अश्रू आटलेल्या डोळ्यांसाठी!

राज्याचा दोन महिन्यांचा दौरा करून मी मुंबईत परतलो. मी कोपरखैरणेला आलो, तिथं असणाऱ्या काही मित्रांना मला भेटायचं होतं.
Sweet Home Old age home
Sweet Home Old age homesakal
Summary

राज्याचा दोन महिन्यांचा दौरा करून मी मुंबईत परतलो. मी कोपरखैरणेला आलो, तिथं असणाऱ्या काही मित्रांना मला भेटायचं होतं.

राज्याचा दोन महिन्यांचा दौरा करून मी मुंबईत परतलो. मी कोपरखैरणेला आलो, तिथं असणाऱ्या काही मित्रांना मला भेटायचं होतं. कोपरखैरणेला सेक्टर एकमधून जात असताना काही म्हातारी माणसं मला बाहेर रस्त्यावर खाली बसलेली दिसली. एका जागी एवढी म्हातारीकोतारी माणसं का बसली असतील, असा प्रश्न मला पडला होता. कोणी चिंतेत होतं, कोणी मनोरुग्ण असल्यासारखं आपले केस खाजवत होतं. काही जण शांतपणे सगळं पाहत होते. एक आजी तोंडाला पदर लावून रडत होती. काही जणांच्या चेहऱ्यावर कमालीची काळजी होती. तिथं काही तरी वाईट घडलं होतं यात शंका नव्हती. मी गाडीतून उतरलो आणि त्या रस्त्यावर जमलेल्या मंडळींच्या दिशेने चालायला लागलो. मी त्या सगळ्या माणसांच्या जवळ जाऊन एकाला विचारलं, ‘आजोबा, तुम्ही सगळे असे का बसला आहात? काय झालं? ती आजी का रडते?’ त्या आजोबांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, ‘आतमध्ये बघा, आम्ही जिथं राहत होतो, तिथलं पूर्ण छत कोसळलंय.’

मी पलीकडे नजर टाकली, तर छत कोसळलेलं दिसत होतं. आजूबाजूला काही माणसं आतमधलं सामान बाहेर काढत होती. एक आजी सगळ्यांना हातवारे करून सांगत होती, ‘मी रात्री म्हणाले होते ना, आपण हनुमान चालिसा म्हणून झोपू या, तर तुम्ही माझं ऐकलं नाही.’ दुसरे आजोबा एकाकडे हातवारे करून सांगत होते, ‘अरे मी या कुलकर्णीला सांगत होतो. घरात भुताचे पिक्चर लावू नकोस, त्याने माझं ऐकलं नाही.’ हे सगळं ऐकून दुसऱ्या एका आजोबांनी आपल्या डोक्यावर हात मारला. तेवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक आजोबा दुसऱ्या आजोबांना म्हणत होते, ‘मांडू का डाव, खेळायचे का पत्ते?’ ते दुसरे आजोबा खूप चिडले आणि म्हणाले, जिवानिशी वाचलास ना, बस शांत.’ माझ्या लक्षात आलं, की हा एक वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाचं छत कोसळलंय. तिथं अत्यंत वाईट आणि हलाखीची परिस्थिती होती.

तिथली परिस्थिती, ‘स्वीट होम’ ट्रस्टचे लावलेले फलक वाचण्यामध्ये मी दंग झालो होतो. तितक्यात सगळ्यांचा आवाज आला. ‘ताई आली, ताई आली.’ ताई आल्यावर तिथल्या मंडळींना अश्रू आवरेनात. त्या महिलेने सगळ्यांना सांगितलं, ‘शांत बसा, रडू नका. आता ते पडलं त्याला काय करायचं?’ कुणाला लागलंय का, कुणाला काही खरचटलं का, काही नुकसान झालं का, याची चौकशी ती महिला करत होती.

वरच्या मजल्यावर सामान हळूहळू शिफ्ट करणं सुरू झालं होतं. ती आलेली महिला बाहेर खुर्ची टाकून बसली. मी माझी ओळख सांगितली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव प्रतिभा दीपक मोरे-कारेकर (९८९२६८७३१३). प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आजोबा आणि आजीचा सामाजिक वारसा प्रतिभाताई पुढे नेत आहेत. प्रतिभा यांच्या आजी हिराबाई रायगड जिल्ह्यामधील हारवीट येथील सरपंच होत्या. त्यांचे आजोबा नामदेव कृष्णा मोरे हे त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते होते. गावात शाळा नसल्यामुळे ते गावातल्या पिंपळाच्या झाडाखाली शाळा भरवायचे. पुढे त्यांनी गावात शाळा उभारली. गावात पाणी मिळावं यासाठी पुढाकार घेतला. नामदेव यांच्या कामामुळे त्यांना अवघा जिल्हा ओळखू लागला. आजोबा आणि आजींच्या तालमीत त्या घडल्या. प्रतिभा यांची आई मंगला लहानपणीच वारली. प्रतिभा यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. प्रतिभा यांच्या आजोबांनी अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रम सुरू केले. आजोबांचं काम प्रतिभा यांच्या वडिलांनी पुढे चालवलं. आता ते काम प्रतिभाताई पुढे चालवत आहेत.

