नवनिर्मितीचा किमयागार

संदीप काळे sandip.kale@esakal.com
Sunday, 14 February 2021

भ्रमंती LIVE
मागच्या आठवड्यात पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. फोन वाजला. मित्र ब्रह्मा चट्टे याचा फोन होता. ब्रह्मा म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाच्या ध्येयानं झपाटलेला कार्यकर्ता, पत्रकार. शेती, शेतकरी यांच्याविषयी त्यानं हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी त्यानं मला सांगितलं आणि विचारलं : ‘आता कुठं आहात?’

मागच्या आठवड्यात पुण्याहून सोलापूरला निघालो होतो. फोन वाजला. मित्र ब्रह्मा चट्टे याचा फोन होता. ब्रह्मा म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाच्या ध्येयानं झपाटलेला कार्यकर्ता, पत्रकार. शेती, शेतकरी यांच्याविषयी त्यानं हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी त्यानं मला सांगितलं आणि विचारलं : ‘आता कुठं आहात?’
मी म्हणालो : ‘सोलापूरला निघालोय.’

तोही त्याच परिसरात होता. भेटायचं ठरलं. लांबोटी गावाच्या थांब्याजवळ तो माझी वाट पाहत उभा राहिला. मी तिथं पोहोचलो. ब्रह्मानं मला त्याच्या घरी नेलं. ब्रह्माबरोबर त्याचे मित्र होते. त्यानं त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्यांचं नाव सुहास आदमाने (९०२८५०८१८३). गप्पाटप्पा सुरू झाल्या. सुहास हे काहीतरी वेगळं रसायन आहे हे माझ्या लक्षात आलं. सुहास यांचं गाव लांबोटीपासून तीन किलोमीटरवर आहे.  शिरापूर. सुहास यांनी तिथं अवघ्या काही दिवसांत मोठा उद्योग उभा केला आहे.

सुहास बीई (कॉम्प्युटर) आहेत. सध्या तिशीचे असलेले सुहास यांनी परदेशातील नोकरी सोडून सन २०१३ ला आपल्याच गावातील लोकांसाठी उद्योग सुरू करायचा निर्णय घेतला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुहास यांच्याकडे ना पैसा होता, ना वशिला. एक वर्ष रिसर्च केल्यावर सुहास यांनी शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला एक कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या या उद्योगत चार वर्षांनंतर १० कोटी वार्षिक उत्पन्न मिळू लागलं. केवळ शुद्ध पाणीनिर्मिती एवढ्यावरच न थांबता देशी गाईचं तूप, दूध, कोक, सोडा, मसालादूध अशी अनेक उत्पादनं तिथं घेतली जाऊ लागली. महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश या पाच राज्यांत सुहास यांच्या ‘स्पेनकावर्ड’ या कंपनीच्या उत्पादनांना मागणी वाढू लागली. 
शिरापूरला चाललो असताना सुहास यांनी वाटेत मला ही सगळी कहाणी सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिरापूरला पोहोचलो. सुहास यांनी त्यांची सगळी कंपनी मला दाखवली. तिथलं वातावरण कौटुंबिक होतं. पाणीसुद्धा देशी कसं असावं याची संकल्पना सुहास यांनी मला सांगितली. अगदी कमी कालावधीत कंपनीला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाल्याची प्रमाणपत्रं, पुरस्कार त्यांनी मला दाखवले. 
‘एमआयडीसीत हा प्रकल्प का सुरू केला नाही?’ मी सुहास यांना विचारलं.

