व्यथा एका समाजाची...

मला औरंगाबादला जायचं होतं. आता या भागातील मुख्य असणारे रस्ते चांगले झाले आहेत; पण या रस्त्यांच्या जराही आजूबाजूला गेलं, की रस्त्याची तीच पहिल्यासारखी वाताहत पाहायला मिळते.
human
humansakal
Summary

मला औरंगाबादला जायचं होतं. आता या भागातील मुख्य असणारे रस्ते चांगले झाले आहेत; पण या रस्त्यांच्या जराही आजूबाजूला गेलं, की रस्त्याची तीच पहिल्यासारखी वाताहत पाहायला मिळते.

मला औरंगाबादला जायचं होतं. आता या भागातील मुख्य असणारे रस्ते चांगले झाले आहेत; पण या रस्त्यांच्या जराही आजूबाजूला गेलं, की रस्त्याची तीच पहिल्यासारखी वाताहत पाहायला मिळते. आमची पत्रकारांची ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ नावाची संघटना देशातील एकवीस राज्यांत आणि महाराष्ट्रातील तीनशेबावीस तालुक्यांत गेली. त्यामुळे फिरताना, या तालुक्यातून त्या तालुक्यात जाताना तिथले पदाधिकारी भेटायला येतात, प्रश्न मांडतात, चहापानाचा कार्यक्रम होतो आणि मग पुढे निघायचं, असा माझा प्रवास सुरू होता. मी कळमनुरीला पोहोचलो. कळमनुरीपासून अगदी जवळच माझं सांडस नावाचं आजोळ, त्यामुळे कळमनुरीचा सर्व भाग मला माहिती होता. कळमनुरीला माझं थांबण्याचं एक कारण होतं, कळमनुरीला गुजरीजवळ राहणारा नईम कुरेशी नावाचा माझा मित्र काही दिवसांपूर्वी आजाराने निवर्तला.

नईम माझ्याबरोबर स्टेशन उमरीला बारावीला असताना शिकायला होता. गंभीर आजाराचा इलाज न झाल्याने तो गेला. नईम बारावीला नापास झाला आणि घरीच राहिला. कळमनुरीत त्याने सायकल दुरुस्तीचं दुकान टाकलं होतं. नईमच्या आई-वडिलांना, कुटुंबाला भेटावं या हेतूने मी नईमच्या घरी पोहोचलो.

नईमची आई आणि बाबा दोघंही ऐंशी वय ओलांडलेले. नईम असताना मी अनेक वेळा नईमच्या घरी आलो होतो. मला पाहिल्यावर नईमचे आई-वडील रडायला लागले. मी त्यांची समजूत काढत होतो. मी त्यांच्या घरात बसलो. नईमची बायको मागच्या किचन रूममधून बोलत होती. नईमचा मुलगा सायकल घेऊन बाहेर पडला. त्याने सगळ्यांना मी आल्याचं सांगितलं. येणारा प्रत्येक जण येऊन माझी विचारपूस करत होता.

नईमला पाच बहिणी आणि चार भाऊ. सर्व जण छोटे-छोटे व्यवसाय करतात. चार बहिणींचं सासर गावात, म्हणजे कळमनुरीतच आहे. एक बहीण नांदेडला आहे. कळमनुरीमधल्या त्या चार बहिणींचे यजमानही छोटे-छोटे व्यवसाय करतात. म्हणजे कुणी फळं विकतो, कुणी भाजीपाला विकतो, तर कुणी बाजूच्या गावात जाऊन भंगार खरेदी करतो. दोघांचा परिवार नईमच्या वडिलांपासून ते छोट्या बहिणीपर्यंत सहासष्ट जणांचा झाला होता. काही बहिणींना तर सहा-सहा मुलं झाली होती. रोज दिवसभर कष्ट केले तर रात्री चूल पेटणार अशी अवस्था. नईमला पाच मुली. पाचही मुलींनी अजून शाळेचं तोंड पाहिलं नाही. घरात हिंदीमध्ये एक छापील सुविचार लिहिला होता. त्याचा अर्थ होता, ‘तुमचा उद्धार करायला कुणी येईल याची वाट पाहू नका, तुम्ही स्वतः उभं राहा आणि तुमचा सर्वांगीण विकास खेचून आणा.’ तो सुविचार त्या कुटुंबीयांसाठी लागू होत होता असं वाटत होतं. नईमचे वडील सलीम चाचा, नईमची आई रुबिना चाची यांच्याशी मी बोलत बसलो होतो. त्यांचं कुटुंब, परिस्थिती सर्व काही देवाच्या भरोशावर सुरू होती. नईमचे वडील सलीम चाचा मला बोलताना सांगत होते, ‘माझे आजोबा मूळचे हैदराबादचे. त्यांची बहीण लग्न करून कळमनुरीला आली, त्यांच्यासोबत तेही इथं आले. त्यांचा लाकडाचा छोटा व्यवसाय होता.’ मी त्यांना बोलताना मध्येच म्हणालो, ‘तुमच्या घरात कोणकोण किती शिकलं?’ ते लगेच म्हणाले, ‘तसा शिक्षणाचा आणि माझ्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. नईम शिक्षणाबाबत फार जिद्दी होता, तो त्याच्या मित्रामुळे.

