लग्नपत्रिका पाहावी छापून...(संजय कळमकर)

लग्नपत्रिका पाहावी छापून...(संजय कळमकर)

‘लग्नाला यावंच लागेल’ असं सांगून पाहुणे लग्नपत्रिका ठेवून गेले. मी ती पाकिटाबाहेर काढली तेव्हा शब्दांच्या पलटणीच अंगावर चाल करून आल्यासारखं वाटलं. पाहुणे पत्रिकेबरोबर एखादी दुर्बिणही ठेवून गेले असते तर बरं झालं असतं असं वाटून गेलं.

कारण, त्या लग्नाचं नेमकं ठिकाण, वेळ आणि तारीख तरी नीट पाहता आली असती इतकी ती पत्रिका शब्दबंबाळ होती. हा अनुभव कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांनाच येत असतो. अशा मजकुरानं भरलेल्या पत्रिका वाचताना आपण हसतो; परंतु पत्रिका छापण्याची वेळ आपल्यावर आली तर आपणही त्या तशाच छापून स्वतःचं हसू करून घेत नसतो काय? पत्रिकेच्या सुरवातीला वर एका देवाचं नाव असतं. आपल्याकडं तेहतीस कोटी पर्याय असल्यानं प्रत्येक जण हे नाव वेगळं टाकण्याचा प्रयत्न करतो.

त्याखाली नवरदेवाचं नाव असतं. नावापुढं कंसात डिग्र्याची लांबलचक यादी असते. त्या वाचताना अनेकांना शंका येते. इतक्‍या डिग्र्या मिळवेपर्यंत याचं लग्नाचं वय कसं उलटून गेलं नाही! ते उलटून गेलेलं असलं तरी अक्षता पडेपर्यंत तरी ते मेकअप्‌च्या कौशल्यामुळं कुणाला दिसत नाही. खाली ‘हे अमुक यांचे नातू, सुपुत्र’ वगैरे असल्याचा उल्लेख आढळतो. तो वाचण्याच्या भानगडीत सहसा कुणी पडत  नाही. त्याखाली वधूचं नाव असतं. कधी कधी नवरदेव खूपच शिकलेला, तर नवरी फक्त अकरावी असते. मग वर कंसात एवढ्या डिग्र्या असताना तिच्याही नावापुढं काहीतरी टाकून बॅलन्स साधणं गरजेचं असतं. ‘अकरावी’ असं लिहिणं वाईट दिसेल म्हणून ‘एफवायजेसी’ असा अकरावीसाठीचा इंग्लिशमधला समानार्थी शब्द छापून पत्रिकेपुरती वेळ मारून नेली जाते.

मधला मायना वेगवेगळा असतो. मिती, शुक्‍ल, शके या त्यातल्या गोष्टी तर फारच दुर्बोध असतात. त्यामुळे त्यावर नुसतीच नजर फिरवून पुढचा मायना वाचला जातो. त्यात मुहूर्ताला ‘गोरज’ असं विशेषण असतं. पत्रिकेतल्या या गोरज मुहूर्तावर क्वचितच एखादं लग्न लागत असावं. नाहीतर ‘आवाज वाढव डीजे तुला आयची शपथ हाय’च्या तालावर नाचून ‘गोरज मुहूर्त’ केव्हाच तुडवला गेलेला असतो. पत्रिकेतल्या मुहूर्तावर लग्न लावलं जाणार नसेल तर मुहूर्त शोधण्यासाठी इतका आटापिटा का केला जातो ते समजत नाही. तसाही लग्न वेळेवर लागण्याचा आणि प्रपंच सुखी होण्याचा काहीच संबंध नसतो म्हणा. (लाखो रुपये खर्च करून थाटामाटात लग्न लागलेल्या जोडप्यांचे संसार विस्कळित होतात, तर मंदिरात किंवा नोंदणी पद्धतीनं लग्न लागलेली जोडपी सुखानं प्रपंच करताना दिसत असल्याची असंख्य उदाहरणं आहेत). काही दिवसांनी तर मुहूर्त काढून देणारे गुरुजी ‘१२.१५ ते ३.४५ यादरम्यान सारा मुहूर्तच आहे,’ असं सांगून नाचणाऱ्यांची सोय करून देतील की काय कुणास ठाऊक. मायन्याखाली नातेवाइकांच्या नावांची मतदारयादीसारखी लांबलचक रांग असते. ही नावं छापताना खूपच काळजी घ्यावी लागते. त्यात एखादं जरी नाव चुकलं तरी कोण गहजब होतो! ज्याचं नाव टाकायचं राहिलेलं असतं तो लग्नाच्या ठिकाणी सुतकात असल्यासारखा, तोंडाचा लंबगोल करून फिरताना आढळतो. कुणी विचारलं ‘एवढे नाराज का?’ तर तो सांगतो, ‘पत्रिकेत माझं नावच नाही.’ जणू ती यादी संसदेत वाचायची आहे! मग, आयुष्यभर त्याचे टोमणे खाण्यापेक्षा त्याचं नाव टाकून, पुन्हा पत्रिका छापून किटाळ दूर केलं जातं. पत्रिकेच्या तळाशी ‘आमच्या काकाच्या, मामाच्या लगनाला यायचं हं!’ अशी बोबडी तळटीप दिलेली असते. तीत बंडू, खंडू, चिंगी, मंगी अशी नावं असतात. लग्नाच्या मांडवात बसलेल्या वऱ्हाडाला वाटतं की हा बंडू आता असा दुडूदुडू धावत मंडपात येईल; पण प्रत्यक्षातला बंडू पाहून नवल करावं तेवढं थोडंच. डोक्‍यावरच्या केसांची वैविध्यपूर्ण कलाकुसर केलेला आणि जागोजागी बंदुकीच्या गोळ्या लागल्यासारखी छिद्राछिद्रांची जीनची पॅंट घातलेला हा दांडगा बंडू मंडपात आल्याबरोबर आपली तारुण्यसुलभ लुडबुड सुरू करतो. पत्रिकेचा एकही कोपरा कोरा ठेवायची नाही, असा जणू विडाच ती छापणाऱ्यांनी उचललेला असतो. मग चार-पाच निमंत्रक, पाच-सहा व्यवस्थापक, दहा-बारा स्वागतोत्सुक आणि पंधरा-वीस संयोजक अशी नावांची रेलचेल संबंधितांची परवानगी न घेता केली जाते. शिवाय ‘फर्म’ म्हणून फुटाण्याच्या दुकानापासून ते आदर्श हेअर कटिंग सलून, माधुरी ब्यूटीपार्लर, रिलॅक्‍स फूट वेअर, गजानन किराणा मार्ट, भदाणे सायकल मार्ट, सपकाळ लेडीज टेलर ते साखर कारखान्यापर्यंतची नावं टाकली जातात. 

