esakal | सदा नावाची केस (संजय कळमकर)
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay kalamkar

सदा नावाची केस (संजय कळमकर)

sakal_logo
By
संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com

चौकाच्या कोपऱ्यात लाकडी फळ्यांचं छोटंसं दुकान होतं. समोर एक जुनाट आरसा, ऐतिहासिक वाटावी अशी उंच लाकडी खुर्ची. गिऱ्हाइकाला बसायला डुगुडुगु हलणारं बेभरवशी बाकडं. त्या बाकड्यावरून गावातलं कुणी खाली पडलं नाही असा एकही दिवस जात नसे. लाकडी फळ्यांवर देवांच्या तसबिरी. सर्व तसबिरींवर उदबत्तीचा धूर जाईल अशा पद्धतीनं सदा कारागीर कोपऱ्यात एकच उदबत्ती लावायचा. अशा दुकानात साधा पायजमा, तिरप्या खिशाची बंडी, डोक्‍यावर टोपी आणि चेहऱ्यावर सदा मिश्‍किल भाव असलेला सदा कुणाची ना कुणाची हजामत करताना दिसायचा. हे दुकान टाकण्याआधी तो गळ्यात चामड्याची धोकटी अडकवून घरोघरी जाऊन हजामती करत असे. गावातल्या ताज्या घडामोडींची माहिती त्याच्याकडं असायची. मात्र,"याचं त्याला, त्याचं याला' सांगण्याचं काम त्यानं कधी केलं नाही. "आपण एकमेकांच्या आनंदाच्या गोष्टी इतरांना सांगून आनंद द्यायचा. कुणाची कळ करून भांडण लावायचं नाही,' असं सदा म्हणायचा.

नंतर घरोघरी जाऊन हजामत करण्याचं सोडून तो गावातल्या चौकात असलेल्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाखाली पोतं टाकून बसू लागला. गिऱ्हाईक मांडी घालून पोत्यावर बसायचं. सदा धोकटीतून साबण, ब्रश, वाटी, दात्रे तुटलेला जुनाट कंगवा, कात्री, नखं काढण्याची नऱ्हाणी, लोखंडी वस्तरा, तुरटीचा मोठा ओबडधोबड तुकडा अशी "आयुधं' काढायचा. तोच लोखंडी वस्तरा व तोच तुरटीचा तुकडा गावातल्या सगळ्या बाप्या माणसांच्या चेहऱ्यांवरून फिरवायचा. वस्तरा चालण्याआधी सदाच्या तोंडाची टकळी सुरू व्हायची. गिऱ्हाईक त्याच्या बोलण्यात हरवून जायचं. गिऱ्हाइकाच्या "तोंडाला फेस' येईपर्यंत सदा त्याच्या चेहऱ्याला साबणाचा फेस लावायचा. नंतर लोखंडी वस्तरा सहाणेवर घासून त्याला धार करायचा. गिऱ्हाइकाच्या हातात आरशाचा तुकडा दिलेला असेच. त्यात फक्त कपाळ, नाहीतर फक्त डोळे किंवा गालाचा काही भाग दिसे. संपूर्ण चेहरा दिसेल असा आरसा सदानं कधी गिऱ्हाइकाच्या हाती दिला नाही. त्यामुळे हजामत कशी झाली हे गिऱ्हाइकाला शेवटपर्यंत कळत नसे. काही म्हातारे त्याला "दाढी कितीला?', "डोकी (हजामत) कितीला?' असे भाव विचारत. सदा सांगायचा ः "दाढी पाच रुपये, डोकी दहा रुपये.'
मग एखादा इरसाल म्हातारा म्हणायचा ः 'माझ्या डोक्‍याची दाढीच कर.''
सदा त्याच्यापेक्षा इरसाल. म्हाताऱ्याच्या डोक्‍यावर वस्तरा फिरवताना थोडा तिरपा धरल्यावर रक्त निघायचं. एकंदर, सदापुढं कुणी जास्त हुशारपणा दाखवला तर त्याचं बळजबरीचं "रक्तदान' झालंच म्हणून समजा!
***

