‘नंददीप’ चा प्रकाश...

मी नागपूरहून यवतमाळमध्ये आलो. चांगल्या रस्त्यामुळे आता यवतमाळची जुनी ओळख पुसली गेलीय. पाच वर्षांपूर्वी यवतमाळ एखाद्या तालुक्याप्रमाणे वाटायचं.
Nandini shinde and Sandip shinde
Nandini shinde and Sandip shindesakal
Summary

मी नागपूरहून यवतमाळमध्ये आलो. चांगल्या रस्त्यामुळे आता यवतमाळची जुनी ओळख पुसली गेलीय. पाच वर्षांपूर्वी यवतमाळ एखाद्या तालुक्याप्रमाणे वाटायचं.

मी नागपूरहून यवतमाळमध्ये आलो. चांगल्या रस्त्यामुळे आता यवतमाळची जुनी ओळख पुसली गेलीय. पाच वर्षांपूर्वी यवतमाळ एखाद्या तालुक्याप्रमाणे वाटायचं. यवतमाळमध्ये उन्हाच्या झळा जोरकसपणे जाणवत होत्या. मी यवतमाळ येथील ‘सकाळ’च्या ऑफिसमध्ये पोहोचलो. सूरज पाटील नावाचा माझा सहकारी आला.

आम्ही थोडे फिरायला बाहेर पडलो आणि मग ऑफिसकडे परत निघालो. बसस्थानकाच्या बाहेर झोपलेल्या माणसांचे केस कापण्याचं काम सुरू होतं. ज्यांचे केस कापून झाले, त्यांना गाडीत टाकलं जायचं. तेवढ्या उन्हात त्या साऱ्या माणसांची कसरत मी पाहत होतो. चार-चार माणसं एका माणसाला पकडून त्याचे कपडे बदलत होती. अंगावर कपडे नाहीत, खूप लांब केस वाढलेत, काखेत छोटं बाळ आहे, ते कुणाचं आहे माहिती नाही; पण ममतेने ते घट्ट उराशी धरलं आहे. कोणी ओरडतंय, कोणी किंचाळतंय, कोणी रडतंय, कोणी घाबरतंय... आमच्यासमोर तो सारा प्रकार सुरू होता.

कमी वेगात असलेली आमची गाडी मी थांबवली. मी सूरज पाटील यांना विचारलं, ‘ही धरपकड नेमकी कसली सुरू आहे?’ त्यावर सूरज म्हणाले, ‘आमच्या यवतमाळमध्ये संदीप शिंदे नावाचा एक युवक आणि त्याची पत्नी नंदिनी दोघेजण मिळून रस्त्यावर फिरणारे भिकारी, वेडे, निराधार यांच्या संगोपनाचं काम करतात, त्यांना आधार देतात.’ मी सूरज यांना म्हणालो, ‘अहो पण, ज्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांनी, समाजाने नाकारलं, त्यांना हे पती-पत्नी का आपलंसं करतात? त्यांना भीती वाटत नाही का, या वेड्या लोकांची?’ मी प्रश्नांचा भडिमार सूरज यांच्यावर केला. सूरज अगदी शांतपणे मला म्हणाले, ‘लोकांसाठी काहीतरी करायचं, ही आग जेव्हा मनातून लागते ना, तेव्हा एक इतिहास घडतो. तेच या दोघांच्या बाबतीत झालं.’ मला हेच उत्तर सूरज यांच्याकडून अपेक्षित होतं.

मी सूरज यांना म्हणालो, ‘चला, आपण या गाडीच्या मागे आपली गाडी घेऊ. हे लोक नेमकं कुठे जातात, काय करतात त्याचा मागोवा घेऊ.’ आम्ही त्या माणसं उचलणाऱ्या गाडीच्या मागे आमची गाडी घेतली. ते अनेक ठिकाणी जात होते, रस्त्यावर दिसणाऱ्या वेड्यांचे केस कापत होते, त्यांना नवीन कपडे घालत होते आणि गाडीत टाकत होते. शेवटी त्यांची गाडी भरली आणि ती निवाऱ्याकडे निघाली. त्या लोकांना आतमध्ये टाकणं सोपं होतं; पण बाहेर काढणं अवघड होतं. शेवटी त्या गाडीसोबत असणाऱ्या माणसांनी खिंड लढवली आणि त्यांना बाहेर काढलं. एका रूममध्ये ती सारी माणसं घातली. आम्ही आतमध्ये, थेट त्या ठेवलेल्या माणसांच्या रूममध्येच गेलो. जागेचा प्रचंड अभाव. जिथं दहा-बारा माणसं मोठ्या मुश्किलीने राहतील, तिथं चाळीस-पंचेचाळीस माणसं होती. जाताना मी सरळ आत गेलो आणि येताना नाक बांधून बाहेर आलो. तिथं अनेक वेडे होते... आणि अनेक अतिशहाणेपण !

