राणी केविलवाणी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjeev Latkar writes about queen beheviour

राणी मनमोकळी होती. गप्पिष्ट होती. संवेदनशील होती. इतकं सगळं छान सुरू असतानाच घरात वादळं धडकू लागली. त्याचा विपरीत परिणाम राणीवर झाला.

राणी केविलवाणी...

राणी मनमोकळी होती. गप्पिष्ट होती. संवेदनशील होती. इतकं सगळं छान सुरू असतानाच घरात वादळं धडकू लागली. त्याचा विपरीत परिणाम राणीवर झाला. ती शाळेत दांड्या मारते. कथ्थक सोडलं. राणीच्या आईला हे सगळं असह्य झालं. घरात वादळं खूप आली आणि आनंद हिरावून ती निघून गेली...

खरं तर राणीचे (नाव बदलले आहे) आई-बाबा दोघेही भेटायला येणार होते; पण आई एकटीच आली. बाबा बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाहीत, असं तिनं सांगितलं. त्यामुळे राणीबद्दल बोलायला तिच्या आईने अडखळतच सुरुवात केली. मला तिचा संकोच लक्षात आला. मी म्हटलं, ‘‘तुम्ही प्लीज अवघडू नका! जे आहे, ते मोकळेपणाने सांगितलं तरच आपण याबद्दल काही मार्ग काढू शकतो... आणि हो! आपली चर्चा ही आपल्यापुरतीच राहील. त्यामुळे तुम्ही कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही...’’

माझ्या सांगण्याचा योग्य तो परिणाम झाला आणि राणीची आई बोलू लागली. राणी नववीत होती. तिची आई एका खाजगी बँकेत उच्च पदावर कार्यरत होती, वडील हे एक उद्योजक होते. राणी त्यांची एकुलती एक मुलगी. अर्थातच लाडात वाढलेली, बालपणापासून ऐशारामातच लोळलेली. चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली. राणीचा अभ्यास यथातथाच होता. काही विषय तिला जमत. काही विषय तिच्यासाठी कठीण होते. पण तिच्या आई-बाबांची त्याबद्दल तक्रार नव्हती. कारण राणीला कथ्थक खूप आवडे आणि ती ते चांगलं सादरही करे. तिचे कथ्थकचे क्लास चालू होते. त्या जोडीला ती टेनिस शिकत होती. त्याशिवाय चित्रकला, शिल्पकला यांचे छंद वर्गही ते आवर्जून अटेंड करी. थोडक्यात राणीला हवं ते करण्याची पूर्ण मुभा होती.

राणी मनमोकळी होती. गप्पिष्ट होती. संवेदनशील होती. मित्र-मैत्रिणी खूप. त्यामुळे ती सतत गराड्यात असे. तिचे काही ना काही उपक्रम सुरूच असत. आईशी तिचं खूप छान आणि मोकळं रिलेशन होतं. दिवसभरात जे जे घडलंय, ते ते सर्व ती आईशी शेअर करायची. आईचं माहेर समृद्ध होतं. माहेरी प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये यशस्वी होता. उच्च पदापर्यंत पोहोचला होता. राणीची आई त्याला अपवाद नव्हती.

इतकं सगळं सुंदर सुरू असतानाच घरात वादळं धडकू लागली. त्याचा विपरीत परिणाम राणीवर झाला. ती आता पूर्वीसारखं काहीच करत नाही. शाळेत दांड्या मारते. क्लासमधली उपस्थिती नगण्य झाली आहे. कथ्थक सोडलं आहे. टेनिस कोचिंगला राणी जात नाही. तिच्याकडचा मित्र-मैत्रिणींचा ओढा आटला आहे. राणीच्या आईला हे सगळं असह्य झालं. तिने राणीशी बोलण्याचा खूपदा प्रयत्नही केला; पण राणी आता पूर्वीसारखा प्रतिसादही देत नाही. मनापासून खुलून बोलत नाही. आईशी काहीच शेअर करत नाही. राणीच्या आईला आता प्रश्न पडलाय की काय करायचं?

घरात वादळं खूप आली आणि घराचा आनंद हिरावून ती निघून गेली. पहिलं वादळ आलं ते म्हणजे राणीच्या बाबांना बिझनेसमध्ये खूप मोठा तोटा झाला. तो तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी जी जी पावलं उचलली, ती ती सर्व फसत गेली आणि तोटा वाढत गेला. त्यातून काहीच मार्ग निघेना म्हणून राणीचे बाबा खचले आणि दारूच्या आहारी गेले. घरात सतत भांडणं सुरू झाली. राणीची आई तिच्या पगारात घर चालवत होती. राणीला काही कमी पडू देत नव्हती. पण राणीच्या आईच्या, तिच्या ऑफिसमधल्या एका मित्राबरोबर असलेल्या मैत्रीचा बाबांनी गैरअर्थ लावला आणि वारंवार त्यांच्यात भांडणं होऊ लागली. यातली प्रत्येक गोष्ट राणीच्या डोळ्यांसमोर घडत असल्याने आईच्या ‘तथाकथित अफेअर’मुळे ती आईशी बोलेनाशी झाली... आईने राणीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, की ऑफिसमध्ये कोणाशी मैत्री असण्यात गैर काहीच नसतं. मी सर्व मर्यादा खूप काटेकोरपणे पाळते. स्वतःची खूप काळजी घेते. बाबा सध्या निराश अवस्थेत आहे. खचला आहे. त्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे तो हे आरोप करतो आहे. त्याचा गैरसमज मी हळूहळू दूर करेन... आईने इतकं समजावूनही राणी ते मानायला तयार नव्हती.

