सलामीसाठी विराटसमोर रवी शास्त्रींचा 'आदर्श'

Rohit-and-Virat
Rohit-and-Virat

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विराट कोहलीनं सलामीला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यानं विश्वकरंडक ट्वेंटी-२० स्पर्धेतही सलामीला खेळण्याचा आपला विचार जाहीर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मानं ‘असा काही निर्णय झालेला नाही,’ असं सांगितलं. काही तासांत विराटनंही घूमजाव करत  ‘अद्याप निर्णय झालेला नाही,’ अशी टिप्पणी केली. मात्र, खरं सांगायचं तर विराटसाठी मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला येणं काही नवीन नाही. विराट चार सामन्यांत सलामीला आला. अहमदाबादला टी-२० मध्ये डावाची सुरुवात करण्यापूर्वी विराट सलामीला सात वेळा खेळला आहे. २०१७ च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांत त्यानं डावाची सुरुवात केली होती. २०१८ च्या आयर्लंडदौऱ्यातही त्यानं स्वतःला सलामीला खेळवलं होतं. एवढंच कशाला, नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्येही त्यानं स्वतःला हे स्थान दिलं होतं.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील १९९२ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडनं मार्क ग्रेटबॅचला पिंच हिटर म्हणून पाठवलंं. त्यानंतरच्या भारतीय उपखंडातील स्पर्धेत श्रीलंकेनं सनथ जयसूर्या-रोमेश कालुवितरणा यांना स्फोटक सुरुवात करून देण्यासाठी पाठवलं. हे काही अपवाद सोडले तर संघातील सर्वोत्तम फलंदाजाला सर्वाधिक षटकं खेळण्याची जास्तीत जास्त संधी असावी हाच त्यामागचा विचार होता. मधल्या फळीतील यशस्वी फलंदाजांना सलामीला पाठवण्यामागं हा विचार होता. सुनील गावसकरसह कुणीतरी हवं म्हणून ज्या प्रकारे मधल्या फळीतील फलंदाजांना सलामीला पाठवलं जात असे, तसं काही इथं घडलेलं नाही. मर्यादित षटकांच्या, विशेषतः एकदिवसीय सामन्यातील आकडेवारीवर नजर टाकली तर हा प्रयोग सचिन तेंडुलकर, मार्क वॉ, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांसारख्या अनेकांच्या बाबतीत यशस्वी ठरला आहे.

शास्त्री यांचा आदर्श?  
विराटनं स्वतःच्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत प्रयोग करताना मार्गदर्शक रवी शास्त्री यांचाच आदर्श ठेवायला हवा. त्यांनी संघातील सर्व क्रमांकांवर फलंदाजी केलेली आहे. अपवाद केवळ अकराव्या क्रमांकाचा. फिरकी गोलंदाज म्हणून संघात आलेल्या शास्त्री यांनी हे केलं आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय स्पर्धेत शास्त्री ‘चॅंपियन ऑफ चॅंपियन्स’ झाले, त्या वेळी ते सलामीला खेळले होते. हो, तीच ती, ऑडी मिळालेली स्पर्धा! आता विराट हाच प्रयोग ट्वेंटी-२० स्पर्धेबाबत करू पाहत आहे एवढंच...

मधल्या फळीतील यशस्वी सलामीवीर सचिन
सचिन तेंडुलकर : सलामीला येऊन पंधरा हजार धावा केलेला सचिन तेंडुलकर कारकीर्दीतील सुरुवातीची साडेचार वर्षं ४ ते ७ या क्रमांकांवर खेळत असे. नव्वदच्या दशकात सलामीसाठी रवी शास्त्री, नवज्योतसिंग सिद्धू, कृष्णम्माचारी श्रीकांत हे पर्याय असतानाही सचिनला सलामीला पाठवण्याचं ठरवण्यात आलं होतं.

सनथ जयसूर्या : सुरुवातीला प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून संघात. मधल्या फळीत खेळताना ४५ सामन्यांत १४.०८ ची सरासरी. सुरुवातीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग अपयशी ठरल्यावर पुन्हा मधल्या फळीत.
ख्रिस गेल : सलामीला येऊन दहा हजार धावा केलेल्या विरळा फलंदाजांत स्थान. सुरुवातीच्या १८  डावांत दोन ते सात क्रमांकावर फलंदाजी. पहिल्या सहा डावांत मिळून ३६ धावा.

तिलकरत्ने दिलशान : दहा वर्षं मधल्या फळीत किंवा खालच्या क्रमांकावर खेळल्यावर सलामीला खेळवण्याचा प्रयोग. ‘कमी तिथं दिलशान’ हे घडत असताना त्यानं केवळ एक शतक केलं होतं. २००९ मध्ये त्याला सलामीला खेळवण्याचं ठरलं. त्यानं त्या वर्षी चार शतकं केली. त्या वर्षीच्या विश्वकरंडक ट्वेंटी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावाही त्याच्याच होत्या.

वीरेंद्र सेहवाग : भारतीय संघात निवड झाली ती गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू म्हणून. त्या वेळी तो सातव्या- आठव्या क्रमांकावर खेळत असे. त्याच्या बाराव्या एकदिवसीय सामन्यात त्याला सौरव गांगुलीसह डाव सुरू करण्याची सूचना देण्यात आली. सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे संघात नसल्यानं हा प्रयोग झाला. वीरेंद्रला या क्रमांकावर स्थिरावण्यास काहीसा वेळ लागला; पण सलामीच्या चौथ्या डावात त्यानं ७० चेंडूंत शतक केलं.

मार्क वॉ : मार्क वॉ ऑस्ट्रेलिया संघात आला, त्या वेळी मार्क टेलर आणि मायकेल स्लेटर ही जोडी जमलेली होती. ती बदलण्याचं काही कारण नव्हतं. सुरुवातीला पाचव्या क्रमांकावर खेळण्यास सुरुवात केलेल्या मार्क वॉ याचा क्रमांक उंचावत गेला.

सईद अन्वर : अन्य फलंदाजांच्या तुलनेत सलामीला खूपच लवकर संधी. दहाव्या सामन्यातच ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर क्वचितच हा क्रमांक बदलला.

सौरव गांगुली : १९९२ च्या अपयशी पदार्पणानंतर गांगुली चार वर्षं संघाबाहेर होता. तो १९९६ मध्ये संघात आला तो मधल्या फळीतील खेळाडू म्हणून; पण त्याला सातव्या-आठव्या क्रमांकावरही खेळवण्यात आलं. त्याच वर्षी ‘टायटन कप’ स्पर्धेत अजय जडेजानं मधल्या फळीत खेळण्याचं ठरवलं आणि सचिन तेंडुलकरचा सलामीचा सहकारी म्हणून सौरवला पसंती देण्यात आली.

Edited By - Prashant Patil

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com