मोरे घराण्यातील प्रतिभाताईंची ही तिसरी पिढी सेवाभावी काम निष्ठा म्हणून करत आहे. टाकून दिलेली माणसं, जड झालेली माणसं, टाकून दिलेली मुलं, यांचं प्रमाण समाजात कमी झालेलं नाही; पण त्या तुलनेत लोकांची सामाजिक कार्यासाठी मदत करण्याची वृत्ती मात्र निश्चितच कमी झाली आहे. त्यातूनच अनेक सामाजिक उपक्रम, जे लोकांच्या मदतीने चालतात, त्यांचं पुढे काय करायचं हा प्रश्न अनेक ठिकाणी आ वासून उभा आहे. प्रतिभा यांच्या सेवाभावी कार्यासमोरही हा प्रश्न तसाच उभा आहे. या कार्यासाठी सरकारकडून काहीही मदत मिळत नाही आणि लोकांकडूनसुद्धा मिळत नाही. हल्ली गतिमानतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या गतिमानतेमध्ये माणसाचा संवाद तुटला आहे. निकामी असणारी माणसं कुणालाही घरात नको आहेत.

‘एकट्या नवी मुंबईमध्ये पंधरा-सोळा वृद्धाश्रम आहेत. या परिस्थितीच्या गतीला कोणीही थांबवू शकत नाही. त्या वृद्धांचं करायचं काय, जे पोलिसांकडून सातत्याने आपल्याकडे येतात. त्यांना नाही कसं म्हणायचं? ज्यांना कुणीच नाही, त्यांना वाऱ्यावर सोडायचं तरी कसं? असे एक-दोन नाही, तर अनेक प्रश्न उभे आहेत.’ प्रतिभाताई बोलत होत्या आणि मी शांतपणे ऐकत होतो. असं वाटत होतं, की आपण माणूस म्हणून जन्म घेतला हे खरं आहे; पण पुढे वयाच्या साठ-सत्तरनंतर कसं जगायचं हा प्रश्न जरी पुढे आला, तरी ती समोर असणारी माणसं पुढे येत होती आणि माझ्या अंगावर काटासुद्धा.

मी प्रतिभाताईंना म्हणालो, ‘‘इतकी हलाखीची परिस्थिती असताना तुम्ही हे सगळं कशासाठी चालवता? तुमच्याजवळ जे काही होतं ते विकून कशाला सारं करायचं?’ प्रतिभा म्हणाल्या, ‘या जागी माझे आई-बाबा असते, तर त्यांना मी वाऱ्यावर सोडलं असतं का? परिस्थिती कितीही वाईट असू दे, पण चार माणसं तुमच्यासोबत असतील, चार माणसं तुम्हाला आशीर्वाद देत असतील, तर लक्षात ठेवा, निसर्ग नेहमी तुमच्याबरोबर असतो. मला माहीत आहे, माझ्याकडं उद्या या सगळ्या माणसांना काय खायला घालायचं याची तजवीज नाही, तरीही मी आनंदाने त्यांना सांभाळत आहे. हे छप्पर बांधायला, मला कधी जमेल हे सांगता येत नाही. बऱ्याच दिवसांपासून मी ‘स्वीट होम’साठी जागा शोधतेय, पण मिळत नाही. माझ्याकडे जागा कमी पडते, म्हणून मी अनेक आजी-आजोबांच्या मुलांना विनंती केली, तुमच्या आई-वडिलांना काही दिवस घेऊन जा; पण ही मुलं माझा फोन उचलायलाही तयार नाहीत. कोणी परदेशात आहे, कोणी दुसऱ्या राज्यामध्ये आहे, कोणी मुंबईमध्ये आहे, या सगळ्यांना आपली बायको, मुलं हवी आहेत; पण आई-वडील नको आहेत.’

