स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ कसे विसरता?

Cricket
Cricket

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यापासून इंग्लंडमधील अनेक माजी कसोटीपटू खेळपट्टीवर टीका करत आहेत. यात मायकेल वॉन आघाडीवर आहे; पण त्यालाच आपल्या मायभूमीत खेळलेल्या आणि दोन दिवसांत संपलेल्या कसोटीचा विसर पडला. त्या वेळी इंग्लंडनं वेस्ट इंडीजला दोन दिवसांत ‘लीडस्’ला पराजित केल्यानंतर ब्रिटनमधील माध्यमांनी फुटबॉलऐवजी क्रिकेटच्या यशाला महत्त्व दिलं. त्या वेळी कोणत्याही प्रकारे खेळपट्टीवर टीका केली गेली नाही. ‘अविश्वसनीय’, ‘इंग्लंड इन वंडरलँड’, ‘इंग्लंड इन मॅडकॅप व्हिक्टरी’ अशी शीर्षकं देण्यात आली होती, तर दुसरीकडे  क्रिकेटतज्ज्ञांनी वेस्ट इंडीजच्या कणाहीन फलंदाजीस लक्ष्य केलं होतं. त्या वेळी, खेळपट्टीचा काहीच दोष नव्हता, असं चित्र निर्माण करण्यात आलं.

‘हेडिंग्ले येथील या कसोटीत वेस्ट इंडीजनं पहिल्या डावात १७२ धावा केल्यावर इंग्लंडला २७२ धावाच करता आल्या, त्याही वेस्ट इंडीजच्या क्षेत्ररक्षकांची मेहेरनजर झाल्यामुळे,’ असं क्रिकेटविश्लेषक टोनी कोझिएर यांनी म्हटलं आहे; पण खेळपट्टीचं काय? ‘बीबीसी’नं या कसोटीचं वर्णन करताना खेळपट्टीबाबत ‘कॅप्रिशिअस सरफेस’ ही टर्म वापरली आहे, म्हणजेच थोडक्यात ‘लहरी खेळपट्टी’! या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना विंडीज कर्णधार जिमी ॲडम्सनं ‘या खेळपट्टीवर प्रत्येक डावागणीक फलंदाजी करणं अवघड जाईल,’ असं सांगितलं होतं. पहिल्या दिवशी पंधरा फलंदाज बाद झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्लंडची अवस्था सहा बाद १२४ झाली होती; पण सोडलेले झेल, खराब मैदानी क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडची धावसंख्या वाढली. त्यानंतर ढगाळलेल्या वातावरणात विंडीज फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांचा डाव ६१ धावांत संपला. त्याच मालिकेतील एका कसोटीत विंडीजचा डाव ५४ धावांत संपल्यानं लहरी खेळपट्टी, चेंडूचा स्विंग, एका दिवसात गेलेल्या पंधरा विकेट हे सर्व जणू इंग्लंडच्या पथ्यावर पडलं होतं.

दोन दिवसांत संपलेल्या कसोटी
प्रतिस्पर्धी               विजेता    ठिकाण    तारीख

इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    ऑस्ट्रेलिया    ओव्हल    २८ ऑगस्ट १८८२
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    ऑस्ट्रेलिया    लॉर्डस्    १६ जुलै १८८८
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    इंग्लंड    ओव्हल    १३ ऑगस्ट १८८८
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    इंग्लंड    मँचेस्टर    ३० ऑगस्ट १८८८
द. आफ्रिका वि. इंग्लंड    इंग्लंड    पोर्ट एलिझाबेथ    १२ मार्च १८८९
द. आफ्रिका वि. इंग्लंड    इंग्लंड    केपटाऊन    २५ मार्च १८८९
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    इंग्लंड    ओव्हल    ११ ऑगस्ट १८९०
द. आफ्रिका वि. इंग्लंड    इंग्लंड    पोर्ट एलिझाबेथ    १३ फेब्रुवारी १८९६
द. आफ्रिका वि. इंग्लंड    इंग्लंड    केपटाऊन    २१ मार्च १८९६
ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका    ऑस्ट्रेलिया    मँचेस्टर    २७ मे १९१२
इंग्लंड वि. द. आफ्रिका    इंग्लंड    ओव्हल    १२ ऑगस्ट १९१२
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया    ऑस्ट्रेलिया    नॉटिंगहॅम    २८ मे १९२१
ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज    ऑस्ट्रेलिया    मेलबर्न    १३ फेब्रुवारी १९३१
द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया    ऑस्ट्रेलिया    जोहान्सबर्ग    १५ फेब्रुवारी १९३६
न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया    ऑस्ट्रेलिया    वेलिंग्टन    २९ मार्च १९४६
इंग्लंड वि. वेस्ट इंडीज    इंग्लंड    लीड्स    १७ ऑगस्ट २०००
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान    ऑस्ट्रेलिया    शारजा    ११ ऑक्टोबर २००२
द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे    द. आफ्रिका    केप टाऊन    ४ मार्च २००५
झिम्बाब्वे वि. न्यूझीलंड    न्यूझीलंड    हरारे    ७ ऑगस्ट २००५
द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे    द. आफ्रिका    पोर्ट एलिझाबेथ    २६ डिसेंबर २०१७
भारत वि. अफगाणिस्तान    भारत    बंगळूर    १४ जून २०१८
भारत वि. इंग्लंड        भारत    अहमदाबाद    २४ फेब्रुवारी २०२१

न दिलेल्या फॉलोऑनची कहाणी
अहमदाबाद कसोटीची चर्चा सुरू होते त्या वेळी सन १९९९ ची भारत-न्यूझीलंड कसोटी विसरता येणार नाही. यापूर्वीच्या चारपैकी तीन कसोटींत गोलंदाजांनी वर्चस्व राखल्यानं खेळपट्टीवर टीका झाली होती. त्यात एकदा खेळपट्टीला ‘अत्यंत खराब’ असा शेरा मारण्यात आला होता. त्यानंतर ता. २९ डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यानची कसोटी न दिलेल्या फॉलोऑननं कायम चर्चेत राहिली. भारतानं पहिल्या डावात २७५ धावांची आघाडी घेतल्यावर फॉलोऑन देणं टाळलं. त्या वेळी १४१.४ षटकं गोलंदाजी केल्यावर गोलंदाजांना पुन्हा न थकवण्याचा निर्णय झाला; पण काही महिन्यांनंतर भारतात जेव्हा निकालनिश्चितीचं वादळ घोंघावायला सुरुवात झाली, त्या वेळी ‘फॉलोऑन न देण्याचा निर्णय कपिलदेवनं घेतला, असं मंडळाचे तत्कालीन सचिव जयवंत लेले यांनी आपल्याला सांगितलं,’ असा दावा मनोज प्रभाकरनं केला. त्यातच या स्टेडियमवरील विद्युत्-व्यवस्था कपिलच्या कंपनीनं केल्याचं जाहीर झाल्यामुळे हे प्रकरण वाढलं होतं. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे याची चौकशी सोपवण्यात आली. भारतीय मंडळानं माधवन समितीकडे हे प्रकरण सोपवलं. ‘हा निर्णय सांघिक होता. गोलंदाजांबरोबर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता,’ ही सचिन तेंडुलकरनं माधवन यांच्याकडे दिलेली साक्ष निर्णयक ठरली होती. ‘अहमदाबादचा उकाडा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता,’ असंही सांगण्यात आलं होतं. माधवन यांनी ‘क्रिकेटमधील अनिश्चितता स्वीकारायला हवी,’ असं सांगत कपिलला निर्दोष ठरवलं. सीबीआयनं कपिलला दोषमुक्त केलं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com