मुलांवर अवाजवी लक्ष ठेवल्याचे परिणाम...

मुलांचं मोठं होणं म्हणजे केवळ उंचीपुरतं मर्यादित नसतं. मुलं जाणिवांच्या, अपेक्षांच्या, अभिव्यक्तीच्या, विचार करण्याच्या पातळीवरसुद्धा मोठी होऊ लागतात.
Children and Parents
Children and Parentssakal
Summary

मुलांचं मोठं होणं म्हणजे केवळ उंचीपुरतं मर्यादित नसतं. मुलं जाणिवांच्या, अपेक्षांच्या, अभिव्यक्तीच्या, विचार करण्याच्या पातळीवरसुद्धा मोठी होऊ लागतात.

मुलांचं मोठं होणं म्हणजे केवळ उंचीपुरतं मर्यादित नसतं. मुलं जाणिवांच्या, अपेक्षांच्या, अभिव्यक्तीच्या, विचार करण्याच्या पातळीवरसुद्धा मोठी होऊ लागतात. पण सतत देखरेखीखाली असलेल्या मुलांची अशा परिस्थितीत कुचंबणा होते. कारण त्यांनी स्वतःहून शोधलेल्या स्वतःच्या वाढीच्या जागा आपल्याला मान्य असतातच, असं नाही आणि आपण सतत देत असलेल्या नकारामुळे त्यांना मिळालेली संधी निष्फळ ठरू शकते.

मुलं मोठी झाल्यानंतरच पालकांचं रिकामंपण हाच धागा पुढे नेताना मी रेश्माताईंना म्हटलं, ‘गृहिणी आणि आई हे दोन्ही रोल अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. आपल्या हातात काय उरलं, असा विचार तुमच्या मनात या टप्प्यावर येणं अगदी स्वाभाविक आहे... कारण तुम्हाला आता स्वतःचा विचार करायला वेळ मिळाला आहे. आपण थोडे उशिरा भेटलो आहोत. आधी भेटलो असतो तर मी तुम्हाला वेगळा सल्ला दिला असता...’

माझ्या म्हणण्यावर रेश्माताईंची उत्सुकता चाळवली असावी. ‘मी तुम्हाला आधी अप्रोच झाले असते, तर तुम्ही मला नेमका काय सल्ला दिला असता?’

त्यांच्या प्रश्नावर मी उत्तरलो, ‘आपण मुलांचं करता करता स्वतःला विसरतो... हा टप्पा कधी कधी खूप धोकादायक ठरू शकतो. म्हणजे मुलांच्या बाबतीत आपण एवढे पझेसिव्ह होतो, की मुलं, मुलांचे आयुष्य, हा आपल्या जगण्याचा संपूर्ण भाग होऊन जातो... आपण म्हणतो त्याप्रमाणे मुलंही वागत असतात आणि आपल्या अपेक्षा वाढत गेल्या तर त्याचं मुलांवरचं ओझं वाढत राहतं... पालकत्व हा फाजील अपेक्षांचा विषय नक्कीच नव्हे. पालकत्व म्हणजे निरपेक्ष प्रेम असावं लागतं... पण पझेसिव्ह झाल्यानंतर अनेक पालक हे सर्व टर्म्स डिक्टेट करायला लागतात. थोडेसे हुकूमशः होतात. सूक्ष्म पातळीवर आपण केलेल्या त्यागाचं त्यांनाच ओझं होऊ लागतं... असं होणं चुकीचं अशासाठी आहे, की तुमचं व्यक्तिमत्त्व हे पूर्ण वेगळं आहे आणि मुलांची व्यक्तिमत्त्वेही निराळीच घडणार आहेत...’’

रेश्माताईंना माझं म्हणणं पटलं असावं. त्यांनी माझ्या सुरात सूर मिसळताना म्हटलं, ‘माझीही अशीच अवस्था झाली होती... माझं म्हणणं सृष्टीने ऐकावं म्हणून मी कधी-कधी खूप हट्टी व्हायचे. दुसरीकडे सृष्टीही तिचं म्हणणं पुढे रेटण्यासाठी हट्ट धरायची. दोघांच्याही हट्टामुळे खूपदा भांडणंसुद्धा झालेली आहेत...’