एका म्हाताऱ्या आजोबांकडे बोट दाखवत प्रतिभाताई म्हणाल्या, ‘हे गृहस्थ वाशीला अधिकारी होते. आपल्या दोन्ही पोरांना त्यांनी शिकवलं. दोन्ही मुलं दिल्लीमध्ये ‘सीए’ आहेत. सुना चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. त्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं, ‘हे दोन दिवसही वाचू शकणार नाहीत, त्यांच्या नातेवाइकाला बोलवा.’ त्या वेळी मुलांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यादिवशी त्यांनी माझा हात हातात घेऊन मला सांगितलं, ‘बेटा तू आणि तुझे यजमान तुम्ही दोघे माझी मुलं आहात. माझा अंत्यसंस्कार तुम्हीच करा.’ आपल्या मुलांनी आठ दिवसांतून एकदा तरी फोन करावा, एवढी माफक आणि छोटीशी आशा त्यांची असते; पण तेही मुलं करत नाहीत.’ प्रतिभाताई माझ्याशी हे सगळं बोलत असताना त्या वृद्ध गृहस्थांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. प्रतिभाताई त्यांची समजूत काढत होत्या.

अनिता शिंदे या एका आजीची ओळख मला प्रतिभाताईंनी करून दिली. त्यांच्याविषयी प्रतिभाताई मला सांगत होत्या, ‘या आजींना सात मुली आहेत; पण एकाही मुलीने त्यांना घरी नेलं नाही.’ मी आजींना म्हणालो, ‘तुमच्या मुली तुमच्यावर प्रेम करत नाहीत का? तुम्हाला विचारत नाहीत का?’ त्यावर आजी शांतपणे म्हणाल्या, ‘बाबा मुली आपल्या घरी आहेत तोपर्यंत आपल्या. जेव्हा त्या लग्न होऊन त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्यांचा कारभार त्यांच्या यजमानाच्या, सासू-सासऱ्यांच्या हातात असतो. मुलीची कितीही इच्छा असली की, आपल्या आईला आपल्यासोबत ठेवावं, तरी तसं तिच्या घरच्यांना वाटायला नको का?’ मी मध्येच म्हणालो, ‘सातही मुलींच्या घरचे तसेच आहेत का? त्यांना तुम्ही नकोशा आहात का?’ आजी पुन्हा शांतपणे म्हणाल्या, ‘जमानाच तसा आलाय बाबा. कुणालाही म्हातारं माणूस नकोय घरी.’

तिथं असणाऱ्या प्रत्येकाची एक वेगळी कथा होती. ज्या घरासाठी आयुष्यभर त्यांनी घाम गाळला, त्याच घरातून त्यांच्या मुलांनी लाथ मारून हाकलून दिलं. आता ते बोलत नाहीत, विचारत नाहीत, अशी अवस्था आहे. प्रतिभाताईंसारखं कुणी तरी सोबत येतं आणि आयुष्याचा एक एक दिवस असाच निघून जातो. आता अश्रू वाहून वाहून डोळे पार कोरडे पडलेत. आता कुणाचीच वाट पाहिली जात नाही. असं सगळं चित्र त्या वृद्धाश्रमामध्ये होतं. प्रतिभाताईंचे यजमान दीपक कारेकर, भाऊ विकास भरत मोरे आणि हितेश व हर्षवर्धन ही त्यांची दोन छोटी छोटी मुलं, प्रतिभाताईंच्या कामाला हातभार लावतात.

जिथं दोनवेळच्या जेवणासाठी आणीबाणी होती, तिथं छत बांधण्यासाठी कधी पुढाकार घेतला जाईल, असा प्रश्न माझ्या मनात घोळत होता; पण प्रतिभाताई कसली हार मानतात! त्यांनी कधीच हार मानायची नाही, असं बाळकडू आजीकडून घेतलं आहे. अशा प्रतिभाताईंना सगळ्यांची मदत मिळणं गरजेचं आहे. अशा प्रतिभा अनेक उभ्या राहिल्या, तर समाजातील असे टाकून दिलेले किंवा आधार गमावलेले लोक उभे राहतील.

मी प्रतिभाताईंचे आभार मानले. निघताना माझ्या मनात विचार येत होता, पोटच्या मुलांनी असं केलं तर थकलेल्या पायांनी विसावा घ्यायचा कुठं? एका ठिकाणी कुठं तरी एखादी प्रतिभाताई पुढं येईल; पण बाकी ठिकाणी काय? तुम्ही-आम्ही प्रतिभा होऊ आणि अनेक प्रतिभांचे हात मजबूत करू, बरोबर ना...!

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com