ओळखा अंदाज उष्णतेचा!

वर्षभर कडक उन्हाळा जाणवला नाही, तरी वाढलेल्या कालावधीचा उन्हाळी ऋतू आणि योग्य हवामानाची परिस्थिती असल्यास उष्णतेच्या लाटेची वाढलेली शक्यता पाहायला मिळेल.
Summer
Summersakal
Summary

वर्षभर कडक उन्हाळा जाणवला नाही, तरी वाढलेल्या कालावधीचा उन्हाळी ऋतू आणि योग्य हवामानाची परिस्थिती असल्यास उष्णतेच्या लाटेची वाढलेली शक्यता पाहायला मिळेल.

- प्रा. संदीप पेटारे, sakal.avtaran@gmail.com

वर्षभर कडक उन्हाळा जाणवला नाही, तरी वाढलेल्या कालावधीचा उन्हाळी ऋतू आणि योग्य हवामानाची परिस्थिती असल्यास उष्णतेच्या लाटेची वाढलेली शक्यता पाहायला मिळेल. भविष्यात मुंबईमध्ये उन्हाळ्यातील कमाल तापमान हे राजस्थानसारखे ५० अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता जरी नसली, तरी राज्यातील इतर भागांत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही आपण उष्णतेला पुरेसे गांभीर्याने घेत नाही...

भारतीय हवामान विभाग आपल्याला हवामानाच्या अंदाजाबाबत अवगत करते. हा अंदाज अधिकाधिक अचूक असावा यासाठी विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. सध्याचा अंदाज नव्याने विकसित केलेल्या मल्टी मॉडेल इंसेम्बल तंत्रज्ञानावर आधारित आहे. मल्टी मॉडेल इंसेम्बल प्रणाली विविध जागतिक हवामान अंदाज संशोधन केंद्र तथा मान्सून मिशन अंदाज प्रणालीच्या निष्कर्षांचा अचूक अंदाज वर्तविण्याकरिता उपयोग करते. भारतीय हवामान विभागाने चालू उष्ण हंगामाकरिता मार्च ते मे २०२३ मधील देशभरातील हंगामी आणि मासिक तापमानाचा अंदाज तयार केला आहे. उष्णतेची लाट असामान्यपणे उच्च तापमानाचा विशिष्ट कालावधी असतो, जो उष्ण हवामानाच्या हंगामात उद्‌भवणाऱ्या सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त असतो.

जागतिक तापमान वाढ, वातावरण बदलांसारख्या अनेक समस्यांसह सतत वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या लहरी, उकाडा भारतीयांच्या आरोग्यासाठी मोठे आवाहन ठरत आहे. भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या चेतावणीनुसार मार्च ते मे महिन्यांत ईशान्य भारत, पूर्व व मध्य भारत आणि उत्तर, पश्चिमी भारतात कमाल तापमान सामान्यापेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. उष्णतेच्या लाटेची स्थिती सामान्य हवामान मूल्याच्या संदर्भात विशिष्ट ठिकाणी कमाल तापमानात ४.५ ते ६.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ दर्शविते; तर ६.४ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमाल तापमानात वाढ झाल्यास तीव्र स्वरूपाच्या उष्णतेच्या लहरींचा प्रत्यय येतो.

राष्ट्रीय हवामान कार्यालयाने १९०१ पासूनचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी अनुभवल्यानंतर पुढील महिन्यात तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या विक्रमी उष्णतेच्या लाटेची पुनरावृत्ती होईल, ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि काही तासांसाठी ब्लॅकआऊट सुरू होईल, अशी चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. ५० अंश सेल्सिअस (१२२ फॅरेनहाइट) इतकं उच्च तापमान कोणत्याही परिस्थितीत असह्य असले, तरी भारताच्या १.४ अब्ज लोकसंख्येपैकी जे गच्च भरलेल्या शहरांमध्ये अडकले आहेत किंवा ज्यांची घरे हवेशीर नाहीत, त्यांच्यासाठी हा धोका अधिक तीव्र स्वरूपाचा असेल.

