काळी टिकली अन् घराचा आधार...

जेजुरीवरून मला पुरंदरला जायचं होतं. सासवडला माझे मित्र विकास गुरव यांची भेटही घ्यायची होती. श्रीकांत कोलते नावाच्या माझ्या मित्राने त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत.
woman
womanesakal
Summary

जेजुरीवरून मला पुरंदरला जायचं होतं. सासवडला माझे मित्र विकास गुरव यांची भेटही घ्यायची होती. श्रीकांत कोलते नावाच्या माझ्या मित्राने त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत.

जेजुरीवरून मला पुरंदरला जायचं होतं. सासवडला माझे मित्र विकास गुरव यांची भेटही घ्यायची होती. श्रीकांत कोलते नावाच्या माझ्या मित्राने त्यांच्या शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्या शेतीमधले प्रयोग पाहण्यासाठी मला बोलावत होते. आम्ही चार मित्र गाडीतून निघालो. सासवडपासून बरंच पुढे गेल्यावर एका छोट्याशा वस्तीजवळ श्रीकांत यांचं शेत आहे. आम्ही शेतातले प्रयोग पाहिले. परतीच्या दिशेने निघालो तर श्रीकांतच्या शेतामधील विहिरीवर एक महिला पाणी काढत होती. विहीर कसली ती नक्षीदार बांधलेली बारव होती. मी श्रीकांतना विचारलं, ‘‘अहो, अजून उन्हाळा लागला नाही, तरीही पाण्यासाठी बरीच ओढाताण दिसते. बाजूच्या वस्तीमध्ये पाण्यासाठी अडचण आहे का?’’ श्रीकांत म्हणाले, ‘‘तशी पाण्याची अडचण नाही; पण लोडशेडिंगमुळे अनेक वेळा लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यात डीपी खराब झाला, वायर तुटली, तर मग पुन्हा चार-पाच दिवस दुरुस्तीसाठी लागतात.’’ श्रीकांत पाणी, आजूबाजूला असलेल्या वस्तीविषयी बोलत होते. आमच्या गाडीमध्ये पाण्याच्या बाटल्या होत्या; पण तरीही विहिरीतलं ताजं पाणी पिण्याचा मोह काही आवरत नव्हता. श्रीकांतना म्हणालो, ‘‘दादा, पाणी पिऊ या आपण.’’ श्रीकांत विहिरीच्या जवळ गेले. विहिरीमधून पाणी काढणाऱ्या त्या महिलेला ‘आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या,’ अशी विनंती केली. पाठीमागे वळून त्या बाईने पाहिलं, विहिरीचा मालकच आपल्याला पाणी मागतोय हे तिच्या लक्षात आलं.

पांढऱ्याफटक चेहऱ्यावर मोठी काळी टिकली, काळजीने काळे पडलेले डोळे अशी ती बाई होती. त्या बाईने सावधगिरीने तिचा पदर कमरेला खोवला. पोहरा विहिरीमध्ये टाकून तिने पाणी काढलं. मी पाणी पिण्यासाठी ओंजळ करून पुढे झालो. थंडगार पाणी, कितीही प्यालं तरी आणखी प्यावं असं वाटत होतं. पाणी पिऊन वर मान केली, तर तीन लहान-लहान मुली हातात छोटं-छोटं पातेलं घेऊन पाणी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींकडे पाहून त्यांची आई एकदम कडाडली, ‘‘कपडे घालून येता येत नाही का? वेड्या कुठल्या!’’ त्या रागातच त्या बाईने तो पोहरा विहिरीत फेकला. त्या पोहऱ्याचा आतमध्ये ‘धप्प’ असा पाण्यात पडल्याचा आवाज आला. त्या बाईंचा राग शांत झाल्याचं पाहून त्या तिन्ही मुलींमधली मोठी मुलगी म्हणाली, ‘‘कपडे आजीने धुऊन वाळू घातले.’’ ती बाई एकदम शांत झाली. तिच्या लक्षात आलं, आपण विनाकारण मुलींना बोललो. आम्ही सर्वजण बाजूलाच त्या आई-मुलींमधला बोलण्यातून, डोळ्यांतून होणारा संवाद ऐकत, पाहत होतो.

