esakal | स्वामींची हत्या?...
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामींची हत्या?...

स्वामींची हत्या?...

sakal_logo
By
संदीप काळे saptrang@esakal.com

आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी लढणारे स्टॅन स्वामी यांचे काल 84 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खरेतर यास निधन झाले असे म्हणता येणार नाही, तर न्यायव्यवस्थेने त्यांचा बळी घेतला असे म्हणावे लागेल. फादर स्टॅन स्वामी यांच्यावर नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याचबरोबर दहशतवादाचा आरोप असल्याचे भारतातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. (sandip-kale-writes-about-stan-swamy)

फादर स्टॅन स्वामी यांना न्याय मिळावा म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले. पण, काल (5 जुलै) दुर्दैवाने मृत्यू त्यांचा झाला आणि न्याय व्यवस्थेचे रूप पुन्हा उघडे पडले. स्वतःवर झालेले आरोप त्यांनी कधीच मान्य केले नाही. परंतु, ते आरोपी नाहीत हे कायद्याने मान्य होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

84 वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना सरकारी यंत्रणांनी मारले नाही तर मग कोणी मारले?

सध्या आपला देश गुन्हेगारीचे एक बेट होत चालले आहे. दहशतवादी असा आरोप असलेले भारतातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फादर स्टॅन स्वामी यांना, भीमा कोरेगाव येथे 2018 साली हिंसा भडकली होती. त्यानंतर, पोलिसांनी त्यांच्यावर नाना प्रकारचे आरोप केलेत आणि त्या आरोपाअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. शहरी नक्षलवादी असा ठपका फादर स्टॅन स्वामी यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांचे सहकारी आणि ते माकपा (माओवादी) या बंद असलेल्या संघटनेशी त्यांचा संबंध आहे, देशात अशांतता पसरविण्याचे काम फादर स्टॅन स्वामी करत आहेत, असे विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर एनआयएने केलेत.

झारखंड मधील रांची इथून फादर स्टॅन स्वामी यांना 2018 साली वयाच्या 82 व्या वर्षी अटक करण्यात आली. भीमा कोरेगाव प्रकरणी त्यांना झालेली अटक ही सोळावी अटक होती. वर्णन गोन्झाल्विस, हनी बाबू, शोमा सेन, महेश राऊत, वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गॅडलिंग, अरूण फरेरा, आणि आनंद तेलतुंबडे या सर्वांच्या संपर्कात फादर स्टॅन स्वामी होते असा आरोप त्यांच्यावर एनआयएने केला आहे. फादर स्टॅन स्वामी यांना अटक करण्यात आली, त्यावेळीपासूनच त्यांची प्रकृती ढासळत होती. अनेकदा, त्यांनी न्यायालयात ढासळत असलेल्या प्रकृतीमुळे जामीन अर्ज दाखल केला, परंतु प्रत्येकवेळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मुंबईच्या तळोजा जेलमध्ये आठ महिने घालविल्यानंतर, त्यांची प्रकृती इतकी ढासळली की, स्वतःचे स्वतःहून जेवण आणि आंघोळ सुद्धा ते करू शकत नव्हते. तळोजा कारागृहाने अतिशय निष्काळजीपणाने या प्रकरणाला हाताळले. याच्यातून, कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो.

फादर स्टॅन स्वामी कोण होते?

फादर स्टॅन स्वामी यांचा जन्म तामिळनाडूमधील त्रिची येथे, 26 एप्रिल 1937 साली झाला. वडील हे शेतकरी तर आई गृहिणी होती. फादर स्टॅन स्वामी यांनी समाजशास्त्रात एमए केले. समाजशास्त्र या विषयाचे ते अभ्यासक होते. बंगळुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केले. स्वामी यांनी, बंगळूरमध्ये एका दशकाहून अधिक काळातील अल्पसंख्याकांतील नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा चालविली.

झारखंडमधील आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी लढता यावे म्हणून झारखंड मध्येच ते स्थायिक झालेत. आपल्या आयुष्यात त्यांनी 20 वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त वेळ आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला.

माओवादी म्हणून अटक असलेल्या ३हजार तरुण आणि तरुणींची, सुटका व्हावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. फादर स्टॅन स्वामी यांनी, अतिशय दुर्गम भागातील आदिवासींच्या राहत्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्यांच्या परवानगीशिवाय खाणी, धरणे व नगरशैली कशी तयार केली जातात आणि बहुतेकवेळा नुकसानभरपाई न देता त्यांना कसे जमिनी देण्यापासून वंचित ठेवल्या जाते, याची माहिती ते त्यांना करून देत.

हेही वाचा: प्लस साईज स्त्रियांनी नक्की ट्राय करा 'ही' फॅशन

2018 साली आदिवासी लोकांनी केलेल्या बंडखोरीबद्दल, फादर स्टॅन स्वामी यांनी उघडपणे समर्थन केले होते. त्यांच्या संसाधनावर, भूमीवर त्यांचेच अधिकार आहेत, असे ते ठामपणे सांगायचे. मोठ्या कंपन्या कारखाने आणि खाणीसाठी कशा आदिवासी लोकांच्या जमिनी बळकावतात याबद्दल सविस्तरपणे ते लेख लिहित. आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक संघटना स्थापन केल्या.