राज्याचा विचार केला, तर २०१४ मध्ये नवी दिल्लीतील ‘टेरी’ या संस्थेने ‘यूके मेटऑफिस’च्या मदतीने शासनासाठी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार येणाऱ्या दशकात अमरावती आणि औरंगाबाद विभागातील तापमान हे सर्वात जास्त वाढेल. या भागातील वार्षिक सरासरी तापमान २०७० पर्यंत १९७० ते २००० च्या तुलनेत ३ ते ३.५ अंश सेल्सिअस इतके वाढू शकते. नागपूर विभागात ३.२ अंश इतके आणि पुण्यासह कोकणात २.७ अंशपर्यंत ते वाढू शकते. अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘आयपीसीसी’च्या अहवालानुसार मुंबईमध्ये शतकाच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरी तापमान हे ४.६ अंश इतके वाढू शकते.

जागतिक तापमानवाढ आणि हवामानात होणारे बदल हे मानवनिर्मित कारणांमुळे होत आहेत, याबद्दल कोणतीही शंका नाही. येणाऱ्या दशकांमध्ये भारतासह राज्यातील तापमानात अजून वाढ होणे हे अटळ आहे. वर्षभर कडक उन्हाळा जाणवला नाही, तरी वाढलेल्या कालावधीचा उन्हाळी ऋतू आणि योग्य हवामानाची परिस्थिती असल्यास उष्णतेच्या लाटेची वाढलेली शक्यता पाहायला मिळेल. भविष्यात मुंबईमध्ये उन्हाळ्यातील कमाल तापमान हे राजस्थानसारखे ५० अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता जरी नसली, तरी राज्यातील इतर भागांत (चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला) तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे ही शक्यता नाकारता येत नाही.

उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे मजूर, वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, स्थूल लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, मधुमेह, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे, निराश्रित, बेघर, कारखान्यात काम करणारे कामगार, घट्ट कपडे परिधान करणारे, हॉटेलातील स्वयंपाकी अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संपर्क येणाऱ्या लोकांना उष्माघात होण्याची जोखीम अधिक असते. भारतीय समाजावर उष्णतेच्या लाटांचा व्यापक परिणाम होतो. उष्णतेच्या लाटांच्या विस्तारित कालावधीमुळे मोठ्या प्रदेशातील माती लक्षणीयरीत्या कोरडी होऊन जमिनीची गुणवत्ता घसरते.

शिवाय मान्सूनच्या आगमनावरही याचा स्पष्ट परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण कृषी व्यवस्था प्रभावित होते. कोरड्या जमिनीवर पाऊस झाल्याने पाणी जमिनीत नीट शोषल्या जात नाही, परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता अधिक असते. वाढलेल्या उष्णतेमुळे कृषी आणि बांधकाम, खाणकाम क्षेत्रातील मजुरांना उष्णतेमुळे आपले काम सोडणे, थांबवणे परवडत नाही वा थंडावा निर्माण करणाऱ्या वस्तू खरेदी करणेही परवडत नाही. अशा काही क्षेत्रातील ८०% मजूर या लाटेत पूर्णपणे असुरक्षित असतात. त्यामुळे मजुरांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निदर्शनात आले आहे. अशा समुदायांवर उष्माघातासारखे आघात होऊ शकतात.

परिणामी संपूर्ण अर्थव्यस्था कोलमडण्याची शक्यता असते. चक्कर येणे, सुस्त वाटणे, थकवा वाटणे, मळमळ होणे, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे ही काही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. भारतात २००० ते २००४ आणि २०१७ ते २०२१ या कालावधीत अतिउष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ५५% वाढ झाली आहे, असे वैद्यकीय जर्नल, द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात आढळून आले आहे. उष्णतेच्या संपर्कामुळे २०२१ मध्ये भारतीयांमध्ये १६७.२ अब्ज संभाव्य कामगार तासांचे नुकसान झाले, परिणामी देशाच्या सकल उत्पन्नाच्या ५.४% च्या समतुल्य उत्पन्नाचे नुकसान झाले.

हे सर्व टाळण्याकरिता धोरणात्मक स्तरावर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सोबतच शहरी नियोजन मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे अंमलात आणणे, इमारतीच्या रचनेमध्ये हिरवळीसाठी जागा राखीव ठेवणे, सावली आणि खेळत्या हवेसाठी नियोजन करणे, इमारतीच्या बांधकामात सिमेंटच्या विटांऐवजी मातीच्या विटांना प्राधान्य देणे, इमारतींच्या सुशोभीकरणाकरिता वापरल्या जाणाऱ्या रंगांची उचित निवड करणे, उपयोगात आणल्या जाणाऱ्या काचांच्या तावदानांना बगल देणे गरजेचे आहे. सोबतच वृक्षलागवड आणि संवर्धन सर्वात महत्त्वाचे...

(लेखक वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com