चरित्राने घडते चरित्र...

कोणत्याही व्यक्तीचे चरित्र घडण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे चरित्र वाचण्याची, समजून घेण्याची सवय प्रथम पालकांनी स्वतःला लावायला हवी.
Character
Charactersakal
Summary

कोणत्याही व्यक्तीचे चरित्र घडण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे चरित्र वाचण्याची, समजून घेण्याची सवय प्रथम पालकांनी स्वतःला लावायला हवी.

कोणत्याही व्यक्तीचे चरित्र घडण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे चरित्र वाचण्याची, समजून घेण्याची सवय प्रथम पालकांनी स्वतःला लावायला हवी. त्यातील महत्त्वाचे मुद्दे मुलांना समजून सांगितल्यास त्यांनाही ती वाचण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आवड निर्माण होते. कारण चरित्र वाचन हा मुलांच्या दृष्टीने करिअर विकसित करण्याचा सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे.

ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. माझे एक मित्र एक वेगळेच काम घेऊन माझ्याकडे आले. माझ्यासाठी ते अनपेक्षित होतं आणि सुखदही होतं. या मित्रांच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याची मुलगी ही खूप हुशार होती. तिचा भाषा हा विषय विशेष आवडीचा होता. ती छोट्या छोट्या गोष्टी लिहायची. भाषण करायची. कविता करायची. अधूनमधून चित्र काढायची. पुस्तकं खूप वाचायची. टीव्हीवरचे निवडक; पण उत्तम चित्रपट बघायची....

माझ्या मित्राने मला सांगितलं, ‘ती एका विख्यात लेखकांची खूप चाहती आहे. तिने त्यांचं बरचसं साहित्य वाचून काढलं आहे. आणि त्या लेखकांना भेटण्याची तिला अनिवार इच्छा आहे. तू अशी भेट घडवून आणशील का’, असा प्रश्न त्याने मला केला.

मी विचारात पडलो. कारण ते लेखक माझ्या परिचयाचे होते. त्यांच्याशी बोलावं लागणार होतं आणि माझा असा कयास होता, की ते वेळ काढून या मुलीला नक्की भेटतील. नेमकं तसंच झालं. मी त्यांना फोन केला. फोन करण्याचे कारण सांगितलं.

ते हसू लागले.

ते म्हणाले की, ‘माझ्याकडे अनेक चाहते भेटायला येतात. जिथे जातो तिथे चाहत्यांचा गराडा पडतो... पण आजपर्यंत नववीतली चाहती मला भेटली नव्हती... मला तिला भेटायला नक्की आवडेल!’

मी त्याप्रमाणे मित्राला कळवलं.

मित्राने त्याच्या सहकाऱ्याला कळवलं. सहकाऱ्याकडे त्या लेखकांचा नंबर गेला. त्यांनी परस्पर समन्वय साधून रविवारी भेट नक्की केली. त्यादिवशी रात्रीच मला मित्राचा फोन आला. त्याने त्याच्या सहकाऱ्याला कॉन्फरन्स कॉलवर जोडलेलं होतं. त्याच्या सहकाऱ्याने माझे खूप मनापासून आभार मानले आणि भेटीचा वृत्तांत सांगितला. ते जे काही बोलत होते त्याने मी स्वतः अक्षरशः मोहरून गेलो होतो. लेखकाला आपली लहान चाहती भेटणं हा आनंदाचा विषय असतो आणि या चाहतीला इतक्या लहान वयात आपला आवडता लेखक भेटणं, हा तर सुवर्णक्षण असतो! या दोन्ही गोष्टी या दिवशी घडल्या. दोघांनीही दीड तास गप्पा मारल्या. त्या मुलीने अनेक शंका विचारल्या. मला लेखक व्हायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, हा प्रश्न विचारायला ती विसरली नाही, मग या ज्येष्ठ लेखकाने तिला तिच्या भाषेत आणि तिला समजेल अशा पद्धतीने समजून सांगितलं, की लेखन म्हणजे काय, लेखनाची सुरुवात कशी करायची, वाचन कसं करायचं वगैरे वगैरे... त्यांनी तिला आपल्या लहानपणीचे किस्सेही सांगितले. इतकंच नव्हे, तर तिला स्वतःच्या स्वाक्षरीचे एक पुस्तक भेट म्हणून दिलं. तिच्या आनंदाला कित्येक दिवस पारावार उरलेला नव्हता. जो भेटेल त्याला ती या भेटीचा किस्सा ऐकवत होती. ती अक्षरशः आनंदात होती...

त्यानंतर मी माझ्या ओळखी वापरून लहान मुलांना अशा महान व्यक्तींना भेटवण्याचा सपाटाच लावला. कधी पोलिस अधिकारी, कधी आयएएस अधिकारी, कधी बँक अधिकारी, कधी लष्करातील अधिकारी, कधी एखादा राजकारणी, कधी कधी एखादा खेळाडू, कधी त्या त्या क्षेत्रातील गुरू... अशा अनेकांना भेटण्यासाठी मी मुलांना आणि पालकांना मदत केली आहे. मला अशा

पालकांचं खास कौतुक वाटतं, की जे अशा प्रकारचा विचार करतात आणि आपल्या मुलांना ज्या विषयात गती आहे, ज्या विषयात रुची आहे, त्या विषयातील ज्येष्ठांची भेट घडवून आणतात. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे.

आपण जेव्हा आपल्या मुलांना खेळाडू बनवण्याचे स्वप्न बाळगतो, तेव्हा त्यांना उत्तमोत्तम खेळाडूंची भेट मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, कारण या भेटीच्या स्मृती, प्रेरणा आणि आत्मविश्वास या गोष्टी मुलांच्या मनावर कायमच्या कोरल्या जातात आणि त्यातूनच त्यांचं खेळाडू बनण्याचे स्वप्न हे आकाराला येतं. ते या स्वप्नाचा पाठपुरावा करतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला समोर बघणं, त्याच्याशी बोलणं, त्याचे अनुभव ऐकणे ही मुलांसाठी पर्वणी असतेच; परंतु त्यांच्या करिअरला निर्णायक वळण देण्याची क्षमता अशा भेटींमध्ये असू शकते. ही एक चरित्र निर्मितीची प्रक्रिया आहे.

आता आता मी पालकांना अशा व्यक्तींना परस्पर भेटण्याची सूचना करतो. कारण माझ्या असं लक्षात आलं आहे, की मोठ्या व्यक्ती आपली परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना आवर्जून भेटतातच. आपलं ज्ञान, आपले अनुभव, आपली समृद्धता ही त्यांनाही कुठेतरी नव्या पिढीकडे सुपूर्द करायची असते. पैसा आणि प्रतिष्ठा एवढ्याने माणसाची भूक कधीच भागत नाही. माणसाला परंपरा निर्माण करायची असते. ती त्याची मूलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे अतिशय उच्च पदावरील व्यक्तीसुद्धा आपली परंपरा पुढे नेण्यासाठी लहान मुलांना भेटतातच. फक्त आपली प्रामाणिक इच्छा असावी आणि तळमळ असावी. कारण अशा उच्चपदस्थ व्यक्तींकडे नेहमीच वेळेची कमतरता असते; परंतु अशा भेटींना ते कायम वेळ देतात. आपण हा प्रयोग करून अवश्य बघा...

अजून एक महत्त्वाची गोष्ट. मराठी आणि इंग्रजीत मोठ्या व्यक्तींची, महान व्यक्तींची चरित्र प्रकाशित झाली आहेत. ही चरित्र आपल्या मुलांनी वाचावीत यासाठी सर्वप्रथम तुम्ही ती स्वतः वाचा. त्यातील रंजक भाग, तुम्हाला आवडलेला भाग मुलांना सांगा. मुलांबरोबर चर्चा करा. असे केल्याने मुलांनाही एक दिवस कुतूहल वाटेल आणि ते स्वतःहून चरित्र वाचू लागतील. चरित्र वाचन हा आपले करिअर उत्तम पातळीवर नेण्याचा अतिशय सोपा आणि चांगला मार्ग आहे. कारण चांगली चरित्र वाचणं हा एक संस्कार आहे. चरित्र वाचून चरित्र घडतात हा इतिहास आहे. अर्थात केवळ चरित्र वाचली म्हणजे चरित्र उत्तम होईल असे नव्हे. त्यासाठी मुलांची स्वयंप्रेरणा, ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन, त्यांना मिळणारं प्रोत्साहन आणि सर्वप्रथम त्यांची अंतःप्रेरणा या महत्त्वाच्या गोष्टी आहेतच; पण चरित्र वाचून एक दिशा सापडते. मूल्य आणि संस्कार घडतात. मुलांना आपल्या भवितव्याची दिशा सापडू शकते. म्हणून मुलांनी चरित्र वाचणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे...

असो.

त्या ज्येष्ठ मराठी लेखकाला भेटलेली मुलगी मोठी झाली असेल. ती लेखिका झाली की नाही, हे मला माहिती नाही; पण या लेखकाच्या एका भेटीने तिचे आयुष्य समृद्ध झालं हे नक्की...

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com