गिरवला अक्षरांचा महिमा..!

मी आणि माझे नागपूरच्या ‘सकाळ’मधील सहकारी प्रमोद काळबांडे शहरामधून फेरफटका मारत होतो. आपण नागपूर पाहणं आणि प्रमोद यांच्या नजरेतून नागपूर पाहणं, यांत खूप फरक आहे.
khushal dhak and usha katkar
khushal dhak and usha katkarsakal
Summary

मी आणि माझे नागपूरच्या ‘सकाळ’मधील सहकारी प्रमोद काळबांडे शहरामधून फेरफटका मारत होतो. आपण नागपूर पाहणं आणि प्रमोद यांच्या नजरेतून नागपूर पाहणं, यांत खूप फरक आहे.

मी आणि माझे नागपूरच्या ‘सकाळ’मधील सहकारी प्रमोद काळबांडे शहरामधून फेरफटका मारत होतो. आपण नागपूर पाहणं आणि प्रमोद यांच्या नजरेतून नागपूर पाहणं, यांत खूप फरक आहे. प्रवासात मी गाडीतून बाहेर पाहत होतो. जिकडे पाहावं तिकडच्या भिंतीवर, साहित्यावर शिक्षणाबाबत लिहिलेलं वाचायला मिळत होतं. मी प्रमोद यांना म्हणालो, ‘इथे हे काय नवीन... अनेक भिंतींवर अभ्यासक्रम पाहायला मिळतोय!’ प्रमोद म्हणाले, ‘एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तो इथल्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिकवतो. पलीकडच्या गल्लीमध्ये त्याने छोट्या छोट्या शाळा सुरू केल्या आहेत.’ मी प्रमोद यांना लगेच म्हणालो, ‘का?

महानगरपालिकेच्या शाळा नाहीत का?’ प्रमोद म्हणाले, ‘आता तुम्हाला काय सांगू...’ प्रमोद एकदम शांत बसले. ते का शांत बसले असावेत ते मला कळालं. मला त्या शाळा चालवणाऱ्या युवकास भेटायचं होतं, ती मुलंही पाहायची होती. मी प्रमोद यांना तशी विनंती केली, त्यांनीही होकार दिला. आम्ही रहाटेनगर टोली या वस्तीमध्ये शिरलो.

थोडं पुढे गेलो नि ती वस्ती खूप विद्रूप वाटायला लागली. पावलोपावली माणसं पत्त्यांचा डाव मांडून बसली होती. आमची गाडी पुढे जाऊच शकत नव्हती, अशी रस्त्यांची अवस्था होती. माझे सहकारी प्रमोद काळबांडे मला सांगत होते, ‘हा जो मांगगारुडी समाजवस्तीचा परिसर आहे, त्यामध्ये आजही मातृसत्ताक पद्धती आहे. म्हणजे काय, तर पुरुष घरामध्ये असतात, जमलं तर घरातली कामं करतात. स्त्रिया बाहेर असतात, बाहेरची कामं करतात. स्त्रियाच घर चालवण्यासाठी पैसे कमावतात.’

माझ्यासाठी ते सगळं आश्चर्यकारक होतं. प्रत्येक घराच्या समोर माणसं बसलेली होती. बायका कचरा वेचून डोक्यावरून आणलेलं भंगार घेऊन ते एकत्रित करण्यामध्ये मग्न होत्या. आम्ही एका छोट्याशा शाळेपाशी जाऊन थांबलो. प्रमोद यांनी आतमधल्या एका व्यक्तीला आवाज दिला. प्रमोद यांचा आवाज ऐकून ती व्यक्ती बाहेर आली. प्रमोदने त्या व्यक्तीची आणि माझी ओळख करून दिली. तो तोच तरुण होता, ज्याने तो शाळेचा उपक्रम तिथे सुरू केला होता. आतमध्ये त्या युवकाची पत्नी मुलांना शिकवत होती. तिची शिकवण कानावर पडत होती.

