पंखात बळ भरणारे; ‘ऑल इज वेल’

All is well book
All is well booksakal media

पंखात बळ भरणारे; - संदीप काळे यांचे पुस्तक

‘ऑल इज वेल’

प्रतिभावंत लेखक, संपादक, संघटक संदीप काळे यांचे 'ऑल इज वेल' हे पुस्तक हातात पडले आणि अक्षरशः अधाशा सारखे वाचून काढले. पुस्तक हातात घेतल्यानंतर पूर्ण वाचून झाल्यशिवाय आपण खाली ठेवूच शकत नाही इतकी छान भट्टी या पुस्तकाची जमली आहे. उत्तम, आत्मीयतेने मांडणी करणे ही संदीप काळे यांच्या लेखणीची खरी ताकद आहे. आजपर्यत संदीप काळे सत्तावन पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला अफाट अशी लोकप्रियता आणि वाचकवर्ग लाभला आहे. कित्येक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या चटकन संपल्या आहेत. मात्र 'ऑल इज वेल' हे पुस्तक आतापर्यंतच्या सर्व पुस्तकात सर्वात लोकप्रिय होईल असे पुस्तक आहे.

जे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत एकदाच वाचकांसाठी उपलब्ध सकाळ प्रकाशन यांनी करून दिले आहे. संदीप काळे मराठी साहित्य विश्वाला लाभलेले संवेदनशील आणि उमद्या मनाचे उत्तम लेखक आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दाला सामजिक जाणिवेची झालर लागली असते. ‘ऑल इज वेल’ या पुस्तकाला जेष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांची प्रस्तावना आहे. शरद पवार, अण्णा हजारे, प्रकाश आमटे, सिंधूताई सपकाळ, फ. मुं. शिंदे, श्रीराम पवार, डॉ. महेंद्र कल्याणकर, डॉ. मनोजकुमार शर्मा सगळया मातब्बर मंडळीनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.

‘ऑल इज वेल’ या आत्मकथनात संदीप काळे यांनी जन्मापासून ते पत्रकारितेपर्यंतच आपला प्रवास सामान्य माणसाला समजेल उमजेल अशा सोप्या व ओघवत्या भाषेत मांडला आहे. पुस्तक वाचताना हे आत्मकथन माझेच आहे असे वाटते. इतके ते वाचकांच्या मनाला भिडते. पुढे काय..ही उत्सुकता वाढविणारी संदीपकाळे यांची ही आत्मकथा ग्रामीण भागातील एक मुलगा आत्मविश्वासाच्या जोरावर जीवनात काय करु शकतो याचा जिवंत वस्तुपाठच आहे.

संदीप काळे यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. परिस्थितीचे चटके सहन करीत लहानाचे मोठे होताना आईची माया आणि वडीलांची करडी शिस्त यामुळे मी घडलो हे मोठ्या अभिमानाने ते 'ऑल इज वेल' मध्ये सांगतात. लेखकाला लहानपणी असणारी शिक्षणाची ओढ आणि प्रचंड तळमळ दिसून येते. शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्यात परिवर्तन होवू शकत नाही. यासाठी शिकले पाहिजे. शाळेत जाण्यासाठी लेखक आपल्या आईवडीलांकडे हट्ट धरतात.हे सुंदर पद्धतीने मांडले आहे.

खेड्यातील गरिबी, जातीयता या सगळ्या वातावरणात लेखकाची जडणघडण होते, हे वाचताना आपण पुस्तकाच्या प्रेमात कधी पडतो हे कळत नाही. आईचे संस्कार किती महत्त्वाचे असतात, हे संदीपजी यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. आपली आई कमलबाई काळे म्हणजे जणू काही संस्काराचे विद्यापीठच आहे. जीवनात प्रत्येक क्षणी आपण कसे जगले पाहिजे याचे शिक्षण अनुभवातून त्यांना आईने दिले. परिस्थितीवर मात करत हार न मानता जीवन जगायचे हा आईने दिलेला कानमंत्र म्हणजे लेखकाला मिळालेली आयुष्याची शिदोरीच होय. आपल्या लेकराला चुकीची सवय लागू नये म्हणजे काठीने बदडणारा आणि परीक्षेतील यशाने आनंदी होणारा हळव्या मनाचा कुटुंब वत्सल बाप म्हणजे रामराव काळे यांना लेखकाने सुंदररीत्या मांडताना बापाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे सगळं वाचताना डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होतात.

