सात पिढ्या बसून खाण्याची गोष्ट...

समीरला दहावी, बारावीला सुमार मार्क होते. रिपीट स्टुडन्ट असल्यामुळे ॲडमिशनची मारामारी. भरभक्कम फी मोजण्याची पालकांची तयारी होती; पण उपयोग नव्हता.
Education
EducationSakal
Summary

समीरला दहावी, बारावीला सुमार मार्क होते. रिपीट स्टुडन्ट असल्यामुळे ॲडमिशनची मारामारी. भरभक्कम फी मोजण्याची पालकांची तयारी होती; पण उपयोग नव्हता.

समीरला दहावी, बारावीला सुमार मार्क होते. रिपीट स्टुडन्ट असल्यामुळे ॲडमिशनची मारामारी. भरभक्कम फी मोजण्याची पालकांची तयारी होती; पण उपयोग नव्हता. त्यांनी मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष न देता परदेशात शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रशांत परदेशी गेलाही, पण हाती काय लागले, त्याची गोष्ट...

ही गोष्ट आहे समीर (नाव बदलले आहे.) आणि त्याच्या आई-बाबांची. समीरच्या वडिलांची गावी प्रचंड शेती होती. शिवाय सरकारी खात्यात मोक्याच्या जागी पोस्टिंग होती... आपल्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे आपण मुलाला भरपूर शिकवू शकतो, उच्चशिक्षित करू शकतो, अशी या वडिलांची प्रामाणिक समजूत होती. समीरचे वडील खूप पूर्वीपासून असं म्हणत, की माझ्या मुलाने काही केलं नाही तरी तो नुसतं बसून खाईल एवढे पैसे मी कमावले आहेत... त्यानेच कशाला, पुढच्या सात पिढ्यांनी जरी काही केलं नाही तरी त्यांना पुरेल एवढा पैसा मी कमावला आहे! समीरचे वडील हे जेव्हा अभिमानाने लोकांना सांगत तेव्हा त्याच्या आईचा ऊर अभिमानाने भरून येई. ती आपल्या पतीकडे खूप आदरानं आणि गौरवानं पाहायची आणि उपस्थित मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये तिची मान अभिमानाने उंचावत असे!

समीर कसाबसा म्हणण्यापेक्षा रडतखडत शिकत होता. त्याच्या डोक्यात परदेशात जाऊन शिकण्याचं खूळ तयार झालं. आजूबाजूचे मित्र भरीला पाडत होते... नातेवाईक हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते. प्रत्येकाचं एकच म्हणणं... तुझे वडील रोज खोऱ्याने पैसे कमावतात. तुला काय कमी आहे? तू फक्त वडिलांना सांग... की मला पुढचं शिक्षण परदेशातच करायचंय... ते तुला नक्की पाठवतील... शिक्षणाला का कोणी विरोध करतो? त्यात तुझे वडील म्हणजे प्रचंड पैसा बाळगून असणारे वजनदार गृहस्थ...

झालं! समीरच्या डोक्यात हवा शिरली आणि त्यानं पक्का निर्णय घेतला, की इथलं शिक्षण आपल्याला जमत नसलं तरी पुढचं शिक्षण परदेशात करायचं आणि फॉरेन रिटर्न म्हणून परत येऊन ‘शाईन मारायची.’ फॉरेन रिटर्न म्हटल्यावर आपल्याला मानाची नोकरी नक्की मिळणार आणि आपण लाखो रुपये कमावणार, असा त्याचा फाजील आत्मविश्वास जागा झाला. आता वडिलांचा आत्मविश्वास कमी पडू लागला. कारण आपले चिरंजीव परदेशात जाऊन काय करतील, याचा त्यांना भरोसा वाटत नव्हता. शिक्षण सहज मिळावं, पदवी सहज मिळावी आणि त्यानंतर त्याला (खर्च झाला तरी चालेल, पण-) नोकरीही सहज मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. एकुलत्या एक मुलाला परदेशात पाठवणं त्यांना जड झालं होतं. तिथे तो कसा वागतो, पैशांची उधळपट्टी करतो का, अभ्यास नीट करतो की नाही, यावर कोणतेच नियंत्रण राहिलं नसतं. पण समीरच्या आईने मात्र त्याच्या बरोबरीनेच आग्रह कायम ठेवला की त्याला परदेशात पाठवूच. आईला असं वाटत होतं की, आपला मुलगा परदेशात जाऊन आला, खूप शिकला, स्थिर झाला म्हणजे त्याला भविष्यात चांगली मुलगी स्थळ म्हणून सांगून येईल... समाजात, नातेवाईकांमध्ये शेजाऱ्या-पाजाऱ्यांत आपली मान अभिमानाने उंचावेल!

