पालक-मुलांच्या संवादातील एकजीनसीपणा

काही दिवसांपूर्वी मी पालकांची एक कार्यशाळा घेतली. त्यात तुम्ही मुलांशी बोलताना सर्वाधिक कोणती वाक्ये बोलता, त्याबाबत विचारणा केली.
Parents and Children
Parents and Childrensakal
Summary

काही दिवसांपूर्वी मी पालकांची एक कार्यशाळा घेतली. त्यात तुम्ही मुलांशी बोलताना सर्वाधिक कोणती वाक्ये बोलता, त्याबाबत विचारणा केली.

काही दिवसांपूर्वी मी पालकांची एक कार्यशाळा घेतली. त्यात तुम्ही मुलांशी बोलताना सर्वाधिक कोणती वाक्ये बोलता, त्याबाबत विचारणा केली. मला आलेल्या उत्तरांपैकी बहुतांश वाक्ये ही नेहमीच होती. ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणेच ‘घरोघरी तीच वाक्ये’ अशीही म्हण असायला हरकत नाही! सर्वांचे प्रश्न एकच आहेत आणि विचार करण्याची पद्धतही एकच आहे. त्यावर अनेक पालकांनी आपल्या विचारसरणीत बदल करण्याची तयारी दर्शवली.

लकांच्या कार्यशाळेत मी पालकांना कोऱ्या चिठ्ठ्या वाटल्या. ते कोरे कागद हातात पडल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य झळकलेलं होतं. मी पालकांना म्हटलं, ‘आपण कार्यशाळेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या कागदावर मला काही लिहून द्यायचं आहे.’ साहजिकच पालकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही तुमच्या मुलांशी दिवसभरात संवाद साधता. या संवादादरम्यान तुम्ही मुलांशी जी वाक्य रोज आणि सर्वाधिक बोलता, ती मला या कागदावर लिहून हवी आहेत...’

काही पालकांना विषय लक्षात आला, काही पालकांना अजून स्पष्टीकरण हवं होतं. म्हणून मी त्यावर अधिक स्पष्ट करून त्यांना सांगितलं.

‘असं समजा, आपण मुलांना रोज काही ना काही सांगत असतो. मुलांना रोज काही ना काही सूचना देत असतो. रोज त्यांच्याशी काहीतरी बोलत असतो... जे आपण रोज बोलतो... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या विषयावर सर्वाधिक बोलतो, अशी तुमची वाक्य मला यावर लिहून हवी आहेत.’

बोलण्याच्या ओघात मी अजून एक महत्त्वाची सूचना त्यांना केली...

‘अजून एक महत्त्वाचं! मला प्रामाणिकपणे तुम्ही मुलांशी जे बोलता, तेच हवं आहे... कृपा करून आदर्श वाक्य, जी कदाचित तुम्ही बोलतच नसाल, ती यात टाकू नका! आपल्याला मुलांशी होणारा संवाद अभ्यासायचा आहे... त्यामुळे आपण रोज जे मुलांशी बोलतो, तेच कागदावर आलं तर चांगलं होईल आणि आपल्या उपक्रमाला त्याचा फायदा होईल!’

नेमका विषय आता सर्वांच्याच लक्षात आला होता. पालकांनी लिहायला सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर माझ्या हातात सर्व कागद जमा झाले. मग मी माझ्या सहायकांच्या मदतीने त्यातले सर्वाधिक वेळा आलेले काही कॉमन प्रश्न बाजूला काढले आणि ते प्रश्न लिहून काढले. म्हणजे माझ्या हातात आता पालक मुलांशी रोज सातत्याने जो संवाद साधतात, मुलांना ज्या सूचना करतात किंवा मुलांना जे प्रश्न करतात ते माझ्या हातात आले होते. मी त्या प्रश्नांवर नजर टाकली आणि त्या संपूर्ण उपक्रमाचा सारांश पालकांना सांगू लागलो...

पालक मुलांशी रोज सातत्याने बोलतात, अशी वाक्य काय होती?

१. आज शाळेत काय झालं?

२. डबा खाल्लास का? डबा संपवला का नाहीस?

३. क्लासमध्ये काय झालं?

४. अभ्यास झाला का?

५. परीक्षा कधी आहे? मागच्या परीक्षेचे रिझल्ट काय आले?

६. किती पसारा मांडलाय घरात...

७. इतके कमी मार्क का?

८. फार वेळ टीव्ही बघू नकोस! किती वेळ टीव्ही बघत बसणार आहेस?

९. तू मोबाईल आधी बाजूला ठेव...

१०. किती आळस भरलाय तुझ्या अंगात...

११. अभ्यासाचा कंटाळा करू नकोस...

१२. उद्याची तयारी आजच कर... स्कूल बॅग भरून ठेव!

१३. किती वेळ खेळणार आहेस? बस्स झालं आता...

१४. तुम्हा आजकालच्या मुलांना अजिबात शिस्त नाही...