मी श्रीकांतना विचारलं, ‘ही महिला कोण आहे?’ श्रीकांत म्हणाले, ‘बाजूच्या वस्तीमध्ये रमाकांत कांबळे नावाचा ट्रकचालक होता. कोरोनामध्ये उपचार घेताना मरण पावला. त्याची ही पत्नी प्रथमा, तिच्या या तीन मुली आहेत.’ रमाकांत यांच्या जाण्यानंतर कांबळे कुटुंबीयांची झालेली अवस्था श्रीकांत मला सांगत होते. प्रथमाची तिन्ही भांडी आता पाण्याने भरून झाली होती. पोहऱ्याची लांब दोरी एकत्रित करून प्रथमाने पोहऱ्यात टाकली. त्या जायला निघाल्या. मी म्हणालो, ‘प्रथमाताई, मुली शिकायला जातात ना?’ तिला माझं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं. त्या बाईने श्रीकांतकडे पाहिलं आणि ती मला म्हणाली, ‘नाही अजून, आता पुढच्या वर्षीपासून त्यांना शाळेत टाकणार आहोत.’

‘तुमच्याशी मला बोलायचं आहे, मी तुमच्या घरी आलो तर चालेल का?’ माझे हे शब्द ऐकताच प्रथमाच्या मनात एकदम प्रश्नचिन्ह निर्माण झालं. श्रीकांत पुढे आले व माझी ओळख करून देताना म्हणाले, ‘हे अनेकांच्या घरी जातात, त्यांच्याशी बोलतात, त्यांची मुलाखत घेतात.’ प्रथमाने ‘ठीक आहे,’ म्हणत हळूच मान हलवली. त्या पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे निघालो. त्या बाईंच्या हातात असलेला पोहरा मी हातात घेतला. त्या पाऊल वाटेने आम्ही घराच्या दिशेने निघालो.

आम्ही सगळे जण प्रथमाच्या मागे मागे चाललो, हे पाहून त्या वस्तीवरचे लोक एकटक आमच्याकडे पाहायला लागले. ती वस्ती कसली, इच्छा नसताना आयुष्याचा एक-एक दिवस ढकलण्यासाठीच तात्पुरत्या निवाऱ्याची केलेली ती सोय होती. ती वसाहत राज्याच्या त्या सगळ्या वसाहतींचं प्रतिनिधित्व करणारी होती, ज्या वसाहतींमध्ये माणसं जीव मुठीत धरून जगतात. रस्ता, नाले यांचा येथे काही संबंध नव्हता. ज्यांना आपल्याच राज्यात मराठवाडा, विदर्भ अशी छोटी-छोटी राज्यं निर्माण करायची आहेत, त्यांनी एकदा अशा वस्त्यांमध्ये येऊन पाहावं. ही वस्ती कशी आहे, इथली माणसं कशी आहेत. दिवसभर जगण्यासाठी इतके काबाडकष्ट करायचे की, रात्री जागेवरच पडल्यापडल्या झोप कशी लागते हे कळतही नाही.

राजकारण, समाजकारण, देश, अस्मिता यांचा आणि या लोकांचा काहीही संबंध नाही. आम्ही घरी पोहोचलो. रमाकांतचे आई-वडील सून, मुली कधी येतील याची वाट पाहत होते. रमाकांतचे आई-वडील श्रीकांतना ओळखत होते. प्रथमाचं घर म्हणजे चार भांड्यांचा संसार, बाकी त्या घरात काही नव्हतं. मी त्या छोट्याशा घरात बाजेवर बसलो होतो. श्रीकांत त्या वस्तीवरच्या त्यांच्या ओळखीच्या माणसांबरोबर बाहेर बोलत थांबले होते. माझे मित्रही श्रीकांतबरोबर बोलत बसले होते. मी आतमध्ये आलो. प्रथमाने तिच्या सासू-सासऱ्‍यांशी माझी ओळख करून दिली. आमचं बोलणं सुरू झालं. प्रथमाने सर्वांसाठी चहा ठेवला. घरात इतके कप नव्हते म्हणून तिने मुलीच्या हातून बाजूच्या घरातून कप आणले. मुलींनी सगळ्यांना चहा दिला. आमच्या गप्पा झाल्या आणि त्या गप्पांमधून ती वस्ती, ते कुटुंब, रमाकांत, रमाकांतनंतर जे काही वादळ त्या घरात आलं होतं, त्याविषयी रमाकांतचे आई-वडील माझ्याशी बोलत होते.