‘राज्यघटना म्हणजे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आहे. या ग्रंथामधली तत्त्वं, मूल्यं आचरणात आणली म्हणजे आपण खरे लोकशाहीवाले झालोच. आपण माणसासारखं जगलं पाहिजे...’ त्या महिलेचा प्रत्येक शब्द माझ्या कानाभोवती फिरत होता. एकीकडे आमचं बोलणं सुरू होतं आणि दुसरीकडे त्या मुलांना ती महिला काय शिकवते, याकडे माझं लक्ष लागलं होतं. ती महिलाही बाहेर आली. आमच्या तिच्याबरोबर गप्पा सुरू झाल्या. ते दोघे गेल्या सोळा वर्षांपासून त्या भागामध्ये जे काम करत होते, त्याचा एक इतिहास झाला होता. मराठी शाळा, इंग्रजी शाळा, शिवणक्लास केंद्र, कॉम्प्युटर सेंटर, संगीत केंद्र, एमपीएससी, यूपीएससी अभ्यासिकाही तिथे सुरू केली होती. आम्ही ज्या मांगगारुडी वस्तीमध्ये थांबलो होतो, ती वस्ती खरंतर चोरी, दरोडा, दारू, जुगार खेळणाऱ्यांची वस्ती म्हणून प्रसिद्ध होती.

आमच्याशी जो तरुण बोलत होता, तो खुशाल रामराव ढाक. (९९७०२३६००१) हा लहानपणापासून त्या वस्तीच्या काही अंतरावर राहायचा. कामानिमित्त, मित्रांच्या सोबतीने अनेक वेळा गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या रहाटेनगर टोली या भागात त्याचं जाणं-येणं व्हायचं. सतत पोलिसांचं येणं-जाणं, रोज तिथे असणारा आक्रोश, सतत असणारी रक्तरांगोळी, या वातावरणामुळे तरुणाई पूर्णपणे गुन्हेगारीकडे वळताना, तिथल्या मुलांना रस्त्यावर टोळी-टोळीने भीक मागताना खुशाल यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. हे चित्र बदललं पाहिजे, असं खुशालला वाटायचं. उच्चशिक्षण घेऊन खुशाल बँकेत नोकरीमध्ये लागला. चार पैसे हाती यायला लागले, त्या पैशांतून ग्रामीण भागातल्या मुलांसाठी किमान आपण काहीतरी सुरुवात केली पाहिजे, या भावनेतून तो मुलांना शिकवायला लागला.

सुरुवातीला खुशालला विरोध झाला, मारहाण झाली; पण तो थांबला नाही. तो मुलांना घेऊन बसायचा, त्या मुलांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करायचा. मग त्या मुलांनाही शिक्षणाचा लळा लागला. पहिल्यांदा त्याने त्या मुलांच्या पालकांचं समुपदेशन सुरू केलं. खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळू लागला. तेव्हा खुशालच्या लक्षात आलं की, या कामासाठी आता पूर्णवेळ द्यायला पाहिजे. पहिल्यांदा चार मुलांपासून सुरू झालेलं हे काम एकदा चारशे मुलांपर्यंत येऊन थांबलं. खुशालने बँकेतली नोकरी सोडली. रात्रीच्या वेळेला कुठेतरी छोटं-मोठं काम करायचं, ज्या माध्यमातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होईल, असं त्याने केलं. इथे काहीतरी चांगलं काम उभं राहत आहे, हे शहरामध्ये अनेकांना कळायला लागलं. चांगला विचार करणारी माणसं खुशालच्या पाठीमागे उभी राहिली. खुशालचं लग्न झाल्यावर त्याच्या पत्नी उषा काटकर यांनी खुशालचं काम अजून सोपं करत त्या कामाला प्रचंड हातभार लावला.