१५. उठ की आता! किती वेळ झोपणार आहेस?

मी एका पालकांना विनंती केली आणि हे सर्व प्रश्न वाचून काढायला सांगितले. त्या पालकांनी पालकांकडूनच आलेले सर्व प्रश्न वाचून दाखवले आणि कार्यशाळेत एकच हशा पिकला...

आपण सर्वच जण मुलांशी एकाच भाषेत बोलतो, याची जाणीव पालकांना झाली. मग मी पालकांना म्हटलं, ‘बघा, ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणेच ‘घरोघरी तीच वाक्ये’ अशी सुद्धा म्हण असायला हरकत नाही! तुम्हा सर्वांचे प्रश्न एकच आहेत, याचा अर्थ तुम्हाला पडणारे प्रश्न एकच आहेत... तुमच्या समस्या एकच आहेत... तुमच्या अडचणीही एकच आहेत आणि तुमची विचार करण्याची पद्धतसुद्धा एकच आहे...’

पालकांना हा मुद्दा पटला.

‘तुम्हाला यामध्ये काही बदल करावासा वाटतो का? तुमचं काहीतरी चुकतंय असं तुम्हाला वाटतं का?’’ असा प्रश्न करताच सर्वच पालक विचारात पडले. आपल्या वाक्यांमध्ये बदल करायला हवा, असं साधारणपणे बहुतेक पालकांना वाटत होतं.

‘समजा, तुम्ही मुलं आहात आणि तुमचे पालक तुमच्याशी रोज याच भाषेत बोलू लागले, तर तुम्हाला काय वाटेल याचा तरी विचार कराल?’’

माझ्या या प्रश्नावर मात्र पालक अंतर्मुख झाले आणि एक एक करत बोलू लागले. मी त्यांना बोलू देत होतो...

‘मला तेच तेच ऐकून कंटाळा येईल.’

‘मी तर दुर्लक्षच करेन...’

‘पालकांच्या सूचना तितक्या महत्त्वाच्या नाहीत.’

‘रोज तेच तेच ऐकून कान किटतील माझे...’

‘त्याच त्या सूचना रोजरोज केल्याने त्याचं महत्त्वच संपून जाईल.’

‘पालकांकडून दुसऱ्या अपेक्षाच उरणार नाहीत.’

वगैरे वगैरे...

मग मी बोलू लागलो... ‘बघा..! एवढं सगळं माहीत असूनसुद्धा आपण मुलांना रोज त्याच त्या सूचना करतो, ज्या निरुपयोगी असतात. ज्या अर्थी तुम्ही रोज त्याच त्या सूचना करता त्या अर्थी त्या सूचना निरर्थक आणि निष्प्रभ असतात. आपण मुलांशी होणाऱ्या संवादाचा पॅटर्न नीट लक्षात घेतला पाहिजे. आपण मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे... केवळ सूचना आणि आदेश म्हणजे संवाद नव्हे... संवादामध्ये ऐकण्याला जास्त महत्त्व आहे... आपण मुलांचं ऐकलं पाहिजे... मुलांना आपण असे प्रश्न विचारले पाहिजेत की ज्यावर ते जास्तीत जास्त खुलतील आणि बोलतील. आपण मुलांना जेव्हा बंदिस्त प्रश्न विचारतो तेव्हा ‘हो’ किंवा ‘नाही’ म्हणण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसतं. आता जे १५ प्रश्न आपण कॉमन म्हणून काढले आहेत. त्यात मुलांना उत्तर द्यायला कोणताही वाव नाही! हे प्रश्न नसून जाब आहेत की काय असा संशय येतो... आणि जेव्हा आपण जाब विचारतो तेव्हा संवाद संपलेला असतो. आपण मुलांबरोबर संवाद साधत नाही, कारण आपण पालक म्हणून जाब विचारण्याच्या भूमिकेत जातो. मला वाटतं आपल्याला इथे सुधारणा करायला हवी...’

पालकांच्या प्रतिसादावरून मला स्पष्ट कळत होतं, की पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची फोलता त्यांच्या लक्षात आली आहे. मग मी त्यांना म्हणालो की, तुमच्यापैकी काही पालकांच्या चिठ्ठ्यांमध्ये मुलांबरोबरचा संवाद नेमका कसा असायला हवा, याची झलक मला बघायला मिळालेली आहे. कारण काही पालकांच्या चिठ्ठ्यांमध्ये अपवादात्मक सुंदर प्रश्न जरूर होते. तेही मी एका कागदावर लिहून काढले होते...

मुलांबरोबरचा संवाद कसा घडायला हवा याचा तो आदर्श वस्तुपाठ होता.

मी तेही प्रश्न वाचू लागलो....

(काय होते ते प्रश्न? पुढच्या भागात नक्की वाचा!)

(आपल्यापैकी अनेक जण पालकयात्राचे लेख फॅारवर्ड करता, शेअर करता याबद्दल मनापासून आभार...)

sanjeevlatkar@hotmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com