लेखकाला प्राथमिक शाळेत शिकत असताना आलेले बरे वाईट अनुभव,हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षकांची लाभलेली माया,जीवाभावाच्या मित्रांचे मिळालेले प्रेम, लहान म्हणून घरातून झालेला मायेचा वर्षाव हे सगळं अत्यंत चपखल अशा शब्दात लेखकाने मांडले आहे. लेखकाची ही हातोटी जबरदस्त अशी म्हणावी लागेल. घरची गुरे राखणीसाठी नाईलाजाने लेखकाला काही दिवस शाळेला सुट्टी घ्यावी लागते. त्या काळात गावातील खालच्या जातीच्या माणसाच्या सहवासात घालविलेले दिवस आणि त्याच्या डब्यातील खाल्लेले अन्न लेखकाच्या मनातील निरागसता, निर्मळता दर्शविते. रुढी,परंपरा आणि जातियतेच्या विळख्यात अडकलेल्या समाज जीवनातील हा प्रसंग मनाला भावतो.

दहावीच्या परीक्षेच्या वेळी मनापासून केलेली तयारी यातून लेखकाचा कष्टाळूपणा दिसून येतो. तरीही नापास होण्याची भीती मनात दडलेली असते. अशावेळी 'तु नक्की पास होशील ' म्हणून आईने दिलेला आत्मविश्वास आनंद देणारा वाटतो. त्याप्रमाणे लेखक पासही होतो. परंतु आपले मित्र नापास झाल्याचे कळल्यावर दुःखी होणारा लेखक मित्रांच्या घरी जावून त्यांची विचारपूस करतो. मित्रांबद्दल सहवेदना व्यक्त करणारा लेखकातील संवेदनशीलपणा कमालीचा भावतो. इथे लेखकातील 'माणूस' पण दिसते.

वडील जरी करड्या शिस्तीचे असले तरी वेळप्रसंगी हळवे होतात. लेखकाच्या चांगल्या गोष्टीचे त्यांच्या माघारी कौतुक करतात हे सांगताना आपल्या मुलाचा मनाला अहंकाराचा स्पर्श होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात. शाळेत असताना लेखकाला अनेक मित्र भेटले. काही मित्रांच्या संगतीत लेखक नकळतपणे व्यसनाकडे ओढले जाऊ लागले. नंतर घरी समजल्यावर वडीलांनी मरण्याविषयी केलेल्या वक्तव्यातून संदीप कमालीचे दुखवितात. हा प्रसंग काळजाला चिर करतो. आपल्या लेकराच्या काळजीपोटी वडीलांनी केलेले ते विधान होते हेही लेखक सांगून जातात. अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून आईवडील यांच्या विषयीचा आदर व प्रेम लेखकाने व्यक्त केले आहे.

संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक तुम्हाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देते. प्रसंग कितीही कठीण आला तरी हतबल न होण्याचा मार्ग दाखविते. जिद्दीने उभे राहण्याचे बळ देते. परिस्थितीवर मात करुन पुढे कसे जायचे हे शिकविते. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. कॉलेज जीवन मित्रांचा सहवास, शिक्षकांच्या सहवासात लेखक मोठा होत होते. अभ्यासाच्या वेळी मंदिरात पुजारी पोटाला अन्न देऊन लेखकावर खूप प्रेम करायचे. मागून अन्न खातो म्हणून मित्रांनी केलेल्या हेटाळणीचा प्रसंग वाचताना पोटात खड्डा पडतो आणि रडू येते. अशाही प्रसंगाला लेखकाने संयमाने आणि धीराने तोंड दिले.