‘अनेक पालक म्हणत होते, ‘चोरी करायला आणि भीक मागायला जाणारा मुलगा तिथे तुझ्या शाळेत बसून ठेवून माझा काय फायदा होणार?’ ज्यांच्या गल्लीवरच ‘चोर आहेत’ असा शिक्का आहे, तिथल्या माणसांविषयीचा वेगळा शिक्का कोणता आहे, हे सांगायची गरज नाही. अशा अवस्थेत या मुलांना उभं करणं, त्यांची मानसिकता बनवणं, त्यांच्या पालकांची मानसिकता बनवणं, हे तेवढं सोपं नव्हतं; पण आम्ही त्यामध्ये उतरलो, आम्हाला प्रतिसाद मिळाला,’ खुशाल मला सारं काही सांगत होते.

उषा म्हणाल्या, ‘घरातला कर्ता पुरुष काहीच करत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्या घरातल्या बाईला आमच्या कामाकडे तिचं लक्ष वेधणं फार महत्त्वाचं होतं. त्या महिलांचं समुपदेशन करणं, कार्यशाळा घेणं, त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणं, त्यांच्यासाठी शिवणक्लाससारखे उपक्रम राबवणं, असं आम्ही सुरू केलं. यातून हळूहळू अनेकांच्या ओळखी वाढायला लागल्या. मग त्या ओळखीमधून ‘तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवा,’ असं आम्ही हळूच बोलू लागलो.’

उषा आणि खुशालची त्या मुलांबाबत खूप मोठी स्वप्नं आहेत. त्यांना प्रसिद्धी नकोय. त्यांना सन्मानाने मदत हवीय. त्यांना मुलांचं वसतिगृह बांधायचं आहे. त्यांना या मुलांसाठी मेस सुरू करायची आहे. या मुलांना उच्चशिक्षण द्यायचं आहे. या मुलांच्या अंगावर कपडे घालायचे आहेत. या मुलांना अधिकारी बनण्यासाठी आणि त्यांची मानसिकता शिक्षणाकडे वळवण्यासाठी खुशाल आणि उषाने गेल्या पंधरा वर्षांपासून जे काम सुरू केलेलं आहे, त्या कामाचा आता स्वतंत्र इतिहास झालाय. आम्ही संगीतशाळेमध्ये गेलो. तिथे ती मुलं उत्तम प्रकारे वाद्यं वाजवत होती. वाद्य काय, तर कुठल्यातरी माठावर, लाकडावर, पाटीवर, भांड्यांवर... त्यांच्या कलाकुसरीने कान अगदी तृप्त झाले होते. ज्यांच्याकडे सगळं काही असतं, त्यांना किंमत नसते आणि ज्यांच्याकडे काहीच नसतं, त्यांना शिकण्याची जिद्द असते, असं वातावरण त्या संगीतशाळेमधलं होतं. प्रत्येक मुलाच्या आई-वडिलांची वेगळी स्टोरी होती, तशी तिथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाची मानसिकतासुद्धा वेगळी होती, वेगळी हुशारी त्यांच्याकडे होती.

आम्ही रस्त्याने निघालो खरे, पण अगदी सुन्न होऊन त्या मुलांच्या विश्वामध्ये अजून तिथेच थांबून गेलो होतो. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. मी विचार करत होतो की, या वस्त्या महाराष्ट्रामध्ये खूप असतील. अशा असणाऱ्या अनेक भागांमध्ये अशी कोवळी मुलं राहतात. ज्या वयात पाटी आणि पुस्तक घेऊन लिहीत बसायचं, त्या काळामध्ये काहीजण कुठे भीक मागत आहेत, तर कुठे कुणाचा तरी खून करण्यासाठी हातामध्ये सुरा घेत आहेत. सगळीकडेच खुशाल आणि उषा यांच्यासारखा सेवाभावी विचार करणारी माणसं जन्माला येऊ शकणार नाहीत; पण जिथं जिथं अशी माणसं आहेत, तिथं तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांच्या कार्यासाठी हातभार लावला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com