ते म्हणाले : ‘मला लोकांच्या आरोग्याशी खेळायचं नव्हतं. तिथं विकत मिळणारं पाणी पिण्यायोग्य असतंच असं नाही. शिवाय, विकत घेऊन विकणं हेही अवघडच.’
ग्रामीण भागातला, शेतकऱ्याचा मुलगा आपल्या गावात एखादा उद्योग सुरू करू शकतो व त्याच्या उत्पादनाला भारतभरातून मागणी येते... हे शक्‍य झालं ते सुहास यांच्या हिमतीमुळे आणि गावावर त्यांचं प्रेम असल्यामुळे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुहास म्हणाले : ‘माझ्या पाण्याची चव सहा देशांना आवडली आहे! मध्येच हे कोरोनाचं संकट आलं नसतं तर सोलापूर जिल्ह्याचं पाणी जगातील अनेक देशांना प्यायला मिळालं असतं. पुढच्या पाच वर्षांत किमान पंधरा देशांत मला माझं उत्पादनं घेऊन जायचं आहे. ते माझं स्वप्न आहे.’’
आम्ही सुहास यांच्या घरी गेलो. सुहासची आई लता आणि पत्नी अश्विनी यांची भेट झाली. 

लताताई म्हणाल्या : ‘आमचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे मुलांकडे फार लक्ष देणं शक्‍य होत नसे. मुलीला शिकवण्याचा विचारही मनात येत नसे. सुहासनं शिक्षण घेऊन नोकरी करावी असं आम्हाला वाटायचं; पण त्यानं उद्योग उभारायचा निर्णय घेतला. आम्हाला सुरुवातीला ते फारसं पटलं नव्हतं. मात्र, आता त्याचा अभिमान वाटतो. सुरुवातीच्या काळात त्याला खूप त्रास सहन करावा लागला.’

मी अश्विनीवहिनींना विचारलं : ‘तुमची आणि सुहासची भेट कशी झाली? तुमचं लव्ह मॅरेज असल्याचं सुहास यांनी मला सांगितलं.’
वहिनी काहीशा लाजत म्हणाल्या  : ‘सोलापूरला आम्ही ए. जी. पाटील कॉलेजात शिकत होतो. कॉलेज आणि त्यानंतरची एकूण पाच वर्षं आम्ही सोबत होतो आणि मग लग्न केलं. आता कंपनीचा आर्थिक व्यवहार मीच पाहते.’
ब्रह्मा सुहासला मध्येच म्हणाला  : ‘तुम्ही अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले आहेत, त्याबाबतही सांगा.’

सुहास म्हणाला : ‘मी गरिबीत शिकलो. गरिबीची झळ काय असते याची जाणीव मला शिक्षण घेताना सारखी होत राहायची. या जाणिवेपोटी मी परिसरातील काही मुलांना दत्तक घेऊन शिकवत आहे. 
उद्योग उभे करण्यासाठीही मी अनेकांना मदत केली. ज्यांना वाटतं आपण व्यवसाय करू शकतो, ते माझ्याकडे आल्यास मी त्यांना अशी मदत करतो. यशस्वी उद्योजक म्हणून मला देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी निमंत्रित केलं जातं. सोलापूर आणि पुणे या दोन ठिकाणी मी लोकांच्या सोईसाठी कार्यालय उघडलं आहे.’’

मी शिरापूरहून निघालो, माझ्या मनात अनेक प्रश्न होते. कर्माला, नशिबाला, आई-वडिलांना दोष देत अनेक तरुण निष्क्रियेतेत, आळशीपणा आयुष्य घालवतात. या सर्व तरुणांनी सुहास यांच्यासारखी हिंमत का करू नये? आपण नवनिर्मिती करून विकासाचं किमयागार व्हावं असं बेकार असलेल्या प्रत्येक तरुणाला का वाटत नाही, असे प्रश्न मला पडले... 

संदीप काळे यांची पुस्तके
‘भ्रमंती लाईव्ह’ या सदरातील निवडक लेखांचे ‘अश्रूंची फुले’ आणि माणूस‘की’ हे संग्रह अमेझॉनच्या माध्यमातून घरपोच मिळवण्यासाठी कृपया खालील क्यू आर कोड स्कॅन करावा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandip Kale Writes about Suhas Aadmane