काश्मिरी तात्त्विक प्रज्ञेची ओळख!

काश्मीर हे जवळपास बाराव्या शतकापर्यंत भारताचंच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाचं एक ज्ञानकेंद्र होतं. काश्मीरची शैवपरंपरा ही बुर्झाहोम इथं सापडलेल्या अवशेषांनुसार पाच हजार वर्षं मागे जाते.
Book Aacharya Abhinavgupt
Book Aacharya AbhinavguptSakal
Updated on
Summary

काश्मीर हे जवळपास बाराव्या शतकापर्यंत भारताचंच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाचं एक ज्ञानकेंद्र होतं. काश्मीरची शैवपरंपरा ही बुर्झाहोम इथं सापडलेल्या अवशेषांनुसार पाच हजार वर्षं मागे जाते.

भारतात शैव तंत्रमार्गाचे थोर तत्त्वज्ञ आणि स्तोत्रकारांचे मुकुटमणी व महान अद्वैती आदिशंकराचार्यांनंतर अवघ्या दोनेकशे वर्षांनी दहाव्या शतकात झालेले काश्मीरमधील अभिनवगुप्त हे शैव तत्त्वज्ञानाचे थोर अध्वर्यू तत्त्वचिंतक व चतुरस्र प्रतिभेचे धनी होत. काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाला त्यांनी अतुलनीय उंची प्रदान केली. आदिशंकराचार्यांचे व्यक्तिगत जीवन जसे अनेक दंतकथा, आख्यायिका व चमत्कारांनी भरले आहे, तसेच अभिनवगुप्तांचे जीवनचरित्रही त्यांच्या जीवनाबद्दल क्वचित आलेले त्रोटक उल्लेख व चमत्कृतिजन्य आख्यायिकांनी भरलेले आहे. त्यामुळे दोघांची खऱ्या अर्थाने ऐतिहासिक म्हणता येतील अशी चरित्रं उपलब्ध नाहीत. अभिनवगुप्तांचं नक्की जन्मवर्षही माहीत नाही. किंबहुना प्राचीन काळच्या राजा-महाराजांबद्दल जिथं ही इतिहासाची उपेक्षा, तिथं तत्त्वज्ञांबद्दल काय स्थिती असणार? पण या त्रुटींवरही मात करत प्रशांत तळणीकर यांनी ज्या तटस्थ संशोधकीय पद्धतीने ‘आचार्य अभिनवगुप्त’ हे अभिनवगुप्तांचं चरित्र साकार केलं आहे, ते निश्चितच प्रशंसेला पात्र आहे.

काश्मीर हे जवळपास बाराव्या शतकापर्यंत भारताचंच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडाचं एक ज्ञानकेंद्र होतं. काश्मीरची शैवपरंपरा ही बुर्झाहोम इथं सापडलेल्या अवशेषांनुसार पाच हजार वर्षं मागे जाते. आधी प्रतीकात्मक लिंगरूपात पूजल्या जाणाऱ्या शिव-शक्तीभोवती जशी तांत्रिक कर्मकांडं रचली गेली, तशाच तत्त्वज्ञानात्मक इमारतीही उभ्या केल्या जाऊ लागल्या. शिव-शक्ती स्वरूपातच द्वैत आणि अद्वैत हा तात्त्विक आविष्कार घडवण्यात आला. देशभरातही शैव व शाक्त तत्त्वज्ञानाचे व कर्मकांडांचे असंख्य तत्त्वधारा असलेले पंथ बनू लागले. काश्मीरमधील क्रम, कौल, शिवसिद्धांत या परंपरांमध्ये वसुगुप्ताने आठव्या शतकात ‘त्रिक’ परंपरेची भर घातली आणि तिच्यावर स्वयंप्रज्ञेने अभिनवगुप्तांनी कळस चढवला. या तत्त्वज्ञानानुसार सृष्टी ही तीन तत्त्वांनी बनलेली असून, शिव हे तत्त्व सर्वव्यापी आणि अपरिवर्तनीय आहे. या तत्त्वज्ञानाचा विस्मयकारी विस्तार त्यांनी केला. त्यांची हीच एक कामगिरी नव्हे, तर त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्रावर बहुमोल आणि आजवरची एकमेव टीकाही लिहिली. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यात तंत्रालोक, ध्वन्यालोक लोचन, परमार्थसार यांसारखे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. शैव तत्त्वज्ञानाबरोबरच त्यांनी सौंदर्यशास्त्र, नाट्यशास्त्र, योगशास्त्र, समीक्षाशास्त्रांचंही सखोल अध्ययन करून त्यावरही चिंतनात्मक लेखन केलं. ते विश्वकोशीय प्रज्ञेचे धनी होते, हेच यावरून सिद्ध होतं.

अभिनवगुप्ताचे पूर्वज अत्रिगुप्त यांना आठव्या शतकात सम्राट ललितादित्याने सन्मानपूर्वक कनौज येथून काश्मीरला नेलं होतं. त्याच घराण्यात अभिनवगुप्तांचा जन्म नरसिंहगुप्त आणि विमलकला या दांपत्याच्या उदरी सन ९४० ते ९५० च्या दरम्यान झाला. बालपणीच अभिनवगुप्तांचं माता-पित्याचं छत्र हरपलं. त्याकाळात काश्मीरमध्ये राजकीय सुंदोपसुंदी सुरू होती. दिद्दाराणीचा नृशंस शासनकाळ याच शतकातला. कल्हणाच्या राजतरंगिणीत हा राजकीय दुर्दशेचा काळ चित्रित झाला आहे. कल्हण हा प्रामुख्याने राजकीय इतिहास लिहीत असल्याने तो तत्कालीन महा-बुद्धिशाली अभिनवगुप्ताचा उल्लेख करत नाही. पण, याच अस्थैर्याच्या काळात काश्मीरमध्ये सोमानंद, क्षेमेंद्र, उत्पलाचार्यांसारखे थोर विद्वान निर्माण झाले, हाही एक चमत्कारच होय. अभिनवगुप्त हे दहाव्या शतकातील केवळ काश्मीरमधीलच नव्हे, तर देशभरच्या शैव तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी ठरले. त्यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही.

तरीही अभिनवगुप्ताच्या अतुलनीय कामगिरीचा इतिहासाच्या अंगाने सखोल शोध झाला नव्हता. ‘आचार्य अभिनवगुप्त’ या चिनार प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासावर साक्षेपी प्रकाश तर पडतोच; पण त्यांचं तत्त्वज्ञान, चिंतन आणि त्यांचे गुरू तसंच शिष्यांचाही परामर्श घेतला जातो. त्यासाठी लेखकाने खुद्द अभिनवगुप्तांनी आपल्या ग्रंथसंपदेत जे स्वत:बाबत त्रोटक का होईना उल्लेख केले आहेत आणि त्यांच्या शिष्यांनीही जे काही लिहून ठेवलं आहे, त्याचा चिकित्सात्मक आधार घेतला आहे. श्रीराम पवार यांनी अत्यंत अभ्यासू आणि साक्षेपी प्रस्तावनाही लिहिली आहे. या ग्रंथातून काश्मिरी तात्त्विक प्रज्ञेचा वाचकांना परिचय होईल आणि ते काश्मीरच्या इतिहासाकडे आणि तत्त्वज्ञानाकडे वळतील अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com