ मामानं घोंगड्याचं अर्थचक्र एका वाक्यात मांडलं....घोंगड्याच्या प्रवासाची अधिक माहिती घेण्यासाठी मंदिरासमोर बसलेल्या धनगर बांधवांच्या घोळक्या शिरलो.... ‘‘पट्टणकोडोलीत घोंगडी तयार कोण करतंय आता? तुमी वाशीला नायतर राशिवड्याला जावा. तिथंच मिळंल माहिती,’’ डोक्यावर पटक्याचा भला मोठा पीळ दिलेला धनगर आबा बोलला...मग वाशी गाठली आणि जाणून घेतला घोंगडे निर्मितीचा प्रवास...

चरखे दोनशेवरून आले पंचवीसवर...

वाशीतल्या साऊबाई तांदळे यांच्या घरात पाऊल टाकलं. साऊबाईंच सासरं अन् माहेर हेच गाव. आईचा वारसा घेऊन त्या पिढीजात व्यवसायात आल्या. त्या चरख्यावर कुक्कडं करण्यात व्यस्त असल्याचे दिसले... ‘ही केसं कुठून आणली?’’, या प्रश्नावर त्या बोलू लागल्या...‘‘बकरीची केसं कातरायचा टाईम दोन वेळा हाय. एकतर अक्षय्‍य तृतीयेला, दुसरा दिवाळीला. एका बकऱ्यापास्नं पावशेर केसं मिळत्यात. मोठं बकरं आसल तर अर्धा किलो. ते आणून आमी त्याचा धागा तयार करतोय. वाशीत दोनशे चरखं हुतं आधी. आता पंचवीस असतील. किंमत न्हाई मिळतं घोंगड्याला...जमाना बदललाय. त्यामुळं घोंगडी वापरणारी माणसं बी न्हाई राहिली. घरखर्चाला हातभार म्हणून काम करतोय आमी,’’साऊबाईंनी घोंगड्याची स्थिती मांडली....

सळीवर ठरते लांबी अन् रुंदी...

‘‘एक वर्षाच्या बकऱ्याची केसं जावळाची. ती मऊ व मुलायम, त्येचा धागा रेखीव अन् त्येला तेलकटपणा जास्त...पावसाचं थेंबबी थांबत न्हाई त्यावर. त्येची केली जाणारी शाल पवित्र. ती खांद्यावर घेण्याचा मान पुजाऱ्याचा. बकरं कातरताना दीड फूट कात्री लागतीया....एकदा पायाच्या तिट्टीत बकरं घेतलं की पूरी केसं कापस्तोरं त्याला सोडून चालत न्हाई....धागा तयार झाल्यावर त्यो सळीवर घ्यावा लागतोय. पुरणीनं त्येची लांबी आणि रुंदी किती द्यायची हे ठरवलं जातंय...त्येलाच ताणा द्यायचा, असंबी म्हणत्यात...,’’ घरातल्या माडीवर बसलेले साऊबाईंचे पती सुऱ्याप्पा बोलले. धनगरांच्या एकोणतीस पोटजाती....मेंढपाळ करणारे मेंढे, डोंगरात राहणारे ढंगे, लढाईत झेंडे लावणारे झेंडे धनगर. सणगर लोक पूर्वी धागा करण्याचे काम करायचे. आता मेंढे धनगरसुद्धा धागा करण्याचे काम करतात, या माहितीची भर पडली. तांदळे कुटुंबीयांचा निरोप घेतला. पुढील माहितीसाठी नागावकडे रवाना झालो...दुचाकीवरून हळदी, कुर्डू, इस्पूर्लीमार्गे नागावातल्या संजय रानगेच्या घरात पोचलो...

हातमाग ते मशिनवरचं घोंगड...

सदुसष्ट वर्षांचे राघु रानगे हातमागावर घोंगडे करण्यात व्यस्त होते. ‘‘मागणी आहे का घोंगड्याला?, त्यावर म्हणाले,‘‘चटई, गादी, जाजमाचं दीस हाईत. एक घोंगड करायला एक दिवस लागतोय. ते काम सोपं न्हाई. धागा एकजीव करायला चिंचुक्याची पावडर लागतीया. पाटा, वरवंट्यावर वाटून धाग्यांना चिंचुक्याची खळ लावायला लागतीया. हातमागावरचं हे काम. चिंचुकं आणायला कोल्हापूर, संकेश्वर, खुटाळवाडी, हुपरीला जायला लागतंय. एक क्विंटलला २२०० रुपये मोजाय लागत्यात. एका घोंगड्याची मजुरी ३५० रुपये. परवाडतयं कुठं आमाला हे..! गुंडीवर धागा बाया-माणसं करत्यात. मांडीवर चोळून पण धागा करता येतोय. हातमागावरच्या घोंगड्याची दशी एकसंध येतीया. याव मारून धागा इणलं जात्यात. याव मारलं तसं तुऱ्याला घोंगडं गुंडाळलं जातयं,’’ त्यांनी हातमागावरची प्रक्रिया सांगितली. हल्ली मशिनवर घोंगडी तयार होतात. त्याची दशी एकसंध येत नाही, ही पुष्टी त्यांचा मुलगा संजयने जोडली.

