आमची सई असं का वागतेय?

समस्या नक्की काय आहे, तेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
changes in Behavior of Childrens
changes in Behavior of Childrenssakal
Summary

अलीकडच्या काळात सईच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. सायकल चालवणं तिने बंद केलंय. ती आता खेळण्याऐवजी तासन् तास टीव्ही बघण्यात घालवते. पूर्वी शाळेत आणि क्लासमध्ये घडलेलं सगळं आईशी शेअर करायची. मुळात तिचा स्वभाव खूप बडबड्या असल्यामुळे मनमोकळी होती. आता ती आईशी फारशी बोलत नाही. बोलली तरी वाद होतो. खटके उडतात. मग ती पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून जाते. मग दोन-दोन दिवस संवाद नसतो. आई काळजीत पडते. बाबा घरी आले, की समजावण्याचा प्रयत्न करतात; पण समजावतानाच त्यांच्या रागाचा पारा चढतो. मग शब्दाने शब्द वाढत जातात...

पलीकडे फोनवरून मुलीची आई बोलत होती, ‘‘आमची मुलगी आमचं अजिबात ऐकत नाहीय,’’ आणि तिचा सूर रडवेला होता. ‘‘एक म्हणजे एक गोष्ट ऐकत नाही... आम्ही सांगितलेलं सगळं ती कानाआड करते. पूर्वी अशी नव्हती ती. सगळं ऐकायची. आता ती अजिबात ऐकतच नाही. माझं तर सोडा, तिच्या बाबांचंही ऐकत नाही. तिच्या मनाला जे हवं तेच ती करते... भयंकर हट्टी झाली आहे ती!’’

या बाई बराच वेळ बोलत होत्या. मी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यांना हळूहळू शांत करत मी त्यांना बरेच प्रश्न विचारले. त्यांची समस्या नक्की काय आहे, तेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

त्यांची मुलगी सई (नाव बदलले आहे) नववीत आहे. ती उत्तम बॅडमिंटन खेळत असे. उत्तम स्वीमर होती. अभ्यासातही तिची प्रगती चांगली होती. तिला खूप सारे मित्र-मैत्रिणी होत्या. तिला नवनवीन गोष्टी करायला आवडत. ती पूर्वी सायकलवरून शाळेला जात असे. नवनवीन ग्रुप जॉईन करत असे. सईला ट्रेकिंगचीही आवड होती.

आता अलीकडच्या काळात तिच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. सायकल चालवणं तिने बंद केलंय. ती आता खेळण्याऐवजी तासन् तास बसून टीव्ही बघण्यात घालवते. पूर्वी शाळेत आणि क्लासमध्ये घडलेलं सगळं आईला सांगायची. आईशी शेअर करायची. मुळात तिचा स्वभाव खूप बडबड्या असल्यामुळे मनमोकळी होती. आता ती आईशी फारशी बोलत नाही. बोलली तरी वाद होतो. खटके उडतात. मग ती पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून जाते. मग दोन-दोन दिवस संवाद नसतो. आई काळजीत पडते. बाबा घरी आले, की समजावण्याचा प्रयत्न करतात; पण समजावतानाच त्यांच्या रागाचा पारा चढतो. मग शब्दाने शब्द वाढत जातात. आता बाबांना ती खूप उद्धट, बेजबाबदार, उडाणटप्पू अशी वाटू लागली आहे. बाबा तिला तिच्या अभ्यासावरून, करिअरवरून सारखं टोकत असतात. तिच्या लठ्ठ होण्याबद्दलही घालून पाडून बोलतात.

ती पूर्वीसारखी खेळत नसल्यामुळे तिचं वजन वाढलं आहे, हे खरंय. तिच्या वाढलेल्या वजनामुळे आई काळजीत असते. मग आई तिला डाएट करण्याबद्दल सुनावते. अरबट-चरबट खाऊ नको असं सांगते. त्यावरून पुन्हा वादविवाद, रडारड... मग ती मुद्दाम आडवंतिडवं खाते. आई तिला टीव्ही बघण्यावरून सारखं बोलत असते. तिच्या हातातल्या मोबाईलवरून तिला आई-बाबांची खूप बोलणी खावी लागतात. कारण पुस्तकांपेक्षा तिच्या हातात मोबाईल जास्त वेळ असतो. सईचं अभ्यासात अजिबातच लक्ष नसतं. परीक्षा जवळ आली तरी ती निवांत झोपते. तिच्यावर परीक्षेचं टेन्शन बिलकुल येत नाही. कारण ती मनापासून अभ्यास करत नाही. सकाळी लवकर उठण्याऐवजी उशिरापर्यंत झोपलेली असते. कारण रात्री उशिरापर्यंत ती मोबाईलवर असते. ती आई-बाबांबरोबर एकत्र जेवतही नाही. तिचं जेवण ती रात्री कधी तरी उशिरा स्वतंत्रपणे घेते. आईचं म्हणणं असं, की ती घरात असली तरी घरात नसल्यासारखी असते...