संस्थेचं बारकाईने निरीक्षण करीत संदीप शिंदे यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांचाच शोध घेत होतो. संदीप एका व्यक्तीला अंघोळ घालत होते. संदीप यांच्या बाजूला असलेल्या दगडावर आम्ही बसलो. सूरज यांनी संदीपची ओळख करून दिली. आमचं बोलणं सुरू झालं. संदीप म्हणाले, ‘या आजोबांचं काम फार अवघड आहे. त्यांना अंघोळ घालण्यासाठी मीच पाहिजे असतो, नाहीतर ते कुणाला अंघोळ घालू देत नाहीत. खूप रडतात, हंगामा करतात.’ असं एक एक करत आमच्या गप्पा सुरू झाल्या. संदीप यांच्या पत्नी नंदिनीही आल्या. त्यांच्या गप्पांमधून खूप गोष्टी उमगल्या.

संदीप आणि त्यांच्या पत्नी नंदिनी यांनी हे अवघड काम कसं उभं केलं, त्यातून त्यांनी शेकडो जणांना बरं करून घरी पाठवलं होतं. कित्येकांचे ते दोघे पती-पत्नी आधारवड बनले आहेत. त्यांनी हाती घेतलेलं काम खूपच अवघड होतं; पण तरीही ते काम ते खूप आनंदाने करत होते.

मी ज्या संदीप शिंदे (९५५२२२५०८०) आणि नंदिनी राऊत-शिंदे यांच्याशी बोलत होतो, त्यांनी सात वर्षांपूर्वी नंददीप फाउंडेशनची स्थापना केली. संदीप यांचा लहान भाऊ रमेश शिंदे आजारामध्ये मरण पावला. भावाचं असं एकाकी जाणं संदीप यांच्या खूप जिव्हारी लागलं. संदीप एका केस कटिंगच्या दुकानात काम करायचे. भाऊ गेल्यापासून त्यांचं कोणत्याही कामात मन लागेना. सतत कोणाला तरी मदत केली पाहिजे, म्हणजे मरण पावलेल्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल, या भावनेतून ते काहीतरी करत राहिले. एक दिवस एका भिकाऱ्याच्या जखमेत पडलेले किडे काढत, संदीप यांनी त्या भिकाऱ्याला दवाखान्यात नेलं. तो जखमी कुठे राहील, अशी काळजी करत त्या व्यक्तीला त्यांनी घरी नेलं. असंच दोन-चार भिकारी, वेडे यांच्याही बाबतीत घडत गेलं. आता त्या भिकारी आणि वेड्यांचा संदीप यांना लळा लागला व हेच काम आपण यापुढे करायचं असं संदीप यांनी ठरवलं. त्यांच्या पत्नीनेही त्याला प्रतिसाद दिला. कालांतराने हे काम खूप वाढलं, मोठं झालं.

संदीप आणि नंदिनी यांच्या पुढाकारातून दोनशेहून अधिक रुग्ण परराज्यांत आपल्या घरी सुखरूप गेले. आपल्या राज्यातलाही आकडा मोठा होता. यवतमाळ येथे नंददीप फाउंडेशन, समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक १९ इथे हे काम चालतं. इथे येणाऱ्या व्यक्ती नवीन, अनोळखी आहेत किंवा ओळख पटूनही त्यांच्या नातेवाइकांनी न नेलेल्या व्यक्ती आहेत. तिथे असणाऱ्या प्रत्येक माणसाची कथा अजब आहे.

संदीप यांच्या आई लताबाई आणि वडील बाबाराव या दोघांचाही सुरुवातीला या कामासाठी विरोध होता; पण काम जेव्हा वाढलं, लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं, आपला मुलगा जगापेक्षा काहीतरी वेगळं करतोय, घराण्याचं नाव उज्ज्वल करतोय, हे जेव्हा संदीप यांच्या आई-बाबांच्या लक्षात आलं, तेव्हा आता तेही संदीप यांच्या कामाला हातभार लावत आहेत. आता गावाकडे कमी आणि संदीप यांच्याकडेच जास्त राहायला आई-बाबांना आवडतं. संदीपची मुलगी हर्षाली सध्या पाचवीमध्ये शिकते. तिला वाटतं की, आपणही आपल्या आई-वडिलांसारखी लोकांची सेवा केली पाहिजे.