2018 साली भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती त्या प्रकरणी त्यांना, नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे हिंसा होण्याच्या अगोदर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि तिथे त्यांनी चिथावणीखोर भाषण दिल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. आपल्यावर, लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. मागच्या वर्षी त्यांनी, एका व्हिडिओ द्वारे त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले. एनआयएने, त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असणारे कागदपत्रे जारी केले होते, परंतु फादर स्टॅन स्वामी यांचे म्हणणे होते "हे एक षडयंत्र आहे, आणि माझ्या कॉम्प्युटरमध्ये कुणी तरी चोरून ही कागदपत्रे टाकली आहेत." असा त्यांचा दावा होता.

फादर स्टॅन स्वामी यांना अटक झाल्यानंतर, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल निदर्शने केली. त्यांच्या सुटकेसाठी, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. न्यायालयाने, त्यांच्या प्रकृतीचा विचार करून निर्णय घ्यायला हवा, असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

न्यायाच्या प्रतिक्षेत असणारे फादर स्टॅन स्वामी, यांना कोरोनाची लागण झाली, आणि त्यात त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. त्यांच्यावर, झालेले आरोप आणखी काही सिद्ध झाले नाहीत. परंतु, त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत न्यायव्यवस्थेने जो काही त्रास दिला, त्याबद्दल न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. लोकशाहीने, आपल्यावर अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागण्याची संधी दिली आहे, परंतु न्यायव्यवस्थेने न्यायासाठी दिरंगाई केली की, असे त्याचे परिणाम पाहायला मिळतात.

फादर स्टॅन स्वामी यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत, परंतु लावलेल्या आरोपा सोबतच त्यांचा मृत्यू झाला. शंभर आरोपी सुटले तरी चालतील परंतु एक निर्दोष फासावर चढला नाही पाहिजे, अशी आपल्या न्यायव्यवस्थेची असणारी बाजू इथे याबाबतीत पूर्णपणे कमी पडलीय, असे वाटते. फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूने न्यायलयालाही धक्का बसला असे न्यायालय म्हणाले. परंतु, न्यायालयाने त्यांचे म्हणणे नेहमीच फेटाळून लावले आहे. फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू म्हणजे, न्यायालयाने केलेला खूनच म्हणावा लागेल. न्यायव्यवस्थेने आता सहानुभूती दाखवून काहीही फायदा नाही. न्यायालयाने त्यांच्या वयोमानाचा एकदा तरी विचार करायला हवा होता.

सामान्य माणूस तर न्यायालयाची पायरी चढण्यास पहिलेच घाबरतो, आणि त्यात न्यायालयाची काळी बाजू उघडी पडत असेल तर सामान्य माणसाने कुठे न्याय मागायचा? हा मोठा प्रश्न आहे. लोकांच्या हक्कांसाठी लढणे, जनजागृती करणे म्हणजे काही भडकवून देणे नव्हे, हे केंद्र सरकारला कधी समजेल?

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

बहुजनांना सतत मातीत घालायचं, त्यांना दुजाभाव द्यायचा अशी धारणा भाजपाची सातत्याने होती. किंबहुना, राज्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा या गोष्टी सातत्याने होत गेल्या. आपण एकूण सगळा हा कार्यकाळ पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये बहुतांशी कॉम्रेड्सवर, बहुतांशी बहुजनांच्या कार्यकर्त्यांवर, बहुतांशी चळवळींमध्ये काम करणार्‍या अनेक लोकांवर, विशेषतः डाव्या विचारसरणीच्या असणार्‍या अनेक चळवळींवर घाला घालण्याचे काम करण्यात आले. आपण अनेक संघटना बघितल्या तर, आजही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते परेशान आहेत. शीतल साठे पासून ते अनेक मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत, की ज्यांच्यावर सातत्याने प्रहार घालायचं काम या सरकारने केले आहे.

फादर स्टॅन स्वामी सुद्धा याच बळीचा बकरा बनलेले आहेत, यात तीळमात्र शंका नाही. ज्या माणसाने आयुष्यभर एकमुखी सेवाभावी आंदोलन हातामध्ये घेतलं, त्यातून समाजाचं भलं करण्याचं आंदोलन हाती घेतलं, विज्ञानवादी विचार हाती घेतला त्याच फळ त्या काळच्या भाजप सरकारने त्यांना सातत्याने दिलं, त्यातून त्यांना खूप त्रास भोगावा लागला.

फादर स्टॅन स्वामी यांच्यावरील असलेल्या आरोपांचे भविष्यात काय होते, हे बघावे लागेल. परंतु, आज एक नागरिक न्याय मिळण्याची प्रतीक्षा करताना त्याचा मृत्यू झाला यापेक्षा दुर्दैव काय असू शकते?

फादर स्टॅन स्वामी यांचे कुटुंब नव्हते. त्यांच्यासोबत काम करणारे सहकारीच त्यांचे कुटुंब होते. फादर स्टॅन स्वामी यांची, शेवटची इच्छा होती की, "जर आपल्याला वैद्यकीय जामीन मिळाला तर, आयुष्याची संध्याकाळ आपल्या मित्रांबरोबर घालवायची." अशी इच्छा त्यांनी मे महिन्यात झालेल्या सुनावणीत न्यायालया समोर व्यक्त केली होती. परंतु, दुर्दैवाने त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. आता न्याय तरी कुणासाठी मागायचा?

संपादन : शर्वरी जोशी

loading image