एक तर आमच्यावर शिक्षणाचे संस्कार कधीही होत नाहीत आणि दुसरं, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून हिंदूंशी संबंधित कुणी आमच्यासोबत, आमच्या मुलांसोबत मैत्री करत नाही, आम्हाला मदत करीत नाही.’ आम्ही दोघे बोलत असताना नईमची आई म्हणाली, ‘शिक्षणाबाबत माझी सासूही जबाबदार आहे. तिने आमच्या मनावर सतत बिंबवलं होतं, आपली मुलं शिकून मोठी झाली की, ती आपल्याकडे परत येत नाहीत, ती धर्म विसरतात. सासूचा भाऊ शिकून तेलाच्या कंपनीत गेला होता, त्याने तिकडे लग्न केलं. आई-वडील वारले तरी अंत्यसंस्काराला आला नाही. म्हणून सासूने राग धरून कुणीच शिकायचं नाही असा जणू ‘फतवाच’ काढला.’

नईमचे वडील चाचीवर चिडून म्हणाले, ‘माझ्या आईने माझ्या मुलांना, नातवांना घरात बांधून थोडंच ठेवलं होतं? आपल्या पोरांची मानसिकता आणि कर्म तसं होतं, असंच म्हणावं लागेल.’ मी जिथे बसलो होतो, तिथल्या खिडकीमधून ती गल्ली कडेपर्यंत दिसत होती. दोन्ही बाजूचे नाले तुडुंब भरलेले होते. त्या नाल्यांवरून येणाऱ्या माश्या घरभर फिरत होत्या. शहर असूनही रस्ते नावाला होते. खांबाच्या तारा खाली लोंबकळत होत्या. सगळे जण कसं जगत असतील, असा प्रश्न मला पडला होता. नईमच्या सर्व बहिणी आल्या, त्यांनी माझी खुशाली विचारली, आमच्या गप्पा झाल्या. मी जसं जमेल तसं प्रत्येकाला, प्रत्येकीला विचारत होतो, ‘तुमच्याकडे कोण शिकलं आहे, शाळेत - कॉलेजमध्ये कोण जातं?’ त्यावर ‘नाही’ असंच उत्तर मिळत होतं. फार फार तर, ‘माझ्या लहान मुलाचं नाव शाळेत टाकलंय,’ असं उत्तर मिळायचं. तशी उद्याची चिंता कुणालाही नव्हती. आज कसं जगायचं हाच विचार प्रत्येक जण करत होता. बरं, हा प्रश्न नईमचे भाऊ-बहीण यांच्यापुरता मर्यादित नव्हता, तिथं येणाऱ्या प्रत्येकाची अवस्था तीच होती. त्या सर्वांची कामं, व्यवसाय, हा तर निव्वळ वेठबिगारीसारखा होता. त्या सर्वांचं मी एक पाहिलं होतं... सर्वांची इमानदारी, त्यांची कामावर असणारी श्रद्धा मला दिसत होती आणि तेच त्यांच्या जगण्याचं सामर्थ्य होतं. मला भेटायला येणाऱ्या त्या प्रत्येक ‘मुस्लिम मनाचा शोध’ घेण्याचं काम मी सुरू केलं होतं.

नईमचा भाऊ खलीलला मी विचारलं, ‘आजूबाजूच्या बाकी गल्ल्या तर एकदम छान आहेत, मग तुमच्या गल्लीची अशी वाईट अवस्था का आहे?’ खलील म्हणाला, ‘काही माहिती नाही.’ मी पुन्हा खलीलला म्हणालो, ‘‘तुमचा नगरसेवक कोण आहे?’’ खलीलने माहीत नसल्याची मान हलवली. खलीलचा दुसरा मित्र, जब्बार बोलायला हुशार होता, त्याने सगळ्या प्रश्नांची पटापट उत्तरं दिली. तिथे विकास का झाला नाही, हे त्याने सांगितलं.