‘‘माझ्या सुनेला मी पहिलं मूल झाल्यापासून कोसत होते. तिला मुलीच झाल्या. आम्हाला मुलगा हवा होता. रमाकांत ट्रक चालवण्याच्या निमित्ताने बाहेर असायचा. कोरोनाच्या काळात तो दवाखान्यामध्ये भरती झालाय, एवढंच आम्हाला सांगण्यात आलं. त्याच दवाखान्यातून पुन्हा फोन आला, त्याचा जीव गेला म्हणून. त्याचा जीव गेला तेव्हा त्याची सर्वांत लहान मुलगी यशोदा दहा दिवसांची होती. कोवळी बाळंतीण, आमचं दारिद्र्य आणि सततचा एकटेपणा... मन बेचैन व्हायचं. आपल्या मुलाचं शेवटचं तोंड पाहावं असं कोणत्या आई-वडिलांना वाटणार नाही? आम्हालाही तसं वाटत होतं; पण आम्हाला कुणीही जाऊ दिलं नाही. परस्परच रमाकांतवर अंत्यसंस्कार झाले. आमच्या वस्तीवरच्या एका मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता, तोही ट्रकचालक होता. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मालकांनी चार पैसे तरी दिले. मात्र, आम्हाला कोणीही चार पैशांसाठी मदत केली नाही...’’ रमाकांतची आई एकीकडे सांगत होती आणि दुसरीकडे अश्रूंना वाट मोकळी करून देत होती.

रमाकांतचे वडील म्हणाले, ‘दोन्ही डोळे नसताना जगणं किती अवघड असतं कसं सांगायचं ! माझी सून शिकलेली; पण बिचारीने आमच्या कुटुंबासाठी स्वतःचा बळी दिला हो. पंधराव्या वर्षी तिचं लग्न झालं आणि आता तिशीच्या आतमध्ये ती विधवा झाली. उभं आयुष्य तिच्याकडे आहे आणि दुसरीकडे आमचं सगळं कुटुंब तिच्यावर अवलंबून आहे.’’ बोलता-बोलता अनेक गंभीर विषय पुढे आले, त्यातले अनेक विषय सार्वजनिकरीत्या बोलण्यासारखे नव्हते. मुलगा गेला ते आयुष्यभर बोचणारं दुःख त्या आई-वडिलांना होतंच, शिवाय त्या तरुण असणाऱ्या सुनेला आयुष्यभर सांभाळायचं आणि त्यानंतर रमाकांतच्या मुलींना सांभाळायचं. आता या वयात स्वतःला सांभाळता येत नाही, तर यांना कसं सांभाळायचं, हा प्रश्न कायम होता.

प्रथमा आणि तिची सासू दोघीजणी जेव्हा रोजमजुरी करतात, तेव्हा त्यांची चूल पेटते. प्रथमा म्हणाल्या, ‘‘अनेक वेळा वाटतं, आपण माहेरी निघून जावं. कोणाही सोबत नव्याने संसार थाटावा; पण जेव्हा मी रमाकांतच्या आई-वडिलांकडे पाहते, माझ्या मुलींकडे पाहते, तेव्हा मी माझ्या सगळ्या स्वप्नांवर पांघरूण घालते. माझ्यासोबत, माझ्या कुटुंबीयांसोबत जे काही झालंय, तो एक नियतीचा फेरा होता. त्याला कदाचित तुम्ही विधिलिखित म्हणाल; पण आता यापुढे मी जे काही करणार आहे, ते मी माझ्या मनाने करणार आहे. माझ्या स्वार्थासाठी काहीतरी निर्णय घेऊन मी माझ्या कुटुंबावर अजून कधीही संकट आणणार नाही...’ प्रथमा हे सगळं काळजावर दगड ठेवून बोलत होत्या. रमाकांत, त्याचं प्रथमावर असलेलं प्रेम, त्याच्या मुलींवर असलेलं प्रेम, हे सांगून रमाकांतची आई आक्रोश करून रडत होती. प्रथमाच्या डोळ्यांत मात्र पाण्याचा एक थेंबही येत नव्हता. असं वाटत होतं की, रडून रडून तिच्या डोळ्यांतलं पाणी आटलं आहे. मुली आजीची समजूत काढत होत्या. पण आजी मात्र तिच्यामधल्या आईला रोखू शकत नव्हती.