सूरज आणि संदीप दोघेजण बोलत होते. मी बाजूला आलो, तिथे एक महिला धान्य साफ करत होती. मी तिला विचारलं, ‘‘तुम्ही इकडे किती वर्षांपासून आहात?’’ ती म्हणाली, ‘‘सहा वर्षांपासून.’’ ती कुठून आली, ती कशी बरी झाली आणि आता तिचे दिवस कसे जाताहेत... हा सगळा प्रवास तिने सांगितला. इगोवरून माणसाचं आयुष्य कसं नेस्तनाबूत होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती महिला होती.

संगीता जाधव असं त्या महिलेचं नाव, घरी गडगंज संपत्ती; पण अशा परिस्थितीमध्ये संगीताला ते उपभोगता आलं नाही. तिच्या डोक्यावर परिणाम झाला, ती असल्या परिस्थितीमध्ये घरातून बाहेर पडली. तिला वेडाचे झटके यायला लागले, तिची स्मृती भ्रष्ट झाली. काय करावं हे तिला सुचेना... ती कोण आहे, कुठून आली, हे सगळं ती विसरून गेली. संदीप यांनी तिला त्यांच्या घरी नेलं. संगीताची तब्येत ठीक झाली. ती कुठली आहे, ती कुठून आली, हे सगळं तिला आठवलं. पण जेव्हा संदीप यांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला, तेव्हा त्या नातेवाइकांनी तिला स्वीकारण्यासाठी नकार दिला. ‘ती वेडी आहे, तिला तिथंच राहू द्या,’ असा त्यांचा निरोप आला.

संगीता हे सारं काही आपले डोळे पुसत पुसत मला सांगत होती. आपले आई-वडील जेव्हा नसतात, तेव्हा जगातील सारी नाती संपलेली असतात. संगीतासारख्या अनेक महिला तिथं होत्या, ज्यांची स्टोरी एखाद्या चित्रपटासारखी होती. नंदिनी त्या संगीताचे डोळे पुसत होत्या.

नरेंद्र पवार नावाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, डॉ. श्रीकांत मेश्राम यांची ओळख करून देत मला संदीप यांनी सांगितलं, ‘‘यांच्यासारखी अनेक मंडळी नंददीपचं काम अजून मोठं व्हावं यासाठी अहोरात्र झटत आहेत.’ मी संदीप यांना म्हणालो, ‘या एकाच रूममध्ये इतकी सारी माणसं एकत्रितपणे ठेवणं हे काही चांगलं नाही. दुसऱ्या ठिकाणी जागा, किमान सगळ्यांचं दोन वेळेचं जेवण होईल इतकी पुंजी, याची तुम्ही व्यवस्था करा.’ संदीप हलकंसं हसत म्हणाले, ‘प्रयत्न तर सुरू आहेत. स्थानिक पातळीवरची इच्छाशक्ती आवश्यक आहे. उद्या काय खायचं असा प्रश्न इथे निर्माण होतो; पण संध्याकाळी कोणीतरी मदत देतो आणि त्यावरच हे सगळं चाललेलं असतं.’

मी विचार करत होतो. जवळ काहीही नसताना संदीप आणि नंदिनी यांनी हे नंदनवन कसं पिकवलं असेल? इथे कोणीही निराश, उदास नाही, या दुनियेने आम्हाला टाकून दिलं, याची काही काळजी नाही. अशा तोऱ्यात वावरणाऱ्या इथल्या प्रत्येक माणसाचा होरा काही औरच होता. आम्ही तिथून निघालो. मनात अनेक प्रश्न होते, पण ते प्रश्न विचारायचे कुणाला, हाही प्रश्नच होता. संदीप आणि नंदिनी या दोन संतरूपात असणाऱ्या व्यक्तींच्या कामाचा प्रकाश सर्व ठिकाणी एकदम लख्ख असा पडला आहे. आता तुम्हा-आम्हा सर्वांच्या मदतीने त्यांच्या कार्याला गती मिळण्याची तीव्रतेने गरज आहे. बरोबर ना..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com