‘अगदी बरोबर! अनेक घरांमध्ये हेच घडतं... म्हणजे आपलं आयुष्य आणि मुलांचे आयुष्य हे एकाच रेषेत चालू लागलं की आपल्याला निवांत वाटतं, सुरक्षित वाटतं, पण मुलं मात्र जसजशी मोठी होतात, तसतशी अशा परिस्थितीत अस्वस्थ होऊ लागतात. कारण मुलांचं मोठं होणं म्हणजे केवळ उंचीपुरतं मर्यादित नसतं. मुलं जाणिवांच्या, अपेक्षांच्या, अभिव्यक्तीच्या, विचार करण्याच्या, व्यक्तिमत्त्वाच्या आणि मुख्य म्हणजे त्यांना अपेक्षित स्पेसच्या पातळीवरसुद्धा मोठी होऊ लागतात. मुलांना मोठी स्पेस हवी असते... पण सतत निरीक्षणाखाली, सतत देखरेखीखाली असलेल्या मुलांची अशा परिस्थितीत कुचंबणा होते. कारण त्यांनी स्वतःहून शोधलेल्या स्वतःच्या वाढीच्या जागा आपल्याला मान्य असतातच, असं नाही आणि आपण सतत देत असलेल्या नकारामुळे त्यांना मिळालेली संधी निष्फळ ठरू शकते. म्हणजे त्यांना कुठेतरी जायचं असतं, पण आपण सतरा प्रश्न विचारून त्यांचा जाण्याचा बेत हाणून पाडतो. मुलं दरवेळी चुकीचंच वागतील अशी असुरक्षितता उपयोगी नाही. मुलांना सावधपणे, पण मुक्त सोडावंच लागतं. हा मुक्तपणा सतत देखरेखीखाली आणि निरीक्षणाखाली असलेल्या मुलांच्या बाबतीत येतोच असं नाही... कारण मुलांच्या सर्व टर्म्स कधी-कधी पालक डिक्टेट करतात... कारण त्यांना वेळ असतो आणि त्यांनी मुलांसाठी स्वतःच्या आयुष्याचा वेळ दिलेला असतो...’’

‘माझ्याही बाबतीत असं घडलंय खरं...’, रेश्माताई म्हणाल्या.

मी म्हणालो, ‘तुम्हाला निदान लक्षात तरी आलं की तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम झालाय... तुमच्या आयुष्यात मुलं मोठी झाल्यानंतर अचानक एक पोकळी तयार झाली आहे, याची जाणीव तुम्हाला होणेही खूप महत्त्वाचं आहे. खूप पालकांना तेही कळत नाही. पोकळीमुळे त्यांना एक प्रकारचं नैराश्य येतं. चिडचिड होते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांना राग येतो. मग त्यांचे मुलांबरोबर, इतरांबरोबर खटके उडू लागतात. ही अवस्था दीर्घकाळ चालली तर त्याचा सर्वांनाच त्रास होऊ लागतो. मुलं दुरावतात. ती अधिकाधिक बाहेर राहू लागतात. त्याचाही त्रास होतो. म्हणून ही पोकळी नीट समजून घेतली पाहिजे. ही पोकळी तयार होण्यामागे आपणच कारणीभूत आहोत. कारण आपण मुलांवर अवाजवी लक्ष ठेवलं आहे. अवाजवी देखरेख केली आहे किंवा अवाजवी वेळ दिला आहे. कुठल्याही अवाजवी गोष्टीने समस्याच तयार होतात. मुलांकडे वाजवी लक्ष दिलं पाहिजे... अवाजवी लक्ष दिलं, अवाजवी लक्ष ठेवलं तर त्याचा त्रास मुलांना तर होतोच, पण नंतर नंतर आपल्यालाही होतो. आपल्या आयुष्यातली अशा प्रकारची पोकळी म्हणजे आपण मुलांवर अवाजवी लक्ष ठेवल्याचा परिणाम आहे. मुलांसाठी आपण किती वेळ द्यायचा, आपली किती जागा कोणत्या टप्प्यात कशी व्यापून द्यायची हेही पालकांनी निश्चित करावं लागतं. मुलं जसजशी मोठी होतात, तसतसं आपलं लक्ष हे कमी कमी करावंच लागतं. अति लक्ष दिल्याने मुलांच्या वाढीमध्ये किंवा मुलांना त्यांच्या भावी आयुष्यात त्रास होऊ शकतो...’’

रेश्माताईंनी दीर्घ निःश्वास सोडला. म्हणाल्या, ‘‘असो, मला उशिरा शहाणपण सुचलं आहे...’

‘हरकत नाही!’, मी म्हणालो...

‘या टप्प्यावरही तुम्हाला हे समजलं, हेच महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं पॅशन शोधा... तुम्ही तुमची आवड शोधा... तुम्ही तुमचं म्हणून एक लाईफ जगायला लागा... मुलांना वाढवणे ही आपली जबाबदारी असते, त्याहीपेक्षा ते एक पॅशन असतं... पण केवळ तेच एक पॅशन ठेवून चालत नाही. मुलांना वाढवणं हा आनंदाचा विषय असतो. तसेच स्वतःचे इतर आनंदाचे विषय आपण शोधले पाहिजेत आणि ते जोपासले पाहिजेत... त्याचा सुपरिणाम मुलांवरती असा होतो, की मुलं आपल्या ॲक्टिव्हिटीजकडेही बघत असतात. निरीक्षण करत असतात आणि त्यातून स्वतःला घडवत असतात. म्हणून केवळ मुलं वाढवणं ही एकमेव ॲक्टिव्हिटी असू शकत नाही. त्याबरोबरच आपली स्वतःची म्हणून एखादी ॲक्टिव्हिटी गृहिणीने बाळगायलाच हवी...’

मी त्यांना माझं म्हणणं सांगितलं.

‘मला भरतनाट्यम खूप आवडतं... आता पुन्हा सुरू करते...’, हे रेश्मा ताईंनी स्वतःला दिलेलं वचन होतं... मी त्यांना त्यांच्या भरतनाट्यम् शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्या स्वीकारल्या. आता मी त्यांच्या भरतनाट्यम परफॉर्मन्सच्या आमंत्रणाची वाट पाहतो आहे...

(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com