बाजारपेठेत घोंगडी खरेदीकडे पाठ....

लोणंद, संकेश्वर ही राज्यातली घोंगड्याची बाजारपेठ. अनेकजण परंपरा जपण्यासाठी खरेदी करतात. केवळ घोंगडं व जान तयार करण्याचे दिवस राहिले नाहीत. कानटोपी, काचोळी, शाल करण्यात धनगर समाज मागे नाही. परंपरागत जोड व्यवसाय असला तरी घोंगड्याचे अर्थकारण समजून घेण्याची मानसिकता कोणाची नाही. तयार केलेल्या मालाची खरेदी म्हणावी तशी होत नाही. जत्रा-यात्रांत घोंगडी विक्रीस असली तरी किंमत ऐकून त्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली जाते. लहान मुलांसाठी बाळलोकरीचे कंडे वापरण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. घोंगड्याचे महत्त्व सांगून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळावे, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. रानगे यांच्या घरात या विषयावर विचार चक्रे जोरात फिरली. चहा घेऊन त्यांचा निरोप घेतला...

बकऱ्यांच्या संरक्षणासाठी योजना कोणती?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळातर्फे धनगर समाजातील लाभार्थ्यांना शेळ्या मेंढ्या दिल्या जातात. लाभार्थ्यांकडून लोकर महामंडळ घेते. त्यापासून नवनवीन उत्पादन निर्मिती केली जाते. राना-वनात डोंगरदऱ्यांत भटकंती करत मेंढपाळ व्यवसाय करण्यात धनगर बांधव समाधान मानतात. बंदिस्त शेळीपालन त्यांच्या डोक्याबाहेरचा विषय आहे. ज्या शेतात त्यांचा मुक्काम असतो, तेथे मेंढ्या चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते. पूर्वी एक-दोन बकरी चोरीला जात होती. आता टेम्पो घेऊनच चोरटे येत असल्याचे नंदगावच्या मार्गावर भेटलेल्या मेंढपाळाने सांगितले. केवळ वागरं (जाळी) लावून मेंढ्यांच्या संरक्षणाची दक्षता त्यांना घ्यावी लागते. शासनाकडे मेंढ्या संरक्षणासाठी तंबू देण्याची योजना आहे का? या त्यांच्या प्रश्‍नावर विचार प्रक्रिया वेगावली...

आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळावे

मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन रानगे मूळचे वाशीचे....धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी झगडणारे....त्यांची भेट घेतल्यावर घोंगड्याचं दुखणं स्पष्टपणे समोर आले... ‘‘महिला घरोघरी जोड व्यवसाय म्हणून घोंगडी बनवतात. चरख्यावर आजही त्या धागा विणतात. पारंपरिक व्यवसाय म्हणून त्या तो टिकवतात. पश्चिम महाराष्ट्रात मशीनवर घोंगडे कमी प्रमाणात तयार केले जाते. महिलांना महामंडळांतर्गत एखादी योजना तयार करून चरख्याचे आधुनिक मॉडेल द्यायला हवे. तर त्यांच्या कामाची गती वाढेल. याचा थेट अर्थ घोंगड्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत मिळवून देण्यासाठी योजना आकारण्याची आवश्यकता आहेत. शासनाने पंचायत समितीतर्फे त्याच्या विक्रीचे नियोजन केल्यास लाभार्थ्यांना फायदा होईल. आज बँका धनगर बांधवांना कर्ज देत नाहीत. रानावनात भटकणारा धनगर तारण काय ठेवणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे घोंगड्याला ऊर्जितावस्था तज्ज्ञांनी योजना तयार करावी. लघुउद्योग म्हणून धनगर समाजात घरोघरी घोंगड्याच्या निर्मितीचे युनिट तयार होईल,’’ रानगे यांनी बांधवांची अडचण प्लस त्यावरील उतारा सांगितला...घोंगड्याच्या अर्थकारणावर आणि अडचणींवर विचार करत कोल्हापूरची वाट धरली. त्याचवेळी सुऱ्याप्पा आबांचे वाक्य डोक्यात चमकले...‘दाम मिळंना म्हणून टाचा घासतोय...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com