पुरुषप्रधान खेळांत पॉवर महिलांची

पुरुषप्रधान खेळांत पॉवर महिलांची

जगातल्या अनेक व्यावसायिक लीगचा आदर्श असलेल्या एनबीए अर्थात् अमेरिकेतल्या बास्केटबॉल लीगमध्ये बेकी हॅमन या ‘लीगमधल्या पहिल्या महिला मार्गदर्शक’ ठरल्या आणि जागतिक क्रीडाक्षेत्रात मोठी क्रांती घडली. आत्तापर्यंत कोणत्याही पुरुषसंघाचे मार्गदर्शक हे पुरुषच असायचे; पण हे चित्र आता बदलू लागलं आहे. महिलाही खांद्याला खादा लावून आपली पॉवर दाखवत आहेत आणि बेकी हॅमन या त्यासंदर्भात आदर्श ठरल्या आहेत.

पुरुष संघासाठी तर सोडाच; पण महिला संघासाठीही महिलांची नियुक्ती होण्याचं प्रमाण अमेरिकेतही तसं कमीच आहे. एका अभ्यासानुसार, अमेरिकेतल्या महिला फुटबॉल संघांच्या मार्गदर्शकांत महिलांचं प्रमाण वीस टक्के आहे. या परिस्थितीत पुरुष संघांसाठी महिला-मार्गदर्शकांची नियुक्तीच आश्र्चर्यकारक आहे. सध्या काही संघांबरोबर सहाय्यक मार्गदर्शक म्हणून महिला असतातही. आयर्लंडमधील कॉक फुटबॉल क्‍लबनं लीसा फॉलन यांच्याकडे सूत्रं सोपवली आहेत. त्यापूर्वी त्या बारा वर्षं सहाय्यक मार्गदर्शक होत्या.

सुरुवातीला विरोध; पण नंतर तयारी
युरोपातल्या दुय्यम लीगमध्ये महिलांकडे संघाची सूत्रं सोपवली जातात; पण काहीशा पारंपरिक असलेल्या इजिप्तमध्ये ही नियुक्ती काहीशी धक्कादायक होती. फैझा हैदर यांच्याकडे इजिप्तमधल्या क्‍लबनं ही जबाबदारी सोपवल्यावर तो विषय साहजिकच चर्चेचा झाला. पाच वर्षांपासून त्या मुलांबरोबर फुटबॉल खेळत होत्या. वय वाढू लागल्यावर घरच्या विरोधामुळे स्पर्धात्मक फुटबॉल त्यांना दुरावत गेलं; पण एकदा भावाला सरावासाठी घेऊन जाताना, त्यांनी फुटबॉलला मारलेली किक पाहून, ‘काहीही झालं तरी फुटबॉल सोडू नका,’ असा सल्ला कोचनं त्यांना दिला. अखेर काही महिन्यांत महिला संघाकडून फुटबॉल खेळची परवानगी त्यांना मिळाली.

पंच आहे; महिला म्हणून पाहू नका!
न्यूझीलंडच्या कॅथी क्रॉस या पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांसाठी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला पंच. आयसीसीच्या पंच समितीत स्थान मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत. ‘आंतरराष्ट्रीय पंच समितीतल्या महिला पंचांची संख्या वाढेल,’ अशी अपेक्षा त्यांनी निवृत्त होताना व्यक्त केली होती; पण तसं काही घडलं नाही.  ‘‘मला पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम करताना कुठलीच समस्या नव्हती; पण या सर्व पुरुषांत मीच एकटी महिला आहे,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

जी. एस. लक्ष्मी
भारताच्या जी. एस. लक्ष्मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलमधल्या पहिल्या महिला. ठरल्या.
नायजेरिया आणि ओमान यांच्यातल्या सामन्याच्या वेळी त्यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
पुरुषांच्या विश्वकरंडक क्रिकेट लीग दोनमधल्या स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली.
मे महिन्यात आयसीसी सामनाधिकाऱ्यांत निवड झाली होती. त्यात समावेश करण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला.

स्टेफानी यांची ऐतिहासिक किक
ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं कारकीर्दीतला ७५० वा गोल ज्या सामन्यात केला, ती लढत किक-ऑफपूर्वीच ऐतिहासिक झाली होती. युव्हेंटिस आणि डायनामो किएव यांच्यातल्या या चॅम्पियन्स लीग लढतीच्या वेळी स्टेफानी फ्रॅपार्ट यांची रेफ्री म्हणून नियुक्ती झाली होती. चॅम्पियन्स लीग लढतीत नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला रेफ्री ठरल्या. त्यापूर्वी त्यांची लीग वन, युरोपा लीग, त्याचबरोबर यूएफा सुपर कप अंतिम सामन्यासाठीही नियुक्ती झाली होती. ‘‘स्टेफानी यांच्या नियुक्तीमुळे चॅम्पियन्स लीगमध्ये नवा टप्पा गाठला गेला. त्या सक्षम रेफ्री आहेत आणि ते जास्त महत्त्वाचं आहे,’’ असं मत युव्हेंटिसचे पदाधिकारी फॅबिओ पॅरितिसी यांनी यासंदर्भात व्यक्त केलं. विश्वकरंडक महिला अंतिम सामन्यातल्या नियुक्तीनंतर त्यांनी रेफ्री म्हणून कारकीर्दीत शिखर गाठलं असंच मानलं जात होतं; पण त्यांनी नव्यानं प्रवास सुरू केला.

महिला-मार्गदर्शकांचं यश
अँडी मरे यानं आपल्या टेनिस-कारकीर्दीला चालना देण्यासाठी एमेली मॉरेस्मो (माजी महिला टेनिसपटू) यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर मरे यानं दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत अंतिम फेरी गाठली हेही नसे थोडके.

जॅकलिन विल्यम्स टीव्ही पंच
    वेस्ट इंडीजच्या जॅकलिन विल्यम्स या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नियुक्त झालेल्या पहिल्या दूरचित्रवाणी पंच.
    जमैकाच्या विल्यम्स यांची वेस्ट इंडीज आणि आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी नियुक्ती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com