एक तप हिरकणीचे...

संदीप काळे sandip.kale@esakal.com
Sunday, 7 February 2021

भ्रमंती LIVE
प्राचार्य सुरेश सावंत सर यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त नांदेडला आज (ता. सात फेब्रुवारी) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी राम शेवडीकर सरांनी नांदेडच्या शिवाजीनगर भागातल्या केंब्रिज विद्यालयात बैठक आयोजिली होती.

प्राचार्य सुरेश सावंत सर यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त नांदेडला आज (ता. सात फेब्रुवारी) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी राम शेवडीकर सरांनी नांदेडच्या शिवाजीनगर भागातल्या केंब्रिज विद्यालयात बैठक आयोजिली होती. बैठकीनंतर मी केंब्रिज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेवती भारत गव्हाणे (९६०७८ ८३६६६) यांच्याशी बोलत बसलो होतो. गप्पांच्या ओघात रेवती यांनी त्यांचा संघर्ष कथन केला. त्यांनी उभारलेल्या कामाविषयी सांगितलं. 

रेवती यांचा जन्म बागल पार्डी इथल्या शेतकरी कुटुंबात झाला. उच्चशिक्षण घेऊन काही तरी केलं पाहिजे असं त्याचं स्वप्न. एमएस्सी, बीएड झाल्यावर एका खासगी शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. भारत गव्हाणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते सरकारी नोकरीत. खासगी शाळा चालवण्यात कुशल. कर्तबगार. लग्नानंतर भारती यांनी सरकारी नोकरी सोडली व स्वतः उभ्या केलेल्या खासगी शाळेचा विस्तार करायचं ठरवलं. त्यांनी टप्प्याटप्प्यानं वर्ग वाढवत नेले. विद्यार्थ्यांची संख्या तीनशेच्या आसपास झाली. शाळेचे वर्गही दहावीपर्यंत झाले. यशाचा आलेख वाढतच होता. उत्तम संसार, शाळा, कुटुंब असं सर्व काही छान सुरू होतं. भारत-रेवती यांना दोन अपत्ये झाली. एक मुलगी, एक मुलगा. ज्युनिअर, सीनिअर कॉलेज आणि नंतर निवासी शाळा - ज्या शाळेत किमान पाच हजार मुलं शिकू शकतील - हे स्वप्न उराशी बाळगत भारत यांचा प्रवास सुरू होता. शाळेला मदत करत रेवती संसाराचा गाडा ओढायच्या. शाळेची प्रगती हाच एक ध्यास घेऊन भारत काम करू लागले. असं सगळं व्यवस्थित सुरू असताना चालत्या गाड्याला खीळ बसावी तसं झालं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेवती आणि त्यांच्या शेजारचे देशपांडे कुटुंबीय एका धार्मिक स्थळी दर्शनाला गेले होते. त्याच काळात भारत हे ज्युनिअर कॉलेजच्या उभारणीच्या गडबडीत असल्यामुळे रेवती यांच्याबरोबर जाऊ शकले नव्हते. ‘तुम्ही तातडीनं घरी या,’ असा निरोप दुसऱ्या दिवशी रेवती यांना घरून कुणीतरी पाठवला. रेवती घरी पोहोचल्या आणि समोरचं चित्र पाहून हादरूनच गेल्या. भारत यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह पाहणं रेवती यांच्या नशिबी आलं...अवघ्या दोन दिवसांत भारत-रेवती यांचं आयुष्य उद्‍ध्वस्त होऊन गेलं होतं. ही दुर्दैवाची कहाणी सांगताना रेवती यांचे डोळे साहजिकच डबडबले होते. कूलरवर ठेवलेल्या मेणबत्तीमुळे कूलरनं पेट घेतला होता आणि प्रवाहित विद्युत्‌तारांचा स्फोट होऊन त्यात भारत यांना आपला जीव गमावावा लागला होता.  
भारत यांनी उभा केलेला मोठा शैक्षणिक पसारा त्यांच्या जाण्यानं एका क्षणात ‘पोरका’ झाला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेवती सांगू लागल्या : ‘‘गव्हाणे सर गेले तो दिवस होता २१ जुलै २००८. त्याच दिवशी ज्युनिअर कॉलेजला मान्यता मिळाली होती. कॉलेज सुरू करण्याचं सरांचं जे स्वप्न होतं ते पुढं नेऊ शकेल अशी शिक्षित व्यक्ती सासरी-माहेरी कुणीच नव्हती. सरांच्या निधनाच्या सोळाव्या दिवशी मी शाळेच्या कामाची सूत्रं हाती घेतली. सुरुवातीचे सहा महिने खूप त्रासदायक होते. ‘टीसी काढून नेऊ,’ असं पालक म्हणायचे,  तर ‘शाळेवर प्रशासक नेमा,’ असं सरकारी अधिकारी म्हणायचे, तर स्टाफला वाटायचं, ‘ही बाई काय शाळा चालवणार!’ 