आपल्या गरीबीला दोष न देता आपल्या वाट्याला जे आले आहे ते सहन करीत लेखक पुढेच चालत राहिला हे खूप शिकण्यासारखे आहे. निरनिराळे अनुभव आपल्या डोळ्यांनी टिपत होते. ग्रामीण भागातील चांगला विद्यार्थी म्हणून त्यांच्यावर सगळे भरभरून प्रेम करायचे हे अतिशय आनंदाने लेखकांनी मांडले आहे. लहानपणासूनच संदीपजी यांच्यात संघटन व नेतृत्व कौशल्य हे गुण होते. शिक्षकांनी ते हेरुन त्याला पैलू पाडण्याचे काम केले. म्हणूनच आज समाजासाठी काम करणारा सेवादलातील एक प्रामाणिक कार्यकर्ता संदीप काळे यांच्यात पहायला मिळतो.

पाटनूर गावात राहत असताना लेखकाला साप चावतो. हा प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी येते. आईच्या जीवाची घालमेल होते. सगळा गाव लेखकावर किती माया करतो हे या प्रसंगातून लक्षात येते. असे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत. जे वाचल्यावर तुम्हाला रडू आल्याशिवाय राहत नाही. गावातील व्यसनाचे विदारक व भीषण चित्र वाचताना खूप वाईट वाटते. लेखकाने अतिशय तळमळीने आपले विचार मांडले आहेत. व्यसन म्हणजे गावाला लागलेली कीड असते. व्यसनामुळे संसाराची राखरांगोळी होते. व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व लेखकांनी पटवून दिले आहे.

गरीबी ,दारिद्रय ,जातीयता ,अंधश्रद्धा ,हे सगळं अनुभवत लेखक मोठा होतो. कोणताही आडपडदा न ठेवता संदीप काळे यांनी आपल्या जीवनातील काही मोहाचे, चुकीच्या सवयीचे प्रसंग व घटना दिलखुलासपणे कबूल केल्या आहेत. यातून संदीपजी यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. पुन्हा चुकीच्या वाटेवर न जाण्याचा केलेला निश्चय म्हणजे जीवनात सकारात्मक परिवर्तन करता येते याचे उत्तम उदाहरण आहे. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस हे संदीपजी बाबत तंतोतंत खरे ठरते.

गुरु शिष्याच्या नात्याबद्दल म्हणायचे झाले तर संदीपजी खूप नशीबवान ठरतात. अनेक शिक्षक,प्राध्यापक तसेच चळवळीतील मोठ्या माणसांच्या सहवासात त्यांना मौल्यवान गोष्टी शिकायला मिळाल्या.मोठ्या माणसांचा सहवास म्हणजे जणूकाही त्यांच्या आयुष्याला झालेला परीस स्पर्शच आहे. त्यामुळेच संदीपजी उत्तम पत्रकार व लेखक म्हणून घडले. वाहत्या पाण्यासारखा स्वच्छ आणि दिलदार मनाचा,माणसं जोडण्याची कला अवगत असलेला ,गरीब लोकांबद्दल तळमळ व कळकळ असणारा, लढाऊ वृत्तीचा बाणा असणारा कार्यकर्ता संदीप काळेंच्या रुपात या पुस्तकात पाहायला मिळतो.

बाबा आमटेंची छावणी, माधवीवरचे प्रेम, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, पाटनूर या गावाचे वातावरण, ते औरंगाबाद बामू विद्यापीठ, सांजवार्ता हे सगळे खूप प्रभावीपणे या पुस्तकात मांडले आहे. आतापर्यंतच्या पुस्तकात प्रथम पाच पुस्तकात संदीप काळे यांचे 'ऑल इज वेल' हे पुस्तक माझे आवडते पुस्तक आहे. तुम्ही प्रामाणिकतेची, मेहनतीची कास धरा यश तुमच्या मागे धावत येईल या अर्थाने ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक तरुणाईसाठी अनुभवांचे भांडार आहे. स्वतःच्या जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्यास शिकविणारा अनमोल असा ठेवा आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी वाचलेच पाहिजे.

पुस्तक परीक्षण: लक्ष्मण जगताप, बारामती

पुस्तक: 'ऑल इज वेल’: मनातला सक्सेस पासवर्ड.

लेखक: संदीप रामराव काळे.

भाषा. मराठी, हिंदी इंग्रजी

प्रकाशन: सकाळ प्रकाशन पुणे

पृष्ठे : २७२ (मराठी)

किंमत : १९० रुपये. (मराठी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com