जब्बार कळमनुरीच्या बसस्थानकात खारमुरे विकण्याचं काम करतो; तर खलील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या भागात असणारं नईमचं सायकल रिपेअरिंगचं दुकान चालवतो. आमच्या गप्पांमध्ये माहिती आणि गंभीर असे दोन्ही सूर होते. मग तिकडची मुलं, इकडची मुलं, तो ग्रुप, हा ग्रुप अशी चर्चा सुरू झाली. जातीवरून हिणवत दुजाभाव करणं, कामाच्या ठिकाणी त्रास देणं हे आता आमच्यासाठी नवं नाही असंही त्यांनं सांगितलं. मग खलीलही गप्पांमध्ये खुलला. आमच्या गप्पा नईमची आई खिडकीतून ऐकत होती. तिलाही रहावलं नाही. ती बाहेर आली, चाचाही काठीचा आधार घेऊन बाहेर आले. बाजूच्या मंदिरावर हरिपाठ सुरू झाला होता. त्या हरिपाठाच्या सुरात सूर घालून नईमची आई हरिपाठ म्हणत होती.

नामसंकीर्तन साधन पै सोपे ।

जळतील पापे जन्मांतरीची ।।

न लगती सायास जावे वनांतरा ।

सुखे येतो घरा नारायण ।।

मला आश्चर्य वाटलं. मी चाचीला म्हणालो, ‘‘रोज ऐकून ऐकून तुम्हाला हे पाठ झालं का?’ चाची म्हणाली, ‘नाही, नईमचे बाबा मृदंग वाजवायचे. पाटील गल्लीतल्या हनुमान मंदिरात त्यांना नेहमी मृदंग वाजवण्यासाठी बोलावलं जायचं. मीही अनेक वेळा त्यांच्यासोबत हरिपाठाला जायची. त्याला आता खूप वर्षं झाली. साधारणपणे वीस-बावीस वर्षं झाली. आमच्याकडे वर्षभरापूर्वी हिंदू-मुस्लिम दोन गटांत खूप भांडण झालं, तरीही नईमचे बाबा मंदिरात जात होते. ते मंदिरात जातात हे कुणी तरी मशिदीमध्ये जाऊन मौलवींना सांगितलं, तेव्हा मौलवींनी बोलावून नईमच्या बाबांना तंबी दिली. मुलं-मुली लग्नाच्या होत्या, छोटे-छोटे व्यवसाय करून आम्ही पोट भरणारे, कुठे कुणाच्या नादी लागायचं म्हणून नईमच्या बाबांनी मंदिरात जायचं सोडलं.’’

नईमचे वडील म्हणाले, ‘आजकालच्या मुलांना मृदंगाच्या अंतर्मुखातून आवाज काढता येत नाही. हा आवाज येण्यासाठी अगोदर स्वतःच्या अंतःकरणातून आवाज यावा लागतो.’ चाचांनी घरातला जुना मृदंग आणायला लावला आणि त्या हरिपाठाच्या तालावर मला वाजवून दाखवला. घरातले सगळे जण मृदंगाच्या तालावर टाळ्या वाजवत होते.

कोणी मागे नाही, कुणी सोबत नाही, दारिद्र्य सावलीसारखं मागे आहे... आपल्यावर कोण अन्याय करतं, कोण त्रास का देतं, याची कल्पना असतानासुद्धा या साऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कुणी हिरावून घेऊ शकत नव्हतं, हेही तेवढंच खरं होतं.

मी नईमच्या घरून निघालो. गाडीत बसल्यावर जेव्हा मी मुस्लिम समाजाच्या समस्यांबाबत गुगलमध्ये डोकं घातलं, तेव्हा माझं विचारचक्र अधिक गतीने फिरू लागलं. ही परिस्थिती एका नईमच्या घरची, गल्लीची, शहराची नाही; तर जिथे-जिथे मुस्लिम वस्त्या आहेत, तिथे असणाऱ्या जवळपास सर्व मुस्लिमांची अवस्था सारखीच आहे. आज भाजपची सत्ता आहे म्हणून मुस्लिमवर्ग मागास आहे असं अजिबात नाही, हे अनादिकाळापासून सुरू आहे, मग पक्ष कोणताही सत्तेमध्ये असो. मुस्लिम समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची शैक्षणिक उंची वाढण्यासाठी जितके जास्त प्रयत्न सरकार आणि विशेषतः सर्व समाजाकडून होतील, तितकं अधिक चांगलं. बरोबर ना...?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com