‘आशीर्वाद’मध्ये पुढाऱ्यांची अनेक नावं पदांसह झळकत असतात. त्यात नावं वर-खाली झाली तर संबंधित पुढाऱ्याच्या कार्यालयातून नाराजी व्यक्त केली जाते किंवा एखाद्या अती-उत्साही वरबापानं साऱ्याच पक्षांच्या पुढाऱ्यांची नावं टाकली तर एकमेकांचा नामोल्लेख पाहून कुणीच त्या लग्नाला जात नाही. ‘आशीर्वाद’च्या यादीतली काही नावं पाहून लोकांना हसू येतं. कारण, नाव असणाराच त्याचा प्रपंच कसाबसा टिकवून असतो आणि आशीर्वादाची खरी गरज त्यालाच असते. पाकिटावर डिग्रीसह अथवा पदासह एखाद्या मान्यवराचं नाव ‘प्रेषक’ म्हणून टाकलेलं असतं. अनेकजण त्याचा उल्लेख ‘प्रेक्षक’ असा करतात.

कधी कधी निष्ठा दाखवण्यासाठी काही लोक आपल्या नेत्याची हात जोडलेली हसरी छबीही टाकतात. आजकाल आर्थिक स्थितीनुसार महागाची पत्रिका बाजारात मिळते. अनेक लोक महागड्या पत्रिकेशी आपल्या प्रतिष्ठेचा मिथ्या संबंध जोडत असतात. एखाद्या घरी महागडी पत्रिका दिल्यानंतर त्याच्या पाठीमागं लग्नपत्रिका देणाऱ्याच्या आयुष्याचीच पत्रिका काढली जाते. हा प्रकार ‘हात दाखवून अवलक्षण’ असाच असतो. उदाहरणार्थ ः ‘याच्याकडं चांगला खावडीचा टेबल आहे...सोन्याची पत्रिका छापली तरी परवडेल हो,’ ‘लाच देऊन कंत्राटं मिळवतो...याने केलेले रस्ते वर्षभरात उखडतात’, ‘काल-परवापर्यंत दुसऱ्याच्या लग्नात आहेर घेण्याची याची ताकद नव्हती...निवडून आला नि आता कशी पत्रिका छापलीये बघा,’ ‘जमीन खरेदी-विक्रीत जोरदार कमिशन हाणतो हा’, ‘अशा पत्रिका छापून बापानं कमावलेलं उडवतोय... दुसरं काय?’, ‘अहो, त्यांना घर बांधताना पायात काहीतरी घबाड सापडलं म्हणतात,’ ‘कर्ज काढून हौस करतोय. भिकेला लागण्याचे धंदे’ इत्यादी इत्यादी...प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशांतून महागडी पत्रिका छापली तरी अशीच शेरेबाजी केली जाते आणि पत्रिका वाचून झाल्यानंतर वाचणाऱ्याच्या तोंडी शेवटचं वाक्‍य असतं ः ‘खाली थोडी जागा उरली होती... तिथं ‘आहेर स्वीकारले जाणार नाहीत’ अशी तळटीप टाकायला काय हरकत होती? यांना म्हणजे ना, निव्वळ घ्यायचं तेवढं माहीत आहे हो...!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com