प्रथमा ही आपल्या राज्यामधली एक अशी केस स्टडी आहे, जी तिशीच्या आतमध्ये विधवा झाली. प्रथमा यांसारख्या या वयात, कोरोनाच्या काळात, महाराष्ट्रात विधवा झालेल्या स्त्रियांची संख्या बावीस हजारांच्या वर आहे. तसा हा शासकीय आकडा; पण अजून नोंद नसलेला आकडा कदाचित एवढाच असेल. त्या सर्व स्त्रियांचं आयुष्य त्या मरण पावलेल्या माणसांच्या कुटुंबीयांभोवती फिरतं. म्हणजे कोरोनाकाळात बिचाऱ्या त्या विधवा महिलांचं आयुष्य कसायाच्या दावणीला बांधलेल्या गाईप्रमाणे झालं असेल. एकीकडे महागाईतून सरकारने गरिबाला मारलं, तर दुसरीकडे नियतीने चारी बाजूने पक्कं घेरलं. अशा अवस्थेमध्ये आपण कशासाठी जगायचं, हा प्रश्न त्या प्रत्येक विधवा माउलीला पडणं अगदी साहजिक आहे.

प्रथमा म्हणाल्या, ‘मी जेव्हा आरशासमोर जाते, तेव्हा माझंच मला न पाहू वाटणाऱ्या पांढऱ्या कपाळावर मी काळी टिकली लावते. ती टिकली लावल्यावर मी माझ्या हाताने माझ्यामलाच विधवापणाची मोहोर लावते असं वाटायला लागतं. आपलं आयुष्य किती निरर्थक आहे, जगून काहीही फायदा नाही, असे विचार जेव्हा मनात यायला लागतात, तेव्हा मी माझ्या मुलींना जवळ घेते, माझ्या सासूच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपते.’ आमच्या गप्पा सुरू असताना मुली आजोबांच्या मांडीवर येऊन कधी झोपल्या हे कळलंही नाही. श्रीकांतनी मला आवाज दिला. आम्हाला निघायचं होतं. सासवडमध्ये मला ज्या विकास गुरव नावाच्या मित्राला मला भेटायचं होतं, ती माझी भेट तशीच राहिली.

आम्ही निघालो, प्रथमा आणि तिच्या कुटुंबाकडे पाहून कोरोनाच्या काळामध्ये झालेली हानी आणि त्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेलं अनेकांचं आयुष्य याचा परिणाम समाजमनावर अनेक वर्षं राहील हे खरं होतं. माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे भावनिक गुंतवणूक. ती भावनिक गुंतवणूक प्रथमामध्ये रमाकांतनंतरही त्या कुटुंबाला घेऊन कायमस्वरूपी होती. प्रथमा रमाकांतची सगळी कर्तव्यं पार पाडत होती. अशा हजारो प्रथमा आज अनेक घरांमध्ये त्या कोरोनामध्ये मरण पावलेल्या माणसांच्या म्हाताऱ्या आई-वडिलांची काठी बनून आणि त्यांच्या मुलांचा आधारवड बनून कायम त्यांच्यामागे उभ्या आहेत. त्या सगळ्या प्रथमा दिव्यातल्या वातीप्रमाणे स्वतः जळून इतरांना उजेड देत आहेत. काही कोरोनाच्या बळी, तर काही नैसर्गिक कोपाच्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com