खूप वाद-विवाद, चर्चा, गरमागरमी घडल्यानंतर समीरच्या वडिलांनी मुलाचा आणि आईचा आग्रह मान्य केला. समीरच्या आनंदाला पारावार उरला नाही. आई अतिशय हरखून गेली. साधारण दोन वर्षांचा मिळून एक कोटी रुपयांचा खर्च होता. ज्या विद्यापीठात समीरने ॲडमिशन मिळवलं होतं, ते विद्यापीठ यथातथाच होतं. त्या विद्यापीठाला स्वतःची विशेष ओळख नव्हती. परदेशात फारशी प्रतिष्ठित नसलेली अशीही काही विद्यापीठे असतात की जी व्यापारी दृष्टिकोनातून चालवली जातात. तशाच विद्यापीठात या समीरला प्रवेश मिळाला होता... समीरची आवड, क्षमता, कल या कशाचाही विचार न करता दोन-चार उत्साही लोकांच्या मदतीने अभ्यासक्रम ठरला, विद्यापीठ ठरले, करिअरचा कोणताही विचार न करता समीरच्या सामानाची बांधाबांध सुरू झाली.

समीरला दहावीला सुमार मार्क होते. बारावीला त्याहून कमी मार्क होते. रिपीट स्टुडन्ट असल्यामुळे ॲडमिशनची मारामार होती. त्यामुळे भरभक्कम फी मोजण्याची त्यांची तयारीही होती; पण उपयोग नव्हता!! आई-वडिलांनी मुलाच्या अभ्यासाकडे, गुणवत्तेकडे लक्ष न देता सर्व लक्ष केंद्रित केलं ते परदेशात शिक्षण देण्यावर! मला असे काही पालक माहिती आहेत, जे स्वतःची आणि मुलांची कमतरता झाकण्यासाठी आणि परदेशातून शिकून आला की सगळं ठीक होईल या भाबड्या आशेपोटी मुलांना परदेशात पाठवतात, पण त्यांच्या पदरी निराशाच येते...

बहुतेक परदेशी विद्यापीठात स्पून फीडिंग होत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास, तुमचे प्रोजेक्ट हे स्वतःहून करायचे असतात. थोडक्यात, आपलं शिक्षण ही महाविद्यालय, विद्यापीठ किंवा शिक्षकांची नव्हे तर आपली जबाबदारी असते आणि आपली इथली रचना ही बऱ्यापैकी स्पून फीडिंगवर उभी आहे. समीर हा स्पून फीडिंगलाही दाद देत नव्हता, तर त्याचा परदेशातल्या विद्यापीठात कसा टिकाव लागणार? तिथे त्याचा पूर्ण गोंधळ उडाला. वेगवेगळ्या देशांतून आलेले विद्यार्थी, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी संस्कृती, अभ्यासाचे नवीन विषय, शिकण्याची नवीन पद्धती... यामुळे तो गोंधळून गेला. इतका की त्या गोंधळातून तो सावरू शकला नाही! साहजिकच तो नवे मित्र जोडताना त्याच्यासारखेच मित्र जोडू लागला, ज्यांना शिक्षणात रुची नव्हती तर मजा करायची होती! पालकांच्या जीवावर चैन करणाऱ्या मुलांची एक विशिष्ट मानसिकता असते. समीर त्याच मानसिकतेचा होता आणि त्याने जोडलेले भारतीय विद्यार्थीसुद्धा त्याच मानसिकतेचे होते.

समीरची स्कॉलर, अभ्यासू, मेहनती भारतीय मुलांबरोबर मैत्री होऊ शकली नाही. कारण तो स्वतःला त्यांच्याशी रिलेट करू शकला नाही. याचा परिणाम असा झाला की, समीर त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. पण माझ्याकडे दोन वर्षांचा व्हिसा आहे. त्यामुळे मी उरलेला काही काळ येथेच राहतो. अजून काही छोटे कोर्स असतील तर बघतो, असं करून त्याने वेळ मारून नेली. वडील इथून पैसे पाठवत होते आणि समीर त्याच्या मित्रांबरोबर चैन करत होता. समीर अर्ध्यावर अभ्यास सोडून आला तर आपली नाचक्की होईल. त्यापेक्षा त्याला दोन वर्षांचा काळ तेथेच पुरा करू दे. आपल्याला पैशांची काही कमी नाही, पण आपली प्रतिष्ठा धुळीला मिळायला नको, अशी भूमिका आईने घेतली. त्यामुळे समीर दोन वर्षे मजेत पूर्ण करू शकला!

समीर परदेशातून शिकून आला म्हणून त्याच्या घरात भरपूर पार्ट्या झाल्या. त्याचे परदेशातले फोटो बघून प्रभावित झालेले मित्र आणि नातेवाईक त्याचं गुणगान करू लागले. भारतात नाही, पण परदेशात जाऊन समीर चमकला, असंही जवळचे लोक म्हणून लागले. समीर काय शिकला, त्याची डिग्री कोणती आहे, याची कुणीच चौकशी केली नाही. समीरला नोकरी मिळू शकत नाही, हे केवळ त्याच्या वडिलांना स्पष्टपणे कळलं होतं...

आता समीर वडिलांच्या पैशांवर व्यवसाय, स्वतंत्र बिझनेस सुरू करण्याच्या विचारात आहे. सात पिढ्यांची तरतूद करून ठेवलेल्या वडिलांच्या पोटात मोठा खड्डा पडला आहे. कारण वडिलांनी कमावलेल्या पैशांचं समीर काय करणार हे स्पष्ट आहे... लाखाचे बारा हजार होण्याचा दिवस जवळ आला आहे! सात पिढ्यांची कमाई आपल्या डोळ्यांदेखत संपणार आहे, हे त्यांना कळून चुकलं आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com