आई काळजीत पडली होती आणि बाबा आक्रमक मूडमध्ये होते. मुलीशी संवादच होत नसल्यामुळे तिच्या मनात काय चाललं आहे हे त्यांना कळत नव्हतं आणि आई-बाबांना काय वाटतंय यात सईला रस नव्हता. ही अगदी सरसकट अनेक घरांमध्ये निर्माण होणारी परिस्थिती सईच्या घरीसुद्धा तयार झाली होती. सईचे बाबा हे नोकरीनिमित्त गेली दोन वर्षे बाहेरगावी असतात. शनिवार-रविवार ते घरी येतात. तेवढ्यापुरताच त्यांचा सईशी संवाद होतो. खरे म्हणजे तोही होत नाही. होतो तो केवळ विसंवादच! त्यामुळे शनिवार-रविवार आला की आईच्या पोटात गोळा येतो, की आता फक्त आणि फक्त भांडणच होणार.

सईची आई म्हणाली, ‘‘माझं मन:स्वास्थ्य बिघडलं आहे. सईला हाताळता हाताळता माझ्या नाकी दम येतो. खूप टेन्शन असतं. काहीच कळेनासं झालेलं आहे. मला माझं स्वतःचं आयुष्य उरलेलं नाही. सईसाठी मी नोकरी सोडली... माझं सर्वस्व सईच आहे. दिवस-रात्र तिचाच विचार केला आणि आता खूप विचित्र वाटतंय. मला हेही कळतंय, की आमचंही कुठे तरी चुकतंय, पण काय चुकतंय तेच कळत नाही... दोन वर्षांपूर्वी सगळी सिच्युएशन खूप छान होती हो. आता असं वाटतं, की ते दिवस पुन्हा येणारच नाहीत!! आमच्या सईकडून खूप अपेक्षा होत्या, पण तिची सध्याची घसरलेली गाडी बघताना असं वाटतंय, की सगळ्याच गोष्टी हातातून निसटून चालल्या आहेत. अगदी सईसुद्धा... तिच्या क्लासचे टीचर म्हणालेही- सई किती बदलली आहे. पूर्वीसारखा अभ्यास करत नाही आणि तिचं पूर्वीसारखं क्लासमध्ये लक्षही नसतं...’’

हे सर्व सांगताना पलीकडून सईच्या आईला अनावर झालेला हुंदका मला स्पष्टपणे ऐकू आला.

‘‘अगदी काल-परवापर्यंत सई मला येऊन बिलगायची. मध्यरात्री अचानक येऊन माझ्या कुशीत झोपायची. कधी वाटलं तर रडायची. खुश असली की बोलत सुटायची. मला नेहमी असं वाटायचं, की ती माझाच एक भाग आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे. आता ती खूप तुटलेली वाटते. मी तिला खूप जवळ घेतलं... स्पर्श केला की अवघडते. अपरिचित वाटते. खूप टेन्शन येतं. काहीच कळेनासं झालेलं आहे...’’, सईच्या आईला आता अश्रूंचा बांध आवरणं अवघड गेलं. एका आईच्या वेदना काय असू शकतात, हे समजता येण्यासारखं होतं...

मी जेव्हा पालकांच्या कार्यशाळा घेतो, तेव्हा असे नाजूक आणि हळवे प्रश्न पालक सहसा विचारत नाहीत. स्वाभाविकपणे ते संकोचतात. नंतर थांबून किंवा फोनवरून समस्या सांगतात. सईची आई माझ्या एका ऑनलाईन सेशनला उपस्थित होती. तिने माझा नंबर टिपून घेतला आणि मला कॉल केला. म्हणून ती इतक्या मोकळेपणाने बोलत होती. मला याची कल्पना आहे, की ही केवळ एकाच सईची समस्या नाही. ही केवळ एका घरापुरती समस्या नाहीय. अनेक घरांमध्ये सई असेल किंवा सायली असेल, समस्या आहेतच. या समस्यांना सामोरं कसं जायचं, हे अनेक पालकांना समजत नाही आणि घरामध्ये एक अस्वस्थ... अवघडलेलं असं वातावरण तयार होतं. पालक आणि मुलं ही एकमेकांबरोबर सुखी असण्याऐवजी दोघेही दु:खी असतात.

हे सगळं कसं थांबवायचं? मी सईच्या आईला सांगितलं, की ‘‘तिचे बाबा येतील तेव्हा आपण एक व्हिडीओ कॉल करू. मी तुमच्याशी व्हिडीओ कॉलवरून बोलेन, पण तुम्ही काळजी करू नका. जे तुमच्या घरात घडतंय, ते तुम्हाला अस्वस्थ करणारं असलं, तरी तुम्ही खूप काळजी करावी असं नाहीय. सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येतील; पण मला त्यासाठी तुमचं सहकार्य लागेल.’’

‘‘हो, हो! चालेल... नक्की चालेल!’’

सईच्या आईच्या आवाजात एक आनंदाची लहर आली होती. तिच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

माझा सईच्या पालकांशी काय संवाद झाला, हे आपण पुढल्या भागात नक्की वाचू या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com