पूर्वी बलुतेदारी असल्यानं हजामतीच्या मोबदल्यात सदाला सुगीनंतर वर्षाला धान्य मिळत असे. आता ती परिस्थिती बदलून रोकडा व्यवहार सुरू झाला. सदा दुकानातच स्थिरावला. अगदीच एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जागेवरून उठता येत नसेल तर मात्र तो पुन्हा जुनी धोकटी अडकवून त्याच्या घरी जायचा. "म्हाताऱ्या, वर स्वर्गात हजामत करायला कुणी नाय. जायची घाई करू नको,' अशा गमतीदार गप्पा मारत म्हाताऱ्या मंडळींना सदा हसवायचा. तेही "पुढच्या टायमाला लवकर ये' म्हणत, त्याला जगण्याची अशाश्वत शाश्वती देऊन टाकायचे! गावातल्या म्हाताऱ्यांच्याच डोक्‍यावर नाही तर माझ्या डोक्‍यावरही लहानपणी पहिली कात्री चालवणारा सदाच होता. बाबा मला त्याच्याकडं घेऊन गेले तेव्हा त्यानं माझ्या अंगाभोवती कापड पांघरलं. गळ्याला वादीची गाठ मारली. नंतर सदानं माझ्या डोक्‍यावर कात्री चालवायला सुरवात केली. गाव गोळा होईल एवढ्यानं मी किंचाळायला लागलो. तेव्हा कुठलं तरी बडबडगीत म्हणून सदानं मला समजावण्याचा प्रयत्न केल्याचं मला अजूनही आठवतं. खूप दिवसांनी त्याच्या दुकानात गेलो तेव्हा मला हा प्रसंग आठवला. मला पाहून रुंद हसत सदा म्हणाला ः'बसा साहेब, शहरात गेल्यापासून लई बदलले ओ. दाढी करायची का? आमच्याकडं अजून साबणच आहे. क्रीम नाही. वस्तरा मात्र बदललाय. आता प्रत्येक दाढीला गिऱ्हाईक म्हणतं "ब्लेड बदला'. पूर्वी आख्ख्या गावाला आम्ही एकच वस्तरा वापरायचो. कुणाला काही रोग होत नव्हते. आता वस्तरा बदलावा लागतो. कारण, माणसाचं वागणं बदललं. बिघडली ती माणसं, हत्यारं नाही.''
सदा माझ्याशी बोलत असताना गिऱ्हाईक अचानक ओरडलं.
सदाचा वस्तरा गिऱ्हाइकाच्या चेहऱ्यावरून डोक्‍याकडं सरकला होता! गिऱ्हाईक ओरडलं ः 'सदा, नीट लक्ष देऊन दाढी कर...''
सदाची आणखी गडबड उडायला नको म्हणून मी त्याला म्हणालो ः 'भेटायला आलो होतो. जातो.''
तो म्हणाला ः'हजामतीला नाही; पण आले तर वरचेवर भेटायला येत जावा.''
***

कितीतरी दिवसांनी गावी जाणं झालं. चेहऱ्यावरून हात फिरवला तेव्हा जाणवलं. दाढीचे खुंट वाढले आहेत. सदाची आठवण झाली. चौकातल्या दुकानाकडं आपसूक पाय वळले. लाकडी फळ्यांचं दुकान दिसलं नाही. त्याजागी सदानं दुकानाचं पक्कं बांधकाम केलं होतं. दुकानात तरण्या पोरांची गर्दी होती. हसणं-खिदळणं सुरू होतं. डोक्‍यावर नाना तऱ्हेच्या कलाकुसरी सुरू होत्या. मी आकसून पक्‍क्‍या बाकड्यावर बसलो. अचानक लक्ष भिंतीकडं गेलं. सदानं लावलेल्या देवांच्या तसबिरी अंतर्धान पावल्या होत्या. त्या जागी उघड्या अंगाच्या नट-नट्यांचे भरपूर फोटो होते. त्यातच गुदमरून गेलेल्या एका तसबिरीकडं माझं लक्ष गेलं. तो सदाचा फोटो होता. त्याला कधीतरी घातलेला हार वाळून गेला होता. मी हळूच सदाला हात जोडून जडपणे उठलो.
'एकच नंबर आहे साहेब, बसा,'' असं कुणीतरी म्हणालं.
ते मी ऐकलंच नाही. डोळे पुसत बाहेर पडलो...

loading image