अशात एक दिवस एका क्षुल्लक कारणावरून राणीचं आईशी कडाक्याचं भांडण झालं. राणी आईला खूप वाईट आणि घाणेरडे शब्द बोलली. आईचा संताप अनावर झाला. तिला राहवलं नाही. तिने राणीला आयुष्यात पहिल्यांदा थप्पड लगावली. त्याचा राणीला प्रचंड राग आला. ती अपमानित झाली...

‘‘मी घर सोडून जाते आहे... मला शोधू नकोस!’’ अशी चिठ्ठी लिहून राणी घरातून निघून गेली... या प्रसंगानंतर राणीची आई खूपच खचली. आपण हे सगळं कशासाठी करतो आहोत, असा प्रश्न तिला पडला. आपण आपल्या करिअर मागे फार धावलो का? राणीकडे दुर्लक्ष केलं का? असे प्रश्न तिला छळू लागले. राणीच्या आईने दीर्घकालीन सुट्टी घेतली. राणी घर सोडून गेली तरी तिचा ठावठिकाणा शोधून दोन दिवसांत तिला पुन्हा घरी आणण्यात आईला यश मिळालं, पण या प्रसंगानंतर राणी आईशी बोलेनाशी झाली. बाबांशी असलेला तिचा संवाद पूर्ण तुटला. ती तिच्या खोलीत दरवाजा बंद करून एकांतात बसलेली असायची. देणेकरी टाळण्यासाठी बाबा दिवसभर कुठेतरी बाहेर भटकायचे आणि आई शून्यात नजर लावून बसलेली असायची. सध्या घराचं हे चित्र होतं...हे सगळं मला सांगताना रडून रडून आईचे डोळे सुजले होते. ‘‘राणीचे बाबा आले असते तर आपली चर्चा अधिक परिपूर्ण झाली असती...’’ मी म्हणालो. राणीच्या आईला काय बोलावं ते सुचेना.

मग मीच बोलू लागलो...

‘‘आई-बाबांच्या रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण झाला की मुलं खूप असुरक्षित होतात... संकटं सर्व घरांत येत असतात. वादळंही येत असतात; पण या वादळात आपण एकमेकांपासून दूर होतो की एकमेकांना अधिक घट्टपणे पकडतो, एकमेकांचा हात श्रद्धेने, प्रेमाने घट्ट धरतो यावर आपली रिलेशनशिप अवलंबून असते... तुमच्यात आणि राणीच्या बाबांमध्ये अचानक तणाव तयार झाला की तो पूर्वीपासून होता?’’ माझ्या अनपेक्षित प्रश्नावर राणीची आई पुन्हा रडू लागली.

ती म्हणाली, ‘‘तुमचं म्हणणं खरं आहे. आमच्या रिलेशनशिपमध्ये खूप आधीपासून प्रॉब्लेम्स होते; पण ते ठळकपणे दिसत नव्हते. आता ते डोकं वर काढून जाणवू लागले आहेत. काही चुका माझ्याकडूनही झाल्या. काही राणीच्या बाबांकडूनही झाल्या. मला समजतंय की माझंही चुकलंय; पण राणीला सावरण्यासाठी, सगळं पुन्हा पूर्वीसारखं करण्यासाठी मी काय करू? जे जे शक्य आहे ते ते सर्व मी करायला तयार आहे... अगदी नोकरी सोडायलाही तयार आहे... पण माझी राणी अशी उद्‌ध्वस्त झाल्यासारखी नको आहे मला... तिचं आयुष्य मला पुन्हा फुलवायचं आहे...’’

मी राणीच्या आईला धीर दिला.

‘‘तुम्ही काळजी करू नका... सगळं पूर्वीसारखं होईल; पण तिच्या बाबांचीसुद्धा तेवढीच इनव्हॅाल्वमेंट लागेल... आज आपण आपली चर्चा इथेच थांबवू... पुढच्या खेपेला बाबांना घेऊन या आणि हो! वेळ घालवू नका... कारण जितका अकारण वेळ जाईल, तेवढी राणी निराशेत अडकत जाईल... आपल्याला तिला लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे...’’माझ्या म्हणण्यावर राणीच्या आईने मान डोलावली. ‘‘पुढच्या वेळेस तिच्या बाबांना घेऊन नक्की येते’’, असं सांगून आई निघाली... नंतर कितीतरी वेळ मी त्या तिघांचा विचार करत बसलो होतो...

Web Title: Sanjeev Latkar Writes About Queen Beheviour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang