मुलांचं मोबाईल वेड कसं रोखायचं?

मोबाईल हे मनाला भुरळ घालणारे साधन आहे. त्यात व्हिडीओ बघता येतात, संगीत ऐकता येतं, गाण्याचा आनंद लुटता येतो, चॅट करता येतं.
Mobile
MobileSakal
Summary

मोबाईल हे मनाला भुरळ घालणारे साधन आहे. त्यात व्हिडीओ बघता येतात, संगीत ऐकता येतं, गाण्याचा आनंद लुटता येतो, चॅट करता येतं.

मोबाईल हे मनाला भुरळ घालणारे साधन आहे. त्यात व्हिडीओ बघता येतात, संगीत ऐकता येतं, गाण्याचा आनंद लुटता येतो, चॅट करता येतं. केवळ काही बोटं वापरली की एक अद्भुत जग खुलं होतं. त्यामुळे मुलांना मोबाईलचं आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे, हे प्रथम आपण मान्य करू या. मोबाईलच्या महासागरात आज अनेक पालकही गटांगळ्या खाताना दिसतात. मग त्यांच्या मुलांच्याही नाका-तोंडात पाणी गेलं, तर ते कसं टाळता येईल?

कार्यशाळा, पालकांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी किंवा पालकांचे ई-मेल्स, फोन असोत... वारंवार विचारला जाणारा एकमेव प्रश्न म्हणजे, ‘मुलांचं मोबाईल फोनचं वेड कसं रोखायचं?’

मुलांचा मोबाईलचा हट्ट जेव्हा पराकोटीला पोहोचतो, तेव्हा एखादी दुर्घटना घडते किंवा मुलं टोकाचे पाऊल उचलतात आणि अनेक पालकांच्या मनात धस्स होतं. कारण त्यांचीही मुलं मोबाईलसाठी प्रचंड हट्ट करत असतात. मोबाईल हे एका कुटुंबाचं वेड राहिलेलं नसून ते आता सामाजिक वेड झालेलं आहे. मोबाईलमुळे मुलांचं नुकसान होतं हे खरं; पण फक्त मुलांचं नुकसान होतं, हे खरं नव्हे! तर पालकांचंही नुकसान होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक सतत मोबाईलवर असल्यामुळे पालकत्वाचंही नुकसान होतं.

आज अनेक ठिकाणी नोकरदार माणसं कामाच्या ठिकाणीसुद्धा बराच वेळ मोबाईलवर टाइमपास करताना दिसतात. मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जाऊन जेव्हा प्रशिक्षण करतो, तेव्हा तेथेही मोबाईलमुळे उत्पादकता मंदावल्याचं व्यवस्थापन सांगत असतं. याचा अर्थ मोबाईल फोनच्या अतिवापराचा मुलांच्या अभ्यासावर जसा परिणाम होतो, तसा एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम झालेला दिसतो. एखादी गोष्ट सामाजिक असते, तेव्हा ती मुलांपासून वेगळी काढता येत नाही. मुलंसुद्धा त्याची शिकार होणं, हे अपरिहार्य असतं. म्हणून आपल्याला मोबाईलचा आपल्या आयुष्यातला रोल नेमका काय आहे, किती आहे, त्याचे लाभ कोणते आहेत, मोबाईलचे तोटे कोणते आहेत, याचा विचार करावाच लागेल. मोबाईल ही फेकून देण्याची किंवा लपवून ठेवण्याची गोष्ट नव्हे. आजच्या, विशेषतः कोरोनानंतरच्या काळात तुम्ही मुलांना मोबाईलपासून वंचित ठेवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मोबाईलबद्दल आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे. अर्थात मला अनेक घरं अशीही माहिती आहेत की, त्या घरांमध्ये पालकांनी मुलांना मोबाईल दिलेला नाही आणि मुलांचंही मोबाईलवाचून काही अडलेलं नाही. त्या घरांमध्ये मुलांनी हट्ट केला नसेल, असं नव्हे; परंतु कालांतराने त्यांनी तो हट्ट सोडून दिला आहे. म्हणजे काही मुलं ही मोबाईलशिवाय व्यवस्थित राहू शकतात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पालक त्यांना कन्व्हिन्स करू शकले आहेत, की मोबाईल हे तुझ्या वयाला साजेसं साधन नाही. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तू माझा किंवा घरातला अतिरिक्त मोबाईल वापर; पण मी तुझ्यासाठी वेगळा मोबाईल घेणार नाही... पालकांची कन्व्हिन्सिंग पॉवर अर्थात मुलांना नीट समजावून सांगण्याची हातोटी ही खूप महत्त्वाची असते. अनेक पालक मुलांना समजावून सांगत नाहीत. ते त्यांच्यावर खेकसतात. मुळात मुलांच्या भूमिकेत जाऊन मोबाईलचा विचार करणे ही पालकत्वाची गरज आहे...

सर्वप्रथम आपण हे मान्य केलं पाहिजे, की मोबाईल हे मनाला भुरळ घालणारे साधन आहे. त्यात व्हिडीओ बघता येतात, संगीत ऐकता येतं, गाण्याचा आनंद लुटता येतो, चॅट करता येतं. त्यात इंटरनेट आहे. एकमेकांना मेसेज पाठवण्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे गेम्स आहेत. त्यात घड्याळ आहे. त्यात गजर आहे. त्यात रिमाइंडर आहे... हे काही नमुने झाले. यापेक्षाही अनंत गोष्टी मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. केवळ काही बोटं वापरली की एक अद्भुत जग तुम्हाला खुलं होतं आणि तुम्ही त्या जगाचे होऊन जाता. आजूबाजूचे भान पूर्ण विसरायला लावणं ही मोबाईलची स्ट्रेंथ आहे. मुलांना मोबाईलचं आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे, हे प्रथम आपण मान्य करू या. मोबाईलच्या महासागरात आज अनेक पालकही गटांगळ्या खाताना दिसतात. मग त्यांच्या मुलांच्याही नाका-तोंडात पाणी गेलं, तर ते कसं टाळता येईल?

मोबाईल हाताळताना मुलं त्यांच्या सीमा ओलांडतात आणि भलत्या प्रांतात प्रवेश करतात, हा खरा चिंतेचा मुद्दा आहे. मोबाईलवर जितकं चांगलं उपलब्ध आहे, तेवढेच वाईट, बीभत्स, अश्लील, हिंसकसुद्धा उपलब्ध आहे. आपली मुलं त्या अंधाऱ्या आणि भयंकर विश्वात जाऊ नयेत, हा पालकांचा आटापिटा असतो. मोबाईलमधले अनेक गेम्स असे आहेत, की जे जीवघेणे ठरले आहेत. व्यसनाप्रमाणे मुलं त्या गेम्सच्या अधीन झाल्यामुळे अभ्यासाचं प्रचंड नुकसान झालं आहे...

म्हणजेच मोबाईलची काळी बाजू टाळणं, मोबाईलचे दुष्परिणाम टाळणं याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मोबाईल टाळण्याकडे नव्हे! मोबाईल हे आजचं वास्तव आहे आणि त्याची हाताळणी कशी करायची, याचं प्रशिक्षण... याचे संस्कार मुलांना देणं यात खरं शहाणपण आहे. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे, हे एकदा गृहीत धरलं, की त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे स्वतः शिकणं पालकांसाठी महत्त्वाचं आहे. घरात बसून पालक जेव्हा अमर्याद वेळ मोबाईलवर असतात, तेव्हाच मुलांमधल्या मोबाईलच्या व्यसनाची बीजं पेरली जातात. अत्यंत लहान वयात मुलं हे पाहतात, की ते जिथे जिथे जातात तिथे तिथे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ती व्यक्ती मोबाईलवर व्यग्र असते... मोबाईलवर रंगून गेलेली असते... मग त्यांची पहिली गाठ पालकांच्या मोबाईलची पडते. त्यातून त्यांना मोबाईलबद्दल कुतूहल वाटायला लागतं. शाळेत किंवा क्लासमध्ये काही मुलांकडे ते मोबाईल बघतात. स्वाभाविकच मोबाईलचा संसर्ग त्यांनाही जडतो...

मोबाईल हे एक वादळ आहे आणि या वादळापासून आपलं घर सुरक्षित ठेवायचं आहे, हे आपल्याला मान्य असेल तर मग आपलं घर तितकं मजबूत असायला नको का? आपल्या घरामध्ये मोबाईलला पर्यायी मनोरंजनाच्या, व्यस्ततेच्या व्यवस्था असायला नकोत का? आपण मोबाईलवर अवलंबून राहायचं आणि मोबाईल नुकसान करतोय असं म्हणायचं, या विरोधाभासाला अर्थ नाही! एखादी घातक गोष्ट मुलांच्या हातात देताना आपण डोळ्यात तेल घालून पाहत असतो, की त्या गोष्टीपासून मुलांना नुकसान होऊ नये. मोबाईलच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. मुलं जाणती होईपर्यंत मुलं मोबाईलवर काय बघतात, त्यांनी काय बघायला हवं, त्यांनी कशातून आनंद मिळवायला हवा, अभ्यासासाठी अवांतर ज्ञानासाठी मोबाईलचा कसा उपयोग होतो, कम्युनिकेशन स्किल्स किंवा अन्य कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी मोबाईल किती उपयुक्त आहे, अभ्यासाच्या आकृत्या, अतिरिक्त माहिती ही मोबाईलमधून कशी मिळते, याकडे पालकांचा कल असायला हवा. आज अशी अनेक ॲप्स आहेत जी सर्वस्वी शैक्षणिक आहेत आणि मनोरंजकही आहेत.

त्यातून मुलांचं ज्ञान, कुतूहल, आवड वृद्धिंगत होते. अशी ॲप्स पालकांनी सर्वप्रथम शोधली पाहिजेत. स्वतः पाहिली पाहिजेत आणि मुलांनी पाहावी, म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. मुलांना हातात मोबाईल हवा असतो; परंतु मुलांनी मोबाईलवर काय बघायचं, हे आपण ठरवायला हवं. म्हणजे मग मुलंही ती गोष्ट हळूहळू मान्य करतात. यामध्ये पालकांचे सुपरविजन, पालकांची काटेकोर देखरेख ही खूप महत्त्वाची आहे आणि तेच सर्व समस्यांचे मूळ आहे! कारण पालकांना वेळ नाही, म्हणून ते आधी स्वखुषीने मुलांच्या हातात मोबाईल सोपवतात आणि स्वतः कुठल्यातरी कामात व्यग्र होतात....

हे टाळायला हवं...

मोबाईलचे तोटे जितके आहेत तितकेच त्याचे फायदेही आहेत, याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मोबाईलचा स्वीकार आपण डोळसपणे करायला हवा. मोबाईलवर राग काढून उपयोग नाही. कारण मोबाईलच्या हाताळणीत त्याच्या समस्या दडल्या आहेत. मोबाईल हे एक हार्डवेअर आहे. त्यातलं कोणतं सॉफ्टवेअर पसंत करायचं, कशाला प्राधान्य द्यायचं, हे पालकांच्या हातात आहे. पालकांनी मोबाईलचा शत्रू म्हणून तिरस्कार न करता, मित्र म्हणून स्वीकार करण्यात पालकांचं आणि मुलांचं हित आहे. एकदा मोबाईलचा वापर हा सकारात्मक व्हायला लागला, की त्याची व्यसनाधीनताही आपोआप कमी होते आणि दुष्परिणाम संभवत नाहीत किंवा त्यांची तीव्रता ओसरते. मोबाईलशी मैत्री करणे, मोबाईलमधल्या सकारात्मक सॉफ्टवेअरशी ओळख करून घेणे, हाच यावरचा रामबाण उपाय आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com