या सगळ्यातून मार्ग काढत काढत मी सर्व काही सुरळीत केलं. इतिहासातल्या हिरकणीला रात्री जशी आपल्या तान्हुल्याची ओढ पुढं पाऊल टाकायला भाग पाडत होती तसंच माझंही होत होतं. माझीही पावलं त्याच वेगानं पडायची. मला माझ्या शाळेची आणि सरांच्या स्वप्नाची काळजी होती. आता या सगळ्याला बारा वर्षं म्हणजे एक तप झालं आहे. सरांच्या काळात शाळेत तीनशेच्या आसपास मुलं शिक्षण घ्यायची. आता ती संख्या तिप्पट आहे.’’
इतर समाजातल्या स्त्रियांच्या तुलनेत ठरावीक समाजातल्या स्त्रियांची दुःखं जरा ‘कडवी’ असतात. शिवाय, एक ‘बाई’ म्हणूनही रेवती यांचं स्वतःच्या ‘समाजा’कडून खच्चीकरण व्हायचं, त्या दुःखालाही त्यांना या काळात सामोरं जावं लागत होतं ते वेगळंच. रेवती यांच्याशी गप्पा मारताना मला हे सगळं जाणवत होतं.  

रेवती म्हणाल्या : ‘‘सुरुवातीच्या काळात मी सोळा सोळा तास काम केलं तेव्हा कुठं सगळं सुरळीत झालं. सोळा तास काम करायची सवय आताही कायम आहे. तेव्हा सर्वात मोठं आव्हान होतं ते शाळेच्या उभारणीसाठी सरांनी काढलेलं दीड कोटी रुपयांचं कर्ज चुकतं कसं करायचं हे. मात्र, ते वेळेच्या आत चुकतं झालं.’’

‘मुलं काय करतात,’’ असं विचारल्यावर रेवती म्हणाल्या : ‘‘मुलगी संस्कृती अकरावीत असून तिला टेनिसची खूप आवड आहे. बंगळूरमध्ये ती टेनिसचे धडे घेते. मुलगा सर्वेश हा आमच्याच ‘केंब्रिज विद्यालया’त नववीत आहे. 
सर गेल्यानंतर ही शाळा बंद व्हावी अशी अनेकांची सुप्त इच्छा होती. कुणाचंच पाठबळ माझ्या मागं नव्हतं. सहानुभूतीही नव्हती. ‘चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू’ आणि ‘ध्येयानं झपाटलेली हिरकणी’ अशा दोन दोन भूमिका मला पार पाडाव्या लागत होत्या. सरांनी पाहिलेलं निवासी शाळेचंही स्वप्न आता येत्या काही वर्षांत पूर्ण होईल. या शाळेसाठी मी नांदेडच्या पूर्णा रोड या भागात दहा एकर जागा घेतली आहे. तिथं कामही सुरू झालं आहे.’’ 

गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची रेवती यांनी घेतलेली भूमिका वाखाणण्याजोगी आहे. ही सगळी कहाणी सांगताना रेवती यांचं मन यजमानांच्या, म्हणजेच गव्हाणे सरांच्या, आठवणींनी भरून येत होतं. 
मी रेवती यांचा निरोप घेऊन मी सुरेश सावंत सरांच्या घरी निघालो; पण मनात अनेक प्रश्न होते. 

कुणीही सोबतीला नसताना लढण्याचं एवढं बळ या ‘हिरकणी’त कुठून आलं असेल? खरं तर इतिहास अनेकांच्या मदतीनं घडवला जात असतो. इथं मात्र रेवती यांनी एकटीनंच इतिहास निर्माण केला आहे. मुख्याध्यापक, आई, मुलगी, सून या सर्वच भूमिका रेवती यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ज्यांच्या अवतीभवती अंधार आहे अशा अनेक ‘हिरकणीं’ना रेवती भारत गव्हाणे यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरावा असा आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandip kale writes about revati gavhane